परंडा
प्रकार : भुईकोट
जिल्हा : धाराशीव
उंची : 0
श्रेणी : सोपी
महाराष्ट्राला दुर्गवैभवाची मोठी परंपरा आहे. सह्याद्रीच्या मुख्य धारेवर असणारे गिरीदुर्ग सह्याद्रीच्या नैसर्गिक सुरक्षा कवचामुळे बलदंड व अजिंक्य राहिले होते. परंतु जसं जसं आपण सह्याद्रीच्या डोंगररांगांपासून सपाटीकडे सरकू लागतो तसतसे या किल्ल्यांचं स्थापत्य बदलताना दिसते. यांच्या डोंगरी रूपाचे भुईकोटात रुपांतर होते. मराठवाडा, विदर्भ आणि देशावरील सपाट प्रदेशात असे भक्कम भुईकोट आणि गढी मोठय़ा प्रमाणात दिसुन येतात. भुईकोट हे जमिनीवर असल्यामुळे सहजपणे होणारे आक्रमण लक्षात घेऊन या किल्ल्यांची बांधणी केली जात असे. अशाच भुईकोटाच्या अग्रभागी असलेला एक भुईकोट म्हणजे परांडा. परांडा गावात हा किल्ला आजही मोठय़ा दिमाखात उभा असुन किल्ल्यावर असणाऱ्या विवीध तोफा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. परांडा हे उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्याच्या तालुक्याचे ठिकाण उस्मानाबाद आणि सोलापूर यांच्या हद्दीवर असुन एसटीने येथे जाणे सोयीचे आहे.
...
ट्रेनने यायचे असल्यास कुर्डुवाडी येथे उतरावे. कुर्डुवाडी ते परांडा अशी बससेवा दर अर्ध्या तासाला आहे. परांडा एस.टी. स्थानकापासून चालत पाचच मिनिटांत आपण या किल्ल्यासमोर पोहोचतो. आयताकृती आकाराचा हा किल्ला दहा एकरपेक्षा जास्त परीसरात पसरलेला आहे. किल्ल्याच्या बाहेरील तटबंदीत सव्वीस बुरुज व आतील तटामध्ये एकोणीस असे एकुण ४५ बुरुज किल्ल्याला आहेत. किल्ल्याला दुहेरी तटबंदी असुन बाहेरील तटाला लागून संपुर्ण किल्ल्याभोवती मोठा बांधीव खंदक आहे. किल्ल्याच्या उत्तरेकडे ईशान्य बाजूस खंदकावरून आत प्रवेश करण्यासाठी पूल बांधलेला असुन पुर्वीच्या काळी हा पूल लाकडी असुन काढता घालता येत असे त्यामुळे हा पूल नसताना किल्ल्यांत प्रवेश करणे शक्य नसे. या पुलावरून आपण पहिल्या दरवाजापाशी येतो. गडाचा पहिला दरवाजा खूप मोठा आहे. पुरातत्व खात्याने सध्या येथे नवीन दरवाजा बसवलेला असुन मूळ दरवाजा आतील बाजुस ठेवलेला आहे. या दरवाजाच्या वरील बाजुस दुमजली दगडी सज्जा असून त्यात जंग्या आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस समोर एक रांगत जाता येण्याइतका लहान दरवाजा आहे. पहिल्या दरवाजातून आत शिरल्यावर डावीकडे दुसरा दरवाजा लागतो. यातून आत शिरल्यावर आपण चारही बाजूंनी तटबुरुज वेढलेल्या जागेत येतो. किल्ल्यावर असलेल्या सर्व लहान तोफा पुरातत्त्व खात्याने या तटबंदीच्या आतील देवड्यात रचुन त्यांची तोंडे जंग्यामधुन बाहेर काढली आहेत. दुसऱ्या तटामधील दरवाजाला आतल्या बाजूने बुरुज आहे तसाच बाहेरुन दोन्ही बाजूला