धोडप
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : ४६५० फुट
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील साल्हेर-मुल्हेर,गाळणा,हरीहर यांच्या बरोबरीने सर्वांगसुंदर असलेला अजुन एक किल्ला म्हणजे धोडप किल्ला. प्राचीन काळापासुन धुडप, धरब, धारब, धोडप या नावाने ओळखला जाणाऱ्या या किल्ल्यावर बालेकिल्ला,माची, दरवाजे.चोरदरवाजे, तटबंदी,बुरुज ,मंदीरे,पाण्याची टाकी-विहिरी,मेट यासारख्या दुर्ग अवशेषांची लयलुट असुन हा किल्ला पाहील्यावर एक परिपुर्ण किल्ला पाहील्याचे समाधान लाभते. कळवण भागात फिरताना चांदवड डोंगररांगेतील धोडप किल्ला त्याच्या शिवलिंगाच्या आकाराचा माथा व डोंगरातील नैसर्गिक खाच यामुळे दुरूनही स्पष्टपणे ओळखता येतो. हट्टी हे धोडप किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असुन हे गाव नाशिकपासून वडाळभोई मार्गे १५० कि.मी. अंतरावर तर कळवण या तालुक्याच्या ठिकाणाहुन ५० कि.मी.अंतरावर आहे. हट्टी जाण्यासाठी थेट बससेवा नसुन या गावाच्या ५ कि.मी.अलीकडे असलेल्या धोडांबे गावापर्यंत एस.टी.बसने जाता येते. धोडांबे गावात आवर्जुन पहावे असे प्राचीन शिवमंदिर आहे. धोडांबे गावातुन पुढे जाण्यासाठी पायगाडी अथवा खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. हट्टी गावातुन एक मळलेली पायवाट धरणाच्या काठाने गडावर गेलेली असुन या वाटेने २० मिनीटात आपण गडाच्या पायथ्याशी पत्र्याच्या निवाऱ्यात असलेल्या हनुमान मुर्तीजवळ पोहोचतो.
...
खाजगी वाहन सोबत असल्यास आपल्याला गाडीने या मुर्तीपर्यंत जाता येते. हनुमंताला वंदन करून पाउण तासात आपण गडाच्या माचीखालील तटबंदीजवळ पोहोचतो. येथुन तुटलेल्या तटबंदीतुन आपण गडाच्या माचीवर प्रवेश करतो. या भागाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन दरवाजाचे कोणतेही अवशेष दिसत नसल्याने येथे दरवाजा असावा असे ठामपणे सांगता येत नाही. माचीचा विस्तार प्रचंड व तीन भागात पसरलेला असुन या तीन भागात प्रवेश करण्यासाठी तीन स्वतंत्र दरवाजे आहेत. माचीवर प्रवेश केल्यावर समोरच नक्षीदार घुमटीमध्ये असलेली मारुतीची मुर्ती नजरेस पडते. माचीपर्यंत येण्यासाठी फारसे श्रम पडले नसल्याने सर्वप्रथम आपण उंचावर असलेला बालेकिल्ला पहावा व त्यानंतर माचीची भटकंती करावी. मारुतीला दंडवत घालुन डावीकडे वळल्यावर आपल्याला माचीच्या अंतर्गत भागात दोन बलदंड बुरुजात बांधलेला किल्ल्याचा उत्तराभिमुख दरवाजा दिसतो. या दरवाजाच्या कमानीखाली उजवीकडे देवनागरी भाषेतील शिलालेख कोरलेला आहे. माचीचा हा भाग बालेकिल्ल्याच्या दिशेने वरपर्यंत तटबंदी बांधुन बाहेरील माचीपासुन वेगळा करण्यात आला आहे. हे संपुर्ण बांधकाम घडीव दगडात केलेले आहे. या दरवाजाने आत आल्यावर वाटेच्या दोन्ही बाजुस मोठ्या प्रमाणात वास्तु