पट्टागड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नगर

उंची : ४३९६ फुट

श्रेणी : सोपी

अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांग तशी सर्वाना परिचित आहे. या डोंगररांगेच्या पूर्वेला औंढा, पट्टा, आड आणि बितंगगड हे किल्ले वसले आहेत. या सर्व किल्ल्यांत पट्टा इतरांपेक्षा जास्तच भाग्यवान आहे कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींची चरणधूळ या किल्ल्याने आपल्या मस्तकी धारण केलीय. पट्टागड हा किल्ला बितनगड व औंढा यांच्या मधील टप्प्यात आहे. नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सरहद्दीवरील हा गड आजही दिमाखात उभा आहे. पट्टागडावर शिवाजी महाराज काही काळ थांबल्याने हा गड विश्रामगड म्हणुन देखील ओळखला जातो. गडावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. गडाच्या पूर्व दिशेला पायथ्याला लागून असलेल्या पट्टावाडी गावातून जाणारी वाट सगळ्यात सोपी आणि जवळची आहे. कोकणवाडी गावातून गडाच्या दक्षिण दिशेने दुसरी वाट आपल्याला गडावर घेऊन जाते पण तुलनेने ही वाट अवघड आहे तर तिसरी वाट औंढा आणि पट्टा किल्ल्याच्या मधून वर येते. ... ही वाट सर्वात कठीण आहे. पहिल्या वाटेने गडावर जाण्यासाठी घोटी- भंडारदरा रस्त्यावर टाकेद गावात जाणारा फाटा आहे. टाकेद गावातून म्हैसमाळ घाटमार्गे कोकणवाडी फाटा ९ कि.मी. अंतरावर तर कोकणवाडी फाट्यापासून पट्टागडाच्या पायथ्याची पट्टावाडी ८ किमीवर आहे. पट्टावाडी हे गाव डोंगराच्या पठारावर वसलेले असुन गडाची समुद्रसपाटीपासून उंची ४५६६ फूट तर पायथ्यापासुन उंची ९०० फुट आहे. पट्टावाडीकडे जाताना वाटेवरूनच पट्टागडाच्या पुढे आलेल्या दोन डोंगरसोंडेवरील बुरुज व तटबंदी आपले लक्ष वेधून घेतात. पट्टावाडीतून किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पक्का रस्ता आहे. हा रस्ता संपताना डाव्या बाजुला एक पडीक वास्तू दिसुन येते. या वास्तुशेजारी एका झाडाखाली काही कोरीव मुर्त्या ठेवलेल्या दिसुन येतात. या रस्त्याच्या शेवटी वनखात्याची चौकी असुन येथे ५/- रुपये प्रवेश शुल्क भरुन व नावपत्ता नोंदवुन गडावर जाता येते. गड चढायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजुला एका चौथऱ्यावर एका हत्तीणीचे शिल्प व शेजारील खडकावर चाकावर ठेवलेली तोफ दिसुन येते. थोडा चढ चढुन गेल्यावर वनखात्याने पायऱ्यावर अलीकडेच बांधलेली फायबरमधील दरवाजाची प्रतिकृती दिसते. पायऱ्याच्या वाटेने वर चढतांना डाव्या बाजुस तासलेला कातळ व काही ठिकाणी तटबंदीचे अवशेष दिसतात. पायऱ्याच्या वाटेने वर आल्यावर लहान तोंड असणारी गुहा दिसते. रांगत जाता येईल एवढीच या गुहेची उंची असुन पाणी भरलेले असल्याने या गुहेत जाता येत नाही. या गुहेत पाण्याचे टाक असावे. या गुहेपासून वर गेल्यावर डावीकडे दोन गुहा लागतात. यातील एका गुहेमध्ये लक्ष्मण महाराज या साधूचे वास्तव्य होते. हि जैन गुहा असुन गुहेच्या भिंतीवर एका बाजुला नेमीनाथ यांची प्रतिमा तर दुसऱ्या बाजुला यक्ष प्रतिमा कोरलेली दिसते. या गुहेचे ओसरी व दालन असे