निमगिरी

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : ३६२५ फुट

श्रेणी : मध्यम

सातवाहन राजसत्ता म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं सुरेख स्वप्नं. इतिहासात खोलवर डोकावल्यास आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांचा उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो. सातवाहन राजसत्तेच्या काळात कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट जन्माला आला अन् त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जिवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी अशा बुलंद किल्यांची निर्मिती झाली. त्या काळी नाणेघाटा पासून काही अंतरावर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर या गांवी बाजारपेठ वसली गेली. सातवाहन यांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर गड किल्यांचे साज चढले यातील एक किल्ला म्हणजे किल्ले निमगिरी. निमगिरीच्या शेजारीच हनुमंतगड नावाचा जोडदुर्ग आहे. निमगिरी आणि हनुमंतगड किल्ल्याचे दोन डोंगर एका लहानशा खिंडीने वेगळे झाले आहेत. येथे येण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुणे–मुंबईहुन सर्वप्रथम जुन्नर गाठावे. ... जुन्नरजवळ माणिकडोह धरणावरून नाणेघाटाच्या दिशेने घाटघर गावाकडे एक रस्ता जातो. या रस्त्यावरच जुन्नरपासून २५ कि.मी.वर तर हडसर गावापासुन १० कि.मी.वर खांडीची वाडी गाव आहे. या वाटेने २ कि.मी.चा फेरा जरी वाढत असला तरी निमगिरीला जाणारा हा सर्वात चांगला मार्ग आहे. खांडीची वाडी गावामागेच निमगिरी व हनुमंतगड हि दुर्गजोडी वसली आहे. गावात आल्यावर खिंडीच्या उजव्या बाजूला निमगिरी तर डाव्या बाजूला हनुमंतगड हे लक्षात ठेवुन चढाईला सुरवात करावी. या वाटेवर सर्वप्रथम अतिउच्च विजेचा दाब असणारा खांब दिसतो. या खांबाच्या पुढे असलेल्या शेतातुन वाट सोडुन डावीकडे गेले कि एक अलीकडेच बांधलेले काळुबाईचे मंदीर दिसते. या मंदिराच्या आवारात व वाटेवर प्राचीन मुर्ती आणि मंदिराचे अवशेष विखुरलेले आहेत. मंदिराच्या मागील बाजुस दोन विरगळ व एक कोरीव मुर्ती आहे. येथुन मूळ वाटेवर परत येऊन वर चढायला सुरवात केल्यावर वरील टप्प्यावर एक मोठी विहीर आहे. या विहिरीच्या डाव्या बाजुस असलेल्या झाडीत पिंपळाखाली लहानशा चौथऱ्यावर मारुतीची मुर्ती आहे. या मुर्तीपुढे काही अंतरावर ४२ विरगळ एका रांगेत मांडुन ठेवल्या आहेत. या विरगळ अलीकडील काळातील असुन त्यावर फारसे कोरीव काम दिसत नाही. एका विरगळीवर मोडी भाषेत शिलालेख असुन उर्वरीत विरगळीवर मानव आकृत्या,शिवलिंग, नंदी कोरले आहेत. येथुन पुढे जाताना वाटेत वनखात्याने उभारलेला मनोरा व निवारा असुन या दोघांच्या मधील वाटेने वर निघावे. येथुन वर चढत जाणारी ठळक पायवाट थेट खिंडीतील किल्ल्याच्या पायथ्याच्या पायऱ्यापर्यंत जाते. पायऱ्यांच्या अलीकडे एक वाट उजवीकडे निमगिरीच्या डोंगरात कोरलेल्या गुहेकडे जाते. टेहळणीसाठी खोदण्यात आलेली हि गुहा खोदताना अर्धवट सोडुन देण्यात आली आहे. येथुन कातळात कोरलेल्या पायऱ्या आपल्याला मधील खिंडीत न