अवशेष पहायला मिळतात. वाटेच्या सुरवातीस उजवीकडे घरांचे चौथरे असुन त्यातील एका चौथऱ्यावर तीन दगडाची घुमटी उभारून त्यात झीज झालेली मुर्ती ठेवलेली आहे. वाटेच्या डावीकडे तटामध्ये पायऱ्यांची विहीर असुन त्यापुढे तटाबाहेर जाण्यासाठी लहानशी चोरवाट आहे. त्यापुढे पायऱ्या असलेले दुसरे लहानसे बांधीव टाके असुन शेजारी गोलघुमट असलेले मारुती मंदिर आहे. मंदीरात मारुतीची मुर्ती व नंदी असुन बाहेरी बाजुस तीन भग्न शिवलिंग व दगडी ढोणी आहे. मंदिराच्या दर्शनी भागातील कोनाड्यात एक लहानशी गणेशमुर्ती आहे. याच्या पुढे एका चौथऱ्यावर भात कांडण करण्याची दगडी उखळी आहे. पुढे डाव्या बाजुस सोनारवाडी नावाची ८-१० घरांची गवळी वस्ती असुन सध्या तेथे कोणीही मुक्कामास नाही.गडाच्या पायथ्याशी असलेले गुराखी पावसाळ्यात तीन-चार महिने गुरे घेऊन या वस्तीत मुक्कामास असतात. येथुन पुढे आल्यावर वाटेला दोन फाटे फुटतात. वाटेच्या डावीकडे एक दुमजली विहीर असुन उजवीकडील वाट आपल्याला बालेकिल्ल्याकडे नेते. गडावर मुक्काम करावयाचा असल्यास आधी माची पाहुन मग बालेकिल्ल्यावर जावे अन्यथा प्रथम बालेकिल्ला पाहुन घ्यावा. बालेकिल्ल्याच्या वाटेवर सुरवातीला काही कोरीव दगड पडलेले असुन येथे उजवीकडे झाडीत एक समाधी चौथरा पहायला मिळतो. बालेकिल्ल्याची वाट म्हणजे उभा चढ असुन या वाटेवर काही ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत तर काही ठिकाणी हा मार्गच कातळात कोरलेला आहे. या वाटेने साधारण अर्धा तास वर चढल्यावर आपण गडाच्या कातळ कड्याशी येतो. या ठिकाणी वर चढण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या असुन आता वनखात्याने त्यावर लोखंडी शिडी लावलेली आहे. आपण पायऱ्या किंवा शिडीने वर जाऊ शकतो. शिडीच्या खाली अलीकडे डाव्या बाजुस वनखात्याने लोखंडी कठडे लावलेले असुन या वाटेने चालत पुढे गेले असता आपण एका लहानशा घळीत पोहोचतो. कधीकाळी या ठिकाणी गडावर जाण्याचा मुळमार्ग व त्यात दरवाजा असल्याच्या खुणा दिसुन येतात. येथुन वर चढुन कातळ डाव्या बाजूला व दरी उजवीकडे ठेवत आपण शिडीच्या वरील बाजुस असलेल्या गडाच्या दुसऱ्या दरवाजात पोहोचतो. या वरील वाटेवर देखील वनखात्याने लोखंडी कठडे लावलेले आहेत. गडाचा हा दरवाजा दर्शनी दोन बुरुजांच्या मागे दुसऱ्या दोन बुरुजात बांधलेला असुन हे तटबंदी थेट बालेकिल्ल्याच्या कातळाला भिडवून त्यात तिसरा बुरुज बांधलेला आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन दरवाजाची कमान मात्र पुर्णपणे नष्ट झाली आहे.