नवसारी कोट

प्रकार : भुईकोट

जिल्हा : गुजरात

उंची : 0

श्रेणी : सोपी

महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात असलेल्या किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला लहानमोठे असे एकुण १६ किल्ले पहायला मिळतात. मराठा साम्राज्याच्या उत्तरार्धात यातील बराचसा प्रांत मराठ्यांच्या अमलाखाली म्हणजेच बडोद्याच्या गायकवाडांच्या अधिपत्याखाली असल्याने यातील बहुतांशी किल्ल्यावर मराठमोळी छाप पडलेली आहे. नवसारी कोट हा त्यापैकी एक भुईकोट किल्ला. काळाच्या ओघात वाढत्या शहरामुळे किल्ल्याची तटबंदी पूर्णपणे नष्ट झाली असुन केवळ मुख्य दरवाजा व आतील काही वास्तु शिल्लक आहेत. कधीकाळी हा किल्ला स्वराज्यात असल्याने मी या किल्ल्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील किल्ले या सदराखाली करत आहे. नवसारी भुईकोट पहाण्यासाठी मुंबई-पुणे येथुन सर्वप्रथम नवसारी स्थानक गाठावे. नवसारी भुईकोट पहाण्यासाठी हे जवळचे स्थानक असुन या स्थानकापासून नवसारी कोट केवळ ३ कि.मी. अंतरावर आहे. नवसारी हे गुजरातमधील व्यापारी शहर व जिल्ह्याचे ठिकाण असल्याने येथे वाहनांची चांगली सोय आहे. नवसारी भुईकोट येथे किल्ला म्हणुन कोणालाच माहीत नसल्याने आपण जुनाथाना अशी चौकशी करावी. ... जुनाथाना म्हणजे जुने कचेरीचे ठिकाण. गायकवाडांच्या काळापासुन नवसारी जिल्ह्याचे कचेरीचे ठिकाण या कोटात असल्याने हा कोट जुनाथाना म्हणुनच ओळखला जातो. जुनाथाना चौकात आल्यावर समोरच आपल्याला दोन बुरुजात बांधलेला कोटाचा मुख्य दरवाजा दिसतो. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. आज किल्ल्याच्या तटबंदीतील हा एकमेव अवशेष शिल्लक असुन त्यावर पुर्णपणे सिमेंटचा गिलावा करण्यात आलेला आहे. कोटातील शिल्लक असलेली जुनी वास्तू म्हणजे बल्लाळेश्वर महादेव मंदीर. याशिवाय कोटाच्या आत शनिमंदिर पहायला मिळते पण ते अलीकडील काळातील असावे. कोटाचा आतील परीसर पुर्णपणे विकसित झाला असला तरी आत ब्रिटीशकालीन कोर्टाची वास्तु पहायला मिळते. याशिवाय आत एक कब्रस्तान असुन नव्याने बांधलेले दुसरे लहान शिवमंदिर आहे. शिल्लक असलेल्या आतील वास्तू पहाण्यास १५ मिनिटे पुरेशी होतात. कोटाला वेगळे असे नाव नसुन कोट परिसरात वास्तव्यास असलेले लोक याला गायकवाडांचा कोट म्हणुन ओळखतात. पेशवेकाळात बडोदा शहर व त्याच्या आसपासचा प्रांत यावर मराठयांचा अमंल होता. त्यासाठी पिलाजी गायकवाड यांची येथे नेमणूक होती. नवसारी शहरावर १७२१ ते १९४९ पर्यंत बडोद्याच्या गायकवाडांनी राज्य केले. त्यांच्याच काळात नवसारी भुईकोटाची बांधणी करण्यात आली. त्यानंतर ब्रिटीश काळात बडोदा हे एक संस्थान म्हणुन उदयास आले. भारत स्वतंत्र झाल्यावर १० जून १९४८ रोजी हा भाग भारतीय संघराज्यात सामील झाला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!