दोन भाग असुन आतील दालनात प्रवेश करण्यास मनाई आहे. गुहेबाहेरील ओवरीत दोन जैन देवता मुर्ती दिसुन येतात. बाजूची दुसरी गुहा साधारण आहे. येथुन पुढे उजव्या बाजुलाही दोन गुहा आहेत. यातील मोठया गुहेत लक्ष्मण महाराजांची समाधी आहे तर दुसऱ्या गुहेत चतुश्रुंगी देवीची मुर्ती आहे. गुहेच्या बाहेर पाण्याचा नळ असून गडाच्या वरच्या टाक्यातील पाणी नळाने इथे आणले आहे. या दोन्ही गुहेत व गुहेच्या समोर असलेल्या प्रशस्त प्रांगणावर पत्र्याचे झाकण आहे त्यात रहाण्याची सोय होते. गुहेच्या समोरच गडाचा वनखात्याने निवारा छत्री बांधलेला एक बुरूज असुन या भागात गडाची तटबंदी व तटावर जाणाऱ्या पायऱ्या आहे. गुहेजवळून जाणाऱ्या पायऱ्या चढून वर गेल्यावर वाट डावीकडे वळते आणि किल्ल्याच्या अवशेषांना सुरुवात होते. समोरच गडाचा उत्तराभिमुख त्रिंबक दरवाजा आजही उत्तम स्थितीत आहे. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला व वरील बाजुस बुरूज आहेत. येथून खाली उतरणारी वाट पट्टावाडीत जाते. त्रिंबक दरवाजा पाहून वरच्या दिशेने जातांना कातळात खोदलेल्या पायऱ्या लागतात. येथे सातवाहन कालीन पिण्यायोग्य पाण्याची खोदीव टाकी आहेत. यातीलच पाणी पाईपने खालील मोठ्या गुहेपर्यंत पोचवले गेले आहे. या टाक्याशेजारी जिच्यामुळे या किल्ल्याला "पट्टा" नाव पडलं त्या पट्टाई देवीचे मंदिर आहे. मंदिराचा अलीकडेच जीर्णोध्दार केलेला आहे. मंदिराच्या मागील बाजुस असणाऱ्या उंचवट्यावर गडाचा बुरुज असुन वनखात्याने त्यावर निवारा छत्री बांधली आहे. मंदिरा समोरून पुढे जाउन पायवाटेने वर चढत जाताना जोत्यांचे अवशेष दिसतात व अखेरीस आपण एका प्रशस्त दगडी इमारतीपाशी येतो. या इमारतीला अंबरखाना म्हणतात. अंबरखान्याची वनखात्याने डागडुजी केलेली असून बाहेरील बाजुस मेघडंबरीत शिवाजी महाराजांचा अर्धपुतळा बसवलेला आहे. अंबरखान्याला दोन छोटे दरवाजे असून बाहेर झेंडावंदनाचा एक खांब रोवला आहे. या इमारतीचे छ्त घुमटाकार असुन आत प्रशस्त दालने आहेत. या दालनात शिवचरित्रातील फायबरमध्ये बनविलेले अनेक प्रसंग लावण्यात आलेले असुन आतील मंचावर शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला फायबर पुतळा ठेवलेला आहे. अंबरखान्याभोवती बाग फ़ुलवलेली आहे. अंबरखान्याच्या आवारात पाच-सहा वास्तूंचे चौथरे दिसतात. अंबरखाना पाहुन झाल्यावर किल्ल्यावरील अवशेष पाहाण्यासाठी अंबरखान्याच्या मागुन वरच्या दिशेने चढत जावे. पट्टा किल्ल्याचा माथा म्हणजे एक प्रशस्त पठारच आहे. माथ्यावरून उजव्या बाजुला औंढा किल्ल्याचा सूळका दिसतो. या पठारावर उजव्या बाजूला औंढा किल्ल्याच्या दिशेने जाताना सर्वप्रथम पाण्याचे एक मोठे टाके लागते यातील पाणी पिण्यायोग्य आहे. पुढे गेल्यावर परत पाण्याची दोन मोठी टाकी व त्याच्या पुढे सुकलेल एक टाक आहे. या टाक्यांपुढे खडकातून चिरे काढताना अर्धवट राहिलेले चिरे दिसतात. दगडाच्या या खाणीपासून दोन वाटा निघतात. एक डावीकडे गडाच्या उंच भागात जाते पण या भागात काहीही अवशेष नाहीत तर दुसरी उजवीकडे औंढा किल्ल्याच्या दिशेला