नाखविंदा

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : अहमदनगर

उंची : ३०२० फुट

श्रेणी : कठीण

सह्याद्रीच्या कुशीत आजही अनेक किल्ले आपली इतिहासातील ओळख हरवल्याने काळाच्या पडद्याआड लपले आहेत पण दुर्गप्रेमींच्या प्रयत्नाने पुन्हा प्रकाशात येत आहेत. काळाच्या पडद्याआड लपलेला व आता पुन्हा प्रकाशात आलेला असाच एक दुर्ग म्हणजे नाखविंदा. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात पिंपळगावात असलेला हा दुर्ग पिंपळगाव नाखविंदा म्हणुन ओळखला जातो. या भागात कुंजरगड,कलाडगड,भैरवगड,विश्रामगड,बितनगड,औंढा,रतनगड, हरिश्चंद्रगड यासारखे प्रसिद्ध किल्ले असले तरी नाखविंदा किल्ला मात्र पुर्णपणे अपरीचीत आहे. पिंपळगाव हे नाखविंदा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव घोटी-कळसुबाई राजुरमार्गे ६० कि.मी. अंतरावर आहे. पिंपळगावात प्रवेश केल्यावर गावाच्या मागील बाजुस पुर्व-पश्चिम पसरलेला डोंगर व त्यावरील नाखविंदा किल्ल्याचा सुळका नजरेस पडतो. किल्ल्याचा आकार निमुळता असुन त्याला लागुन असलेल्या दोन्ही सोंड गावाच्या दिशेने खाली उतरतात. या दोन्ही सोंडेवरून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. पश्चिमेकडील सोंडेवरून वर चढल्यास आपण थेट किल्ल्याच्या वाटेला भिडतो तर पूर्वेकडील सोंडेवरून चढाई केल्यास सुळक्याला वळसा मारून आपल्याला पश्चिम टोकावर यावे लागते. ... या दोन्ही वाटा अवघड नसुन एकसमान असल्याने आपण आपल्या सोयीची कोणतीही वाट निवडावी. किल्ल्यावर जाणारी वाट सुळक्याच्या पश्चिम टोकावर असली तरी किल्ल्याच्या माथ्यावर जाणारी वाट मात्र सुळक्याच्या पुर्व बाजूने वर चढते. हे सर्व लक्षात घेऊन व स्थानिकांकडून वाट समजुन घेऊन आपण डोंगर चढण्यास सुरवात करावी. पश्चिम बाजुने वर जाणारी वाट गावातील मंदिराकडून सुरु होते तर पूर्वेकडील वाट गावाबाहेर टोकाला मुख्य रस्त्यावर लागुन असलेल्या घराशेजारून सुरु होते. या घरातील व्यक्ती वाटाड्या म्हणुन आपल्या सोबत येते पण ती गड माथ्यावर येत नाही. (संपर्क-८४३२१२०३१९). पायथ्यापासुन सुरवात केल्यावर अर्ध्या तासात आपण सुळक्याच्या पश्चिम टोकावर पोहोचतो व खऱ्या अर्थाने गड चढाईला सुरवात होते. वाट कठीण नसली तरी एकदम सोपी देखील नाही. सुळक्याच्या मध्यातुन जाणारी हि वाट बहुतांशी कातळात कोरलेली असुन पुर्वी या वाटेवर सुरक्षेसाठी खांब रोवले जात असत. खांब रोवण्यासाठी असलेले हे खळगे आपल्याला जागोजागी दिसुन येतात. कड्याला बिलगुन जाणाऱ्या या निमुळत्या वाटेने ५ मिनीटात आपण कड्यात कोरलेल्या पाण्याच्या पहिल्या टाक्यापाशी पोहोचतो. या टाक्याच्या वरील बाजुस जेमतेम ७-८ माणसे बसू शकतील अशी अर्धवट कोरलेली गुहा असुन या गुहेत जाण्यासाठी कातळात खाचा कोरल्या आहेत. गुहा पाहुन पुढे गेल्यावर कड्यात कोरलेली पाण्याची अजुन दोन टाकी आहेत. येथुन पुढे जाणारी वाट जेमतेम पाउल मावण्याइतपत असुन येथे आधारासाठी खांब रोवण्याची सोय दिसुन येते. या वाटेने थोडे पुढे आल्यावर वाटेवर मातीने बुजलेले चौथे लहान टाके पहायला मिळते. वाटेचा पुढील भाग काहीसा रुंद असुन येथे एक कातळटप्पा पर करून आपण गडाच्या माथ्यावरील वाटेजवळ पोहोचतो. येथुन गडमाथ्यावर जाण्यासाठी ८-१० फुट उंचीचा धोकादायक कातळटप्पा पार करावा लागतो. या टप्प्याखाली थेट दरी असल्याने नवख्या भटक्यांनी मदतीशिवाय हा टप्पा पार करू नये अन्यथा येथुनच मागे फिरावे. गडाचा माथा अतिशय निमुळता असुन वर एक चौकोनी व एक आयताकृती आकाराचे अशी दोन पाण्याची कोरडी टाकी पहायला मिळतात. कड्याच्या काठावर तटबंदीचे दोन चार घडीव दगड वगळता इतर कोणतेही अवशेष दिसत नाहीत. गडमाथा समुद्रसपाटी पासुन ३०२० फुट उंचावर असुन येथुन कळसूबाई शिखर व रतनगड किल्ला तसेच अलंग- मदन डोंगररांग स्पष्टपणे दिसुन येते. आपण वर चढलो त्या टोकाच्या विरुद्ध बाजुस वर येणारी अजुन एक वाट असुन स्थानिक आदिवासी या वाटेने वर चढतात पण हि वाट आपण आलेल्या वाटेपेक्षा धोकादायक असुन तिचा वापर न करता आलो त्याच वाटेने खाली उतरावे. संपुर्ण किल्ला पाहुन परत गावात येण्यास साधारण दोन तास लागतात. गावातील शाळेत किंवा मंदिरात राहण्याची सोय होते पण जेवणाची सोय मात्र नाही. गावात लवकर पोहोचुन उपाहारगृहात विनंती केल्यास जेवणाची सोय होईल. गडाचे नाखविंदा नावाचे संदर्भ कोठे आढळत नसल्याने गडाचा इतिहास अपरीचीत आहे. (किल्ल्यावर असलेल्या मधमाशांची गावात दहशत असल्याने कोणीही स्थानिक सहजपणे किल्ल्यावर येण्यास तयार होत नाहीत उलट ते आपल्या मनात मधमाशांची भिती घालतात व काही वर्षापुर्वी घडलेल्या मधमाशी हल्ल्याचे वर्णन करत रहातात. मी ऑगस्ट २०२२ साली किल्ल्यावर गेलो असता सुकलेले एक पोळे वगळता मधमाशांचे एकही जिवंत पोळे किल्ल्याच्या माथ्याला दिसुन आले नाही.)
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!