नारगुंद

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : बेळगाव

उंची : २४५० फुट

श्रेणी : सोपी

मराठयांचे राज्य दक्षिणेत तुंगभद्रा कावेरीपर्यंत पसरले त्यावेळी मराठयांनी या भागात असलेल्या किल्ल्यांची दुरुस्ती करण्यासोबत काही किल्ले नव्याने बांधले. दक्षिणेकडील या प्रांतात दुर्ग उभारणीत मराठयांचा देखील काही प्रमाणात सहभाग दिसुन येतो. शिवाजी महाराज आणि दुर्ग हे नाते आपल्याला दक्षिणेतील किल्ले पाहताना देखील दिसुन येते. आदिलशहाच्या ताब्यात असलेला दक्षिणेकडील प्रांत महाराजांनी स्वराज्याला जोडला त्यावेळी या भागातील पारसगड किल्ला दुरुस्त केला तर मनोली,हुबळी हलीयाळ या सारखे भुईकोट नव्याने बांधुन काढले. यात महाराजांनी नव्याने बांधलेला गिरीदुर्ग म्हणजे किल्ले नारगुंद. भाषावार प्रांतरचना करताना स्वराज्यात असणारा हा मराठी बहुभाषिक प्रांत कर्नाटक राज्याला जोडला गेला. यात बेळगाव जिल्ह्याबरोबर धारवाड व गदग जिल्ह्यातील काही गावे सामील आहेत. महाराजांनी बांधलेला नारगुंद किल्ला आज गदग जिल्ह्यातील नारगुंद तालुक्यात सामील झाला आहे. ... नारगुंद गावात आजही मोठ्या प्रमाणात मराठी आडनावे दिसुन येतात. एकेकाळी स्वराज्यात असलेल्या या किल्ल्यांना मी महाराष्ट्रातील किल्ले समजतो व त्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले म्हणुन करत आहे. बेळगाव जिल्ह्यातील गडकोटांची भटकंती करताना हा किल्ला सौंदत्ती तालुक्यातील पारसगड पासुन फक्त ३८ कि.मी.म्हणजे केवळ तासभराच्या अंतरावर असल्याने सहजपणे पाहुन होतो. नारगुंद हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सौंदत्ती येथुन नारगुंदला जाण्यासाठी बससेवा आहे. गदग शहरापासुन नारगुंद ५२ कि.मी. तर हुबळी पासुन ५४ कि.मी.वर आहे. सौंदत्तीहुन जाताना दुरूनच या गडाच्या डोंगरावर असलेल्या पवनचक्क्या दिसायला सुरवात होते तर गावात गेल्यावर गावामागील डोंगरावर असलेल्या बुरुजावर भगवा फडकताना दिसतो. गडावर असलेल्या पवनचक्क्यामुळे वर जाण्यासाठी कच्चा रस्ता बांधला आहे पण रस्ता चांगला असल्याने कोणतेही वाहन थेट गडावर जाते. गावाबाहेर असलेल्या तलावाच्या काठावरून डोंगराला वळसा घालत हा रस्ता गडावर जातो. निमुळत्या आकाराचा हा गड दक्षिणोत्तर पसरला असुन दुर्लक्षीत असल्याने तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळली आहे. गडावर येणारा रस्ता दोन ठिकाणी तटबंदी फोडुन वर आलेला असुन गडाचा दरवाजा पुर्णपणे नष्ट झाला आहे. गडाची समुद्रसपाटीपासुन उंची २३९० फुट असुन गडाचा माथा ४५०० फुट लांब तर दोन्ही टोकावर रुंदीला २७० फुट व मध्यभागी ८० फुट आहे. पवनचक्की व रस्त्यामुळे गडावरील बहुतांशी अवशेष नष्ट झाले आहेत. गाडी गडाच्या टोकावर जात असल्याने व गडाला फारशी रुंदी नसल्याने एका टोकावरून सुरवात करून दुसऱ्या टोकापर्यंत गेल्यास सर्व अवशेष पाहुन होतात. किल्ल्याच्या उत्तर टोकावरून सुरवात केल्यास सर्वप्रथम