नागपुर

प्रकार : भुईकोट

जिल्हा : नागपुर

उंची : 0

श्रेणी : सोपी

नागपूर शहराच्या महाल भागात गोंड राजाचा किल्ला म्हणुन ओळखला जाणारा नागपुरचा किल्ला आहे. हा किल्ला आहे म्हणण्यापेक्षा होता असे म्हणणेच जास्त योग्य ठरेल कारण एक दरवाजा वगळता किल्ला म्हणावा असे या किल्ल्याचे कोणतेही अवशेष शिल्लक नाहीत. जुन्या नागपुरात महालामधील कल्याणेश्वर मंदीर व दरवाजा प्रसिद्ध आहे. कल्याणेश्वर दरवाजा पार करून पुढे गेल्यावर उजव्या बाजुस एक लहान गल्ली आहे. या गल्लीतच किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे. कधीकाळी या किल्ल्याभोवती पाण्याने भरलेले खंदक व तटबंदीत अनेक बुरुज असल्याचे वाचनात येते पण वाढत्या शहरीकरणामुळे विदर्भाच्या इतिहासातील एका मोठया कालखंडाचा साक्षीदार या गल्लीत लुप्त झाला आहे. यातील एक बुरुज अगदी अलीकडील काळापर्यंत शिल्लक होता पण आज तोदेखील दिसत नाही. किल्ल्यास उत्तरेच्या असलेल्या मुख्य दरवाजाची कमान आजही शिल्लक असुन या दरवाजावर पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख आहे. ... दरवाजातुन साधारण २०० फुटांवर राजवाड्याचा लाकडी दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील बाजुस भग्नावस्थेतील राजवाडा आहे. राजवाड्याचे आवारात संगमरवरी बांधकामातील कारंजे असून एक विहीर पहायला मिळते. गोंड राजाच्या किल्ल्याचे आता आपल्याला इतकेच अवशेष पहायला मिळतात. महाल भागाची भटकंती करताना आपल्याला भोसले यांचा राजवाडा व इतर काही जुने वाडे व मंदिरे पहायला मिळतात. यशिवाय वेशीच्या तटबंदीत जुम्मा दरवाजा, कल्याण दरवाजा व इतर दोन दरवाजे पाहायला मिळतात. मध्य प्रदेशातील राणी दुर्गावतीच्या काळात गढा−मंडला येथील गोंडचे राज्य चांगलेच विस्तारले होते. इ.स.१५६४ सालच्या अकबराच्या स्वारीनंतर या राज्याचे चंद्रपूर आणि देवगड या राज्यांत विभाजन झाले. देवगडचे गोंड घराणे मूळचे हरया किंवा हरयागड येथील होते. या घराण्यातील जातबा या कर्तृत्वान पुरुषाने देवगड ही राज्याची जागा निवडली. गढ्याच्या राजाने मोगलांचे मांडलिकत्व स्वीकारल्यानंतर जातबाही मांडलिक बनला. अकबराच्या काळात तो २०००स्वार, १०००० पायदळ व १०० हत्तींचा सेनापती असल्याचे वर्णन आइने-ए-अकबरीत येते. त्याचे स्वतःचे नाणे त्या काळात चालत असे. राज्याच्या सीमा नागपुरपर्यंत वाढल्यावर त्याने नागपुरात किल्ला उभारून ठाणे बांधले. जातबानंतर त्याचा मुलगा केसरीशहा उर्फ कोकशाह गादीवर आला. कोकशाहने खंडणी न दिल्याने सन १६३७ मध्ये शाहजहानचा सरदार खानदौरान याने नागपुरपर्यंतचा प्रदेश ताब्यात घेतला. यावेळी नागपूरच्या किल्ल्यावर हल्ला करून किल्ल्याचे तीन-चार बुरूज सुरुंग लावून उडवून दिले. यावर कोकशाहने दीड लाख रुपयासह १७५ हत्ती देऊन तह केला आणि नागपूरचा किल्ला वाचविला. कोकशहाला पाच मुले होती. कोकशाहच्या मृत्युनंतर महिपतशहा उर्फ बख्तबुलंदशाह सत्तेत आला. सत्तेसाठी भावांनी हुसकावल्याने तो औरंगजेबाकडे गेला. औरंगजेबाने मदतीसाठी मुसलमान होण्याची अट घातल्याने त्याने मुसलमानांशी रोटी व्यवहार करेन पण बेटी व्यवहार करणार नाही असा आग्रह धरला. राज्य परत मिळाल्यावर त्यांनी मुस्लिम धाटणीची नावे स्वीकारली पण आजही त्यांच्यात हिंदू-गोंड पद्धतीने लग्नविधी होतो व नंतर मुसलमानी विधी केले जातात. बख्तबुलंद याने राजमल कायस्थ यास दिवाण नेमले व रामजी त्रिबंक याच्याकडे मुलकी कारभार सोपवला. इ.स. १७०२ मध्ये त्या्ने नवे नागपूर निर्माण केले. याकाळात नागपूरच्या आसपास राजापूर बारसा नावाने ओळखली जाणारी राजापूर, रायपूर, हिवरी, हरिपूर, वाठोडे, सक्करदरा, आकरी, लेंढरा, फुटाळा, गाडगे, भानखेडा, सीताबर्डी ही बारा गावे होती. हि सर्व गावे त्याने रस्याने जोडली. गावात नवे रस्ते बांधुन पेठा वसवल्या. त्यामुळे याला नागपूरचा निर्माता मानण्यात येते. बख्तबुलंदशहानंतर त्याचा मुलगा चाँदसुलतान गादीवर आला. याच्या काळात नागपूरची बरीच भरभराट झाली. त्यानेच शुक्रवार तलाव खोदविला व गावाला तटबंदी केली. चाँदसुलतानच्या निधनानंतर त्याच्या वलीशाह या अनौरस पुत्राने राज्याचा ताबा घेतला. यावेळी राज्य स्वतःकडे आणण्यासाठी चाँद सुलतानची बायको रतनकुँवरने यवतमाळ जिल्ह्यातील भाम येथे असलेल्या रघुजींची मदत घेतली व नागपूरच्या राजकारणात रघुजी भोसले यांचा प्रवेश झाला. राज्य परत मिळाल्यावर रतनकुँवरने बुऱ्हाणशहा व अकबरशहा या दोन पुत्रांसोबत रघुजीला एक हिस्सा दिला. नंतरच्या घडामोडीमुळे बुऱ्हाणशहाने बहुतेक राज्य रघुजीच्या हवाली केले व तो नागपूरच्या किल्ल्यात येऊन राहिला. यानंतरचा नागपुरचा इतिहास म्हणजे नागपूरच्या भोसले घराण्याचा इतिहास. सक्करदरा भागात बख्तबुलंदशहा आणि चाँदसुलतान या पिता-पुत्रांच्या दुर्लक्षीत समाधीं आहेत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!