धोत्री
प्रकार : गढी
जिल्हा : सोलापुर
उंची : 0
श्रेणी : सोपी
सोलापूर जिल्ह्यात सोलापूर पासून २४ कि.मी.अंतरावर धोत्री गावात धोत्रीचा किल्ला आहे. मध्ययुगीन काळात बांधलेला हा किल्ला भुईकोट प्रकारातील असुन किल्ल्याचा इतिहास फारसा ज्ञात नाही. सोलापुरहुन धोत्री गावात जाताना दुरवरून गडाची तटबंदी व बुरूज आपले लक्ष वेधुन घेतात. रस्त्यावरूनच किल्ल्याचे प्रवेशद्वार दिसत असल्याने सहजपणे किल्ल्यात जाता येते. साधारण आयताकृती आकार असलेला हा किल्ला पूर्व-पश्चिम पसरलेला असुन किल्ल्याचे क्षेत्रफळ दोन एकर आहे. किल्ल्याच्या तटबंदीत एकुण दहा बुरूज असुन त्यातील दक्षिणेच्या कोपऱ्यातील दोन बुरूज एकमेकाशी जोडून आहेत. दहा बुरुजापैकी कोपऱ्यातील चार बुरूज मोठया आकाराचे व तटबंदीतील उरलेले सहा बुरूज मध्यम आकाराचे आहेत. किल्ल्याच्या तटबंदी व बुरुज पांढऱ्या चिकट मातीच्या बनवलेल्या असुन त्यांना मजबुती देण्याकरता खालील भागात आतुन व बाहेरून दगडी बांधकाम केलेले आहे
...
तर वरील बाजुस विटा लावलेल्या आहेत. बुरुज व तटबंदीत जागोजागी जंग्या आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी असलेला बालेकिल्ला सुरक्षित करण्यासाठी त्याला बाहेरील बाजूने अजुन एक तटबंदी घालुन दुहेरी तटबंदीने सुरक्षित केला आहे. त्यामुळे किल्ला तीन भागात विभागला गेला असुन रणमंडळातून आत आल्यावर मुख्य दरवाजातून आत न जाता बाहेरील दोन तटबंदीच्या मधील भागात फिरता येते. या भागात प्रचंड प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने शेवटपर्यंत जाता येत नाही. हा झाला किल्ल्याचा पहिला भाग. या तटबंदीत शिरण्यासाठी दरवाजा असावा पण तो पुर्णपणे कोसळून गेला आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार उत्तराभिमुख असुन कधीकाळी दरवाजासमोर असणारी रणमंडळाची रचना पुर्णपणे ढासळून गेलेली आहे. प्रवेशव्दारा जवळील तटबंदीत सज्जा असुन प्रवेशव्दाराला अलीकडे लाकडी दरवाजा बसवलेला दिसुन येतो. किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार १२ फूट उंच असुन दरवाजाच्या आत दोनही बाजुला पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. यातील एका देवडीतुन वर सज्जावर व तिथुन बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर समोरच मोकळे मैदान असुन त्याच्या टोकाला वास्तूचे अवशेष आहेत. डाव्या बाजुच्या तटबंदीतील कोपऱ्याच्या बुरूजात एक कोठार दिसुन येते. किल्ल्याचा हा दुसरा भाग असुन उजव्या बाजूच्या तटबंदीत बालेकिल्ल्याचे पूर्वाभिमुख प्रवेशव्दार आहे. या प्रवेशव्दारालाही पहारेकऱ्यासाठी दोन्ही बाजुस देवड्या असुन आत शिरल्यावर उजव्या बाजूला पायऱ्या व त्याच्या टोकाशी कमान असणारी चौकोनी विहिर आहे. विहीरीत पाणी असुन ते पिण्यायोग्य आहे. बालेकिल्ल्याच्या चार टोकाला चार बुरुज दिसतात पण प्रत्यक्षात दक्षिण दिशेचे दोन बुरुज बाहेरील तटबंदीत आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला असलेल्या टोकावरील मातीच्या भव्य बुरुजात बुरुजावर जाण्यासाठी बुरुजाच्या आतुनच वळणदार पायऱ्या आहेत. किल्ल्यातील हा सर्वात मोठा व उंच बुरूज असुन या बुरुजावरून संपूर्ण किल्ला दिसतो व किल्ल्याची रचना लक्षात येते. बुरुजावरून खाली उतरून आल्यावर बाजूच्या तटबंदीत एक अर्धवर्तूळाकार छ्त असलेली खोली आहे. किल्ल्याचे अंतर्गत अवशेष पुर्णपणे ढासळलेले असुन असुन त्यावर मोठया प्रमाणात झाडी वाढली असल्याने अवशेषांची शोधयात्रा करावी लागते. बुरुजाच्या अलीकडे काही अंतरावर जमिनीला समांतर पायऱ्या असुन जमिनीखाली १५ x २० फुट आकाराचे तळघर आहे. तळघराच्या पुढील बाजुस अजुन एका वास्तूचा दरवाजा दिसतो. हि वास्तू दोन दालनाची असुन पायऱ्या उतरून कवळ पहिल्या दालनापर्यंत जाता येते. येथे खूप मोठया प्रमाणात वटवाघुळ असल्याने दुसऱ्या दालनात शिरता येत नाही. या भागातील तटबंदीत अनेक उध्वस्त वास्तूंचे अवशेष पहायला मिळतात. हा बालेकिल्ल्याचा भाग असुन किल्ल्याचा तिसरा भाग आहे. पश्चिमेच्या तटबंदीत एक झुडूपांनी झाकलेला छोटा दरवाजा असुन या दरवाजाने आपल्याला सर्वप्रथम पाहिलेल्या पहिल्या भागाच्या टोकाशी जाता येते. या दरवाजातून आत आल्यावर डाव्या बाजुला पायऱ्या असणारी दुसरी मोठी चौकोनी विहीर दिसते. हि विहीर गाळाने भरलेली असुन आतील पाणी पिण्यायोग्य नाही. समोर सर्व बाजूंनी तटबंदीने बंद असलेले आयताकृती मैदान दिसते. या तटबंदीच्या दोन टोकाला दोन बुरुज असुन डाव्या बाजुच्या बुरुजावर जाण्यासाठी विटांनी बांधलेला बंदिस्त कमानीदार मार्ग दिसतो पण तिथे जाण्याची वाट मात्र अतिशय बिकट आहे. या बुरूजावर जाण्यासाठी विहिरीच्या वरील बाजुस असणारा दरवाजा माती पडुन पुर्णपणे बुजला असुन वरची केवळ कमान दिसते. या कमानीतून आपल्याला अक्षरशः पोटावर सरकत शिरावे लागते पण आत आल्यावर मात्र हि धडपड सार्थ झाल्याची वाटते. या बुरुजावरून देखील संपुर्ण किल्ला दिसतो. या तटबंदीच्या बाहेरील बाजूला तटबंदीला लागुनच एक तलाव व त्याच्या काठावर लहानसे मंदिर दिसते. येथे आपली किल्ल्याची फेरी पूर्ण होते. संपुर्ण किल्ला फिरण्यास दीड तास लागतो.
© Suresh Nimbalkar