नांदेड/नंददुर्ग
प्रकार : भुईकोट
जिल्हा : नांदेड
उंची : 0
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रात काही किल्ले हे आज केवळ नाममात्र किंवा त्यांचे अवशेष केवळ अस्तित्व दाखवण्यापुरते उरले आहेत. अशा अनेक किल्ल्यांपैकी एक किल्ला म्हणजे नांदेडचा किल्ला. गोदावरी नदीकाठी वसलेल्या नांदेड शहरात नदीच्या उत्तर तीरावर नंदगिरी किल्ला होता. आज या किल्ल्याचे नांदेड शहराच्या जुन्या भागात अरब गल्ली येथे गोदावरीच्या पात्रालगत काही अवशेष उरले आहेत. नांदेड शहर रस्ते आणि रेल्वे मार्गाने संपुर्ण देशाशी जोडलेले असल्याने येथे येण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नांदेडहून रिक्षाने अरब गल्लीत असलेल्या किल्ल्यापर्यंत जाता येते. ग्याझेटमधील नोंदीनुसार कधीकाळी य़ा भुईकोट किल्ल्याला दुहेरी तटबंदी असुन त्यात २४ बुरुज होते. त्यापैकी १४ बुरुज बाहेरच्या तटबंदीत तर १० बुरुज आतील तटबंदीत होते. आजमात्र किल्ल्याच्या तटबंदीत केवळ ९ बुरुज उरलेले असुन त्यापैकी किल्ल्याचे ५ बुरुज आणि तटबंदी बाहेरुन दिसतात तर उरलेले ४ बुरुज गडफेरी करताना आतील बाजूने लक्षात येतात.
...
अरब गल्लीतुन दिसणाऱ्या नांदेड महानगरपालिकेने बांधलेल्या दोन टाक्यांच्या दिशेने गेल्यावर आपला किल्ल्याच्या सध्याच्या अवशेषांच्या आत प्रवेश होतो. आपला किल्ल्यात जेथुन प्रवेश होतो त्या ठिकाणी महानगरपालिकेने दोन सिमेंटचे छोटे बुरूज बांधलेले असुन तेथे लोखंडी दरवाजा लावलेला आहे. हा दरवाजा सकाळी ९ ते संध्याकाळी ७ या वेळेतच उघडा असतो. या लोखंडी दरवाजातून आत आल्यावर समोरच पाण्यांच्या टाक्यांच्या बाजूला किल्ल्याची माहिती देणारा फ़लक पुरातत्व खात्याने लावला आहे. किल्ला पुरातत्व विभागाच्या ताब्यात असूनही नांदेड महानगरपालिकेने किल्ल्यात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या दोन मोठया टाक्या आणि विश्रामगृह बांधून किल्ल्याची पार रया घालवली आहे. या वाटेने पुढे आल्यावर एक १५x१२x१० फ़ूट लांबीरुंदी व खोली असलेला हौद आहे. हैदराबाद निजामाच्या काळात गोदावरी नदीच्या पात्रातून पाणी या उंचीवर खेचुन येथे त्याचे शुद्धीकरण करून नांदेड शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी त्याची बांधणी करण्यात आली होती. आता या हौदाचे चुकीच्या पध्दतीने नुतनीकरण केल्याने त्याचे कारंजे बनले आहे. पुष्कर्णीच्या पुढे नदीच्या काठाने काही निजाम काळात बांधलेल्या वास्तूं व त्यांचे अवशेष आहेत. या वास्तू बांधताना किल्ल्याच्या मूळ वास्तू व त्यांच्या अवशेषांचा वापर केला गेला आहे. या अवशेषांच्या डाव्या बाजूला उंचावर एक बुरूज असुन अवशेषांच्या उजव्या बाजुला खालच्या अंगावर दुसरा बुरूज आहे. वरील बुरुजाचा भाग हा किल्ल्यातील सर्वात उंच भाग असुन तेथुन किल्ल्याचा बराचसा भाग व गोदावरीचे दुरवर पसरलेले पात्र नजरेस पडते. खालील बुरुजावर एक अखंड तोफ असुन या भागातील तटबंदी नव्याने विटांनी बांधलेली आहे. येथुन पुढील भागात किल्ल्याचे उरलेले दोन बुरूज असुन या बुरुजांच्या शेजारीच विश्रामगृह बांधलेले आहे. यातील पहिल्या बुरुजाच्या खाली खडकात खोदलेले एक टाके असुन दगडात बांधलेले एक कोठार आहे. येथे मोठया प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने या वास्तू पटकन लक्षात येत नाही. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ला संपुर्णपणे आतबाहेर पहाण्यासाठी एक तास लागतो. किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नळ आहे. इतिहासात नंदीतट, नंदीनगर, नंदीग्राम इत्यादी नावाने प्रसिध्द असलेल नांदेड शहर नंद वंशातील राजाने वसवले. पैठण ही नंदवंशीय राजाची दक्षिण भारतातली राजधानी होती तर नंदाहार आणि नवनंदडेरा ही उपराजधानी होती. यातील नवनंदडेरा या नावाचा अपभ्रंश होऊन नांदेड झाले. नांदेड हे शहर उपराजधानी आणी व्यापारी केंद्र असल्याने या शहराला संरक्षणासाठी त्याकाळी तटबंदी असावी. नांदेड हा नगर किल्ला असुन सातवहानांच्या काळात नांदेड शहर हे मोठे बौध्दपीठ होते. सांचीच्या स्तुपावरील दानलेखात त्याचा उल्लेख आढळतो. वाकाटका नंतर चालुक्य राष्ट्रकुट व गंग यांच्या काळात नांदेड हे शैक्षणिक केंद्र आणि वैभवशाली नगर होते. त्यानंतरच्या काळात बहामनी, मुघल आणि शेवटी स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा किल्ला निजामाकडे होता.
© Suresh Nimbalkar