पदरगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : २०१० फुट

श्रेणी : अत्यंत कठीण

कर्जत-खांडस मार्गे गणेश घाटातुन भिमाशंकरला जाणे हि बहुतांशी गिरीमित्रांची आवडती भटकंती आहे. या वाटेने घाटातील गणेश मंदीर पार करून वर सपाटीवर आल्यावर पुढे भीमाशंकरला जाताना एक उंच सुळका आपल्याला सतत खुणावत रहातो. जसजसे आपण या सुळक्याला वळसा मारत पुढे जातो तसे याचे रुप डोंगर माथ्यावर असलेले शिवलिंग व त्यासमोर बसलेला नंदी असे बदलत जाते. हा डोंगर म्हणजेच प्राचीन गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला पदरगड किल्ला. या डोंगराला लाभलेला नैसर्गीक कातळकडा तटबंदी पाहुन यावर टेहळणीसाठी पदरगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. या किल्ल्यावर जाणारी वाट अवघड असल्याने त्यावर जाण्यासाठी प्रस्तरारोहण साहित्य व तंत्राची गरज भासते त्यामुळे इच्छा असुनही बहुतांशी गिरीमित्रांचे या गडावर जाणे होत नाही. पदरगडावर जाण्यासाठी खांडस हा गडाचा पायथा असुन भीमाशंकर हा पदरगड वसलेल्या डोंगररांगेचा माथा आहे. ... या दोन्ही ठिकाणाहुन गडावर जाता येत असले तरी खांडस येथुन पदरगडावर जाणे सोयीचे आहे. मुंबई-कर्जत-खांडस हे अंतर ९४ कि.मी. असुन कर्जत स्थानकातुन ३२ कि.मी. अंतरावर असलेल्या खांडस गावात जाण्यासाठी एस.टी. तसेच खाजगी जीपची सोय आहे. खांडस गावातुन तासाभराच्या चालीनंतर आपण गणेश घाटातील गणपती मंदिरात पोहोचतो. मंदिराच्या वरील सपाटीवर आल्यावर पदरगडचा सुळका दिसण्यास सुरवात होते. या वाटेवरील एका वळणावर आपल्याला दगडी कठडा बांधलेली विहीर दिसते. गणपती मंदिरापासुन इथवर येण्यास अर्धा तास लागतो. या विहिरीकडे दगड मांडुन बाणाची खुण करण्यात आली असुन येथे एक वाट समोर जंगलात जाताना दिसते. हिच पदरगडवर जाण्याची वाट आहे. पदरगड व त्याशेजारी असलेला डोंगर यामधील खिंडीतून गडावर जाणारी वाट असल्याने जंगलात शिरण्यापुर्वी हि वाट निश्चित करून घ्यावी म्हणजे चुकण्याची शक्यता उरत नाही. पदरगडावर जाणारी वाट म्हणजे डोंगर उतारावरून वाहत येणाऱ्या घळीतील पाण्याची वाट आहे. या वाटेने आपण घळीच्या वरच्या टोकाला असलेल्या अरुंद बोळापाशी पोहोचतो. पावसामुळे डोंगरावरून वाहत येणाऱ्या पाण्याने वाटेवरील माती वाहुन गेल्याने हि अरुंद घळ निर्माण होऊन त्यात वरील बाजुने मोठमोठे दगड अडकले आहेत. त्यामुळे घळीचे वरील तोंड बंद झाले असुन त्यातुन एक माणुस कसाबसा वर जाऊ शकेल इतपत जागा शिल्लक आहे. शरीराची कसरत करत म्हणजेच गिर्यारोहणाच्या भाषेत चिमणी क्लाईंब करत हा टप्पा पार करावा लागतो. नेहमी सह्याद्री भटकंती करणारे व कातळचढाई करणाऱ्यासाठी हि कठीण गोष्ट नाही पण नवीन लोकांनी मात्र दोराचा वापर करावा. त्यासाठी कातळाच्या वरील बाजुस बोल्ट मारलेला आहे. यानंतर वरील टप्पा येतो तो प्रस्तरारोहणाचा. नजरभय असलेला हा टप्पा फारसा कठीण नसला तरी येथे असलेला ठिसुळ दगड व दुसऱ्या बाजुस असलेली खोल दरी पहाता या ठिकाणी दोर लावणे चांगले. त्यासाठी कातळात बोल्ट मारलेले आहेत. हा टप्पा चढुन वर आल्यावर समोर एक कातळसुळका आडवा येतो. या सुळक्याला वळसा मारत आपण सुळका व गडमाथा यांमधील खिंडीत येतो. येथे किल्ल्याच्या डोंगरात दोन गुहा वेगवेगळ्या कोनात कोरलेल्या असुन यातील एक गुहा अर्धवट कोरलेली आहे. गणेश घाटावर लक्ष ठेवणाऱ्या पहारेकऱ्यासाठी या गुहेचा वापर होत असावा. येथुन गडावर जाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत पण वाटेच्या