जाते. या वाटेने पुढे गेल्यावर एक गुहा लागते. गुहेचे ओसरी आणि दालन असे दोन भाग आहेत. ओसरी दोन खांबांवर तोललेली असुन दालन चार खांबांवर तोललेल आहे. या गुहेच्या पुढे जाताना खालील बाजुस उतारावर ओळीत खोदलेली पाण्याची ७ टाकी दिसतात. पुढे सरळ चालत राहिल्यास अजुन एक गुहा पाहायला मिळते. या गुहेच्या बाहेरच्या बाजुला जमिनीवर कातळात खोदलेले धान्य कोठार आहे. या धान्य कोठाराची जमिनीवर खडकात बांधलेली तीन तोंडे व त्यावरील दगडी झाकणे पाहायला मिळतात. या दोनही गुहेशेजारी पाणी असल्याने येथे रहाण्याची उत्तम सोय होऊ शकते. गुहेच्या पुढे चालत गेल्यावर एकामागोमाग एक अशी पाण्याची १२ टाकी लागतात या टाक्यांना बारा टाकी म्हणून ओळखले जाते. यातील शेवटच्या टाक्याच्या मागे कातळात कोरलेली गुहा आहे. या गुहेत आत पाणी घेण्यासाठी दगडी भिंतीत पन्हाळी कोरली आहेत. बारा टाक्याच्या खालील बाजुस पठारावर अजुन एक पाण्याचे मोठे टाके दिसते. गडावर पाण्याची ३० पेक्षा जास्त टाकी आहेत. या पायवाटेने औंढा किल्ल्याच्या दिशेने सरळ गेल्यावर १५ मिनिटात आपण पट्ट्याच्या उत्तराभिमुख दिल्ली दरवाजापाशी पोहोचतो. दरवाजाची कमान उध्वस्त झालेली असुन दरवाजाच्या बाजुचे बुरुज शिल्लक आहेत. दरवाजापासून किल्ल्याच्या खालच्या बाजुला गेलेली तटबंदी ढासळलेली आहे. दरवाजाच्या बाहेरच्या बाजुला पाण्याच एक मोठे खोदीव टाक आहे. येथुन पुढे जाणाऱ्या पायवाटेने औंढा किल्ल्यावर जाता येते. दरवाजा पाहुन आल्यावाटेने मागे फ़िरुन अंबरखान्याच्या वरील बाजुने डावीकडे गेल्यावर काही वास्तूंचे अवशेष दिसतात. पुढे शिवकालिन बंधारा व पुढे अजुन एक तलाव पाहायला मिळतो. गडाच्या डाव्या टोकावर दोन भव्य बुरुज आहेत. हे बुरुज आपल्याला पट्टावाडीत येताना रस्त्यावरून दिसलेले असतात. हे बुरूज पाहून खाली उतरणाऱ्या वाटेने आपण पट्टादेवी मंदिराकडे येतो.येताना वाटेत वनखात्याने निवाराछत्री बांधलेला अजुन एक बुरुज दिसतो. येथे आपली गडफेरी पूर्ण होते. संपूर्ण गडमाथा फिरण्यास ४ तास लागतात. पट्टागडाच्या सर्वोच्च भागात उभे राहिल्यावर चारही दिशांचा लांबवरचा मुलुख नजरेस पडतो. पश्चिमेस कळसूबाई, त्रिंबकगड ,अलंग, मदन आणि कुलंग हे दुर्ग दिसतात तर दक्षिणेला बितनगड, महांकाळ डोंगर आणि उत्तरेला औंढा,आड हे किल्ले दिसतात. पट्ट्यापासून औंढयापर्यंत गेलेल्या कोकणकड्याच्या आकाराची डोंगरकडा फारच सुंदर दिसते. गडाच्या पूर्व उतारावर म्हाळुंगी आणि आढळा या नद्या उगम पावतात. या सर्व परिसरावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असे. गडाच्या इतिहासात डोकावले असता गडाला फार मोठा इतिहास असल्याचे कुठेही सापडत नाही. पण गडावरील पाण्याची सोय व अवशेषांची उपलब्धता पहाता गड नांदता असताना गडावर खूप मोठया प्रमाणावर वस्ती असावी. संत एकनाथांच्या भावार्थ रामायणातील अरण्यकांडात औंढा व पट्टा किल्ल्य़ांचा उल्लेख आढळतो तो असा रावणाचा छेदिला आंगोठा तेथे झाला औंढापट्टा / त्रिंबकीच्या बिकटघाटा अवंढा-पट्टा प्रसिध्द. यावरून यादव काळात हा गड अस्तित्वात होता. या किल्ल्याचे बांधकाम बहामनी सल्तनतच्या काळात (इ.