नरनाळा
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : अकोला
उंची : २९६० फुट
श्रेणी : सोपी
महाराष्ट्राच्या पूर्वेकडे असलेला निसर्गसंपन्न प्रदेश म्हणजे विदर्भ. प्राचीन परंपरा लाभलेल्या या प्रदेशात अनेक राजसत्ता नांदल्या व त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बलाढ्य दुर्ग उभारले. नरनाळा व गाविलगड हे गोंड राजसत्तेने उभारलेले असेच दोन बलाढ्य दुर्ग. सातपुडा डोंगररांगेतील घनदाट जंगलात असलेले हे गिरीदुर्ग आकाराने तसेच प्रचंड आहेत. यातील नरनाळा किल्ला विदर्भातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग असल्याने पुरातत्व विभाग व वनखात्याकडून याच्या मर्यादीत भागातच प्रवेश दिला जातो. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात असलेला नरनाळा किल्ला जाफराबाद-नरनाळा-तेलीयागड असा तीन किल्ल्यांचा समुह आहे. नरनाळा किल्ल्यास भेट देण्यासाठी आपल्याला किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले शहानुर गाव गाठावे लागते. अकोला शहरापासुन अकोट हे तालुक्याचे ठिकाण ४७ कि.मी. अंतरावर असुन अकोट ते शहानुर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव पोपटखेडमार्गे १९ कि.मी. अंतरावर आहे.
...
नरनाळा किल्ला हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा भाग असल्याने किल्ला पाहण्यासाठी वनखात्याचे नियम पाळावे लागतात. मी येथे दिलेले नियम हे जानेवारी-२०१९ मधील आहेत. मंगळवारी अभयारण्य बंद असल्याने किल्ल्यात जाता येत नाही. पुर्वी किल्ल्यात पायी प्रवेश दिला जात होता पण आता स्थानिकांना वगळता इतरांना पायी प्रवेश दिला जात नाही. खाजगी वहानास प्रवेशशुल्क भरून व सोबत वनखात्याचा मार्गदर्शक घेऊन किल्ल्यावर जाता येते. खाजगी वाहन नसल्यास वनखात्याचे वाहन, मार्गदर्शक व प्रवेश या सर्वांचे एकत्रीत शुल्क भरूनही किल्ल्यावर जाता येते. अभयारण्यात प्रवेश करण्याची वेळ सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे. पुर्वी दिवसभर किल्ला पहाता येत होता पण आता अभयारण्यात गर्दी न करता जास्त पर्यटकांना अभयारण्य व किल्ला पहाता यावा यासाठी दिवसाचे दोन भाग पाडुन प्रत्येकी साडेतीन तासासाठी मर्यादीत वहाने किल्ल्यात सोडली जातात. यातील अर्धा तास प्रवासात जात असल्याने केवळ तीन तास किल्ला पहाण्यास मिळतात. संपुर्ण नरनाळा किल्ला एकुण ३३२ एकरवर पसरलेला असुन याची तटबंदी साधारण १० कि.मी.आहे. यामुळे गाडी असली तरी संपुर्ण किल्ला पाहुन होत नाही. या तीन तासात मार्गदर्शक जागोजागी गाडी थांबवत आपल्याला किल्ल्याचे वाटेवर असलेले केवळ मुख्य अवशेष दाखवतो. किल्ल्याचा घेर मोठा असल्यामुळे संपूर्ण किल्ला पहाण्यासाठी एक अख्खा दिवसही कमी पडेल. किल्ल्यावरील महत्वाच्या वास्तु पुरातत्वखात्याच्या ताब्यात असल्याने या सर्व वास्तु सुस्थितीत आहे. वनखात्याची चौकी पार करून साधारण १.५ कि.