नारायणगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : सिंधुदुर्ग

उंची : २३८० फुट

श्रेणी : मध्यम

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेले आंबोली पूर्वीपासुनच सावंतवाडी संस्थानाचे थंड हवेचे ठिकाण होते. सह्याद्रीतील निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी येथे काही ठिकाणे असुन त्यापैकी एक ठिकाण म्हणजे कावळेसाद पॉंईंट. या कावळेसाद पॉंईंटला अनेक पर्यटक भेट देतात पण याच्या विरुध्द बाजूस असलेल्या नारायणगडकडे मात्र कोणाची पावले वळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे नारायणगडच्या परीसरातील लोकांना या किल्ल्याबद्दल काहीच माहिती नाही. इतकेच नव्हे तर किल्ल्याजवळ असलेल्या गेळे गावात काही जुनी माणसे वगळता तरुण वर्गाला देखील या किल्ल्याबद्दल माहिती नाही. गडाकडे जाण्याच्या मार्गावर असंख्य ढोरवाटा असल्याने तसेच किल्ल्याचे अवशेष झाडीत लुप्त झाल्याने गडावर जाण्यासाठी वाटाड्या सोबत असणे आवश्यकच आहे. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण मुंबईपासून कोल्हापुरमार्गे ५०६ कि.मी.वर तर सावंतवाडी पासुन ३२ कि.मी अंतरावर आहे. आंबोलीहुन कोल्हापुरकडे जाताना गेळे हे नारायणगड जवळील गाव ८ किमी अंतरावर आहे. ... आंबोली-बेळगाव रस्त्यावर आंबोली पासून ६ कि.मी.वर कावळेसाद पॉंईंट व गेळे गावात जाण्यासाठी फाटा फुटतो. या फाट्याने पुढे आल्यावर उजवीकडचा रस्ता कावळेसाद पॉंईंटला तर डावीकडचा रस्ता गेळे गावात जातो. गेळे गावातील रवळनाथ मंदिरापर्यंत गाडी जाते. गावात मुक्काम करायचा झाल्यास या मंदिरात मुक्काम करता येईल. गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने पुरेसे पाणी सोबत घेऊनच गडावर निघावे. रवळनाथ मंदिराच्या मागील बाजुस असलेली घरांची वाट संपल्यावर उजव्या बाजुस वळणाऱ्या पायवाटेने गडावर जाता येते. या वाटेवर एका ठिकाणी उजवीकडे काही अंतरावर खडकात खोदलेले पाण्याचे टाके असुन त्यात वर्षभर पिण्याचे पाणी असते पण ते टाके पायवाटेवरून नजरेस पडत नाही. वाटेच्या पुढील भागात डावीकडे शंकराचे उध्वस्त मंदीर असुन या मंदिराच्या अवशेषात एक शिवलिंग व समोर एक नंदी असुन शिवलिंगाशेजारी दोन घडीव मुर्ती व काही तांदळा पहायला मिळतात. स्थानिक लोक या स्थानाला लिंगी म्हणतात. येथुन पुढे जाणारी वाट दाट झाडीतुन जाते. या झाडीत डाव्या बाजुस काही घडीव मुर्ती असुन स्थानिक या जागेला म्हार्ताळ म्हणुन ओळखतात. येथुन पुढे एक उतार पार करत आपण नारायणगडच्या खिंडीत येतो. नारायणगड सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून काहीसा वेगळा झाला असुन गेळे गावातून गडावर जातांना लहानमोठे चढउतार पार करत आपण नारायणगड व सह्याद्रीरांग यामधील खिंडीत पोहोचतो. खिंडीतुन डाव्या बाजुचा चढ चढत पाच मिनिटात आपण गडावर प्रवेश करतो. किल्ल्याचा दरवाजा व त्या शेजारील तटबुरुज आज पुर्णपणे नष्ट झाले आहेत. किल्ल्यावर प्रवेश केल्यावर समोरच एक दगडी ढोणी असुन या ढोणीच्या मागील बाजुस २-३ बांधकामाची जोती आहेत. येथे असलेल्या उंच खडकावर चढल्यास संपुर्ण किल्ल्याचा परीसर नजरेस पडतो. किल्ल्यावर फारसे अवशेष नसले तरी असलेले सर्व अवशेष झाडी वाढल्याने त्यात लपले आहेत. किल्ल्यावर सातेरी देवीचे स्थान असुन येथील मुर्ती गावात नेण्यात आली आहे. तिथे एका झाडाखाली काही घडीव दगड पडलेले आहे. याशिवाय गडावर कोरडा पडलेला एक साचपाण्याचा तलाव आहे. गडाच्या काही भागात ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. दक्षिणोत्तर पसरलेल्या या किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची २३३० फुट आहे. गडावरून दुरवर पश्चिमेला असलेली मनोहर-मनसंतोष ही दुर्गजोडी, पुर्वेला कावळेसाद पॉंईंट व खाली लांबवर पसरलेला कोकण परीसर तसेच पारपोली घाट इतका दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. गेळे गावातुन संपुर्ण किल्ला पाहुन परत येण्यास ३ तास पुरेसे होतात. आंबोलीतून एका दिवसात महादेवगड व नारायणगड हे २ किल्ले सहज पहाता येतात. सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरण्यासाठी अनेक घाटमार्ग असले तरी त्यातील आंबाघाट, बावडाघाट, फोंडाघाट व पारपोली घाट हे चार महत्वाचे घाटमार्ग होते. यातील पारपोली घाटांचे वैशिष्ट म्हणजे याच्या माथ्यावर महादेवगड व नारायणगड हे किल्ले आहेत तर पायथ्याशी मनोहर-मनसंतोषगड हि दुर्गजोडी आहे. कोकणातील बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यातील सावंतवाडी संस्थानाच्या हद्दीत असलेल्या पारपोली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी सावंतवाडी संस्थानाचे अनासाहेव फोंडसावंत यांनी १७०९ ते १७३८ दरम्यान नारायणगड हा किल्ला बांधला. पारपोली घाटाचे संरक्षण व जकात वसूली केंद्र या किल्ल्यावर होते. इ.स. १७७२-७३ दरम्यान सावंतांचे कारभारी जिवाजी विश्राम यांनी महादेवगड व नारायणगड जिंकुन रांगणा देखील घेतला तेव्हा करवीर राणी जिजाबाई यांनी स्वतः स्वारी करत महादेवगड व नारायणगड हे किल्ले जिंकुन घेतले पण काही काळातच सावंताना परत केले. यानंतर जानेवारी १७८८ मध्ये करवीरकरांनी फितुरीने घेतलेला नारायणगड इ.स.१७९३ मध्ये सावंतांना परत केला. २० नोव्हेंबर १८०४ मधील एका पत्रानुसार करवीरकरांच्या ताब्यात असलेला नारायणगड सावंतानी हल्ला करून जिंकुन घेतला. इ.स. १८२८ मध्ये फोंडसावंत तांबुळकर यांनी सावंताविरुद्ध बंड करत गडाचा ताबा घेतला पण इंग्रजांची फौज सावंतांच्या मदतीस येताच त्यांनी पळ काढला. इ.स.१८३२ पर्यंत नांदता असलेला हा किल्ला नंतरच्या काळात सावंतांची आर्थिक परीस्थिती डळमळीत झाल्याने ओस पडला तो कायमचाच.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!