नेता थेट निमगिरीवर नेऊन सोडतात. कातळात कोरलेल्या या सुंदर पाय-या म्हणजे या गडाचा अनमोल ठेवा आहे. एका ठिकाणी तीन पायऱ्या तुटलेल्या असल्याने तसेच या पायऱ्या फारशा वापरात नसल्याने काही ठिकाणी मातीचा घसारा पायऱ्यावर जमा झाला आहे व पायऱ्या मातीत अर्धवट गाडल्या गेल्या आहेत त्यामुळे सांभाळूनच या वाटेने वर चढावे लागते. खिंडीपासून ते माथ्यापर्यंत चढाईचा हा टप्पा रोमांचकारी आणि सुंदर आहे. वळणदार कातळ कोरीव पाय-यांनी जाताना वाटेत कातळात कोरलेली पहारेकऱ्याची एक चौकी लागते आणि उद्ध्वस्त दरवाजातून १० मिनिटात आपण निमगिरीच्या माथ्यावर पोहोचतो. थोडे साहस करण्याची तयारी असल्यास या पायऱ्यांनी वर चढावे अन्यथा या वाटेच्या खाली असलेली वाट वळणे घेत १५ मिनिटात निमगिरी आणि हनुमंतगड यांच्या मधील खिंडीतुन वर गडावर येते. गडाच्या कातळात कोरून काढलेला पायरीमार्ग गड सातवाहन कालीन असल्याची साक्ष देतात. निमगिरीचा किल्ला समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंचावर असुन साधारण लंबगोलाकार आकाराचा हा गड १० एकरवर दक्षिणोत्तर पसरला आहे. गडावर प्रवेश करताना उध्वस्त दरवाजाच्या डाव्या बाजुला खडकात खोदलेली पहारेकऱ्याची गुहा आहे. या गुहेतून वर जाणाऱ्या पायऱ्या ढासळलेल्या आहेत. गडाच्या या भागात व्यवस्थित तटबंदी दिसुन येते. दरवाजातून आत आल्यावर उजव्या बाजूने गडफ़ेरीस सुरुवात करावी. या वाटेने प्रदक्षिणा करताना सर्वप्रथम पाण्याच्या ३ टाक्या दिसतात. यापैकी एका टाक्यातील पाणी गाळून पिण्यास वापरता येईल. या टाक्याच्या पुढे काही अंतरावर छप्पर उडालेले एक लहानसे घुमटीवजा मंदीर आहे. या मंदिराला लहानसा दरवाजा असुन समोर कोनाड्यात गजलक्ष्मीचे शिल्प व त्यासमोर शिवलिंग ठेवले आहे. मंदिराच्या पुढील भागात खराब पाण्याची दोन टाकी आहेत. या टाक्यांच्या पुढील बाजुस तीन टाक्यांचा समुह असुन डाव्या बाजुला टेकाडाच्या उतारावर ३ लहान कबरी दिसतात. वाटेच्या पुढील भागात तीन गुहा आहेत. यातील एक गुहा पडझड झालेली असुन उर्वरीत दोन गुहांचा वापर स्थानिक गुराखी पावसाळ्यात गुरे बांधण्यासाठी करत असल्याने त्या राहण्यायोग्य नाहीत. शेवटच्या गुहेच्या आत पाण्याचे एक टाके असुन लहानसा दरवाजा असलेली अजुन एक गुहा आहे. वेळ पडल्यास ५ ते ६ जणांना या आतील गुहेत रहाता येईल. गडाच्या पुढील भागात पहाऱ्याची चौकी सोडल्यास कोणतेही अवशेष नसल्याने येथुन गडाच्या मधील उंचवट्यावर चढायचे. या उंचवट्यावर काही उध्वस्त वास्तू अवशेष दिसुन येतात. या उंचवट्यावरून चावंड, जीवधन हरिश्चंद्रगड, हडसर, सिंदोळा किल्ले नजरेस पडतात. निमगिरी किल्ला जुन्नरच्या पश्चिम खो-यात असल्याने समोर माणिकडोह आणि मागे पिंपळगाव धरणाचा जलाशय दिसतो. संपूर्ण किल्ला फिरण्यास १ तास लागतो तर पायथ्यापासुन दोन्ही किल्ले पाहायला चार तास लागतात. इतिहासाबाबत निमगिरी किल्ला मौन बाळगुन असल्याने दुर्गप्रेमींकडून हा किल्ला दुर्लक्षिलेला आहे. पण येथील कातळकोरीव पायरीमार्ग पहायला या किल्ल्याला आवर्जून भेट दयायला हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!