निमगाव म्हाळुंगी

प्रकार : गढी

जिल्हा : पुणे

उंची : 0

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात निमगाव म्हाळुंगी नावाचे गाव आहे. तसे हे गाव लोकांना फारसे माहित असण्याचे कारणही नाही पण आपल्या सारख्या दुर्गप्रेमीना हे गाव परीचीत आहे ते मराठ्यांचे अखेरचे सेनापती बापू गोखले यांच्यामुळे. या गावात सेनापती बापू गोखले यांची गढी अंतिम घटका मोजत आजही उभी आहे. पुणे-नगर महामार्गावरील शिक्रापूरपासून १२ कि.मी अंतरावर असलेले निमगाव म्हाळुंगी हे गाव पुण्यापासून ४५ कि.मी.अंतरावर आहे. गावात प्रवेश केल्यावर गढी कोणालाच माहीत नसल्याने टाकळकर शाळा म्हणुन चौकशी करावी म्हणजे सहजतेने गढीजवळ पोहोचता येते. गढीचे अवशेष बंदीस्त झाल्याने सहजपणे दिसुन येत नाही त्यामुळे गावभर फिरले तरी गढी कळून येत नाही. सध्या गढीच्या जागेत म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळीचे टाकळकर विद्यालय आणि वसतीगृह आहे. गढीचे प्रवेशद्वार आजही सुस्थितीत असुन ते शाळेच्या वास्तुमध्ये बंदीस्त झाले आहे. तेथील शिक्षकांच्या परवानगीने ते आपल्याला आत-बाहेर पहाता येते. गढीचा दरवाजा घडीव दगडात बांधलेला असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. ... आता या दरवाजाच्या मधील भागाचे तालमीत रुपांतर करण्यात आले आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण गढीच्या आतील भागात पोहोचतो. चौकोनी आकाराची हि गढी साधारण अर्धा एकरवर पसरलेली असुन आतील वास्तु पुर्णपणे भूईसपाट झाल्याने त्या जागेचे पटांगणात रुपांतर केलेले आहे. भुईसपाट झालेल्या या वास्तुमधुन बचावलेली एकमेव गोष्ट म्हणजे या गढीत असलेली विहीर. गढीची पडझड झालेली तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक असुन काही काळाचीच सोबती आहे. गढीभोवती प्रदक्षिणा केली असता गढीच्या तटबंदीत दोन टोकावर ढासळलेले दोन बुरुज पहायला मिळतात. संपुर्ण गढी फिरण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. नरहर गणेश तथा बापू गोखले यांचा कार्यकाळ तसा फारच थोडा म्हणजे इ.स. १७७७ - १९ फेब्रुवारी १८१८. गणेश नरहर ऊर्फ बापू गोखले यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तळेजाखण या गावी इ.स. १७७७ मध्ये झाला. लहानपणीच आई-वडील वारल्यामुळे त्यांचा व त्यांच्या मोठ्या भावाचा सांभाळ विजयदुर्ग मधील पिरंदवणे येथे रहाणारे त्यांचे चुलते धोंडोपंत व चुलती लक्ष्मीबाई यांनी केला. नाना फडणवीस हे पुणे दरबारातील मोठे प्रस्थ असल्याने त्यांच्या नातलगांची दरबारी वर्णी लागत असे. या काळात नाना फडणवीसांच्या घराण्यातील गंगाधरपंत भानू हे विजयदुर्गचे सुभेदार होते. तेथे रामोशांच्या तुटालुटीच्या बंदोबस्तात कठीण प्रसंगी धोंडोपंत यांनी चांगली कामगिरी केल्याने गंगाधरपंत भानू यांनी नाना फडणवीस यांच्याकडे त्यांची शिफारस केली. त्यामुळे इ.स. १७८४-८५च्या दरम्यान धोंडोपंत यांना नाना फडणवीसांनी पुण्यास बोलावून घेतले. त्यांच्या सोबत आठ वर्षांचे बापू व त्यांचा मोठा भाऊ पुण्यास आले. धोंडोपंतांना पुणे दरबारात सरदारकी प्राप्त झाली. वयाच्या १५ व्या वर्षापासुन काकासोबत मोहिमेवर जाऊ लागल्याने लहानपणीच बापूंना आपल्या काकांकडून लढाईचे व मुत्सद्दीपणाचे डावपेच समजले होते. इ.स. १८०० पासून बापूंचे स्वतंत्र कर्तृत्त्व सुरू झाले. इ.स.१८०२ मध्ये त्यांच्याकडे सरसेनापती पदाची जबाबदारी आली. विठोजी होळकरांना पकडणे, प्रतिनिधींचा बंदोबस्त करणे, इंग्रजांशी अखेरपर्यंत लढणे या गोष्टी बापुंच्या कारकीर्दीत प्रामुख्याने घडून आल्या. इंग्रजांशी सर्व सरदारांनी म्हणजे रास्ते, विंचूरकर, काळे, शिंदे, होळकर यांनी एकत्रित आघाडी उघडावी असा बापूंचा विचार होता. बापूंनी त्यासाठी तीस-चाळीस हजारांची फौज जमा केली. ऑक्टोबर १८१७ मध्ये बापूंनी इंग्रजांना चारी बाजूने घेरल्याचे मुळा-मुठेच्या संगमावरील बंगल्यात राहणाऱ्या एलफिन्स्टनने आपल्या रोजनिशीत लिहीले आहे. इंग्रजांवरील या वेळच्या हल्ल्याचा प्रतिकार खडकीहून इंग्रजांचे सैन्य आल्यामुळे झाला. ३० ऑक्टोबर १८१७ ला इंग्रजांचे सैन्य खडकीला येऊन भिडल्यावर त्यांच्या अचानक हल्ल्याविषयी बाजीराव पेशवे, बापू गोखले आणि इतर सरदार साशंक होते. एलफिन्स्टनचे दुसरे बाजीरावांवर दडपण आल्याने त्यांनी आपल्याकडून प्रथम तोफ उडवू नका असा बापूंना निरोप दिला. बापू एक लहानशी तुकडी घेऊन इंग्रजांच्या सैन्यात घुसले पण त्यांच्या घोड्याला गोळी लागल्याणे ते माघारी फिरले. सैन्य समोरासमोर भिडले आणि बरीच लढाई झाली. बापू निर्धाराने लढत होते पण बाजीरावांचा निरोप आल्याने लढाई थांबवावी लागली. १६ नोव्हेंबरला येरवड्यात पुन्हा मराठ्यांची इंग्रजांशी लढाई झाली पण ऐनवेळी बाजीरावाने पळ काढल्याने फौज गोंधळली आणि बापू गोखलेंना एकाकी झुंज द्यावी लागली. अखेरीस पंढरपूरजवळ गोपाळअष्टी येथे २० फेब्रुवारी १८१८ रोजी इंग्रजांशी लढताना बापुना वीरमरण प्राप्त झाले. महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिराजवळील महाबळेश्वराच्या (शंकराच्या) देवळात असलेल्या अहोरात्र नंदादीपांपैकी एक नंदादीप बापु गोखले यांनी लावल्याचे सांगितले जाते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!