सुरवातीस असलेल्या ५-६ पायऱ्या तुटल्यामुळे हा भाग तेथे असलेल्या झाडाच्या आधारे चढावा लागतो. या पायऱ्या चढुन जाताना उजव्या बाजुला कातळात कोरलेली अजून एक गुहा पहायला मिळते. साधारण २०-२२ पायऱ्या चढुन गेल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. पदरगड समुद्रसपाटीपासुन १९७४ फुट उंचावर असुन गडमाथा पुर्वपश्चिम पसरलेला व दोन भागात विभागलेला आहे. हा गडमाथा चिंचोळ्या वाटेने एकमेकाशी जोडलेला आहे. पहील्या भागात कातळात कोरलेली पाण्याची २ बुजलेली टाकी असुन येथील उंचवट्यावर एका वास्तुचा चौथरा आहे. माथ्याच्या दुसऱ्या भागात कातळात खोदलेले एक मोठे पण कोरडे पडलेले टाके आहे. या टाक्याशेजारी एका वास्तुचा चौथरा असुन या चौथऱ्यावर काही घडीव दगड पडलेले आहेत. या भागात दोन कातळसुळके असुन हे सुळके कलावंतीणीचा महाल म्हणुन ओळखले जातात. येथुन पहिल्या सुळक्याला वळसा घालत आपण दोन सुळक्यामधील खिंडीत पोहोचतो. येथे पहिल्या सुळक्याखाली गणेश घाटाच्या दिशेने कातळात खोदलेली एकापुढे एक अशी दोन पाण्याची टाकी आहेत. यातील दुसऱ्या टाक्याला लहानशी गुहा आहे. टाकी पाहुन परत खिंडीत आल्यावर दुसऱ्या सुळक्याला डावीकडे ठेवत आपण कातळात खोदलेल्या गुहेत पोहोचतो. पदरगडावरील हि सर्वात मोठी गुहा असुन प्रसंगी ८-१० जण या गुहेत राहु शकतात पण गुहेचा तळ मात्र समतल नाही. गुहा पाहुन सुळक्यामधील खिंडीत आल्यावर दुसरा सुळका उजवीकडे ठेवत एक अस्पष्ट वाट जाताना दिसते. या वाटेने पुढे आल्यावर हि वाट उजवीकडे चढत सुळक्याच्या दिशेने जाते. हि वाट अत्यंत धोकादायक व घसाऱ्याची असल्याने या वाटेला जाऊ नये. या वाटेच्या शेवटी सुळक्याखाली अजून एक टाके कोरले आहे. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. गडावर एकुण सहा टाकी असली तरी कोठेही पिण्याचे पाणी नाही. पदरगडावरून पूर्वेला भिमाशंकर डोंगर, उत्तरेला सिध्दगडाचा डोंगर तर दक्षिणेला कोथळीगड दिसतो. गडाच्या घेऱ्यात असलेल्या गणपती घाटातील लहानशी वाडी पदरगडवाडी म्हणुन ओळखली जाते. पदरगडाखाली असलेल्या दक्षिण पठारावर एक भलेमोठे खडकात खोदलेले टाके नजरेस पडते. सकाळी लवकर सुरवात केल्यास खांडस गावातून पदरगडावर जाण्यास व गड फिरण्यास ४ तास पुरेसे होतात. पदरगड नेमका कोणी व केंव्हा बांधला हे ज्ञात नसले तरी त्याचा आकार व वरील अवशेष पहाता प्राचीन काळापासुन याचा टेहळणीचा किल्ला म्हणुन वापर होत असावा. मराठ्यांचे शस्त्रागार असलेला कोथळीगड जिंकताना औरंगजेबाने आधी आजूबाजूचे किल्ले ताब्यात घेतले त्यात पदरगडचा सामावेश होता. पदरगडवर जाणारी वाट हि पाण्याची वाट असल्याने तसेच गडावरील वाट कड्यावरुन जात असल्याने या वाटेवर पावसाळ्यात व नंतर मोठया प्रमाणात शेवाळ जमते. यासाठी पावसाळा व नंतर दोन महीने या किल्ल्यावर जाणे टाळावे. तसेच घळीपर्यंत जाणाऱ्या वाटेवरील दगड ठिसुळ असल्याने मोठया प्रमाणात पायाखालील दगड निसटतात. त्यामुळे एकामागे एक चालताना दक्षत बाळगावी. भीमाशंकरला जाणारे गिरीमित्र पाण्यासाठी पदरगडाखाली असलेल्या विहिरीचा वापर करतात शिवाय फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीला मोठा जमाव येथुन भीमाशंकरला जात असल्याने विहिरीस पाणी उरत नाही. गडावर पाण्याची सोय नसल्याने खांडस गावातुन पुरेसे पाणी सोबत घेऊनच निघावे. नव्याने भटकंती करणाऱ्यांनी अनुभवी मार्गदर्शक व गिर्यारोहण साहित्याशिवाय किल्ला चढण्याचे धाडस करू नये.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!