निमगाव खंडोबा
प्रकार : शिवमंदिर (खंडोबा)
जिल्हा : पुणे
उंची : 0
जेजुरीचा खंडोबा हे अवघ्या महाराष्ट्राचे दैवत आहे. खंडोबाची महाराष्ट्रात जेजुरी,निमगाव दावडी, पाली, माळेगाव, सातारे ,शेंगूड, अणदूर(नळदुर्ग),वाटंबरे अशी एकुण आठ महत्वाची ठिकाणे आहेत. यातील पुणे जिल्ह्यात असलेले खंडोबाचे दुसरे ठिकाण म्हणजे निमगाव. महाराष्ट्रात निमगाव नावाची अनेक गावे असल्याने हे गाव त्याच्या शेजारील दुसऱ्या गावासोबत जोडनावाने ओळखले जाते. या गावाशेजारील दुसरे गाव म्हणजे दावडी. त्यामुळे हे गाव निमगाव दावडी म्हणुन ओळखले जाते. पण येथील खंडोबा मंदिराच्या प्रसिद्धीमुळे हे नाव देखील मागे पडत असुन निमगाव खंडोबा हे नाव रूढ होऊ पहात आहे. आपल्यासारख्या भटक्यांसाठी निमगाव व दावडी ही दोन्ही गावे महत्वाची आहेत कारण निमगावात आपल्याला चंद्रचूड यांची गढी तर दावडी गावात गायकवाड यांची गढी पहायला मिळते. आपली आजची भटकंती मात्र निमगाव दावडी येथे असलेल्या खंडोबा मंदिराची आहे. पेशवेकाळात निमगाव नागना म्हणुन ओळखले जाणारे हे गाव काळाच्या ओघात नागना गाव विस्थापित झाल्याने निमगाव दावडी म्हणुन ओळखले जाऊ लागले.
...
निमगाव दावडी हे ठिकाण पुणे जिल्ह्यात खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरूनगर येथुन ९ कि.मी. अंतरावर आहे.राजगुरुनगर हे शहर असल्याने मुंबई-पुणे येथून तेथे जाण्यासाठी वाहनांची चांगली सोय आहे पण पुढे मात्र खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. निमगावची मुख्य वस्ती हि भीमा नदीच्या काठावर वसलेली असुन या वस्तीपासून साधारण १.५ किमी अंतरावर एका मध्यम आकाराच्या टेकडीवर खंडोबाचे किल्लेवजा तटबंदी असलेले मंदिर उभारलेले आहे. मंदिरापर्यंत जाण्यासाठी नव्याने गाडीमार्ग बांधलेला पायरी मार्गानेही मंदीराजवळ जाता येते. मंदिरात जाण्यासाठी पुर्व व उत्तर असे दोन दिशांना पायरी मार्ग आहेत. पुर्व दिशेला असलेल्या पायरीमार्गाच्या सुरवातीस भैरवनाथाचे मंदिर असुन येथुन साधारण १०० पायऱ्या चढुन गेल्यावर आपण मंदिराच्या पुर्व तटबंदीजवळ पोहोचतो. येथे समोरच लहानसा दरवाजा असुन तो केवळ उत्सवाच्या वेळीच उघडला जातो. या शिवाय मंदिराकडे येण्यासाठी उत्तरेकडून दुसरा पायरी मार्ग असुन या मार्गावर हेगडी प्रधानाची मूर्ती असलेले मंदीर आहे.पायरी मार्गाच्या शेवटी चार दगडी खांबावर तोललेल्या ओवऱ्या असुन सध्या स्थानिकांनी त्याचा ताबा घेऊन तेथे घाण करून ठेवली आहे. या ओवऱ्याच्या दोन्ही बाजुस शरभ कोरलेले असुन आतील बाजुस लहान दरवाजावर गणेशपट्टी व भिंतीवर घोड्यावर,हत्तीवर बसलेल्या वीरांची शिल्प कोरलेली आहेत. मंदिराची दर्शनी वास्तु व तिची अशी अवस्था पाहुन वाईट वाटल्याशिवाय रहात नाही. येथून पुढे आल्यावर डाव्या बाजुस दगडी बांधकामातील पाच कमानीवर तोललेली दुसरी वास्तु आहे पण तिची अवस्था देखील पहिल्या वास्तुसारखीच आहे. मंदीर परिसरावर तटबंदीस लागुन अतिक्रमण करण्यास सुरवात झालेली आहे वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. येथे समोरच तटबंदीतील मुख्य दरवाजा असुन त्यावर नगारखाना बांधलेला आहे. दरवाजाबाहेर दोन्ही बाजुस तटबंदीला लागुन दोन मंडप असुन या मंडपात उजवीकडे हनुमान तर डावीकडे गणपती स्थापन केलेला आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस देवड्या असुन लाकडी दारास दिंडी दरवाजा आहे. दरवाजाने आत शिरल्यावर उजव्या बाजुस दोन दगडी घोडे व वृंदावन आहे. त्याशेजारी तीन भव्य दिपमाळा व दोन दिपमाळाचे चौथरे आहेत. यातील एका दीपमाळेवरील शिलालेखात श्री मार्तंडे । तत्पर । गायकवाड ।सरकार । सयाजीराव महाराज शक १८-०१ (५) सुभानु । नाम । स.