मी. आत आल्यावर रस्त्याला दोन फाटे फुटतात. सरळ जाणारा रस्ता जंगलात तर डावीकडील रस्ता डोंगरावरील नरनाळा किल्ल्याच्या दिशेने जातो. या वाटेने साधारण ४ कि.मी.अंतर पार केल्यावर डोंगर उतारावर असलेली किल्ल्याची तटबंदी दिसायला सुरवात होते व थोड्याच वेळात उजवीकडे गडाचा पहिला शहानुर दरवाजा नजरेस पडतो. पण येथुन दरवाजात जाण्यासाठी नीट वाट नाही. येथुन तटबंदी तोडुन काढलेल्या रस्त्याने साधारण १० मिनीटे पुद्धे गेल्यावर उजव्या बाजुस गडाचा मेहंदी किंवा मेंढा दरवाजा नावाने ओळखला जाणारा दुसरा दरवाजा लागतो. येथे गाडी थांबवुन खाली उतरावे व सर्वप्रथम हा दुसरा दरवाजा पाहुन घ्यावा. या दरवाजावर कोणतीही कलाकुसर नसुन दरवाजाच्या आतील तटाच्या भिंतीत एका बाजुला पहारेकऱ्याच्या कमानीदार देवड्या आहेत. या दरवाजातुन खाली उतरून पहिल्या शहानुर दरवाजाकडे जाता येते. ७०० फुट लांबीचा हा मार्ग पुर्णपणे तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. या वाटेने चालत ५ मिनिटात आपण गडाच्या पहील्या शहानुर दरवाजात पोहोचतो. या दरवाजाने बाहेर पडुन तेथुन आपली गडफेरी सुरु करावी. गडाच्या पहिल्या दरवाजाच्या कमानीवर दोन शरभ कोरलेले आहेत. दरवाजाची प्रवेश करण्याची कमान व आत बाहेर पडण्याची कमान या दरम्यानचा भाग पूर्णपणे बंदिस्त असुन दोन्ही बाजुस चौथऱ्यावर पहारेकऱ्यासाठी अनेक कमानीदार देवड्या आहेत. या देवडीमध्ये कोठार तसेच तटावर व दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी लहान मार्ग आहेत. दरवाजाच्या आतील बाहेर पडण्याच्या बाजुस दोन कमानी असुन या कमानीवर देखील शरभ कोरलेले आहेत. या कमानीशेजारी एक लहान दरवाजा असून त्यातुन दरवाजाच्या छतावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. या दरवाजावर कमळाची फुले व इतरही नक्षीकाम केलेले आहे. दरवाजावर असलेल्या चार शरभशिल्पांमुळे हा दरवाजा शेर दरवाजा म्हणुनही ओळखला जातो. शेर दरवाजा पाहुन गाडीतुन थोडे पुढे आल्यावर उजवीकडे महाकाली दरवाजा म्हणुन ओळखला जाणारा गडाचा अतिशय सुंदर असा तिसरा दरवाजा आहे. संपुर्ण महाराष्ट्रात कोणत्याही किल्ल्याला इतका सुंदर व प्रशस्त दरवाजा नाही. या संपुर्ण दरवाजाची रचना एका अष्टकोनी बुरुजाच्या आत केलेली असून या बुरुजात काही खिडक्या आहेत. रस्त्याशेजारी असलेल्या १२-२० वळणदार पायऱ्या चढुन आपण बुरुजात लपवलेल्या एक मोठया दरवाजासमोर येतो. या दरवाजातून आत आल्यावर दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन डाव्या बाजुस गडाचा अतिशय सुंदर असा महाकाली दरवाजा आहे. दरवाजाची उंची साधारण ३५ फुट असुन दरवाजाच्या सर्वात वरील भागात एक व कमानीवर एक असे सुलेखन (कॅलिग्राफी) पद्धतीने कोरलेले पर्शियन भाषेतील दोन शिलालेख आहेत. हे दोन्ही शिलालेख बहमनी काळातील असुन वरील शिलालेखात हा दरवाजा फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने हिजरी ८९२ मध्ये (इ.स.