एक एक बुरूज आहे. आतल्या बाजूच्या बुरुजाच्या दारावर बाहेर आलेला छोटासा सज्जा आहे. आतील मोकळ्या भागात उजव्या बाजूला तटबंदीच्या भिंतीत कोरीव शिल्पपट्टी आणि त्याखाली दोन व्याल पाहायला मिळतात. तटाला असलेल्या दोन्ही बाजूच्या पायऱ्यांनी बाहेरील तटाच्या फांजीवर व दरवाजावर जाता येते. या तटावर अनेक ठिकाणी देवळाचे दगड व वीरगळ भिंतीत दगड म्हणुन वापरलेले पहायला मिळतात. हा गड मूळ हिंदू राजवटीचा असल्याच्या खाणाखुणा आजही इथल्या बांधकामावर जागोजागी दिसतात. पुढे उजवीकडे किल्ल्याचा पूर्वाभिमुख तिसरा दरवाजा आहे. येथील मूळ दरवाजा आजही शिल्लक असुन त्यावरील लाकडी फळय़ा, पोलादी टोकदार सुळे, साखळदंड, अडसर, दिंडी दरवाजा या सर्व गोष्टी आजही पहाता येतात. यातून आत शिरल्यावर समोरच एक मोठा बुरुज आडवा येतो. या बुरुजाच्या डावीकडे सहा-सात कमानी असलेली एक इमारत दिसते. किल्ल्याची सध्या मोठया प्रमाणात डागडुजी चालु असल्याने यात पुरातत्त्व विभागाचे कार्यालय आहे या बहुदा घोडेपागा किंवा पहारेकऱ्यासाठी देवड्या असाव्यात. येथुन बुरुजाच्या उजवीकडे वळुन किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीमध्ये जाता येते. तटबंदीच्या बेचक्यातून हि वाट थेट महादेवाच्या मंदिरापाशी घेऊन जाते. जाताना वाटेत एका ठिकाणी दगडी बांधकामाच्या खोलीत कबरीचे अवशेष दिसतात. दुहेरी तटबंदी ही या किल्ल्याच्या स्थापत्याच्या अजोड नमुना असुन अशी तटबंदी फार कमी ठिकाणी पाहायला मिळते. खंदकानंतर बांधलेल्या तटबंदीनंतर साधारण ५० ते ६० फूट अंतर ठेवून दुसरी उंच तटबंदी बांधली गेली आहे. दोन्ही तटांमध्ये जागोजागी जंग्या बांधल्या असुन दोन तटांमधून आत जायला वेगळे दरवाजे आहेत. या दोन तटबंदीमधून आपण आतील संपुर्ण किल्ल्याला फेरी मारू शकतो पण आतील भागात जाण्यासाठी मुख्य दरवाजाकडेच यावे लागते. ह्या व्यतिरिक्त आत जायला एकही मार्ग नाही. हे पाहुन परत मागे फिरावे व आपण जिथुन वळलो त्या ठिकाणी येऊन वाट उजवीकडे वळते तिथे किल्ल्याचा चौथा भव्य असा उत्तराभिमुख दरवाजा आहे. दरवाजाच्या कमानीवर मध्यभागी डोळय़ाच्या आकारात एक पर्शियन लिपीतील शिलालेख बसवलेला आहे. चौथ्या प्रवेशव्दाराची उंची जवळजवळ ४० ते ५० फुट असुन शेजारील बुरुजांची उंची जवळपास ६० फुट भरेल. दरवाज्याच्या समोर आजही पाणी असलेली एक छोटीशी आयताकृती ५० फुट खोल विहीर आहे. कमानीच्या समोरच एक महाकाय बुरुज असुन त्यावर २० फुट लांबीची तोफ आहे पण तेथे जाण्यासाठी किल्ल्यातून वाट आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर आपला मुख्य किल्ल्यात प्रवेश होतो. उजव्या हाताची वाट एका छोटय़ा दरवाजातून गडातील पूर्वाभिमुख मशिदीत जाते. ही