नळदुर्ग

प्रकार : वाडा

जिल्हा : ठाणे

उंची : 0

श्रेणी : सोपी

इतिहासात नामोल्लेख असलेले काही किल्ले काळाच्या ओघात पुर्णपणे नष्ट झाले असुन आज त्यांची स्थाननिश्चिती करण्याइतपत ओझरते अवशेष देखील शिल्लक नाहीत. ठाणे जिल्ह्यातुन हरवलेला असाच एक दुर्ग म्हणजे नळदुर्ग !!! ठाणे जिल्हा ग्याझेटीयरमध्ये या किल्ल्याबाबत पुढीलप्रमाणे माहीती मिळते. मुरबाडच्या दक्षिण पूर्वेला असलेल्या नारिवली गावाजवळ नळदुर्ग नावाचा भुईकोट किल्ला आहे. इ.स.१८६२च्या नोंदीनुसार किल्ल्यात पाण्याची सोय नसुन किल्ला पुर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. नारिवली गावात या किल्ल्याची शोधमोहीम केली असता कोणालाही अगदी वृद्ध लोकांना देखील या किल्ल्याची माहीती नाही. किल्ला म्हणुन चौकशी केल्यावर या सर्वांची बोटे सिद्धगडकडे वळतात. पण याच गावाजवळ असलेल्या बांगरपाडा वाडीत आपल्याला ३५० वर्ष जुना वाडा पहायला मिळतो. या वाड्याचा इतिहास आज अज्ञात असुन आसपासच्या परिसरात हा वाडा कान्हो पाटील यांचा ५६ दरवाजांचा वाडा म्हणुन ओळखला जातो. दुमजली असलेल्या या चौसोपी वाड्यात साधारण चाळीस खोल्या असुन जमिनीखाली तळघर आहे. ... वाड्याच्या अंतर्गत भागात दोन चौक असुन यातील एक चौक चांदणी चौक म्हणुन ओळखला जातो तर दुसरा चौक न्यायदालन असल्याचे सांगीतले जाते. पहिल्या मजल्यावर मोठे सभागृह असुन त्याच्या वरील भागात छपराखाली अजुन एक लहान मजला आहे. वाडा अनेक भागात विभागलेला असुन आत फिरताना आपण भुलभुलैयात फिरत असल्यासारखे वाटते. वाडयाला लागुनच मारुती मंदिर असुन तेथे हनुमान मुर्ती सोबत कान्हु गणु बांगर यांची देखील मुर्ती पहायला मिळते. कधी काळी कान्हु गणु पाटील यांच्याकडे आसपासच्या २४ गावांची वतनदारी असल्याचे सांगीतले जाते. वाड्याच्या आवारात एक विहीर असुन पुर्व दिशेला पडीक भिंतीचे व दरवाजाचे अवशेष दिसतात. हे अवशेष वाड्याभोवती असलेल्या तटबंदीचे कि अजुन कशाचे हे ठामपणे सांगता येत नाही. या वाड्याचे अस्तित्व पहाता नळदुर्ग देखील याच्या आसपास कोठेतरी असावा पण त्याची स्थान निश्चिती होऊ शकली नाही. मी पाहीलेले ठिकाण इतरांना माहित व्हावे यासाठी केलेला हा लेखनप्रपंच !!!!
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!