१४८७) दुरुस्त केल्याचा उल्लेख आहे तर दुसऱ्या शिलालेखात ईश्वराच्या अस्तित्वा शिवाय जीवन अपुंर्ण आहे अशा आशयाचा मजकूर कोरला आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजुस अप्रतिम कोरीव कामाने सजवलेले दुमजली गवाक्ष आहेत. दरवाजाच्या वरील भागात नक्षीदार झरोके असुन चौकटीवर वेगवेगळी फुले व नक्षी कोरलेली आहे. दरवाजाच्या डाव्या बाजुस एक दगडी रांजण आहे. दरवाजासमोर लहान पटांगण असुन याच्या उर्वरित तीन बाजुस चौथरे व त्यावर कमानीदार देवड्या आहेत. या चौथऱ्याखाली तळघरे असून त्यात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. चौथऱ्यावरील इमारतींच्या छतावर तसेच दरवाजाच्या आत व वरील भागात जाण्यासाठी या देवडीत जिने बांधलेले आहेत. या वास्तुची एकुण रचना पहाता हा केवळ दरवाजा नसुन शासकीय कामासाठी वापरली जाणारी इमारत असावी. महाकाली दरवाजाने आत शिरल्यावर दरवाजाच्या आतील बाजुस लागून असलेले वास्तु अवशेष दिसतात. येथुन डावीकडे व उजवीकडे अशा दोन वाटा फुटतात. आपण प्रथम उजवीकडील वाटेने पुढे निघावे. या वाटेवर एक मोठा बुरुज असून या बुरुजाजवळ तटाला लागुन काही इमारतीचे अवशेष आहेत. या बुरुजाला कुंडली बुर्ज (शस्त्रांचा कारखाना) असे नाव आहे. तटावरून या वास्तुत उतरणाऱ्या मोठमोठया पायऱ्या आहेत. या वास्तुत पाण्याची लहान बांधीव टाकी व मोठमोठे बंदिस्त चुलाणे आहेत. निजामकाळात येथे लहान तोफा घडवण्याचा कारखाना असल्याचे वाचनात येते. हि वास्तु कदाचित तोफा घडविण्याचे ठिकाण असण्याची शक्यता आहे. एक माणुस उचलु शकेल अशी तोफ म्हणजे नर+ नाळा व त्यावरून या किल्ल्याला नरनाळा नाव पडल्याचेही सांगितले जाते. हा भाग पाहुन पुन्हा महाकाली दरवाजाकडे यावे व डावीकडील वाटेने पुढे जावे. या वाटेवर ५ मिनिटाच्या अंतरावर डाव्या बाजूस सावरवली व गज बहादूरवली या गोंड राजांच्या दोन समाधी आहेत. हा भाग पाहुन गाडीने पुढे निघावे. रस्त्यावरील एक लहानसा चढ चढुन आपण थोड्याशा सपाटीवर येतो. येथे वनखात्याने प्राणी निरीक्षणासाठी मनोरे बांधलेले आहेत. या सपाटीवर एक पायवाट दिसुन येते. खाली उतरून पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर आपण डावीकडे तटाच्या काठावर बांधलेल्या सुंदर अर्धगोलाकार बुरुजाकडे येतो. या बुरुजावर जमिनीच्या पातळीत कमानी असुन या कमानीत हवेशीर गवाक्ष व बाहेरील बाजुस सज्जे बांधलेले आहेत. बुरुजाच्या दोन्ही बाजुस वर चढण्यासाठी पायऱ्या असून त्याशेजारी शरभ कोरलेले आहे. सुंदर अशी हि हवामहल वास्तु खुनी बुरुज या भयानक नावाने ओळखली जाते. या बुरूजा वरून किल्ल्याचे तीन दरवाजे व त्यातुन किल्ल्यावर जाणारा संपुर्ण मार्ग नजरेस पडतो. येथुन पुढे जाताना अजून एक अर्धगोलाकार बुरुज पहायला मिळतो. वाटेने पुढे गेल्यावर दरीच्या काठावर दोन चौथऱ्यावर मांडून ठेवलेल्या १८ फुट लांबीच्या दोन तोफा पहायला मिळतात. या तोफांच्या मागील बाजुस प्रशस्त