नाचणगाव

प्रकार : सराई

जिल्हा : वर्धा

उंची : 0

श्रेणी : सोपी

वर्धा जिल्हा म्हटले कि आपल्याला आठवते महात्मा गांधी यांचे सेवाग्राम पण विदर्भातील या वर्धा जिल्ह्यात एकेकाळी बरेच किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी स्वरुपात अस्तित्वात होते. वर्धा जिल्ह्यातील किल्ल्यांची शोधयात्रा करताना आम्हाला एकुण १० कोट अवशेष रुपात पहायला मिळाले. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे गडकिल्ले महाराष्ट्राचे या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतरत्र कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणक युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. या किल्ल्यांना भेट दिली असता मिळालेली माहिती मी दुर्गभरारी या संकेतस्थळावर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातील बऱ्याच गढी पुर्णपणे नष्ट झाल्या असुन केवळ तटबंदीची एखादी भिंत अथवा एखादा बुरुज वा दरवाजा असे उर्वरित अवशेष काळाशी झुंज देत आहेत. या १० किल्ल्यात २ गिरिदुर्ग १ सराई तर उरलेले ७ गढीकोट आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गाव, मंदिरे वा दर्गा असल्याने या वास्तुनीच या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे. ... स्थानिकांचे या वास्तुबद्दलचे अज्ञान व उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. आम्ही पाहीलेल्या १० कोटामधील काही प्रमाणात सुस्थितीत असलेली वास्तु म्हणजे देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील सराई. नाचणगाव सराईला भेट देण्यासाठी सर्वात जवळचे ठिकाण पुलगाव शहर आहे. वर्धा ते पुलगाव हे अंतर ३२ कि.मी. असुन पुलगाव ते नाचणगाव हे अंतर फक्त ३ कि.मी. आहे. पुलगाव येथुन नाचणगावात जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. सराई गावात प्रसिद्ध असल्याने बस थांब्यावर उतरून ५ मिनीटात गावाच्या मध्यभागी असलेल्या सराईत पोहचता येते. चौकोनी आकाराची हि सराई एक एकर परिसरावर पसरली असुन गढीच्या उत्तरेला मुख्य दरवाजा व दक्षिणेला एक असे दोन दरवाजे आहेत. मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजुस दोन ओवऱ्या असुन आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. दोन्ही दरवाजे व बाहेरील तटबंदी घडीव दगडांनी बांधलेली असुन या दरवाजावर तसेच ओवऱ्यावर कमळाची फुले व कलश कोरलेले आहे. दरवाजाच्या आतील बाजुस तटावर जाण्यासाठी जिना असुन दरवाजावरून संपुर्ण सराई नजरेस पडते. सराईचे आतील बांधकाम विटांनी केलेले आहे. सराईच्या दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजा बाहेर अतिक्रमण झाल्याने हा दरवाजा दगड लाऊन बंद करण्यात आला आहे. या दरवाजाला लागुन आतील बाजुस दोन खोल्या आहेत. सराईची उत्तरेकडील व पुर्वेकडील तटबंदी आजही पुर्णपणे शिल्लक असुन पूर्वेकडील तटबंदीत १६ खोल्या तर उत्तरेकडील तटबंदीत ७ खोल्या अशा एकुण २३ खोल्या पहायला मिळतात. सराईच्या मध्यभागी दगडी चौथरा असलेली अष्टकोनी घडीव बांधकामातील दरवाजा असलेली सुंदर विहीर असुन या विहिरीत उतरण्यासाठी बांधीव पायरीमार्ग आहे. पाण्याने भरलेली हि विहीर दुमजली असुन विहिरीच्या दरवाजावर दोन सुंदर व्याघ्रमुखे कोरलेली आहेत. संपुर्ण सराई फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. सध्या सार्वजनीक बांधकाम विभागाने या सराई दुरुस्तीचे काम हाती घेतले असुन अतिशय भयानक रीतीने हि दुरुस्ती केली जात आहे. पडलेल्या तटबंदीच्या जागी नवीन कोन्क्रिटची भिंत बांधण्यात आली असुन इतर ठिकाणी खडीसिमेंट ओतले जात आहे. तुटलेल्या वास्तु सिमेंट विटांनी जोडल्या जात आहेत. गावाबाहेरील माळावर एक दुमजली मोगल शैलीतील भलीमोठी इमारत पहायला मिळते. स्थानिक लोक या वास्तुला किल्ला म्हणुन संबोधतात. अंधार झाल्याने आम्हाला या वास्तुच्या आतील भागात जाता आले नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!