नारायणगड

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : पुणे

उंची : २७१० फुट

श्रेणी : मध्यम

पुणे जिल्ह्यातील नारायणगाव तमाशाची पंढरी म्हणुन ओळखले जाते. जुन्नर तालुक्यातील या नारायणगावच्या उत्तर दिशेला सपाट प्रदेशात मुख्य डोंगररांगेपासून थोडासा वेगळा असलेल्या एका डोंगरावर नारायणगड हा किल्ला वसला आहे. जुन्नर बाजारपेठ आणि नाणेघाट यांच्याशी असलेली जवळीक व सपाट प्रदेशात मध्यभागी असणारा हा डोंगर पहाता नारायणगड हा टेहळणीसाठी महत्वाचा किल्ला असावा. किल्ल्यावरील कातळात खोदलेल्या पायऱ्या व पाण्याची टाकी पहाता या किल्ल्याची बांधणी सातवाहन काळात झाली असावी. नारायणगडला जाण्यासाठी मुंबई-पुणे येथुन सर्वप्रथम नारायणगाव गाठावे. नारायणगाव एसटी स्थानका समोरुन एक रस्ता खोडदला जातो. या रस्त्याने ९ किमी अंतरावर डाव्या बाजूचा रस्ता गडाचीवाडी या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावातुन मुकाईदेवी मंदिरापर्यंत जातो. नारायणगाव ते मुकाईदेवी मंदिर अंतर साधारण ११ कि.मी आहे. ... गडाचा डोंगर पुर्वपश्चिम दोन भागात विभागलेला असुन गडाची समुद्रसपाटी पासूनची उंची २६४० फुट आहे. मुकाईदेवी मंदिरापासुन गडावर जाणाऱ्या नव्याने बांधलेल्या सिमेंटच्या पायऱ्या सुरु होतात. या पायऱ्यानी पुढे गेले असता आपल्याला कातळात खोदून काढलेल्या पायऱ्या दिसतात. या पायऱ्यांच्या बाजुने कठड्याचे किंवा तटाचे दगड बसविण्यासाठी कोरलेल्या खोबणी पहायला मिळतात. या कातळकोरीव पायऱ्यांची चढण चढल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. येथे असणारा गडाचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला आहे. हा दरवाजा शिल्लक असताना त्यावर नारायणाची मुर्ती व वाद्यांचीं चित्रें असल्याचे उल्लेख आढळतात. पायथ्यापासुन गडावर यायला अर्धा तास पुरेसा होतो. गडावर प्रवेश केल्यावर उजव्या आणि डाव्या बाजूला टेकाड दिसतात. त्यातील डाव्या बाजूच्या टेकाडावर हस्तमाता मंदिर आहे. या दोन्ही टेकाडाचे माची व मधील उंचवटा असे दोन भाग पडलेले असुन दोन्ही टेकाडाच्या माचीवरून वरील उंचवट्याला फेरी मारता येते. गडमाथा आकाराने निमुळता असुन २० एकर परिसरावर पुर्वपश्चिम पसरलेला आहे. मंदिरामुळे स्थानिकांचा गडावर वावर असल्याने पायवाटा बऱ्यापैकी रुळलेल्या आहेत. सरंक्षण दृष्ट्या नारायणगडाची उंची जास्त नसली तरी किल्याला तीन बाजुंनी नैसर्गिक कातळकड्याचे सरंक्षण असल्याने फारशी तटबंदी बांधलेली नाही. गडावर प्रवेश केल्यावर आपण मंदिराकडे न जाता उजव्या बाजुच्या टेकडाकडून गडफेरीला सुरवात करायची. या टेकडीच्या डाव्या बाजुने म्हणजे दरी डावीकडे व टेकाड उजवीकडे ठेवत सुरवात केल्यावर वाटेत सर्वप्रथम खडकात खोदलेले पाण्याचे टाके दिसते. हे टाके पाहुन पुढे गेल्यावर खडकाच्या उतारावर खोदलेले दुसरे टाके दिसते. हे टाके खांबटाके असुन याच्या वरील भागात एक झिजलेला देवनागरी शिलालेख आहे. हे टाके नारायण टाके म्हणुन ओळखले जाते.इ.स.१८३०ला गडावर टाक्यात सापडलेली नारायणाची मुर्ती या टाक्यात सापडली असावी असे वाटते. या टाक्याच्या पुढे दरीच्या बाजूस झाडीत लपलेला चोर दरवाजा आहे पण तेथे खुप मोठया प्रमाणावर झाडी वाढली असल्याने व तेथे जाण्याची वाटही धोकादायक असल्याने तेथवर जाता येत नाही. येथुन पुढील भागात कोणतेही अवशेष नसुन सरळ जाणारी हि वाट गडाच्या पुर्व टोकावरील बुरुजावर जाते. या टोकावर आपल्याला बुरुजांचे अवशेष आणि तटबंदीच्या खुणा पहायला मिळतात. येथुन मागे न फिरता समोरील उंचवट्यावर चढुन जावे. या उंचवट्यावरून संपुर्ण किल्ला नजरेस पडतो. येथुन हस्तमाता मंदिराच्या दिशेने उतरायला सुरवात केल्यावर वाटेत गवतात लपलेले घरांचे अवशेष नजरेस पडतात. हे अवशेष पहात डाव्या बाजुने खाली उतरल्यावर गडाच्या उत्तर दिशेला सलग पाच पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला मिळतो. टाक्यांचा समूह पाहुन पुढे आल्यावर आपण खालुन गडावर येणाऱ्या पायऱ्यांच्या वरील भागात येतो. येथे खडकात खोदलेले २० x १५ फुट आकाराचे भलेमोठे टाके आहे. या टाक्यासमोरची तटबंदीचे आजही काही प्रमाणात शिल्लक आहे. हे टाके पाहुन पुढे आपण गडावर प्रवेश केलेल्या ठिकाणी येतो. येथे आपली गडाची एका बाजुची प्रदक्षिणा पूर्ण होते.