या भागातील दरीकाठावर असलेली तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत असुन त्यावरील चर्या सुस्थितीत आहे. दरवाजाची तटबंदी बालेकिल्ल्याच्या कातळाला जेथे भिडली आहे तेथे बुरुजाजवळ पाण्याचे टाके असुन या टाक्याच्या उजवीकडे हनुमंताचे तर डावीकडे गणपती व भैरवाचे शिल्प कोरलेले आहे. हनुमंत टाके म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्याशेजारी काही अंतरावर अर्धवट कोरलेले दुसरे कोरडे टाके आहे. दरवाजाच्या आतील भागात बऱ्यापैकी सपाटी असुन हा संपुर्ण भाग तटबंदीने बंदिस्त केलेला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात घराचे चौथरे विखुरलेले आहेत. येथुन गडमाथ्याकडे पाहिले असता तळातील कातळ कोरून त्याच्या वरील भागात एका सरळ रेषेत घडीव दगडात बांधलेली बालेकिल्ल्याची तटबंदी व त्यातील बुरुज दिसुन येतात. दरवाजातुन आत आल्यावर वर चढत जाणाऱ्या वाटेने १० मिनिटात आपण बालेकिल्ल्यात प्रवेश करणाऱ्या सर्पाकृती आकाराच्या कातळकोरीव मार्गावर पोहोचतो. या मार्गावर प्रवेश करण्यापुर्वी डावीकडे कातळात कोरलेली पाण्याची दोन मोठी टाकी पहायला मिळतात. या कातळकोरीव मार्गाच्या दुसऱ्या वळणावर कातळात कोरलेले दोन पर्शियन शिलालेख आहेत. बालेकिल्ल्याचा दरवाजा पुर्णपणे कातळात कोरलेला असुन दरवाजाचा आतील भाग म्हणजे १५ फुट लांबीचा भुयारी मार्ग आहे. भुयारात प्रवेश करणारा दरवाजा उत्तराभिमुख असुन बाहेर पडणारा दरवाजा पूर्वाभिमुख आहे. दरवाजाच्या आतील वाट एका बाजूने कातळात कोरलेली असुन दुसऱ्या बाजुला तटाने बंदीस्त केली आहे. दरवाजाचा वरील भाग बुरुजाने बंदिस्त केलेला असुन तेथुन दरीच्या काठाने पुढे गेले असता डावीकडे उतारावर कातळात कोरलेले टाके दिसते तर उजवीकडे दरी काठावर एक बुरुज असुन त्यावर शेंदूर फासलेले नरशिल्प आहे.दरवाजाचा हा भाग पाहुन झाल्यावर मूळ वाटेवर परतावे व आपली पुढील गडफेरी सुरु करावी. येथुन पुढे जाताना उजव्या बाजुस पडझड झालेली कातळकोरीव वास्तु तर डावीकडे घडीव दगडात बांधलेली तटबंदी पहायला मिळते. येथुन कातळात कोरलेल्या काही पायऱ्या चढुन वर आल्यावर १५ मिनीटात आपला बालेकिल्ल्यावर प्रवेश होतो. बालेकिल्ल्याच्या सुरवातीस उजवीकडे पडझड झालेली एक सुंदर वास्तु असुन हि वास्तु नेमकी काय असावी याचा बोध होत नाही. या वास्तुचे एक दालन आजही सुस्थितीत असुन जवळच पाण्याचे भरलेले टाके आहे. वाड्याच्या उजवीकडे साचपाण्याचा तलाव असुन येथे दरीकाठावर झाडीत लपलेली तटबंदी पहायला मिळते. वाटेच्या डावीकडे एक मोठा समाधी चौथरा असुन त्याला लागुनच हिरव्यागार पाण्याने भरलेले कातळकोरीव टाके आहे. या टाक्याच्या खालील बाजुस दरीकाठावर एक उध्वस्त वाडा त्याच्या भिंती व कमानीसह उभा आहे. वाडा पाहुन पुढे जाताना दरी काठावर उतारावर अजुन एक कातळकोरीव टाके पहायला मिळते. या वास्तु पाहुन सुळक्याच्या दिशेने निघाल्यावर सुळक्याच्या वरील भागात असलेली आयताकृती आकाराची गुहा दिसते. या गुहेत जाणारी वाट अवघड नसली तरी घसारायुक्त असल्याने शक्य असले तरच या गुहेत जावे अन्यथा