स.१३४७ ते इ.स.१४९०) झाले असावे. चौदाव्या शतकात पट्टा किल्ला बहामनी साम्राज्यात असल्याचे उल्लेख आढळतात. त्यानंतर याचा ताबा येथील स्थानिक महादेव कोळी जमातीकडे गेला. इ.स. १४९० मध्ये बहामनी साम्राज्याची शकले झाल्यावर हा किल्ला निजामशाहीत गेला. इ.स. १६२७ मधे मुगलांनी हा किल्ला जिंकला. इ.स.१६७१ मध्ये मोरोपंतानी हा किल्ला जिकूंन स्वराज्यात दाखल केला पण १६७२ मधे मोगलांनी हा किल्ला परत घेतला. इ.स.१६७५ मध्ये मोरोपंत पिंगळ्यांनी पट्टागड दुसऱ्यांदा स्वराज्यात आणला. सन १६७९ मध्ये दक्षिण मोहिमेच्या अंतिम टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी जालन्याची लूट केली. इतिहासातील नोंदीप्रमाणे १५ नोव्हेंबर १६७९ रोजी महाराजांनी ही लूट केली. महाराज हि लुट घेऊन रायगडाकडे जात असल्याची खबर मोगल सरदार रणमस्तखानाला लागली. दहा हजारांची फौज घेऊन तो महाराजांच्या मागावर निघाला. संगमनेरजवळील रायतेवाडी येथे दोन्ही सैन्याची गाठ पडली. तीन बाजूंनी शत्रू सैन्याने महाराजांना घेरले. दि. १८, १९ व २० नोव्हेंबर असे ३ दिवस दोन्ही सैन्यात लढाई झाली. महाराजांबरोबर असलेल्या आठ हजार पैकी चार हजार सैन्य कामी आले. महाराजांच्या कारकिर्दीतली हि शेवटची लढाई. त्यात खानाच्या मदतीला औरंगाबादेहून मोठी फौज रवाना झाल्याची खबर आली. युद्ध सुरू असतानाच महाराजांनी खजिना घेऊन पुढे जायचे व बाकीच्या सैन्याने लढाई सुरू ठेवायची अशी रणनिती ठरवुन बहिर्जी नाईकांनी निवडक ५०० घोडेस्वारांसह महाराजांना आणि मिळालेल्या लुटीला पट्टा किल्ल्यावर पोहोचवले. संगमनेरजवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्यातील शेवटची लढाई लढून शिवाजीमहाराज २१ नोव्हेंबर १६७९ या दिवशी पट्टा किल्ल्यावर आले. दक्षिणेच्या मोहिमेच्या दगदगीमुळे राजांची तब्येत खालावली होती त्यामुळे १७ दिवस त्यांचे वास्तव्य या किल्ल्यावर होते. गडावरून परतताना राजांनी या किल्ल्याचे नामांतर विश्रामगड असे केले. पुढे इ.स.१६८६ पर्यंत हा सर्व परिसर मराठ्यांच्या ताब्यात होता. महाराजांच्या मृत्युनंतर इ.स.१६८२ साली औरंगजेब महाराष्ट्रात आला व त्याने मराठयांचा प्रदेश जिंकण्यास सुरवात केली. १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेतले. मोगलांनी १६८८ ते ८९ या काळात मराठ्यांचे औंढा, त्रिंबकगड, कवनी, त्रिंगलवाडी, मदनगड हे किल्ले फितुरीने घेतले मात्र पट्टागड त्यांना जिंकून घ्यावा लागला. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबला लिहितो की सेवकाने १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठ्यांच्या ताब्यातील पट्टा व इतर किल्ल्याखालील जमीनदारांना रकमा देण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. इ.स १६७१ मधे माधवरावांनी पट्टागड मुगलांकडुन जिंकला. त्यानंतर अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात इंग्रजांनी हा किल्ला मराठयाकडून जिंकुन घेतला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!