आता समोरच्या बाजूला हस्तमाता मंदिर असलेले नारायणगडाचे दुसरे टेकाड दिसते. येथे टेकाडाकडे जाणाऱ्या दोन पायवाटा दिसतात. एक वाट उजव्या बाजूला वर चढत जाते तर दुसरी वाट डाव्या बाजुला खाली झाडीत वळते. या वाटेने खाली उतरल्यावर कातळात खोदलेले पाण्याच टाक पाहायला मिळते. यातील पाणी पिण्यायोग्य आहे. हे टाक पाहून परत मूळ वाटेवर आले असता नुकतेच साफ केलेले पाण्याचे दुसरे कोरडे टाके दिसते. येथून पाच-दहा पावले चालल्यावर उजव्या बाजूला वाड्याचे अवशेष आहेत. यात शरभशिल्प कोरलेले दोन कमानीचे दगड असुन व्दारपट्टीवर गणपतीची सुंदर छोटीशी मुर्ती आहे. याच्या मागील बाजुस वाडयाचा चौथरा व अर्धवट ढासळलेल्या भिंती पहायला मिळतात.किल्ल्यावर खुप मोठया प्रमाणात असलेल्या गवतामुळे किल्याचे बरेचसे अवशेष हे गवतामधून शोधावे लागतात. वाडयाच्या मागील बाजुने हस्तमाता मंदिराच्या टेकाडाला वळसा घालत टेकाडाखालील माचीच्या भागात जाता येते. या भागात दोन पाण्याची टाकी असुन त्यातील एक टाके बुजलेले आहे. वाडयाच्या मागील टेकाडावर जाऊन चढत उतरत किंवा मूळ वाटेवर जाऊन रुळलेल्या वाटेने किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावरील गडदेवता हस्तमाता मंदिराकडे जाता येते. हस्तमातेचे दगडी बांधकामातील मूळ मंदीर तसेच ठेवुन गावकऱ्यांनी त्यावर नविन सिमेंटचे मंदिर बांधलेले आहे. मंदिराच्या चार फुट उंचीच्या गाभाऱ्यात देवीचा तांदळा आणि हस्तमातेची चतुर्भुज मुर्ती असुन मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. मंदिराच्या उंचवट्यावरून किल्यावर नजर टाकली असता किल्याचा व आसपासचा संपूर्ण परिसर नजरेस पडतो. येथे आपली गडफ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण किल्ला पाहाण्यास दोन तास लागतात. गडाच्या इतिहासावर नजर टाकली असता गडाची बांधणी जरी सातवाहन काळात झाली असली तरी याचा सर्वप्रथम उल्लेख पेशवेकाळातच मिळतो. इ.स.१६०५ पासून जुन्नर परगणा मालोजीराजांकडे होता. शहाजीराजांनी अनेकदा आपली नोकरी बदलली मात्र जुन्नर ते चाकणपर्यंतच्या परिसराचा ताबा सोडला नाही. जुन्नर परगण्यामध्ये नारायणगड आणि खोडद गावाचा समावेश होत होता. किल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथ यांच्या कालखंडात बांधली गेली व उर्वरित बांधकाम नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले याची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये मिळते. पहिल्या बाजीराव पेशव्यांचा नारायणगडाशी जवळचा संबंध होता. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंनी पेशवेपदाची सूत्रे बाजीरावाकडे सोपवली तेव्हा नारायणगाव आणि नारायणगडाचा सरंजाम त्यांना दिल्याचे पत्रांमध्ये उल्लेख सापडतात. पेशव्यांतर्फे हा किल्ला सयाजी पवार ह्यांना सरंजाम म्हणून देण्यात आला होता. नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीराव पेशव्याच्या कालावधीत पेशवाईचा आर्थिक कारभार सदाशिवराव भाऊकडे असता इ.स.१७५८ मधील नारायणगडाचा आर्थिक हिशेब आपणाकडे तातडीने सादर करावा हा त्यांचा आदेश पेशवे दप्तरामध्ये पहायला मिळतो. इंग्रजांनीं १८२० सालीं या किल्ल्याची मोठया प्रमाणात नासधूस केली व किल्ला पाडून टाकला. १८३० साली येथील एका टाक्यात नारायणाची मुर्ती सापडली पण सध्या ती मुर्ती कोठे आहे याचा ठावठिकाणा लागत नाही. १९४२ मध्ये महात्मा गांधीच्या भारत छोडो आंदोलनाला या गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. माजी पोलीस पाटील कै.रावजी पाटील काळे, श्री बाळा पाटील गायकवाड यांच्या समवेत ग्रामस्थांनी नारायणगडावर राष्ट्रध्वज फडकविला होता. मुंबई-पुण्याहून जवळ असुनही उपेक्षित असणाऱ्या ह्या किल्ल्याला दुर्गप्रेमीनी नक्की भेट द्यायला हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!