दुरूनच दर्शन घ्यावे. सुळक्याच्या पायथ्याशी आल्यावर सुळक्याच्या पोटात वेगवेगळ्या स्तरात कोरलेल्या ८-१० गुहा नजरेस पडतात. यातील काही गुहा अर्धवट कोरलेल्या असुन काही गुहामध्ये पाण्याची टाकी आहेत. यातील शेवटच्या दोन गुहा ४०-५० माणसे राहु शकतील इतक्या प्रशस्त असुन त्यात वेगवेगळी दालने आहेत. यातील एका दालनात देवीचे लहानसे मंदिर उभारलेले आहे. गुहेबाहेर पाण्याने भरलेले खांबटाके असुन यातील पाणी थंडगार व पिण्यायोग्य आहे. या गुहेतील मुक्काम आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा एक वेगळाच आनंद देऊन जातो. टाक्याशेजारील कोरड्या टाक्यात भग्न नंदी व शिवलिंग ठेवलेले आहे. या टाक्याशेजारी दूरवर पसरलेली नैसर्गिक गुहा असुन या गुहेचे दुसरे तोंड सुळक्याच्या मागील बाजुस आहे. बालेकिल्ल्यावरील सुळक्याला पुर्णपणे फेरी मारता येते पण सुळक्यावर जाण्यासाठी मात्र प्रस्तरारोहण साहित्य व अनुभव असणे गरजेचे आहे. गुहेकडून सुळक्याला फेरी मारताना दोन अर्धवट कोरलेल्या गुहा व एक कोरडे टाके पहायला मिळते. गुहेसमोरून जाणारी वाट आपल्याला डोंगरसोंडेच्या नैसर्गिक खाचेपर्यंत घेऊन जाते. ६०-७० फुट खोल असलेल्या या खाचेमुळे पुढील डोंगरसोंड किल्ल्यापासुन वेगळी झाली असुन या खाचेच्या टोकावर गोलाकार बुरुज असल्याच्या खुणा दिसुन येतात. येथे आपली बालेकिल्ल्याची फेरी पूर्ण होते. बालेकिल्ल्यावरून सातमाळ डोंगररांगेतील रवळ्या- जावळ्या, मार्कंड्या, सप्तशृंगी,कांचना-मांचना, प्रेमगिरी, साल्हेर-सालोटा,चौल्हेर, कण्हेरगड,चांदवड, इंद्राई, राजदेहेर,कोळधेर, अहीवंतगड, अचला या सारखे लहानमोठे १६ किल्ले तसेच हंड्या, इखारा हे सुळके पहायला मिळतात. पायथ्यापासून बालेकिल्ल्यावर यायला व तो संपुर्ण फिरण्यासाठी साधारण पाच तास लागतात. बालेकिल्ल्यातून अर्ध्या तासात आपण खाली माचीवर पोहोचतो. बालेकिल्ल्यावर वळलो तेथे डावीकडे एक दुमजली विहीर असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य नसले तरी विहिरीची रचना आवर्जुन पहाण्यासारखी आहे. काटकोनी आकारात घडीव दगड व विटांनी बांधलेल्या या विहिरीत दोन मजल्यावर विटांच्या उंच कमानी असुन तळापर्यंत जाण्यासाठी घडीव दगडात पायऱ्या बांधलेल्या आहेत. या विहिरीला लागून एक वाट डावीकडे दरीच्या दिशेने जाते. या वाटेने खाली एका आश्रमाजवळ आले असता आपण गणेश टाक्याजवळ पोहोचतो. डोंगर उतारावर हे टाके एका कपारीत खोदलेले असुन टाक्यात पाणी जमा होण्यासाठी वरील बाजुस जिवंत झरा आहे. टाक्याच्या भिंतीत देवळी कोरून त्यात गणेशाची स्थापना केली असल्याने हे टाके गणेश टाके म्हणुन ओळखले जाते. येथे वरील बाजुस वनखात्याने काही निवारे उभारले आहेत. येथुन बांधीव पायवाटेने माचीची भटकंती सुरु केल्यावर माचीच्या डावीकडील उतारावर (दरीच्या दिशेला) सुस्थितीत