नवतेदुर्ग उर्फ गुढ्याचा किल्ला
प्रकार : भुईकोट
जिल्हा : रत्नागिरी
उंची : 0
श्रेणी : सोपी
महाराष्ट्रातील अनेक किल्ले आज लोकांच्या विस्मृतीत गेले असुन इतिहासाच्या पानात डोकावणारे हे किल्ले नेमके कुठे आहेत याचा उलगडा होत नाही. पुण्यातील श्री.सचिन जोशी यांनी संशोधन करून रत्नागिरी जिल्ह्यातील कासारदुर्ग, माणिकदुर्ग, नवतेदुर्ग हे दुर्गत्रिकुट नव्याने प्रकाशात आणले आहे. नवतेदुर्ग स्थानीक लोकात गुढ्याचा किल्ला म्हणुन ओळखला जातो. कोकणातील रत्नगिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेला हा दुर्ग अंजनवेलची वहिवाट या कागदपत्रात आपले अस्तित्व दर्शवितो. आजपर्यंत अज्ञातवासात असलेला हा दुर्ग दाट झाडीत हरवलेला असुन संवर्धन न झाल्यास लवकरच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गुढे गावातील ओढ्याकाठी एका लहानशा टेकडीवर असलेल्या या किल्ल्याला भेट देण्यासाठी चिपळूणहुन गुहागरकडे जाणाऱ्या मार्गावर उमरोळी येथे डावीकडे वळुन पाथर्डी-मिरवणे-गुढे हा जवळचा मार्ग आहे. चिपळूणहुन हे अंतर ३० कि.मी. आहे.
...
कोकणात आडबाजुला असलेल्या या भागात वाहनांची फारशी सोय नसल्याने सोबत खाजगी वाहन असणे सोयीचे ठरते. गावात घरे असली तरी बहुतांशी माणसे नोकरीसाठी मुंबईत असल्याने घरे बंद आहेत त्यामुळे फारसे कोणी भेटत नाहीत. किल्ल्याची जागा गावातील लोक बरोबर दाखवतात पण येथे वाढलेल्या झाडीमुळे आत शिरणे जिकरीचे असुन भरकटण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो स्थानीक माणुस सोबत घेऊनच किल्ल्यात शिरावे. गुढे गाव अनेक वाड्यांचे बनलेले असुन गावातील शेवटच्या वाडीबाहेर ओढ्याच्या काठावर हा किल्ला आहे. या वाडीतून जाताना रस्त्याच्या डावीकडे गवतात उघडयावर पडलेले अतिशय सुंदर असे कोरीव शिवलिंग पहायला मिळते. या वाडीच्या टोकाला असलेल्या ओढ्याच्या पुलावरून डावीकडे वळल्यावर आपण ओढयाच्या दुसऱ्या बाजुस येतो. येथे साधारण ४०० फुट अंतरावर एका वळणावर थोडासा चढ असुन डाव्या बाजुस झाडाखाली किल्ल्यात मिळालेल्या काही झिजलेल्या भग्न मुर्ती ठेवलेल्या दिसतात. या झाडाच्या उजवीकडून खाली उतरणाऱ्या वाटेने आपल्याला किल्ल्यात जाता येते. याशिवाय ओढयाच्या विरुद्ध बाजुस असलेल्या वामनेश्वर मंदिराकडून ओढयात उतरून ओढा पार करून किल्ल्यात जाता येते. पण ओढयात पाणी असल्यास या वाटेने जाता येत नाही. कासारदुर्ग व नवतेदुर्ग या दोन्ही दुर्गांच्या बाबतीत एक समानता दिसुन येते ती म्हणजे नदीच्या वक्राकार पात्राचा खंदक म्हणुन वापर करत उर्वरीत बाजुला खंदक अथवा तटबंदी उभारून या किल्ल्यांची रचना करण्यात आली आहे. किल्ल्याच्या ओढयाच्या दिशेस असलेल्या बाजुस खडक तासुन साधारण १५ फुट उंचीची तटबंदी बनवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी खडकाची उंची कमी आहे त्या ठिकाणी चिरे रचुन तटबंदी उभारण्यात आली आहे. या ठिकाणी किल्ल्यात पाणी नेण्यासाठी ओढयात उतरण्यासाठी वाट आहे. या वाटेने किल्ल्यात जाता येते. किल्ल्याच्या आतील बाजूस तटबंदीत झिजलेले जांभा दगड व काही घडीव चिरे पहायला मिळतात. आत काही वास्तुंचे चौथरे आहेत पण त्यावर प्रचंड प्रमाणात झाडी वाढलेली आहे. किल्ल्यावरील टेकडीच्या भागातुन फिरताना दोन बुरुज व त्यावरील बांधकाम पहायला मिळते. किल्ल्याची टेकडी ओढयाच्या पात्रात शिरलेली असुन ओढा या टेकडीभोवती गोलाकार आकारात वळला आहे. किल्ल्याच्या वरील भागात अजुन एक-दोन बुरुज असावेत पण गर्द झाडीमुळे जास्त फिरता येत नाही. किल्ल्याचे अवशेष पाहण्यासाठी शोध मोहीम करावी लागत असल्याने गडफेरी करण्यास १ तास लागतो. इ.स.१८२४ च्या सुमारास नकलल्या गेलेल्या अंजनवेलची वहिवाट या कागदपत्रात हा परिसर विजयनगरच्या पवार नामक सरदाराच्या ताब्यात असुन त्याने मौजे गुढे तर्फ वलंबे येथे नवतेदुर्ग बांधुन येथे बाजारपेठ वसवल्याचा उल्लेख येतो. कासारदुर्ग, माणिकदुर्ग, नवतेदुर्ग हे तीनही किल्ले पालशेत बंदरावरून कऱ्हाड बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावर आहेत. या मार्गावर कर वसुलीसाठी व व्यापाऱ्यांना सरंक्षण देण्यासाठी या किल्ल्यांची निर्मीती केली गेली असावी. इ.स.१५०२च्या (शके १७२४) सुमारास विजापूरच्या मुस्तफाखान सरदारानें पवारांच्या या गढ्या उध्वस्त करून दाभोळ येथें सुभा स्थापन केला. किल्ल्याची आजची अवस्था पाहता त्या नंतरच्या काळात हा दुर्ग ओस पडला असावा.
© Suresh Nimbalkar