नानी दमण

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : दमण

उंची : 0

श्रेणी : सोपी

मुंबईहुन १८० कि.मी. अंतरावर दिव दमण शहर आहे. १६ व्या शतकात हजारो मैल दुरून येथे आलेल्या पोर्तुगीजांनी या शहरावर ४०० वर्ष सत्ता गाजवली व भारत स्वतंत्र झाल्यावर डिसेंबर १९६१ मध्ये हा प्रदेश भारतात सामील झाला. दमण शहरातुन वाहणाऱ्या दमणगंगा नदीमुळे शहराचे मोटी दमण व नानी दमण म्हणजे मोठे दमण व छोटे दमण असे दोन भाग पडले आहेत. यातील छोटे दमण हे शहर आकाराने मोठे असुन मोठे दमण हे शहर आकाराने लहान आहे. पोर्तुगीजांची मुळ वसाहत हि मोटी दमण किल्ल्यात असल्याने मोटी दमण किल्ला आकाराने मोठा तर नानी दमण किल्ला आकाराने लहान आहे. पोर्तुगीज हि दर्यावर्दी जमात असल्याने पोर्तुगालशी थेट संबंध ठेवता यावा यासाठी व दमण शहराच्या रक्षणासाठी त्यांनी दमणगंगा खाडीमुखावर दोन किल्ले बांधले. हे दोन्ही किल्ले एकमेकासमोर असुन यातील नानी दमण किल्ला म्हणजेच सेंट जेरोम फ़ोर्ट दमणगंगा नदीच्या उत्तर तीरावर आहे. ... मराठयांचा या किल्ल्याशी आलेला संबंध म्हणजे इ.स १७३९ साली चिमाजीअप्पांच्या वसई मोहिमेच्या काळात या किल्ल्यावरून वसई किल्ल्यावरील पोर्तुगीजांना मदत मिळू नये यासाठी मराठा फौजांनी या किल्ल्याची नाकेबंदी केली होती. गुजरातच्या सुलतानाकडून हा प्रांत ताब्यात घेतल्यावर पोर्तुगीजांनी येथे किल्ला बांधण्यास सुरवात केली. या किल्ल्याचे बांधकाम इ.स. १६१४ ते १६७२ पर्यंत चालु होते म्हणजे किल्ला बांधण्यासाठी साधारण ५० वर्ष लागली. किल्ल्याचे बांधकाम म्हणजे पोर्तुगाल वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण ३ एकरवर पसरलेला असुन किल्ल्याच्या तटबंदीत बाणाच्या आकाराचे तीन बुरुज आहेत. किल्ल्याच्या २० फुट उंच असलेल्या तटबंदीत दक्षिणेकडील दमणगंगा नदीच्या दिशेने मुख्य दरवाजा असुन उत्तरेला दुसरा लहान दरवाजा आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर दोन शिलालेख पोर्तुगीज राजचिन्ह व सेंट जेरोम यांचा पुतळा कोरलेला असुन इतर सजावटीचे काम केले आहे. संपुर्ण दरवाजाची सजावट पोर्तुगीज शैलीत केलेली आहे. दरवाजाच्या आतील बाजुस आडवी भिंत बांधलेली असुन या भिंतीमुळे आपला थेट किल्ल्यात प्रवेश न होता या चिंचोळ्या मार्गातुन आत जावे लागते. या ठिकाणी तटामध्ये एक खोली बांधलेली आहे. किल्ल्याच्या आतील भागात अवर लेडी ऑफ द सी हे चर्च व ख्रिश्चन दफनभूमी या दोन जुन्या वास्तु असुन नव्याने बांधलेली शाळा आहे. किल्ल्यातील उर्वरित जागेचे एका मोठया मैदानात रुपांतर करण्यात आले आहे. किल्ल्यात शिरल्यावर उजव्या बाजुस तटाला लागून फ़ांजीवर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्याची तटबंदी अखंड असल्याने फांजीवरून संपूर्ण किल्ला फ़िरता येतो. ही तटबंदी एक बैलगाडी जाईल इतपत म्हणजे जवळपास १० फुट रुंद आहे.तटबंदी व बुरुजावर बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या व तोफांचा मारा करण्यासाठी झरोके बांधले असुन काही ठिकाणी केवळ एक माणुस उभा राहू शकेल अशा आकाराचे गोलाकार आडोसे बांधले आहेत. दरवाजाकडील बुरुजावर चढुन फांजीवरून चालत आपण किल्ल्यावरील दुसऱ्या बुरुजावर येतो. या बुरुजावर घंटा टांगण्यासाठी कमान बांधलेली आहे. या बुरुजाखाली असलेला खंदक पहाता संपुर्ण किल्ल्याला खंदक असावा पण काळाच्या ओघात तो बुजला अथवा बुजवला गेला असावा. या बुरुजावरून किल्ल्यात उतरण्यासाठी जिना बांधलेला असुन जीन्याखालील चौकात वर येण्यासाठी दरवाजा बांधलेला आहे. या चौकात खालील बाजुस बुरुजामध्ये दोन मोठी कोठारे बांधली आहेत. या बुरूजाशेजारी किल्ल्यातुन बाहेर पडण्यासाठी दुसरा लहान दरवाजा म्हणजेच उत्तरेकडील दरवाजा आहे. यानंतर आपण किल्ल्याच्या पश्चिमेकडील म्हणजेच समुद्राच्या दिशेने असलेल्या तिसऱ्या बुरुजावर येतो. या बुरुजावर एक उंच चौथरा बांधलेला असुन त्यावर झेंडा उभारण्यासाठी एक भलामोठा लाकडी खांब रोवलेला आहे. येथुन पुढे तटावरून फिरत किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आल्यावर आपली गडफेरी पुर्ण होते. तटावरून संपुर्ण किल्ल्यास फेरी मारण्यासाठी अर्धा तास पुरेसा होतो. वापी ते दमण हे अंतर १२ कि.मी. असुन वापी रेल्वे स्थानकातून बस, रिक्षा आणि खाजगी वहानाने दमणला जाता येते. नानी दमण बसस्थानकापासुन चालत हा किल्ला अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!