असलेली तटबंदी पहायला मिळते. थोडेसे खाली उतरल्यास हि तटबंदी जवळून पहाता येते. पायवाटेने पुढे जाताना वाटेच्या आसपास काही घरांचे चौथरे तसेच भिंती पहायला मिळतात. वाटेने सरळ पुढे आल्यास उजवीकडे गणपतीचे मंदिर असुन या मंदिराशेजारी एक बांधीव व एका कोरीव अशी दोन पाण्याची टाकी आहेत. वरील बाजुस असलेल्या बांधीव टाक्यातील पाणी पिण्यासाठी व तेथे सांडून खाली कोरीव टाक्यात जमा झालेले पाणी जनावरांसाठी व इतर कामासाठी वापरले जात असावे. या मंदिराच्या डाव्या बाजुस दरीकाठावर भग्न शिवमंदिर असुन त्यासमोर विटांनी बांधलेल्या नंदीमंडप व त्यातील नंदी आजही आपले स्थान टिकवून आहेत. या मंदिराजवळ कातळात कोरलेले पाण्याचे एक टाके आहे.पायवाटेने सरळ पुढे आल्यावर दुसरे शिवमंदीर असुन या दोन्ही शिवमंदीराची रचना एकसमान आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असुन मंदीरात शिवलिंग तर बाहेर नंदीमंडपात नंदी स्थापन केलेला आहे. मंदीराबाहेर पत्र्याचा निवारा उभारलेला असुन पावसाळा वगळता २०-२२ लोक येथे सहज मुक्काम करू शकतात. मंदिराच्या मागील बाजुस एक लहान पायविहीर असुन यातील पाणी पिण्यायोग्य आहे. मंदिरापुढे असलेल्या झाडाखाली दोन चरणपादुका तसेच काही घडीव अवशेष पहायला मिळतात.वाटेने सरळ पुढे जाताना डाव्या बाजुस पठारावर असलेला पावसाळी तलाव पहाता पुर्वी येथे शेती केली जात असावी. या वाटेवर डाव्या बाजुस कातळात कोरलेले पिण्यायोग्य पाण्याचे अजुन एक टाके पहायला मिळते. दुसऱ्या शिवमंदीरापासुन मळलेल्या वाटेने साधारण २० मिनिटे चालत गेल्यावर आपण माचीच्या दक्षिण दिशेला असलेल्या दरवाजाजवळ पोहोचतो. पुर्वाभिमुख असलेला हा दरवाजा बालेकिल्ल्याच्या डोंगरापासून खाली दरीपर्यंत बांधत नेलेल्या तटबंदीत बांधलेला असुन दरीच्या काठावर बुरुज बांधलेला आहे. दरवाजाशेजारी संरक्षणासाठी असलेल्या चौकोनी बुरुजांची पडझड झालेली असुन एका बुरुजातील पहारेकऱ्याची देवडी आजही तग धरून आहे. या दरवाजातून जाणारी वाट रावळ्या-जावळ्या किल्ल्याखालील पठारावर जाते. येथे आपली सोनारमाची प्रदक्षिणा पुर्ण होते. बालेकिल्ल्यावरून उतरल्यावर गडाची हि संपुर्ण माची फिरण्यासाठी साधारण एक ते दीड तास लागतो. माचीवरील हा दरवाजा पाहुन झाल्यावर सोनार वाडीजवळ आपण या माचीवर प्रवेश केलेल्या पहिल्या दरवाजाजवळ जावे. या दरवाजात आल्यावर एक बांधीव पायवाट सरळ तर दुसरी बांधीव पायवाट उजवीकडे आपण किल्ल्यावर प्रवेश केला त्या दिशेला जाते. आपण सरळ जाणाऱ्या पायवाटेने आपली पुढील गडफेरी सुरु करायची. या वाटेने साधारण १५ मिनिटे चालल्यावर उजवीकडे आपण आधी पाहीलेल्या दुमजली विहीरीप्रमाणे अजुन एक विहीर पहायला मिळते. या विहिरीस विटांची एकच कमान असुन हिची रचना आयताकृती आकाराची आहे. या विहीरीत उतरण्यासाठी