नांदुरखी

प्रकार : गढी

जिल्हा : ठाणे

उंची : 0

श्रेणी : सोपी

मध्ययुगीन काळात भिवंडी हे मोठे बंदर असुन सागरी मार्गाने थेट समुद्राशी जोडले होते. उल्हास नदीची उपनदी असलेली कामवारी नदीतुन जहाजांची वाहतुक थेट भिवंडीपर्यंत होत असे. या सागरी मार्गाच्या रक्षणाकरता पोर्तुगीजांनी खारबाव,फिरंगकोट, नांदुर्खी, जुनांदुर्खी, कांबेकोट, कारीवली यासारखे अनेक लहान लहान कोट उभारले. भिवंडी-वसई दरम्यान जुनांदुर्खी गावाजवळ पोर्तुगीजांची निर्मिती असलेला नांदुर्खी कोट हा असाच एक लहानसा कोट. नांदुर्खी कोटास जाण्यासाठी वसई-चिंचोटी-अंजूरफाटा-भिवंडी मार्गावरील खारबाव व फिरंग कोट पाहुन नांदुर्खी कोटास जाता येते व तेथुन कांबे कोटास जाता येते. भिवंडीमार्गे भिवंडी-पारोळ रस्त्याने जुनांदुर्खी हे अंतर १० कि.मी.असुन भिवंडीहुन खाजगी रिक्षाने जुनांदुर्खी गावात जाता येते. कांबे गावापासुन हे अंतर साधारण २ कि.मी.आहे. बसने आल्यास मुख्य रस्त्यावर जुनांदुर्खी फाट्यापुढील निम्बसार फाट्यावर उतरावे. या फाट्यापासुन मुख्य रस्त्याने थोडे पुढे आल्यावर डाव्या बाजूस कोटाची उंच भिंत नजरेस पडते. जुनांदुर्खी फाटा ते निम्बसार हे अंतर साधारण २ कि.मी. आहे. स्थानिकांना या कोटाची फारशी माहीती नाही पण पांडवांची माडी विचारल्यास ते आपल्याला या ठिकाणावर आणुन सोडतात. ... पोर्तुगीजांनी बांधलेल्या टेहळणीच्या बहुतांशी वास्तु एकसमान व एक आकाराच्या दिसुन येतात. साधारण ३०x २० फुट आकाराचा हा दुमजली कोट असुन याचा वरील भाग आज पुर्णपणे उध्वस्त झाला आहे. या कोटाच्या बांधकामात ओबडधोबड दगड व चुन्याचा वापर केलेला आहे. कोटाच्या भिंतीत वरील मजल्यासाठी वासा रोवण्यासाठी खोबण्या दिसुन येतात. सद्यस्थितीत २० फुट उंचीच्या या वास्तुची मूळ उंची २५ फुट असावी कोट पाहण्यास १० मिनिटे पुरेशी होतात. जवळच असलेली कामवारी नदी व या वास्तुचे बांधकाम पहाता हि वास्तु टेहळणीसाठी असावी. याचा वापर खाडीच्या वाहतुक मार्गावर देखरेख करण्यासाठी आणि जहाजाच्या संरक्षणासाठी होत असावा. वसई ते भिवंडी दरम्यान असलेले हे कोट उल्हास खाडी व कामवारी खाडीच्या दोन्ही बाजूस बांधलेले आहेत. साधारणतः १६व्या शतकात पोर्तुगीजानी उभारलेल्या या टेहळणीवजा कोटांचा मुख्य उपयोग जलमार्गाचे रक्षण करणे व प्रांतातील लहान मोठया कोटाना आवश्यक रसद पुरविणे हा होता. हे सगळे लहान आकाराचे कोट, टेहळणी बुरूज व लांब पल्ल्याच्या तोफा यांचा वापर करत पोर्तुगीजांनी उत्तर कोकणावर आपले साम्राज्य वसवले. इ.स.१७३० मध्ये मराठयांनी पिलाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली कांबे कोट जिंकला अशी नोंद आढळते. त्यावेळी जवळच असल्याने कदाचित हा किल्लादेखील मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. पुढे मराठा-पोर्तुगीज तहात हा किल्ला पुन्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. इ.स. १७३९च्या या वसई मोहिमेत खारबाव, कांबे, फिरंगीपाडा हा परिसर मराठ्यांच्या ताब्यात आला आणि पोर्तुगीजाचे या भागातून बस्तान उठले ते कायमचेच. किल्ला पाहण्याच्या हेतुने येथे येणाऱ्याचा हिरमोड होण्याची शक्यता आहे पण सागरी व्यापारी मार्गावरील पोर्तुगीजांची टेहळणी चौकी व तिचे भौगोलिक महत्व पाहायचे असेल त्याने या स्थानास अवश्य भेट द्यावी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!