नवरा नवरी

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ३२०२ फुट

श्रेणी : मध्यम

सह्याद्रीच्या कुशीत आजही अनेक किल्ले आपली इतिहासातील ओळख हरवल्याने काळाच्या पडद्याआड लपले आहेत पण दुर्गप्रेमींच्या प्रयत्नाने पुन्हा प्रकाशात येत आहेत. काळाच्या पडद्याआड लपलेला व आता पुन्हा प्रकाशात आलेला असाच एक दुर्ग म्हणजे कुशेगावचा किल्ला. आनद पाळंदे यांच्या दुर्गवास्तु या पुस्तकात कुशेगावचा किल्ला म्हणुन ओळखला जाणारा हा किल्ला भगवान चिले यांच्या गडकिल्ल्यांच्या राज्यात या पुस्तकात नवरा नवरी किल्ला या लडीवाळ नावाने मिरवताना दिसतो. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात कुशेगावात असलेला हा किल्ला काही दुर्गप्रेमीना कुशेगावचा किल्ला म्हणुन परीचीत असला तरी स्थानिक लोक मात्र या किल्ल्याला येथील दोन लहान मोठ्या सुळक्यामुळे नवरा नवरीचा किल्ला म्हणुन ओळखतात. गडावर किल्लेपणा जागवणाऱ्या फारशा खुणा नसल्याने हा किल्ला दुर्गप्रेमीना पुर्णपणे अपरीचीत आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी पहिने व कुशेगाव अशा दोन गावातुन वाटा असुन किल्ल्याचे दोन्ही दरवाजे कुशेगावच्या दिशेने असल्याने या गावातुन जाणे जास्त सोयीचे आहे. ... इगतपुरी ते कुशेगाव हे अंतर ४० कि.मी.असुन नाशिक महामार्गावरील घोटी फाटा येथुन वाडीव्हरे मार्गे हे अंतर ३० कि.मी.आहे. नाशिक महामार्गावरील वाडीव्हरे गाव ते कुशेगाव हे अंतर फक्त १४ कि.मी.आहे. कुशेगावाच्या टोकावर असलेल्या पिंपळवाडी या वाडीतून किल्ल्यावर जाणारी पायवाट आहे. किल्ल्यावर फारसे कोणी जात नसल्याने वाट फारशी मळलेली नाही. या वाटेवर अनेक ढोरवाटा असल्याने गावातुन वाटाड्या सोबत घेणे गरजेचे ठरते. पिंपळवाडीतुन किल्ल्याकडे नजर टाकली असता गावाच्या मागील बाजुस पुर्व-पश्चिम पसरलेला किल्ल्याचा डोंगर नजरेस पडतो. या डोंगराच्या उजव्या बाजुस असलेला निमुळता सुळका म्हणजे नवरी, मध्यभागी असलेला डोंगर म्हणजे नवरा तर डावीकडे काहीसा अलिप्त असलेला डोंगर बिडा (सासरा) म्हणुन ओळखला जातो. गडावर जाणारी एक वाट बिडा डोंगराच्या दिशेने जाऊन उजवीकडे वळते व पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेल्या वाटेने वर जाते तर दुसरी वाट नवरा डोंगराच्या पोटात असलेल्या घळीतून वर चढते. या वाटेवर उभा चढ व झाडी असल्याने या वाटेचा वापर शक्यतो उतरताना करावा. म्हणजे चढण्याचे श्रम कमी होतात व उतरताना दुपार असल्यास उन्हाचा त्रास देखील कमी होतो. बिडा डोंगराच्या दिशेने वर चढत सुळक्याच्या पायथ्याशी आल्यावर हि वाट उजवीकडे नवरा डोंगराच्या पायथ्याकडे वळते. येथुन झाडीझुडुपातून वाट काढत हि वाट आपल्याला डोंगरावरून खाली झेपावणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाच्या वाटेवर आणुन सोडते. या वाटेवर मोठ्या प्रमाणात झाडी व अनेक फसव्या वाटा असल्याने सोबत वाटाड्या