तळापर्यंत घडीव दगडात पायऱ्या बांधलेल्या आहेत. येथुन थोडे पुढे आल्यावर उजवीकडील तटबंदीत संकटकाळी किल्ल्याबाहेर जाण्यासाठी चोरवाट आहे. चोरवाट पाहुन बांधीव वाटेने थोडे पुढे आल्यावर झऱ्याचे पाणी साठविण्यासाठी बांधलेली दोन लहान टाकी असुन यातील पाणी पिण्यायोग्य आहे. येथुन साधारण १५ मिनिटे चालत गेल्यावर आपण कळवण दरवाजात पोहोचतो. माचीच्या आतील दरवाजापासून या दरवाजापर्यंत येण्यासाठी ४० मिनिटे लागतात. या दरवाजाने खाली जाणारी वाट ओतूर मार्गे कळवण गावात जाते. उत्तराभिमुख असलेला हा दरवाजा वरील डोंगर सोंडेपासून खाली दरीपर्यंत बांधत नेलेल्या तटबंदीत बांधलेला आहे. दरवाजा आजही सुस्थितीत असुन दरवाजाच्या आत तटबंदीला लागुन मोठ्या प्रमाणात असलेले वास्तु अवशेष पहाता येथे बऱ्यापैकी वस्ती असल्याचे जाणवते. हा दरवाजा पाहुन झाल्यावर पुन्हा सोनारवाडी कडील दरवाजापर्यंत यावे. या दरवाजाकडून उजवीकडे वळल्यावर आपल्याला किल्ल्यावर प्रवेश केला असता सर्वप्रथम पाहीलेल्या मारुतीरायांचे दुसऱ्यांदा दर्शन होते. या घुमटीच्या मागील बाजुस काही वास्तुंचे अवशेष विखुरलेले आहेत. वाटेच्या पुढील भागात काही घडीव दगडात बांधलेल्या समाधीं तसेच कबरी आहेत. काळाच्या ओघात यांची देखील पडझड झालेली आहे. पुढे एक प्रशस्त तलाव असुन माचीवरील वास्तु बांधण्यासाठी काढलेल्या दगडांमुळे याची निर्मीती झाली असावी. पुढे दरीच्या उजव्या काठाने फेरी मारताना या भागातील तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक असल्याचे दिसुन येते. या तटबंदीमध्ये माचीवर प्रवेश करण्यासाठी गडाचा महादरवाजा असुन हा दरवाजा आपल्याला मराठवाड्यातील भुईकोट किल्ल्याच्या दरवाजाची आठवण करून देतो. दरवाजा चांगलाच प्रशस्त असुन दरवाजाच्या आतील भागात उंच चौथऱ्यावर दोन्ही बाजुस ओवऱ्या बांधलेल्या आहेत. दरवाजाच्या इमारतीचे छत सहा घुमटावर तोललेले आहे. दरवाजात थेट प्रवेश करता येऊ नये यासाठी समोरील बाजुस तटबंदी बांधुन आत येण्याचा मार्ग वळणदार व चिंचोळा केलेला आहे. दरवाजाच्या दर्शनी भागात महीरप असुन वरील बाजुस नक्षी व दोन कमलपुष्पे कोरलेली आहे. या दरवाजाबाहेर कधीकाळी दुसरा दरवाजा असल्याच्या खुणा दिसुन येतात.या दरवाजातुन बाहेर पडणारी वाट विखारा सुळक्याच्या पायथ्याशी व तेथुन कांचनबारीच्या दिशेने जाते. दरवाजाच्या पुढील भागातील तटबंदीत घडीव दगडात बांधलेला एक प्रशस्त असा सुस्थितील बुरुज पहायला मिळतो. बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन फांजीमध्ये तोफेचा मारा करण्यासाठी झरोके व बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या आहेत. बुरुजाच्या पुढील भागात कळवण दरवाजाच्या दिशेने बांधत नेलेली तटबंदी आजही बऱ्यापैकी शिल्लक आहे. