पवनार
प्रकार : भुईकोट
जिल्हा : वर्धा
उंची : 0
श्रेणी : सोपी
पवनार म्हटले कि आपल्यला आठवतो आचार्य विनोबा भावे यांचा परमधाम आश्रम. वर्धा शहराच्या दक्षिणेस धाम नदी काठावर असलेला हा आश्रम सर्वाना परीचीत असला तरी याच धाम नदीच्या तीरावर वसलेला पवनार किल्ला मात्र आज विस्मृतीत गेला आहे. पवनारची ओळख हि जुनी असुन प्राचीन काळी पवनार ही वाकाटक राजा प्रवरसेनाची राजधानी होती. प्रवरपूर नावाने ओळखले जाणारे हे नगर काळाच्या ओघात पवनार झाले. प्रवरपूरचा वैभवशाली इतिहास सांगणारे किल्ल्याचे अवशेष आजही पवनार येथे पहायला मिळतात. आजच्या संगणक युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नसल्याने या किल्ल्यांला भेट दिली असता मिळालेली माहिती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. किल्ल्याचा बराचसा भाग पुर्णपणे नष्ट झाला असुन काही अवशेष आजही काळाशी झुंज देत उभे आहेत. स्थानिकांचे या किल्ल्याबद्दलचे अज्ञान व उदासीनता या किल्ल्याच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे.
...
पवनार किल्ल्याला जाण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वर्धा शहर गाठावे लागते. वर्धा ते पवनार हे अंतर १० कि.मी. असुन तेथे जाण्यास बस तसेच रिक्षा उपलब्ध आहेत. भौगोलिकदृष्ट्या पवनार किल्ल्याचे दोन भाग पडलेले असुन गावाभोवती असलेला कोट हा नगरदुर्ग तर नदीकाठी उंच टेकडीवर असलेला किल्ला सैन्याचे ठाणे असावे असे वाटते. कधीकाळी पवनार गावाला असलेल्या तटबंदीत चार दरवाजे असल्याचे स्थानिक लोक सांगतात पण आज मात्र हि तटबंदी पुर्णपणे नष्ट झाली असुन चार दरवाजापैकी केवळ एकाच दरवाजा शिल्लक आहे. पवनार गावात आल्यावर सर्वप्रथम पवनार-सेवाग्राम रस्त्यावर असलेला हा दरवाजा पाहुन घ्यावा. साधारण २५ फुट उंचीच्या या दरवाजाचे खालील बांधकाम घडीव दगडांनी तर वरील बांधकाम विटांनी केलेले आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजूस अर्धवट तुटलेला देवनागरी भाषेतील शिलालेख पहायला मिळतो. नगरदुर्गाचा शिल्लक असलेला हा एकमेव अवशेष पाहुन धाम नदीकाठी टेकडीवर असलेला किल्ला पहाण्यास जावे. किल्ल्याकडे जाणारा रस्ता नदीकाठाने थेट किल्ल्यावर जातो. जाताना वाटेच्या उजव्या बाजुस एके ठिकाणी नगरदुर्गाची थोडीफार तटबंदी व त्यात असलेला लहान बुरुज पहायला मिळतो. टेकडीचा चढ सुरु झाल्यावर वाटेच्या उजव्या बाजूस झाडीत लपलेली मुख्य किल्ल्याची ढासळलेली तटबंदी व दोन बुरुज पहायला मिळतात. या ठिकाणी बहुदा किल्ल्याचा दरवाजा असावा असे वाटते. वाटेत पुरातत्व खात्याचे नावापुरता अस्तित्व दाखवणारे फलक दिसुन येतात. रस्त्यावरील कमान ओलांडुन आपण किल्ल्यात असलेल्या दर्ग्यापाशी येऊन पोहोचतो. मुख्य दर्ग्याच्या आवारात मोठया प्रमाणात कबर पसरलेल्या असुन दोन लहान दर्गे नव्याने बांधले आहेत. दर्ग्यासमोरील मोकळ्या आवारात लोखंडी जाळीने बंदिस्त केलेली एक खोल विहीर पहायला मिळते. त्रिकोणी आकाराचा हा किल्ला दक्षिणोत्तर साधारण ८ एकर परिसरावर पसरलेला आहे. तटावरून फेरी मारताना किल्ल्याच्या दोन बाजूस पसरलेले धाम नदीचे पात्र दिसते. किल्ल्यावरून नदीच्या बाजूस उतरुन किल्ल्याला फेरी मारल्यास झाडीत लपलेली तटबंदी व बुरुज दिसुन येतात. मुघल काळात पवनार हे मोगलांचे विदर्भातील एक महत्वाचे ठाणे होते.
© Suresh Nimbalkar