नागेश्वर

प्रकार : नैसर्गिक गुहा- शिवमंदिर

जिल्हा : रत्नागिरी

श्रेणी : मध्यम

सह्याद्रीच्या कडेकपारीत दुर्ग भटकंती करताना दुर्गांसोबत अनेक देवदेवतांची ठाणी पहायला मिळतात. वासोटा किल्ल्याची भटकंती करताना असेच एक न चुकवता पाहावे असे ठिकाण म्हणजे नागेश्वर गुहा. नागेश्वरला भेट दिल्याशिवाय वासोट्याची दुर्गभ्रमंती खऱ्या अर्थाने पुर्ण होऊच शकत नाही पण हा संपुर्ण परीसर व्याघ्रप्रकल्प व कोयना अभयारण्य परिसरात येत असल्याने येथे मुक्काम करण्यास बंदी आहे. त्यामुळे वासोटा किल्ल्याची वासोटा-नागेश्वर हि १२ तासाची खडतर दुर्गभ्रमंती एका दिवसात पुर्ण करावी लागते. नागेश्वरला जाण्यासाठी अनेक परंपरागत मार्ग असले तरी घाटमाथ्यावरुन साताऱ्यातील बामणोली येथुन तर कोकणातील चिपळूण जवळील चोरवणे येथुन गडावर जाण्यासाठी दोन प्रमुख रुळलेले मार्ग आहेत. सातारा-कास-बामणोली असा गाडीमार्ग असुन सातारा- बामणोली अंतर ३८ कि.मी. तर कास ते बामणोली हे अंतर १४ कि.मी. आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी बोटीने कोयना धरणाचा जलाशय ओलांडुन वनखात्याचे प्रवेशशुल्क भरून वासोट्याकडे जाता येते. ... या वाटेने बामणोली-मेट इंदवली-वासोटा-नागेश्वर-वासोटा-मेट इंदवली–बामणोली अशी भ्रमंती एका दिवसात सहज पुर्ण करता येते पण यासाठी बामणोली मुक्कामी येणे गरजेचे आहे. बामणोलीला भैरवनाथ मंदिरात मुक्काम करता येईल. इथे काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. हा संपुर्ण परिसर सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाच्या अखत्यारीत असल्याने वासोट्याला पावसाळ्यात म्हणजे १५ जुन ते १५ ऑक्टोबर या कालावधीत तसेच ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या कालावधीत जाण्याची परवानगी मिळत नाही. अभयारण्यात प्रवेश करण्याची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी १.३० पर्यंत असुन परवानगीच्या सोपस्कारामुळे भ्रमंती सकाळी ८ पुर्वी सुरु करता येत नाही. बामणोली येथून मेट इंदवलीला जाणाऱ्या १२ व्यक्ती सामावणाऱ्या बोटीसाठी ३५४०/- रुपये आकारले जातात. हा दर १ व्यक्ती व १२ व्यक्तीसाठी एकच असुन दोन लहान समुह एकत्र मिळून जाण्याचे ठरवले तर बोटवाले अडवणुक करतात. याशिवाय अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी वनखात्याचे प्रती व्यक्ती शुल्क ३०/- रुपये असुन बोटीसाठी १५०/- व मार्गदर्शक ३००/- असे आहेत. याशिवाय कॅमेऱ्याचे शुल्क वेगळे आकारले जाते. बामणोली – मेट इंदवली – वासोटा – नागेश्वर – मेट इंदवली हा ट्रेक करणार असल्यास सूर्य मावळण्यापूर्वी बामणोलीला न आल्यास वनखात्याकडून दंड आकारला जातो शिवाय बोट चालवणारे जास्त पैशासाठी अडवणूक करतात. कोयना धरणाचा जलाशय बोटीने पार करून मेट इंदवलीला पोहोचायला साधारण एक तास लागतो. मेट इंदवली येथुन वनखात्याच्या कार्यालयामागून जाणारी वाट छप्पर नसलेल्या हनुमान व गणपती मंदिरापाशी येते. नागेश्वरशिवाय कोठेही पिण्यायोग्य पाणी नसल्याने येथील ओढ्यात पाणी भरून घ्यावे. हा ओढा पार करून घनदाट जंगलातील उभी चढण चढत साधारण १.३० तासात आपण नागेश्वर फ़ाट्यावर येतो. येथून उजवीकडे जाणारी वाट नागेश्वरला जाते तर सरळ चढत जाणारी वाट आपल्याला वासोटा गडावर घेऊन जाते. मेट इदंवली या पायथ्यापासुन ठळक पायवाटेने २.