आपल्याला नव्याने बांधलेले शिवमंदीर पहायला मिळते. नव्याने बांधलेल्या या मंदीरात तळपाया तसाच ठेवलेला असुन त्यात कीर्तिमुख पहायला मिळते. या टोकावर आपल्याला एका वास्तुचे अवशेष व बुरुज पहायला मिळतो. येथुन दक्षिणेकडे जाताना दोन्ही बाजुस किल्ल्याची उध्वस्त तटबंदी व त्यात पडझड झालेले बुरुज पहायला मिळतात. किल्ल्याचे जे काही अवशेष उरले आहेत ते किल्ल्याच्या दक्षिण बाजुस आहेत. येथे कातळात कोरलेला अष्टकोनी आकाराचा मोठा व खोल तलाव असुन या तलावाकाठी तटबंदी उभारली आहे. या तटबंदीत दरवाजा असुन त्यातुन तलावात उतरण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. तलावात पाणी असुन मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे. तलावाशेजारी दारीकाठावर ढासळलेला बुरुज असुन या बुरुजात वर जाण्यासाठी लहान दरवाजा आहे. या भागातील गडाची तटबंदी व इतर बांधकाम काही प्रमाणात शिल्लक असुन त्यात काही वास्तुंचे चौथरे पहायला मिळतात. येथे तटबंदीला लागुनच अजुन एक कोरडा पडलेला तलाव पहायला मिळतो. किल्ल्याचे दक्षिण टोक गडाचा सर्वात उंच भाग असुन तेथे जाण्यासाठी काही पायऱ्या बांधल्या आहेत. गडाच्या या टोकावरील बुरुजावर भगवा फडकवलेला आहे. या टोकावर आपली गडफेरी पुर्ण होते. गाडी घेऊन गडावर आल्यास गडफेरी करण्यास अर्धा तास पुरेसा होतो. नारगुंद किल्ल्याचा इतिहास सुरु होतो छत्रपती शिवाजी महाराजांपासून. इ.स १६७५ साली दक्षिण मोहिमेच्या काळात महाराजांनी या गिरीदुर्गाची बांधणी केली. त्या नंतर जवळपास १५ वर्ष हा किल्ला स्वराज्यात होता. महाराजांच्या मृत्यूनंतर १६९१ साली मुघलांनी या गडाचा ताबा घेतला. इ.स.१७०७ मध्ये रामराव दादाजी भावे या सरदाराने मुघलांचा पराभव करून किल्ला पुन्हा ताब्यात घेतला. १८ व्या शतकात किल्ला व आसपासचा प्रदेश मराठयांच्या ताब्यात असुन व्यंकटराव हा येथील देसाई होता. इ.स.१७७८ मध्ये हा किल्ला व प्रदेश म्हैसूरच्या हैदरअलीच्या ताब्यात गेला पण लवकरच हा प्रांत माधवराव पेशव्यांनी ताब्यात घेतला. इ.स.१७८४ मध्ये टीपू सुलतान याने किल्ल्याचा ताबा घेतला पण इ.स. १७८७ सालीं सावनेर येथे झालेल्या लढाईत टिपूने मराठ्यांबरोबर तह केला. या तहानुसार ४८ लक्ष रु. खंडणी व गजेंद्रगड, बादामी, नरगुंद व कित्तूर हे किल्ले मराठ्यांस परत केले. इ.स.१७९२ सालीं हा किल्ला व प्रदेश पेशव्यांनी परशुरामभाऊ पटवर्धन यांनां सरंजामांत दिला. इ.स.१८५७ च्या बंडात नारगुंद किल्ला देखील सामील होता. त्यावेळी भास्करराव भावे उर्फ बाबासाहेब हे नारगुंदचे देसाई होते. कर्नल माल्कमच्या नेतृत्वात ब्रिटीश सैन्याने १८५८ साली मे महीन्यात किल्ल्यावर हल्ला केला व गड ताब्यात घेतला. त्यानंतर काही महीन्यांनी दक्षिण भारताचे पोलिटिकल एजंट मॅन्सन यांच्या खुनाच्या व राजद्रोहाच्या आरोपाखाली बाबासाहेब भावे यांना पकडून फासावर देण्यात आले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!