निरा नृसिहपुर
प्रकार : मध्ययुगीन विष्णुमंदीर
जिल्हा : सोलापुर
पुणे व सोलापुर या जिल्ह्याच्या सीमा जेथे एकत्र येतात त्या ठिकाणी निरानदी व भीमा नदीच्या संगमावर श्रीक्षेत्र निरानरसिंहपूर वसले आहे. येथील श्रीनरसिंह हा महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य-प्रदेश येथील अनेक घराण्यांचा कुलस्वामी आहे. श्रीक्षेत्र नरसिंहपूर येथे जाण्यासाठी पुणे येथून सोलापूर जाणाऱ्या बसने टेभुर्णी येथे उतरावे. टेंभुर्णी येथून अकलूज जाणाऱ्या बसने संगम चौक येथे उतरावे. येथुन नरसिंहपूर येथे जाण्यासाठी रिक्षा आहेत. किंवा पंढरपूर अकलूज मार्गाने येत असल्यास अकलूजहून टेंभुर्णी जाणाऱ्या बसने संगम चौकला उतरल्यास रिक्षाने नरसिंहपूर येथे जाता येते. पुणे ते नरसिंहपूर अंतर १८५ किमी आहे. मंदिराचे बांधकाम हे नदीकाठच्या उंचवट्यावर केलेले असल्याने दुरूनच मंदिराचे दर्शन घडते. नदीच्या संगमावर असलेले हे मंदीर पेशवेकाळात बांधलेले असुन मध्ययुगीन वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे. मंदीराच्या पायऱ्या चढताना पायऱ्यावर बसवलेले दगडी हत्ती आपले लक्ष वेधुन घेतात. मंदिराच्या चारही बाजूंनी रुंद व भक्कम असा तट असुन दर्शनी भागात दरवाजावर नगारखाना बांधलेला असुन शेजारी दोन बुरुज बांधलेले आहेत. या संपुर्ण तटाच्या आतील बाजुस दगडी ओवऱ्या बांधलेल्या आहेत.
...
मुख्य मंदिराचे गर्भगृह, सभामंडप व मुखमंडप असे भाग पडले आहेत. संपूर्ण बांधकाम दगडी असून छतावर नक्षी व विविध देवतांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराचे दगडी खांब अतिशय कुशलतेने घडविलेले आहेत. रंगशिळेच्या मंडपाचे दोन्ही बाजूस दरवाजे आहेत. ह्या सर्व दरवाजावर जय विजय कोरलेले असुन पितळी दरवाज्यावरील जय-विजयाची सुबकता व मुद्रा विलोभनीय आहेत. वेगवेगळया प्रकारच्या नक्षी, घाटदार खांब ,कंगोरे प्रमाणबद्ध व अतीव देखणा असा पितळी दरवाजा येथे आहे. नृसिंहाची मुर्ती पश्चिमाभिमुख असुन काळ्या पाषाणात घडवलेली हि मुर्ती वीरासनात आहे. उजवा पाय गुडघ्यात मुडपलेला असुन डाव्या पायाची मांडी घातलेली तर उजवा हात उजव्या गुडघ्यावर व डावा हात कंबरेवर आहे. मुर्तीचे मुख सिंहासारखे रुंद असुन डोळे मोठे व चेहऱ्यावर उग्र भाव आहे. चेहरा व शरीराचा भाग हा सिंहासारखा दर्शविलेला असुन हातपाय मात्र मानवी आहेत. हि मुर्ती साधारणतः पाचव्या शतकातील आहे. नरसिंहाची मुळ मूर्ती काळ्या पाषणात कोरलेली असुन तिच्यावर चुना आणि वाळुचे मिश्रण करून लेपन करण्यात आले आहे. शके १७८७ साली रघुनाथराव विंचुरकर यांनी या देवालयाचा जीर्णोद्धार केलेला असुन त्या संबंधीचा शिलालेख मंदीरात पहायला मिळतो. मंदिराच्या परीसरात लक्ष्मी,भक्तप्रल्हाद,श्रीदत्तात्रय,भीमाशंकर,विठ्ठल-रुक्मिणी,शाकंबरी,काशीविश्वेश्वर गणपती,काळभैरव,रामेश्वर या देवतांची मंदिरे आहेत. याशिवाय मंदिराच्या आवारात काही विरगळ व नागशिल्प दिसून येतात. मंदिराच्या पुढील बाजुस दीपमाळ व जानकेश्वर नावाचे शिवमंदिर असुन जानकीबाई यांच्या स्मरणार्थ रघुनाथ विंचूरकर यांनी शके १८०३ साली हे शिवमंदिर बांधले. मंदिराच्या पश्चिम दरवाजात एक मोठी घंटा बांधलेली असुन ती १७३९ साली चिमाजीअप्पांनी वसई जिंकल्यानंतर तेथील चर्चमधुन आणल्याचे सांगीतले जाते.पेशवे यांनी या घंटा निरनिराळ्या देवस्थानाला पाठवून दिल्या. त्यापैकीच एक सदाशिव माणकेश्वर यांच्या प्रयत्नाने निरा नरसिंहपूर येथे आणण्यात आली. निरा आणि भीमा नदीच्या संगमावर असलेला घाट शके १५२७ मध्ये बांधून पूर्ण झाला. हे बांधकाम त्रिमलापाळ दाधजी मुधोजी यांनी केले. हे बांधकाम पुर्ण करण्यास साधारण ३ वर्षे लागली. नरसिंहपूर देवालयात भक्तांसाठी खोल्या उपलब्ध आहेत पण सोय न झाल्यास टेंभुर्णी येथे जावे लागते.
© Suresh Nimbalkar