असा दगडी बांधकामातील कमानीदार महाल आहे. या महालाची मोठया प्रमाणात पडझड झालेली आहे. महालाच्या डावीकडे एक पायवाट खाली उतरताना दिसते. या वाटेने थोडे खाली उतरले असता एकामागे एक असे दोन दरवाजे पहायला मिळतात. यातील एक दरवाजा साध्या बांधणीचा असुन दुसऱ्या दरवाजाचे बांधकाम शहानुर दरवाजाप्रमाणे आहे पण याची मोठया प्रमाणात पडझड झालेली आहे. दोन दरवाजाचा हा मार्ग अकोट दरवाजा म्हणुन ओळखला जातो. हा दरवाजा पाहुन पुन्हा गाडीकडे यावे. गाडीने थोडे पुढे आल्यावर रस्त्याच्या उजव्या बाजुस एका ओळीत असलेल्या पाच कमानी व त्याशेजारी भिंतीत दोन लहान दरवाजाची दालने दिसुन येतात. यातील एका दालनात मोठया प्रमाणात कोनाडे आहेत. हे ठिकाण म्हणजे गडावरील गजशाळा असुन त्याशेजारीळ दोन दालने माहुतांच्या राहण्यासाठी व हत्तीच्या पाठीवरील सामान ठेवण्यासाठी आहेत. येथुन पुढे आल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजुस एक मोठी वास्तु पहायला मिळते. गडावरील हि सर्वात मोठी वास्तु असून या वास्तुची एकंदरीत रचना व आकार पहाता हा गडावरील राजमहाल असावा. पडझड झालेल्या या वास्तुच्या मागील बाजुस मोठया प्रमाणात कमानी असून या वास्तुच्या आत अनेक दालने आहेत. या सर्व दालनात मोठया प्रमाणात माती साठलेली आहे. मागील कमानी म्हणजे घोडयांच्या पागा असाव्यात. महालाचे मुख्य प्रवेशद्वार कोरीवकामाने सजवलेले आहे. या वास्तुला वळसा घालुन पुढे आल्यावर उजव्या बाजुस केवळ गडावरच नव्हे तर या गडाच्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेला शक्कर तलाव आहे. कुत्रा चावल्यास या तलावात अंघोळ करून काठावरील समाधीची पुजा केल्यास कुत्रा चावलेली व्यक्ती बरी होते या श्रद्धेमुळे आसपासच्या गावातील अनेक श्रद्धाळूं या तलावावर अंघोळीसाठी येतात. किल्ल्याच्या या भागात बऱ्यापैकी सपाटी असुन किल्ल्याच्या बहुतांशी इमारती या तलावाच्या काठावरच आहेत. तलावाच्या उजव्या बाजुस अंबर महाल-बारादरी नावाने ओळखली जाणारी दरबाराची वास्तु आहे. ६० x २० फुट लांबीरुंदीची हि वास्तु एका चौथऱ्यावर उभी असुन या वास्तुला तीन कमानी व तीन घुमट आहेत. नंतरच्या काळात या कमानी बंदिस्त करून त्यात तीन दरवाजे बांधण्यात आले आहेत. या वास्तुच्या आतील भागात मोठया प्रमाणात कोनाडे व झरोके असुन छताच्या घुमटावर चुन्यामध्ये मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेली आहे. कधीकाळी हे छत निळ्या रंगाने रंगवल्याच्या खुणा दिसुन येतात. कमानीशेजारी छतावर जाण्यासाठी दरवाजा असून यातील पायऱ्यांनी छतावर जाता येते तर त्याशेजारी असलेल्या दरवाजातुन या इमारतीखाली असलेल्या तळघरात जाण्यासाठी जिना आहे. अंबर महालाचे पटांगण फरसबंद केलेले असुन त्याच्या मध्यभागी कारंज्यासाठी हौद बांधलेला आहे. या पटांगणाच्या चारही बाजुस सरळ रेषेत मांडलेले खांबाखालील नक्षीदार तळखडे असुन या पटांगणावर प्रासंगीक मंडप घालण्याची