माघ.शु.११ असा शिलालेख वाचायला मिळतो. मंदिरासमोरील लहानशा दगडी मंडपात नंदी विराजमान झाला आहे. मंदीराचा परिसर साधारण एक एकर असुन पुर्णपणे दगडी तट बांधुन बंदीस्त करण्यात आला आहे. या तटबंदीच्या चार टोकाला चार बुरुज असुन तटावर जाण्यासाठी उत्तर व दक्षिण बाजुने दोन ठिकाणी बंदीस्त जिना आहे. तटाची उंची साधारण २० फुट असुन मंदिरामागील तटबंदीत असलेला तिसरा दरवाजा कायम स्वरूपी बंद करण्यात आला आहे. तटबंदीला लागून साधारण ७० ओवऱ्या म्हणजे पुर्वीचे भक्तनिवास बांधलेले आहे. तटबंदीच्या आवारात मध्यभागी खंडोबाचे मुख्यमंदिर असुन मुखमंडप,सभामंडप,अंतराळ व गर्भगृह याप्रमाणे त्याची रचना आहे. मंदिराचे गर्भगृह मंडप यावर शिखरे आहेत. सभामंडपाचा गोलाकार घुमट खांबाशिवाय आठ कमानीवर तोललेला असुन सभामंडपास बाहेर पडण्यासाठी दोन्ही बाजूस दरवाजे आहेत. गर्भगृहाशेजारी दोन खोल्या असुन त्यातील एकात देवाचे शेजघर आहे. गर्भगृहाच्या मध्यात पितळी मुखवट्याने झाकलेली खंडोबाची पंचलिंगे आहेत. त्यामागे चौथऱ्यावर बानाई, म्हाळसा व खंडोबा यांच्या पितळी मूर्ती आहेत. या मुर्तीच्या मागे भिंतीत बानाई, खंडोबा व म्हाळसा यांच्या मोठ्या मूर्ती आहेत. मंदिराच्या मागील बाजुस गर्भगृहास लागुन नंतरच्या काळात बांधलेले लहान मंदिर असुन त्यात म्हाळसा देवीची तांदळा स्वरूपातील तर महिषासुर मर्दिनी भवानीची दगडी मुर्ती आहे. या मंदिराच्या भिंतीवर असलेल्या शिलालेखात गायकवाड यांचे दिवाण चंद्रचूड यांनी मंदिराच्या शिखराचे काम केल्याचा उल्लेख आहे. मंदिराचे दक्षिण बाजुस एक थडगे असुन ते खंडोबाच्या मुरुळीचे असल्याचे सांगितले जाते. इ.स. १७३८ मध्ये गंगाधर यशवंत व बाजी यशवंत चंद्रचूड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदीराच्या तटबंदीचे बांधकाम इ.स. १७६९ मध्ये बडोद्याचे सरदार मल्हारराव गायकवाड यांनी केलेले आहे. पेशवेकाळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे निमगाव येथे वास्तव्य होते त्यामुळे या गावास ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले होते. निमगाव हे गाव भीमा नदीकाठी वसलेले असुन येथील भग्न घाट व वाडे आपल्या पुर्व वैभवाची साक्ष देत आहेत. मंदिरामध्ये देवास पाणी घालण्यासाठी भीमा नदीचे पाणी आणले जाते. मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा हे महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत आहे. खंडोबा हा शंकराचा अवतार समजला जातो. खंडोबाची लिंग, तांदळा, मूर्ती, टांक अशा विविध प्रतीकात्मक स्वरूपात पूजा केली जाते. खंडोबा अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर खंडोबाचे जागरण गोंधळ घालण्याची प्रथा आहे. तळीभरण हा दुसरा प्रासंगिक कुळाचार असुन यात पाच पुरुषांद्वारे बेल, भंडारा, सुपारीने देवतेला ओवाळले जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. खंडोबाचे उपासक ब्राह्मणांपासून लिंगायत, धनगर, मातंग, मराठा अशा सर्व जातींमध्ये आढळतात. खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास वाघ्या तर स्त्रीस मुरळी असे म्हणतात. खंडोबाच्या उपासनेत भंडारा (दळलेली हळद व सुके खोबरे) फार महत्त्वाचा आहे. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यात दही व मीठ घातलेले), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात. रविवार हा खंडोबाचा दिवस मानला जात असल्याने या दिवशी मंदिरात विशेष गर्दी असते. याशिवाय सोमवती अमावास्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्ठी व महाशिवरात्र या दिवसांनादेखील खंडोबाच्या पुजेसाठी विशेष महत्त्व आहे.
© Suresh Nimbalkar