मशीद म्हणजे पूर्वीचे माणकेश्वर मंदिर होते. मशिदीचे चाळीस स्तंभ व उत्तरेकडील भिंतीतील दगडी जाळी व अन्य भाग हे यादवकालीन हिंदू शैलीतील आहेत. मशिदीसमोर एक छोटासा हौद असुन मशीदीत येण्यासाठी उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे छोटे दरवाजे आहेत. मशीदीवर ४ कोपऱ्यात ४ व मध्यभागी दोन असे एकुण सहा छोटे मिनार आहेत. मशिदीवर जाण्यासाठी पायऱ्याची सोय केलेली आहे. मशीद पाहून पुन्हा दरवाज्यापाशी यायचे आणि उजवीकडे निघायचे. मशिदीच्या उजव्या बाजूने एक वाट पहारेक-यांच्या देवडय़ांवरून जाते. या देवड्यात गडावर करण्यात आलेल्या सफाईमध्ये मिळालेले दारूगोळे आणि भंगलेल्या तसेच अखंड छोटय़ा तोफा आणि पंचधातूची तोफ़ रचुन ठेवलेल्या आहेत. त्याच्या मागे असणाऱ्या खोलीत असंख्य तोफगोळे पडलेले दिसतात. दारूगोळय़ासह दिसणारे किल्ल्यावरील हे एकमेव दारूकोठार असावे. या कोठाराला लागून उजव्या बाजुला एक चौकोनी कोरडा हौद आहे. त्याच्यापुढे अजुन काही बांधकामाचे पडके अवशेष दिसतात. देवड्याच्या समोरच हमामखाना असुन त्यातील एका खोलीत गडावरील साफसफाईत मिळालेली काही शिल्पे, शिलालेख, देवतांच्या मूर्ती ठेवल्या आहेत. नागफणा असलेला पार्श्वनाथ, शेषावर आरूढ झालेला विष्णू, गद्धेगाळ, एक पर्शियन शिलालेख, वीरगळ आणि अन्य बरेच काही इथे आहे पण यामध्येही लक्ष जाते ते विविध आयुधे, कमळ, मोदक घेतलेल्या सहा हातांच्या ४ फुट उंच गणेशमूर्तीकडे. या हमामखान्यासमोरच एक तळघर आहे. या तळघराच्या समोर एक लालवीटांनी बांधलेली इमारत आहे. हे सर्व पाहून मध्यभागी असलेल्या राजवाडय़ाच्या भागात यावे. या राजवाडय़ाचा बराचसा भाग कोसळले असुन तेथे डागडुजीचे काम चालु आहे. या भागातच तटाच्या बाजुला एक पायऱ्याची भली मोठी चौकोनी विहीर आणि नृसिंहाचे मंदिरही आहे. हे मंदिर आदिलशाही सरदार मुरार जगदेवने बांधल्याचे सांगितले जाते. दुसऱ्या एका मंदिरात गरुडावर स्वार लक्ष्मी-नारायणाची मूर्ती दिसते. मंदिरासमोर एक समाधी असून त्याला लागून भैरवाची मुर्ती आणि वीरगळ आहे. या भागातच कमानींची रचना असलेली बहुमजली अष्टकोनी विहीर आहे. विहिरीचा घेर बराच मोठा असून विहिरीच्या आतील भागात काही मजले बांधून काढले आहेत. एका कमानीखालील भुयारी मार्गातून आपण या विहिरीत उतरतो. प्रत्येक मजल्यावर उतरण्यासाठी बांधकामातच जिन्यांची रचना केलेली असुन आजही या विहिरीला भरपूर पाणी आहे. किल्ल्याचा हा आतील भाग पाहून पुन्हा मशीदीपाशी यायचं व तेथुन तटबंदीवर चढायचे. तटबंदीवर आलो की आपण चौथ्या दरवाजाच्या बाजूला असलेल्या ढालकाठीच्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजावर वजनाने आणि आकाराने सर्वात मोठी