पवनी

प्रकार : भुईकोट

जिल्हा : भंडारा

उंची : 0

श्रेणी : सोपी

भंडाऱ्यापासून ४२ कि.मी.तर नागपूर पासून ८४ कि.मी. अंतरावर पवनी शहर आहे. एका बाजूने वैनगंगा आणि उरलेल्या तीन बाजूंनी टेकडय़ा अशी या शहराची रचना आहे. पवनी तालुक्याचे मुख्यालय असलेल्या या शहरात पवन राजाचा किल्ला म्हणुन ओळखला जाणारा पवनी किल्ला आहे. हा किल्ला म्हणजे शहराचे एका बाजूने रक्षण करण्यासाठी टेकडीवर बांधलेली सलग तटबंदी आहे. या तटबंदीच्या आत ऐतिहासिक पवनी नगर वसले आहे. पवनी शहराकडे जाताना दुरूनच टेकडीवर असलेली या किल्ल्याची तटबंदी व तिच्या पायथ्याशी असलेला तलाव नजरेस पडते. पुरातत्व विभागाच्या ताब्यात असणारा हा किल्ला त्यांच्या देखरेखीखाली आजही सुस्थितीत आहे. शहरात जाणारा मुख्य रस्ता किल्ल्याच्या तटबंदीत असलेल्या दरवाजातुनच आत शिरतो त्यामुळे किल्ला शोधावा लागत नाही. भक्कम बांधणीचा हा दरवाजा आजही सुस्थितीत असुन मोठी वहाने देखील यातून सहज ये-जा करतात. ... दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन येथे असलेल्या बांधीव पायऱ्यांनी तटावर जाण्याचा मार्ग आहे. तटबंदीवर जाताना पायऱ्यांच्या उजव्या बाजुस दगडी बांधकामातील जोत्यावर कोरीव खांब पहायला मिळतात. या वास्तुच्या आत तटबंदीत एक कोठार बांधलेले आहे. तटबंदी व बुरूजाचा खालील भाग दगडांनी बांधलेला असुन फांजीवरील भाग विटांनी बांधुन काढला आहे. फांजीवरील भागात असलेल्या तटबंदीत सुंदर चर्या बांधलेल्या असुन त्यात बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या ठेवलेल्या आहेत. किल्ल्याच्या या तटबंदीत एकुण ६ बुरुज असुन त्यातील सुरवातीच्या दोन बुरुजांची वरील बाजु पुर्णपणे नष्ट झाली आहे. उरलेले ४ बुरुज सुस्थितीत असुन यातील दोन बुरुजांच्या वरील बाजुस मनोरे आहेत तर एका बुरुजावर ध्वजस्तंभाची जागा आहे. प्रत्येक बुरुजांजवळ फांजीवर चढउतार करण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. फांजीवरून तटबंदीला फेरी मारताना त्यात बांधलेले एक शौचकूप पहायला मिळते. किल्ल्याच्या पश्चिमेला असलेल्या खंदकाचे रूपांतर तलावात झाले असुन हा तलाव बालसमुद्र म्हणून ओळखला जातो. टेकडीच्या दुसऱ्या टोकापर्यंत गेले असता तेथे एक दर्गा पहायला मिळतो. संपुर्ण तटबंदी व दरवाजा पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. वैनगंगेच्या तीरावर पवनी हे नगर प्राचीन काळापासुन अस्तित्वात आहे. वैनगंगेच्या काठावर असलेला हा प्रदेश वेणाकट म्हणुन ओळखला जात होता. भंडारा जिल्हा गॅझेटियरमध्ये पवनीचा उल्लेख पद्मावती नगर असा येतो. भारतीय पुरातत्त्व विभागाने येथे केलेल्या उत्खननात पवनी येथे इ.स.पूर्व पहिल्या शतकातला कुषाणा क्षत्रप रूपीअम्मा याचा शिलालेख सापडला. त्याला सातवाहन सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीने पराभूत केले. या विजयानंतर सातवाहन राजांनी नाशिक येथील एका लेण्यातील शिलालेखात स्वत:ला वेनाटक स्वामी म्हणुन संबोधले आहे. इ.स. १३१८ मधील देवगिरी यादवांच्या पराभवानंतर या भागावर काही काळ देवगडच्या गवळी राजांची सत्ता होती. त्यानंतर मोगलांचे मांडलिक असलेल्या गोंड राजांनी हा प्रदेश ताब्यात घेतला. इ.स.१७३९ मध्ये नागपूरचे रघुजी भोसले यांनी वलीशाह या गोंड राजाचा पराभव करून सत्ता स्थापन केली. त्यांनी तुळजोरामपंत या सरदाराला पवनीत बंदोबस्ताकरिता ठेवले. २५ सप्टेंबर १८१८ ला मेजर विल्सन यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश फौजांनी भोसल्यांचा पराभव करत पवनी शहर ताब्यात घेतले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!