पद्मगड

प्रकार : जलदुर्ग

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : 0

श्रेणी : कठीण

मराठी माणसाचा समुद्रावरील मानबिंदू असलेला किल्ला म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला सिंधुदुर्ग हि ओळख या किल्ल्यामुळेच मिळाली आहे. असे म्हणतात कि मालवणला जाऊन सिंधुदुर्ग न पहाता येणे म्हणजे देवळात जाऊन देवदर्शन न करता येणे. त्यामुळे येथे येणारे पर्यटक आवर्जुन सिंधुदुर्ग किल्ला पहायला जातात. पण देवळात जाताना नंदीचे अथवा कासवाचे दर्शन करावे हा संकेत मात्र विसरतात. असेच काहीसे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सभोवती असलेल्या किल्ल्याबाबत घडते. शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधताना त्याच्या रक्षणासाठी आसपास पद्मगड, राजकोट, सर्जेकोट या उपदुर्गांची साखळी निर्माण केली. सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटक जात असले तरी या दुय्यम किल्ल्याकडे फारसे कोणी फिरकत नसल्याने दुर्लक्षित झालेले हे किल्ले आज ओस पडले आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दरवाजासमोर पूर्वेस असलेल्या एका लहानशा बेटावर पद्मगड किल्ला बांधलेला आहे. ... सिंधुदुर्ग किल्ला दरवाजा ते पद्मगड दरवाजा हे अंतर सरळ रेषेत मोजल्यास २ हजार फुटापेक्षा कमी आहे. २००६ च्या त्सुनामीपुर्वी अमावस्या व पौर्णिमेच्या दोन दिवस आधी व दोन दिवस नंतर पुर्ण ओहोटीच्या वेळी दांडेश्वर मंदिरापासुन सिंधुदूर्ग किल्ल्यापर्यंत गुडघाभर पाण्यातून चालत जाता येत असे. जमीनीमार्गे किल्ल्यावर होणाऱ्या या प्रवेशास अडथळा करण्यासाठी सिंधुदूर्ग व मालवण किनाऱ्यामधील या चिमुकल्या बेटावर पद्मगड किल्ला बांधला असावा. पद्मगडावर जाण्यासाठी मालवण किनाऱ्यावर असलेले दांडेश्वर मंदीर गाठावे. येथुन ओहोटीच्या वेळेस कोरड्या पडलेल्या भूभागावरून चालत सहजपणे पद्मगड किल्ल्यावर जाता येते. त्यासाठी भरती-ओहोटीचे वेळापत्रक माहीती करून नंतरच पद्मगडाकडे निघावे. हि गोष्ट बहुतेक जणांना ठाऊक नसल्याने पद्मगडावर जाण्यासाठी खाजगी होडी करावी लागते या चुकीच्या माहितीमुळे बहुतांशी लोक इच्छा असुन व किल्ला समोर दिसुनही पद्मगडावर जात नाहीत. दांडेश्वर मंदीरापासुन पद्मगडावर येण्यासाठी १० मिनिटे पुरेशी होतात. सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर असलेला पद्मगडचा उत्तराभिमुख कमानीदार दरवाजा आजही शिल्लक असुन या दरवाजाने आपला गडात प्रवेश होतो. सतत आदळणाऱ्या लाटांमुळे गडाचे बुरुज व तटबंदी याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. गडाचे अंतर्गत क्षेत्रफळ फक्त १० गुंठे असुन ८-१० फुट उंचीच्या रचीव दगडाच्या तटबंदीत केवळ ३ बुरुज आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर एका नजरेत संपुर्ण किल्ला दृष्टीस पडतो. किल्ल्यातील वास्तु म्हणुन पाण्याचे एक चौकोनी लहान टाके, महापुरुषाची घुमटी व दोन घरांची जोती दिसुन येतात. या घुमटीचा अनेक ठिकाणी वेताळ मंदीर म्हणुन उल्लेख येत असला तरी स्थानिक लोक याचा उल्लेख महापुरुष असा करतात. घुमटीच्या आत शिवलिंगाची स्थापना केलेली आहे. तटावर जाण्यासाठी पायऱ्या असुन तटावरून बाहेरील बाजुस खडकात कोरलेल्या दोन लहान गोदी दिसतात. शिवकाळात या किल्ल्यांच्या मदतीसाठी असलेल्या लहान गलबतांच्या किरकोळ दुरुस्तीसाठी या गोदींचा वापर केला जात असावा. त्यासाठी भरती ओहोटीच्या वेळा साधुन या गोदीत पाणी घेण्यासाठी व बाहेर काढण्यासाठी खडकात केलेली चौकोनी छिद्रे दिसतात. किल्ला पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. किल्ला पाहुन दांडेश्वराच्या मंदिराकडे येऊन उजवीकडे गेल्यास मोरयाचा धोंडा लागतो. या ठिकाणी उभे केलेले भगवे झेंडे लांबूनच आपले लक्ष वेधून घेतात. सिंधुदुर्गाची बांधणी करण्यापूर्वी शिवरायांनी या ठिकाणी सागराची पुजा केली होती. या खडकावर चंद्र- सूर्य, शिवलिंग-नंदी, गणपती व पादुका कोरलेल्या आहेत. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा परिसर अवश्य पहायला हवा. पद्मगडाचा इतिहास हा सिंधुदुर्ग किल्ल्याशी संबंधीत असल्याने त्याला वेगळा असा इतिहास नाही पण कागदपत्रात या किल्ल्याचा स्वतंत्र किल्ला असाच उल्लेख येतो.१ ऑक्टोबर १८१२ रोजी इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार सिंधुदुर्ग किल्ल्यासोबत पद्मगड देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!