३० तासात आपण नागेश्वरला पोहोचतो. आता आपण कोकणातुन वर येणाऱ्या दुसऱ्या वाटेचा पर्याय पाहु. रात्री चोरवणे गावात विठ्ठल मंदीरात मुक्काम केल्यास चोरवणे-नागेश्वर-वासोटा-नागेश्वर-चोरवणे अशी भ्रमंती आपण एका दिवसात सहज पुर्ण करू शकतो. चिपळूण ते चोरवणे हे अंतर ३० कि.मी. असुन चोरवणे गावातील विठ्ठल मंदिराकडून एक रस्ता गावासमोरील टेकडाच्या पठारावर जातो. या पठारावर नागेश्वर सुळक्याकडे जाणाऱ्या पायऱ्या असुन खाजगी वाहन सोबत असल्यास आपण या वाहनाने ३ कि.मी अंतरावर असलेल्या या पायऱ्यापर्यंत पोहोचतो. खाजगी वाहनामुळे आपली या भ्रमंतीमधील जाण्यायेण्याची दीड तासाची पायपीट कमी होते व आपली भ्रमंती १० तासात सहज पुर्ण होते पण त्यासाठी सकाळी लवकर सुरवात करावी हे उत्तम. या वाटेने जाताना नागेश्वर शिवाय वाटेत पाण्याची कुठेही सोय नसल्याने पुरेसे पाणी सोबत ठेवणे गरजेचे आहे. चोरवणे गावातील विठ्ठल मंदिरासमोर असलेल्या दुकानात पूर्वसूचना दिल्यास आपली चहानाश्ता तसेच जेवणाची उत्तम सोय होते. यासाठी प्रमोद जाधव ८२७५६२६५१० यांच्याशी संपर्क साधावा व प्रसंगी मदतीसाठी त्यांना कल्पना देऊनच या वाटेने गडावर जावे. चोरवणे गावातुन वासोटा किल्ला व नागेश्वर सुळक्याचे सुंदर दर्शन होते. चोरवणे येथील वाटेने बांधीव पायऱ्या,पायवाट,उभा चढ, लोखंडी शिड्या,कोरीव पायऱ्या, घसारा असा प्रवास करत २.३० तासात आपण नागेश्वर सुळक्यासमोर असलेल्या पठारावर पोहोचतो. येथुन उजवीकडील वाट वासोटा किल्ल्याकडे तर डावीकडील वाट नागेश्वर सुळक्याखाली असलेल्या गुहेकडे जाते. पठारावर नागेश्वर कुंडाकडे असा फलक असुन येथुन उजवीकडे खाली उतरणारी वाट आपल्याला नागेश्वर कुंडापाशी घेऊन जाते. कुंडात कचरा पडु नये यासाठी वरून जाळी अंथरली असुन या कुंडात वर्षभर पाणी असते. पठारावरून काही पायऱ्या पार करत आपण नागेश्वर सुळक्याखाली पोहोचतो. हि वाट देखील पुर्णपणे मळलेली आहे. नागेश्वर सुळक्याच्या पोटात २५-३० माणसे मुक्काम करू शकतील अशी एक मोठी नैसर्गिक गुहा असून तेथे शिवलिंग आहे. या शिवलिंगावर गुहेच्या छतावरून बारा महिने पाण्याच्या थेंबांचा अभिषेक होत असतो. जुन्या अनेक वर्णनात या गुहेत असलेल्या शिवपार्वती मुर्तीचा उल्लेख येतो पण सध्या या गुहेत शिवलिंग वगळता कोणतीही मुर्ती अस्तित्वात नाही. या शिवलिंगाशेजारी नंदीच्या भग्न झालेल्या दोन-तीन मुर्ती आहेत. गुहेतून समोर वासोटा किल्ला व वसिष्ठी नदीचे खोरे नजरेस पडते. दर श्रावणी सोमवारी तसेच शिवरात्रीला हजारो भावीक या नागेश्वरच्या दर्शनाला येतात. चोरवणे ते नागेश्वर सुळका असा उभा चढ पार करून आल्याने काही काळ नागेश्वर गुहेत विश्रांती घ्यावी लागते. नागेश्वरहून समोर वासोटा व त्या अलीकडे एक छोटा सुळका आपले लक्ष वेधून घेतो. हा सुळका खोटा नागेश्वर म्हणुन ओळखला जातो. बहुतेक दुर्गप्रेमी प्रथम नागेश्वराचे दर्शन घेऊन नंतरच वासोट्याला जातात पण त्यासाठी तंगडतोड करण्याची तयारी मात्र हवी. कोकणातील चोरवणे येथुन नागेश्वरला येण्याचा मार्ग जास्त सोयीस्कर असुन त्यासाठी खाजगी वाहन सोबत असायला हवे. हा मार्ग कमी खर्चाचा व कमी वेळ घेणारा आहे. ता.क. हि भटकंती शारीरिक दमछाक करणारी असल्याने पुर्ण विचार करूनच हि भटकंती ठरवावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!