सोय केलेली आहे. अंबर महालाच्या उजव्या बाजुस तीन कमानीवर तोललेली मशीद असून या मशीदीचा घुमट व भिंत यावर मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेलं आहे. मशिदीच्या आवारात कारंजाचा लहानसा हौद आहे. महालाच्या समोरील बाजुस तलावाच्या काठावर बुऱ्हाणउद्दीन नावाच्या पीराची कबर आहे. या कबरीवर तीन थडगी असुन एक पर्शियन भाषेतील शिलालेख आहे. स्थानिक लोक याला कुत्तरदेवाचे ठाणे म्हणुन ओळखतात. रस्त्याच्या कडेला असलेल्या राजवाड्याच्या दिशेने हा तलाव दगडी भिंतीने बंदिस्त केलेला असुन तेथुन तलावात उतरण्यासाठी दरवाजा बांधलेला आहे. येथुन पुन्हा अंबरमहालाकडे यावे. अंबरमहालाच्या डाव्या बाजुस खाली उतरत जाणारी पायवाट असुन या वाटेने थोडे खाली उतरल्यावर एक दरवाजा पहायला मिळतो. किल्ल्याच्या माथ्यावर येण्याचा हा मुळ मार्ग असुन महाकाली दरवाजातील डावीकडील वाटेने कबरीवरून सरळ आल्यास आपला या दरवाजातुन गडावर प्रवेश होतो. दरवाजा पाहुन पुन्हा अंबरमहालाकडे यावे. येथुन शक्कर तलावाच्या कातळावर बांधलेली दगडी कमान दिसते. या कमानीकडे जाताना वाटेच्या उजव्या बाजुस एका चौथऱ्यावर तीन उध्वस्त कमानी दिसतात. गवत वाढलेले असल्यास या कमानी दिसत नाहीत. या कमानीच्या चौथऱ्याखाली तीन बांधीव तळघरे असुन हि तळघरे तेलातुपाची टाकी म्हणुन ओळखली जातात. या टाक्याच्या केवळ वरील बाजुने आत उतरण्यासाठी चौकोनी झडपा ठेवलेल्या आहेत. याची एकंदरीत रचना पहाता हि धान्याची कोठारे असावीत. हि टाकी पाहुन पुन्हा पायवाटेवर येऊन तलावाकडील कमानीकडे यावे. शक्कर तलावाच्या आसपास मोठया प्रमाणात कातळ असुन यावर पडलेले पाणी तलावात जमा करण्यासाठी कातळावर अनेक ठिकाणी चर खोदलेले आहेत. कातळावरील कमानीकडे उभे राहुन उजवीकडे पहिले असता कातळात कोरलेले एक टाके नजरेस पडते. या टाक्याकडून खाली उतरले असता गडावरील हमामखाना पहायला मिळतो. हमामखान्याचा दर्शनी भाग तीन कमानीवर तोललेला असून आत दोन दालनात विभागलेला आहे. हमामखान्यात अंघोळीसाठी वेगवेगळी कुंड बांधलेली असुन खापरी नळाने यात गरम व थंड पाण्याचा पुरवठा केलेला आहे. हमामखान्याच्या मागील भिंतीत पाणी गरम करण्यासाठी असलेल्या चुलाण्याचे भग्न अवशेष दिसतात. हमामखाना पाहुन पुन्हा टाक्याकडे यावे व सरळ जाणाऱ्या पायवाटेने गडाच्या उत्तर बाजुस निघावे. वाटेच्या उजवीकडे तटबंदीतील एका बुरुजावर उध्वस्त अवशेष असून डावीकडे दारूकोठाराची इमारत आहे. येथे समोरच वनखात्याने विश्रांतीसाठी कट्टा बांधलेला आहे. या कोठाराला लागुनच ४०० x ७० फुट आकाराची लांबलचक वास्तु आहे पण हि वास्तु पुर्णपणे झुडूपात बंदिस्त झाली असल्याने नेमकी कशाची आहे ते कळत नाही. हि वास्तु पाहुन पायवाटेने तसेच पुढे गेल्यावर डावीकडे ६०० x ५० फुट आकाराची अशीच अजुन एक इमारत पहायला मिळते. हि वास्तु भिंती घालुन सात भागात विभागलेली आहे. नगारखाना म्हणुन ओळखली जाणरी हि वास्तु नेमकी