नंदुरबार

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नंदुरबार

उंची : ८२० फुट

श्रेणी : सोपी

नंदुरबार आणि पर्यटन म्हटले कि सर्वांच्या भुवया उंचावल्या जातात. महाबळेश्वरनंतरचे राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ वगळता येथे कोणतेही पर्यटनस्थळ नाही असाच सर्वांचा समज आहे. आदीवासी बहुल असलेल्या या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतरत्र कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा आयोजित केला असता बरीच माहिती मिळुन आली व ती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातील हटमोईदा व अष्टे या दोन गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या असुन उरलेले १३ गढीकिल्ले त्यांचे उर्वरित अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आजही उभे आहेत. ... या १३ किल्ल्यात १ गिरिदुर्ग असुन ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत. यातील बहुतांशी गढीकोटात गावे वसलेली असल्याने गावातील वाढत्या वस्तीने या कोटांच्या अवशेषांचा घास घेतला आहे तसेच स्थानिकांची उदासीनता देखील या कोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. आज आपण सर्वप्रथम नंदुरबार जिल्यातील नंदुरबार या एकमेव गिरिदुर्गाचा वेध घेणार आहोत. एकेकाळी खानदेशात मोडणारे नंदुरबार खानदेशच्या विभाजनानंतर आधी धुळे जिल्ह्याचा भाग बनले व नंतर १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून सहा तालुके असलेल्या नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा थेट मध्यप्रदेश व गुजरात राज्याला भिडल्या आहेत. नंदुरबार शहर हे नंदुरबार जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण मुंबई पासुन ३६० कि.मी.अंतरावर असुन देशातील प्रमुख शहराशी रस्त्याने व लोहमार्गाने जोडले गेले आहे. नंदुरबार या गिरीदुर्गाला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नंदुरबार शहर गाठावे लागते. हा किल्ला नंदुरबार शहराच्या पश्चिमेस असलेल्या टेकाडावर वसलेला असुन गडाची उंची समुद्र सपाटीपासुन ८१८ फुट आहे. निमुळत्या आकाराचा हा किल्ला पुर्वपश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ साधारण ३ एकर आहे. स्थानिक लोकांना हा किल्ला हजरत इमाम बादशहा दर्गा म्हणुन परिचित आहे. हा दर्गा थेट किल्ल्याच्या माथ्यावर असुन तिथपर्यंत जाण्यास पक्की डांबरी सडक आहे. गावातुन किल्ल्याकडे जाताना टेकडीच्या पायथ्याशी वाटेच्या दोन्ही बाजुला आपल्याला दोन प्राचीन विहिरी व त्याशेजारी मोठया प्रमाणात राजघराण्यातील व्यक्तींच्या कबरी दिसुन येतात. सध्या या विहिरीत मोठया प्रमाणात गाळ जमा झालेला असुन कबरीभोवताली मोठया प्रमाणात रान माजले आहे. किल्ल्यावर जाताना वाटेच्या उजव्या बाजुस डोंगर उतारावर आपल्याला मोठया प्रमाणात वास्तु अवशेष दिसुन येतात तसेच टेकडीच्या पायथ्याशी असलेला जुना दगडी बंधारा पहाता येतो. सध्या या बंधाऱ्यात मोठया प्रमाणात गाळ जमा झाला असल्याने कमी प्रमाणात पाणीसाठा आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी डांबरी रस्ता बांधताना किल्ल्याची तटबंदी मोठया प्रमाणात नष्ट झाली असुन या वाटेवरील किल्ल्याच्या मूळ दरवाजाच्या दोन कमानी व काही तटबंदीचे आजही पहायला मिळतात. वाटेवरील पहिली कमान पार केल्यावर डाव्या बाजूस एक नव्याने बांधलेला दर्गा तर उजव्या बाजूस एक प्राचीन इमारत दिसुन येते. या इमारतीत एक व बाहेर एक कबर असुन या वास्तुचे एकंदरीत बांधकाम पहाता हि मूळ वास्तु दर्ग्याची नसुन कालांतराने या वास्तुचे दर्ग्यात रुपांतर झाल्याचे जाणवते. याच वाटेच्या डाव्या बाजूस आपल्याला तटबंदीची दगडी भिंत व दरवाजाचे अवशेष दिसुन येतात. दरवाजाची दुसरी कमान पार केल्यावर आपण थेट बालेकिल्ल्याच्या पुर्वाभिमुख दरवाजापाशी पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या