मलिक-ए-मैदान तोफ आहे. हि पंचधातूची तोफ २० फुट लांब असुन तिच्यावर सात ठिकाणी पर्शियन लेख कोरलेले असुन त्यातील एक लेख तोफ़ेच्या तोंडावर कोरलेला आहे. तसेच मध्यभागी वीतभर उंचीची सिंहांची एक जोडी असुन यातील एक सिंह कोणीतरी अर्धवट कापुन नेला आहे. तोफेचा मागचा भाग हा गदेसारखा असुन या भागाला पाकळ्यांचा आकार दिलेला आहे. या बुरुजाच्या डाव्या बाजूला चौथ्या दरवाजावर नगारखाना आहे. तटबंदी उतरून फ़ांजीवरुन चालायला सुरुवात केल्यावर तोफ़ेच्या बुरुजापासून तिसऱ्या बुरुजावर मोठी तोफ़ आहे. पुढे चालत गेल्यावर ८ व्या बुरुजावर अजुन एक मोठी तोफ़ आहे. पुढे दहाव्या बुरुजावर एक कमान असलेली छोटी हवामहल इमारत आहे. बाराव्या बुरुजावर एक मोठी बांगडी तोफ़ असुन तोफ़ेच तोंड मगरीच्या आकाराचे आहे. या तोफ़ेला दोन्ही बाजूला कड्या आहेत. सदर तोफ हि पंचधातूची असून चार मोठ्या बांगड्या जोडून तयार केल्याचे दिसते. प्रत्येक जोडणीच्या ठिकाणी नक्षीदार रिंग कोरलेली असुन तोफेला एके ठिकाणी खड्डा पडलेला दिसतो. पश्चिम तटाच्या कोपऱ्यावरील बुरुजावरील तोफेला मगरीचा चेहरा दिलेला असून तिच्या जबडय़ात तोफेचा गोळा दाखवला आहे. या तटावरच एका तोफेवर ईस्ट इंडिया कंपनीचा मोनोग्राम आणि १६२७ सालचा उल्लेख आहे. पोलादी तोफाही अशाच भल्यामोठय़ा आकाराच्या आहेत. परांडा किल्ल्याचे खरे वैभव हे या बुलंद तटबुरूज आणि बुरुजांवरील प्रचंड तोफांमध्ये आहे. प्रत्येक बुरुजावर असणाऱ्या तोफांमध्ये सहा तोफा पंचधातूच्या तर उर्वरित पोलादी आहेत. परांडाच्या तटबंदीवरुन फिरतांना या सर्व तोफा दिसतात. यांची नावे मलिक-मैदान ऊर्फ रणरागिणी, अझदहपैकर ऊर्फ सर्परूप, लांडाकासम, खडक अशी असुन या तोफांवर ती घडवणाऱ्यांचे पर्शियन व इंग्रजीत नावे व लेख आहेत. तटबंदीमध्ये बुरुज- तटबंदी-बुरुज अशी ही सर्व वाट आहे. या बुरुजांना महाकाळ, बुलंद, चंचल, शाह, नासा आणी ईदबुरुज अशी नावे आहेत. तटावरून फिरत असताना बाहेरील तटाखाली असलेल्या खंदकाकडे आपले सतत लक्ष जात असते. पाण्याने भरलेला खंदक हा कुठल्याही भुईकोटाची पहिली संरक्षक फळी असते पण तिथे आज सांडपाणी सोडलेले असुन बाभळीच्या झाडांचे जंगल माजले आहे. पश्चिम तटाच्या कडेने अनधिकृत दुकाने उभी राहिली आहे. तटावरून फिरताना जाडजूड रुंदीच्या या तटावरून खालीवर ये-जा करण्यासाठी जागोजागी जिने, भुयारी मार्ग ठेवलेले आहेत. गडाच्या आतील भागातील प्रत्येक बुरुजापुढे बाहेरील तटबंदीत दुसऱ्या बुरुजाचे चिलखत घातलेले आहे. या तटाला वरच्या बाजूने पाकळय़ांची झालर लावलेली आहे. संपुर्ण तटबंदी फिरून जेथुन सुरवात केली त्या चौथ्या दरवाजाकडे आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण किल्ला फिरण्यास दोन तास लागतात. किल्ल्याची दुहेरी तटबंदी, तटबंदीतील ४५ बुरूज व त्यावरील तोफा आणि किल्ल्याभोवतीचा खंदक यामुळे हा किल्ला अभेद्य बनला होता. परांडा ही मुळची प्रत्यंडक नगरी. काही ठिकाणी याचा उल्लेख परमधामपूर, प्रकांडपूर, पलियंडा असाही झाला आहे. कल्याणीच्या चालुक्यांचे हे शहर आणि त्यांची ही दुर्गनिर्मिती पुढे मुस्लीम राजवटींनी अधिक बुलंद केली. कर्नाटकातील धारवाड जिल्हय़ात हावेरी तालुक्यातील होन्नत्ती गावी शके १०४६ म्हणजे इसवी सन ११२४ सालचा एक शिलालेख मिळाला आहे त्यात पलियंड गावचा उल्लेख आला आहे. चारशे गावांचे मुख्य केंद्र असलेल्या या पलियंड नगरावर महामंडलेश्वर सिंघणदेव राज्य करत असल्याचा हा उल्लेख आहे. कल्याणीच्या चालुक्याच्या काळात परिमंडा (परंडा) हा एक महत्वाचा परगणा होता. हेमाद्रीने आपल्या चतुर्वर्गचिंतामणि ग्रंथातील व्रतखंडाच्या प्रस्तावनेत यादव घराण्यातील भिल्लम राजाने प्रत्यंडकाच्या राजाला जिंकले असे म्हटले आहे. हे प्रत्यंडक म्हणजेच परांडा असावा. हा पलियंड पुढे पलांडा, मग परिंडा आणि आताचा परांडा होत गेला. हा किल्ला बहामनी सुलतान महंमदशहा बहामनीचा वजीर महमूद गवान याने १४व्या शतकात बांधला. बहामनी सत्तेनंतर हा निजामशाहीच्या ताब्यात आला. इ.स. १५९९ मध्ये मुघल सैन्यानी अहमदनगरच्या निजामशहाला हरवले तेव्हा निजामशाहीच्या सरदारांनी वयाने लहान असलेल्या निजामशहाच्या नावाने राज्य चालवण्याचा निर्णय घेवून राजधानीसाठी अहमदनगर पासून ८० मैलावर असलेल्या परांडा किल्ल्याची निवड केली होती. इ.स. १६०९-१०पर्यंत हे राजधानीचे ठिकाण म्हणून ओळखले जाई. इ.स. १६३०च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात असताना त्यांचे वास्तव्य या किल्ल्यात होते. आदिलशाहाने १६३० मध्ये हा किल्ला जिंकला व मुरार नावाच्या सरदाराने १६३२ला या किल्ल्यावरील सुप्रसिद्ध अशी मुलुखमैदान तोफ विजापूरला नेली. सन १६३०मध्ये शाहजहानने पाठवलेल्या मुघल सैन्याने या किल्ल्यावर केलेल्या हल्ल्यात आतील सैन्याने मुघलांना पराभूत केले होते. शेवटी १६५७ मध्ये हा किल्ला मुघलाकडे गेला. कवी परमानंद यांच्या श्रीशिवभारत काव्यात या भागाचा निर्देश प्रचंडपूर म्हणून केलेला आढळतो. छत्रपती शिवरायांचे वकील काझी हैदरला १६६९ मध्ये मोगलांनी काही काळ याच किल्ल्यात कैदेत ठेवले होते असा संदर्भ जयराम पिंडे लिखित पर्णालपर्वत गृहणाख्यान या ग्रंथात सापडतो. पेशवाईत मराठयांच्या सीमा विस्तारल्याने या किल्ल्याला फारसे महत्त्व राहिले नाही आणि सरतेशेवटी हा किल्ला भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हैद्राबादच्या निजामाकडे रहिला.
© Suresh Nimbalkar