कशासाठी आहे ते कळत नाही. हि वास्तु पाहुन पुढे गेल्यावर आपण एका अजस्त्र तोफेजवळ पोहोचतो. नऊगजी तोफ म्हणुन ओळखली जाणारी हि तोफ २६ फुट लांब व ६ फुट व्यासाची असुन या गडाचे खरे वैभव आहे. य तोफेच्या लांबीवरूनच तीला नऊगजी तोफ हे नाव पडले असावे. तोफेवर एक पर्शियन लेख असुन या लेखात हि तोफ इमादशाहीच्या काळात १५३४-३५ दरम्यान ओतलेली असुन त्यानंतर औरंगजेबच्या काळात नरनाळा किल्ल्यावर आणल्याचा उल्लेख आहे. या तोफेकडून समोरील बाजुस तटबंदीत असलेला किल्ल्याचा अजुन एक दरवाजा नजरेस पडतो. तोफेच्या मागील बाजुस एक भग्न वास्तु असुन हि वास्तु कैदखाना म्हणुन ओळखली जाते. या वास्तुच्या आवारात पाण्याचे टाके आहे. याच्या खालील बाजुस वनखात्याने विश्रांतीसाठी कट्टा बांधलेला आहे. नऊगजी तोफ पाहुन मागे फिरावे व शक्कर तलावाजवळ यावे. गडावरील महत्वाचे अवशेष पाहुन झालेले असल्याने व आपल्याकडे वेळ कमी असल्याने आपली उर्वरित गडफेरी गाडीतुनच पुर्ण करावी. रस्त्याने पुढे जाताना उजवीकडे शक्कर तलावाच्या काठावर एक वास्तु व त्याची दुहेरी कमान पहायला मिळते. या रस्त्याने आपण वनखात्याच्या गडावरील चौकीजवळ येतो. या चौकीत वनखात्याचे ३-४ कर्मचारी सतत तैनात असतात. वन्य प्राण्यांनी हल्ला करू नये यासाठी या संपुर्ण चौकीला तारांचे कुंपण घालुन लोखंडी फाटक लावलेले आहे. वन्यप्राण्यांचा इथपर्यंत वावर असुन ते या भागात असल्यास येथुन पुढे सोडले जात नाही व सोडल्यास गाडीतुन खाली उतरू दिले जात नाही. या चौकीपासुन डांबरी रस्ता संपुन कच्चा रस्ता सुरु होतो. या रस्त्याने जाताना उजव्या बाजुस सर्वप्रथम इमली तलाव व त्यापुढे काही अंतरावर डावीकडे चंद्रावती तलाव पहायला मिळतो. चंद्रावती तलावापुढे काही अंतरावर शिरपुर दरवाजा आहे. येथुन गाडी तटबंदीच्या कडेने जात गडाच्या उत्तर टोकावर तटबंदीजवळ असलेल्या खांब तलावाकडे येते. खांब तलावाकडून पुढे आल्यावर उजवीकडे एका झाडाखाली मारुतीची मुर्ती असून जवळच काही विरगळ व म्हसोबाची मुर्ती आहे. गाडीतुन उतरू न दिल्याने हे सर्व लांबुनच पहावे लागते. याच्यापुढे काही अंतरावर उजवीकडे मोती तलाव असुन या तलावाच्या काठावर दोन कमानी असलेली सुस्थितीतील वास्तु पहायला मिळते. पुढे आल्यावर डाव्या बाजुस किल्ल्याच्या दोन टेकडांच्या घळीत उत्तर टोकावर असलेला दिल्ली दरवाजा पहायला मिळतो. या दरवाजाची बांधणी देखील शहानुर दरवाजाप्रमाणे असुन खाली उतरण्यास मनाई असल्याने हा दरवाजा आतून पहाता आला नाही पण येथे रस्ता वळणदार असल्याने दरवाजाच्या दोन्ही बाजु पहाता येतात. दरवाजा पाहुन पुढे आल्यावर उजव्या बाजुचा दमयंती तलाव पहात आपण जाफराबाद किल्ल्याच्या दरवाजासमोर पोहोचतो. जाफराबाद किल्ला आता वाघ व अस्वलांचे निवासस्थान झाला असुन प्रवेश करण्यास पुर्णपणे प्रतिबंध आहे. येथुन किल्ल्याची तटबंदी व बुरुज पहात गाडी रस्त्याने सरळ पुढे आल्यावर डावीकडे पडझड झालेली एक मोठी