दरवाजाची कमान व मूळ लाकडी दरवाजा आजही शिल्लक असुन दर्शनी भाग सुशोभित करण्यासाठी त्यावर संगमरवरी फरशा बसविण्यात आल्या आहेत पण त्यामुळे मूळ बांधकामाची पार रया गेलेली आहे. पायऱ्या चढुन आत न जाता पायऱ्या शेजारून पुढे आल्यावर तटबंदीत आपल्याला गडाचे मूळ बांधकाम दिसुन येते. या ठिकाणी एका रांगेत चार कबर असुन तटबंदीत काही नक्षीदार दगड दिसुन येतात. हि पाहुन मागे फिरावे व बालेकिल्ल्यात प्रवेश करावा. बालेकिल्ल्यात शिरल्यावर समोरच किल्ल्यावर असणाऱ्या इमारतीच्या नावांचा व त्या कोणी कधी व कशासाठी बांधल्या याची माहिती देणारा संगमरवरी फलक आहे. दरवाजाच्या आतील बाजुस तटाला लागुन दरवाजा व बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. दरवाजासमोर किल्ल्याच्या दोन मूळ ओवऱ्या असुन तीन नव्याने बांधलेल्या आहेत. येथुन काही पायऱ्या चढुन आपण बालेकिल्ल्यावर असलेल्या दर्ग्यासमोर पोहोचतो. बालेकिल्ल्याच्या उत्तर व पश्चिमेकडील तटबंदीत मोठया प्रमाणात ओवऱ्या बांधलेल्या असुन दर्ग्याच्या मागील बाजूस जमिनीशी समांतर असा खाली उतरण्यासाठी पायऱ्या कोरलेला मार्ग आहे. या ठिकाणी जमिनीखाली तळघर असुन ते एका बाजुने खुले आहे. हि वास्तु म्हणजे किल्ल्यावरील रंगमहाल असुन या वास्तुचे बांधकाम मुगल बादशहा शहाजहानच्या काळात कोणी चिखली सरदाराने केल्याचा उल्लेख गडावरील फलकात दिसुन येतो. दर्ग्याच्या दरवाजावर असलेल्या पर्शियन शिलालेखानुसार मूळ मकबरा खानदेश सुलतान नसीर फारुकी याने बांधलेला असुन सध्या असलेल्या मकबऱ्याचे बांधकाम गुजरात बादशहा मेहमुद बेगडा याने केले आहे. किल्ल्यावर एकुण तीन शिलालेख असल्याचे उल्लेख आढळतात पण सध्या हा एकमेव शिलालेख पहायला मिळतो. किल्ल्यावरून संपुर्ण नंदुरबार शहर व खुप लांबवरचा भूभाग नजरेस पडतो. बालेकिल्ल्यातून बाहेर पडल्यावर पायऱ्या उतरून खाली न जाता उजवीकडील वाटेने सरळ निघाल्यावर आपण किल्ल्याच्या पुर्वेकडील टोकावर पोहोचतो. या ठिकाणी पुर्वी एखादा बुरुज असावा आता मात्र कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यास अर्धा तास पुरेसा होतो. नंदुरबार शहर खानदेशांतील जुन्या शहरापैकीं एक असून कान्हेरी येथील लेण्यांत असलेल्या एका शिलालेखांत याचा नंदिगड म्हणुन उल्लेख येतो. हें गांव नंद गवळी राजाने म्हणजेच यादव वंशातील राजाने वसविलें असून मुसुलमानी आक्रमणापर्यंत तें त्यांच्या वर्चस्वाखाली होतें. गावात आजही नंदगवळी राजाचा किल्ला म्हणुन ओळखला जाणारा अर्धवट ढासळलेला भुईकोट आहे. इन्न बतूता यानें आपल्या प्रवासवर्णनात नंदुरबार शहराचा उल्लेख केला आहे. खानदेशचा पहिला सुलतान फारुकी मलिकराज यांने सुलतानपूर व नंदुरबार हीं शहरे इ.स. १५३० सालीं ताब्यात घेतलीं परंतु गुजरात सुलतान मुजफर ह्याच्या आक्रमणाने फारुकी मलिकराज याला थाळनेराकडे परतावें लागलें. इ.स.१५३६ मध्यें महंमुदशहा बेगडा (तिसरा) या गुजरातच्या सुलतानाने राजा झाल्यावर त्यानें अशीरगडावर कैदेंत असतांना कबूल केल्याप्रमाणें सुलतानपूर व नंदुरबार हीं ठाणीं मुबारकखान फारुकी यांस दिलीं. मध्यंतरी गुजरातच्या चेंगीझखानानें हीं पुन्हां घेतलीं होतीं परंतु त्यास लवकरच तीं सोडावीं लागली. अकबराच्या कारकीर्दीत हें जिल्ह्याचें ठाणें असून त्याचा वसूल पांच कोटी दाम असल्याचा उल्लेख येने अकबरीत आढळतो. टॅव्हर्निअर या प्रवाशाने नंदुरबार शहर हें फार भरभराटींत असल्याचे म्हटलें आहे. सन १६६६ मध्यें येथें इंग्रजांनीं एक वखार घातली व ती चांगली चालल्यामुळें त्यांनीं अहमदाबादचा कारखाना १६७० सालीं येथें आणला व त्यांत तयार झालेला माल इंग्लंडांत पाठविण्यांत आला. एकोणिसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात या वखारीचा नाश झाला. इ.स. १८१८ मध्यें नंदुरबार इंग्रजांच्या ताब्यांत आलें तेव्हां अर्धवट ओसाड झाले होतें.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!