असणे फायद्याचे ठरते. पाण्याच्या प्रवाहाने बनलेल्या या वाटेचा वापर किल्ल्याचा दरवाजा म्हणुन केलेला असुन हा मार्ग काही प्रमाणात कातळात कोरलेला आहे. वाटेवर मोठ्या प्रमाणात दगडमाती जमा झाल्याने येथे असलेल्या पायऱ्या त्या खाली गाडल्या गेल्या असाव्यात. वाट अतिशय निमुळती असुन या वाटेने वर जाताना वरून मारा करणे अतिशय सोयीचे आहे. वाटेवर असलेल्या एका लहानशा कपारीत स्थानिकांनी त्यांचे अनगड देव मांडलेले आहेत. वाटेने वर चढुन गेल्यावर समोरच साचपाण्याचा तलाव पहायला मिळतो. या तळ्यात केवळ दिवाळीपर्यंत म्हणजे ऑक्टोंबर महिन्यापर्यंत पाणी असते. गडाचे पठार अरुंद असले तरी खूप दूरवर पसरलेले आहे. गडाचा हा माथा समुद्रसपाटी पासुन २८८० फुट उंचावर असुन येथुन समोर अंजनेरी, हरीहर, बसगड, त्रिंबकगड हे किल्ले सहजपणे दिसुन येतात. गडाच्या खालील बाजुस नजर फिरवली असता दूरवर पसरलेला वैतरणा जलाशय नजरेस पडतो. पठारावरून चालत पश्चिम दिशेला गेले असता पठाराच्या डाव्या बाजुस म्हणजे पहिने गावाच्या दिशेस असलेल्या घळीच्या वरच्या बाजुस एक मध्यम आकाराची गुहा नजरेस पडते. या गुहेच्या आतील बाजुस कातळात कोरलेले पाण्याचे टाके असुन या टाक्यात वर्षभर पाणी असते. प्रसंगी या टाक्यातील पाणी गाळून पिण्यासाठी वापरता येईल. दुरून गुहा नैसर्गिक वाटत असली तरी गुहेचा काही भाग कोरून काढण्यात आला आहे. गुहेच्या माथ्यावरील पठारावर ओबडधोबड दगडात बांधलेला एका मोठ्या वास्तुचा चौथरा व काही लहान चौथरे पहायला मिळतात. हे पूर्वीचे चौथरे कि पावसाळ्यात गडावर राहायला येणाऱ्या गुराख्यांनी नंतरच्या काळात बांधलेला गुरांचा वाडा व खोपटी हे सांगणे तसे कठीणच आहे. दुरवर पसरलेल्या या पठारावर लहान झाड देखील पहायला मिळत नाही. किल्ल्याचा संपुर्ण माथा फिरण्यासाठी एक तास पुरेसा होतो. आपण पाहिलेल्या गुहेच्या विरुद्ध बाजुस म्हणजे डावीकडे दुसरी घळ असुन या घळीतून गडावर येण्याचा दुसरा मार्ग आहे. घळीच्या या वाटेवर माथ्याकडील बाजुस ओबडधोबड दगडात बांधलेली रचीव दगडांची तटबंदी पहायला मिळते पण या तटबंदीची खूप मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. या वाटेने साधारण तासाभरात आपण पिंपळवाडीत पोहोचतो. पिंपळवाडीतुन गडावर जाऊन पुन्हा गावात येण्यासाठी साधारण पाच तास लागतात. रात्री गावात मुक्कामास आल्यास पिंपळवाडी येथील मंदीरात राहण्याची सोय होते पण जेवणाची सोय मात्र नाही. किल्ल्यावर पाणी असले तरी वापर नसल्याने शेवाळलेले आहे त्यामुळे गावातुन पिण्याचे पुरेसे पाणी सोबत घेऊन नंतरच किल्ला चढण्यास सुरवात करावी. किल्ल्याचे मूळ नाव विस्मरणात गेल्याने किल्ल्याचा इतिहास अपरीचीत आहे पण किल्ल्याचे एकुण बांधकाम व स्थान पहाता हा अर्धवट बांधलेला किल्ला असावा किंवा हे त्रिंबकगडच्या घेऱ्यातील टेहळणीचे ठिकाण असावे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!