वास्तु दिसुन येते. पुढे उजवीकडील राम तलाव/धोबी तलाव पहात इमली तलाव पार करून आपण वनखात्याच्या चौकीजवळ येतो व आपली धावतपळत केलेली गडफेरी काही प्रमाणात पुर्ण होते. नरनाळा किल्ला समुद्रसपाटीपासून ३०१० फुट उंचावर असुन याच्या तटबंदीत लहानमोठे २२ दरवाजे व ६७ बुरुज आहेत. गडावर एकुण २२ तलाव असुन यातील ६ तलावाना वर्षभर पाणी असते. पुरातत्व खात्याने केलेल्या उत्खननातून विदर्भाचा इतिहास इ.स.पुर्व तिसऱ्या शतकात असलेल्या सातवाहन राजवटी पर्यंत मागे जातो. स्थानिक कथानुसार नरनाळा किल्ला आठव्या शतकात राजा नरेंद्रपुरी याने बांधला तर दहाव्या शतकात राजा नरनाळा स्वामी राजाचे इथे शासन होते. नरनाळा स्वामी हा ‘राजा वैराट’ आणि ‘राजा इल’ यांच्या काळातील समकालीन राजा समजला जातो. यानंतर १३ व्या शतकात विदर्भात गोंड राजवटीचा उदय झाला व त्यांनी या प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केली. गोंड राजांनी या भागावर जवळजवळ ३०० वर्षे राज्य केले. काही इतिहासकारांच्या मते नरनाळ सिंग ह्या गोंड राजाने ह्या किल्ल्याची निर्मिती केली. इ.स.१४२५ मध्ये बहमणी सुलतान शहाबुद्दीन अहमदशहा वली (१४२२-१४३६) याने या किल्ल्याची दुरुस्ती केल्याचा उल्लेख येतो. बहामनीच्या पडत्या काळात इ.स.१४८७ मध्ये फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याच्या ताब्यात नरनाळा किल्ला आला. बहामणी राज्य नष्ट होउन इमादशाही स्थापन झाल्यावर फत्तेउल्ला इमाद उलमुल्क याने इ.स. १४९० मध्ये गाविलगडावर इमादशाहीची स्थापना केली. त्याने नरनाळा किल्ल्याची दुरूस्तीच नव्हे तर विस्तारही केला. इमादशाही घराण्याने ९० वर्षे वऱ्हाड प्रांतावर राज्य केले. नरनाळा हा वऱ्हाड प्रांतातील महत्वाचा किल्ला होता. इ.स.१५७२ मध्ये निजामशहा व इमादशाहीचा सेनापती तुफालखान यांच्या नरनाळा येथे झालेल्या लढाईत बुऱ्हाण इमादशहाचा पराभव झाला. यात बुऱ्हाण इमादशहा व त्याचे सर्व वंशज मारले गेल्याने इमादशाहीचा शेवट झाला व किल्ला निजामशहाच्या ताब्यात आला. सम्राट अकबरच्या काळात इ.स. १५९८ मध्ये किल्ला मुघलांच्या ताब्यात आला. मुर्तजा निजामशहाच्या काळात मलीकंबर याने काही काळाकरता या किल्ल्याचा ताबा घेतला पण तो पुन्हा मुघलांच्या ताब्यात गेला. इ.स.१७३८ मध्ये रघुजी भोसले यांनी शुजातखानाचा पराभव केल्याने हा किल्ला मराठयांच्या ताब्यात आला पण लवकरच तो निजामाच्या ताब्यात गेला. नागपुरचे स्वतंत्र संस्थान अस्तित्वात आल्यावर मुधोजी भोसले यांनी इ.स.१७५२ मध्ये नरनाळा किल्ल्याचा ताबा घेतला. इ.स.१८१८ मध्ये अप्पासाहेब भोसले व इंग्रज यांच्यामधील तहानुसार किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला व त्यांनी त्याचा ताबा हैद्राबादच्या निजामाकडे दिला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाल्यावर इ.स. १९४८ साली नरनाळा किल्ला भारतीय संघराज्यात विलीन झाला.
© Suresh Nimbalkar