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. किल्ल्याचा परीसर साधारण ४२५ एकरवर पसरलेला असुन संपुर्ण किल्ला पहाण्यास साधारण आठ तास लागतात. किल्ल्यावरील बारमाही पाण्याचे टाक, रहाण्यासाठी प्रचंड मोठी गुहा व भरपूर अवशेष यामुळे धोडप किल्ला एक दिवस मुक्काम करून पहाण्यासारखा आहे. धोडप हा महाराष्ट्रातील चौथ्या क्रमांकाचा उंच किल्ला असुन त्याचा माथा समुद्रसपाटीपासुन ४६५० फुट उंचावर आहे. किल्ल्यावरील प्राचीन गुहा व पाण्याची खांबटाकी पहाता हा किल्ला प्राचीन काळात अस्तित्वात असला तरी याचा सर्वप्रथम उल्लेख १६ व्या शतकात निजामशाहीत धरब नावाने येतो. मुघल सरदार अलावर्दीखान याने बुऱ्हाण निजामशहाचा किल्लेदार भोजबल याला १ लाख रुपयाच्या मनसबीची लालच दाखवुन १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला. बालेकिल्ल्याच्या दरवाज्याच्या डाव्या बाजूस असलेल्या पर्शियन शिलालेखात हिजरी १०४६ मोहरम महिन्याच्या २५ व्या दिवसाचा उल्लेख असुन त्यात शहाजहान बादशहाचा नम्र सेवक अलावर्दी खान तुर्कमान याने चौदा किल्ले चार महिन्यात जिंकल्याचा उल्लेख आहे. या चौदा किल्ल्यात धोडप ,चांदोर, इंद्राई, राजदेहर, कोळदेहर, कांचना, मांचना , कण्हेरा, जवळ्या, रवळ्या, मार्कंड्या, अहिवंत, अचलगड, रामसेज यांचा उल्लेख आहे. इ.स. १६७०-७१मध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने धोडप किल्ल्याला वेढा घातला पण किल्लेदार मुहम्मदझमान याने दाद न दिल्याने किल्ला ताब्यात आला नाही. याचवेळी मुघलांचे इतर सैन्य धोडपच्या जवळपास आल्याने मराठ्यांना वेढा उठवावा लागला. मराठे व हैद्राबाद निजाम यांच्यातील भालकीच्या तहानुसार धोडप किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. इ.स.१७६८ मध्ये माधवराव पेशव्यांविरुध्द भोसले, गायकवाड व इंग्रज याच्या पाठींब्यावर केलेल्या बंडात रघुनाथराव पेशवे यांनी धोडप किल्ल्याचा आश्रय घेतला. यावेळी माधवराव पेशव्यांनी केलेल्या हल्ल्यात रघुनाथरावांचा पराभव झाला व त्यांचा खजीना व सर्व साहित्य पेशव्यांनी ताब्यात घेतले. राघोबादादा माधवरावांच्या स्वाधीन झाले व त्यांना शनिवारवाडयात नजरकैदेत ठेवण्यात आले. दुसरे बाजीराव पेशवे यांच्या काळात दोन सुभेदार आप्पाजी हरी आणि बाजीराव आप्पाजी यांची १६०० सैन्यासह या किल्यावर नेमणुक होती. यावेळी होळकरांचे दोन सरदार अजबसिंग व सुजकुम यांनी किल्ल्यावर हल्ला करुन किल्ला ताब्यात घेतला व गावात लुट केली. इ.स.१८१८ मध्ये दुसरा बाजीराव पेशवा ब्रिटीशाना शरण गेल्याने इंग्रज अधिकारी कॅप्टन ब्रिग्ज याने लढाई न करता हा किल्ला मराठ्याकडून ताब्यात घेतला. यावेळी किल्ल्यावर ३७ सैनिक, काही तोफा व १५९० तोफगोळे होते. कॅप्टन ब्रिग्जने या किल्ल्याचे वर्णन चांदोर रांगेतील सर्वात उंच व भक्कम किल्ला असे केले आहे.
© Suresh Nimbalkar