धारूर
प्रकार : भुईकोट
जिल्हा : बीड
उंची : 0
श्रेणी : सोपी
मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला सोलापुर, औसा, परांडा, उदगीर, कंधार यासारखे एकापेक्षा एक बलदंड व भक्कम भुईकोट पहायला मिळतात. हे सर्व किल्ले आजही सुस्थितीत असुन या किल्ल्यांची रचना महाराष्ट्रात इतरत्र आढळणाऱ्या भुईकोट किल्यांपेक्षा खुपच वेगळी आहे. मराठवाडयातील हा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने त्या अनुषंगानेच येथे किल्ल्याची रचना केली गेली. येथे सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांचे नैसर्गिक सुरक्षा कवच नसल्याने किल्ला लढवय्या बनविण्यासाठी त्याला जाडजुड दुहेरी अथवा तिहेरी तटबंदी बांधुन संपुर्ण किल्ल्याभोवती खंदक खोदण्यात आले. इतकेच नव्हे तर किल्ल्याला एकामागे एक अशी दरवाजाची साखळी रचुन आत जाण्याचा मार्ग दुष्कर केला गेला. हे सर्व पहायचे असेल तर बीड जिल्ह्यातील धारूर किल्ल्याला भेट द्यायलाच हवी. धारूर किल्ला तालुक्याच्या गावात असुन रेल्वेने आल्यास लातुर शहरापासुन ८० कि.मी. अंतरावर तर बसने आल्यास बीड शहरापासून ५७ कि.मी.अंतरावर आहे. मुंबई. पुण्याहून लातूर एक्सप्रेसने लातूरला जावे. लातूरहून खाजगी वहानाने किंवा बसने लातूर - केज -धारुर किंवा लातूर -आंबेजोगाई -धारूर या मार्गे धारूर गाठावे. या भागातील सार्वजनिक वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा.
...
धारूर किल्ला गावाबाहेर धारूर ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजुस वसलेला असुन चालत अथवा खाजगी वहानाने थेट किल्ल्याच्या दरवाजा पर्यंत जाता येते. धारूर शहर देखील कधीकाळी तटबंदीच्या आत वसल्याच्या खुणा गावातुन जाताना पहायला मिळतात. किल्ल्याकडे जाताना या नगरदुर्गाचा एका दरवाजा व एक जुनी मशीद पहात आपण गावाबाहेर असलेल्या किल्ल्यासमोर पोहोचतो. धारूर किल्ला गावाच्या दिशेने जमिनीच्या पातळीत असला तरी दरीत सरळ घुसलेल्या निमुळत्या टेकडावर बांधला आहे. धारूर किल्ला भूईकोट म्हणुन गणला जात असला तरी दरवाजाकडील भाग वगळता इतर बाजुंनी त्याला दरीचे नैसर्गिक संरक्षण आहे. गावाच्या बाजूने किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी या दिशेला किल्ल्याची बांधणी खंदक व त्यासमोर दुहेरी तटबंदी अशी केलेली आहे. किल्ल्याचा दरवाजासमोरील भाग जमिनीपासून वेगळा करण्यासाठी २० फुट रुंद व २५ फुट खोल खंदक थेट दरीपर्यंत खोदण्यात आलेला आहे. हा खंदक दोन्ही बाजुंनी दगडांनी बांधून काढलेला असुन दोन्ही खंदकाच्या दरीकडील टोकावर आडवी भिंत घालुन या खंदकात पाणी अडवण्यात आले आहे. या खंदकात आजही पाणी साठलेले असते. किल्ल्याच्या उजवीकडे असलेला खंदक चांगलाच रुंद असुन त्याला एक प्रकारचा तलावच म्हणता येईल. या तलावाचे पाणी आजही वापरात असुन किल्ल्याबाहेर असलेला हा तलाव सोलापूर दिंडी किंवा खारी दिंडी म्हणुन ओळखला जातो. पुर्वी या खंदकावर काढता-घालता येणारा लाकडी पुल असे आता मात्र यावर दरवाजापर्यंत दगडमातीची कायम स्वरूपी भर टाकण्यात आली आहे. खंदकात प्रवेश करताना उजव्या बाजुस पाण्याचे बांधीव टाके पहायला मिळते. येथुन दिसणारा किल्ल्याचा आकार व त्याचे बलदंड बुरुज व त्यावरील चर्या तसेच मारा करण्याच्या जागा आपली छाती दडपुन टाकतात. किल्ल्यात जाण्यापुर्वी डावीकडे खंदकात उतरून अष्टकोनी आकाराच्या तिसऱ्या बुरुजाकडे जावे. या बुरुजावर एक हत्तीचे शिल्प असुन त्या शेजारी दोन शरभशिल्प आहेत. डावीकडील शरभाच्या पुढील पायात २ हत्ती कोरलेला असुन मागील बाजुस एक हत्ती व त्यावर दोन योद्धे लढताना कोरलेले आहेत. या शिल्पांच्या वरच्या बाजुस अरेबिक,पर्शियन व देवनागरी असा तीन लिपीत कोरलेला शिलालेख आहे. बुरुजावरील हत्तीच्या शिल्पामुळे हा बुरुज हाथी बुरुज म्हणुन ओळखला जातो. त खंदकात पुढे जाऊन त्याच्या टोकाशी असलेली बंधाऱ्याची भिंत तसेच खंदकात चढउतार करण्यासाठी असलेले जिने पहाता येतात.खंदक पाहुन मागे फिरल्यावर किल्ल्यात परवेश करताना दोन बुरुज लागतात. मुख्य दरवाजासमोर समोर एक आडवी भिंत उभारली असुन त्याला समांतर अशी तटबंदीला दुसरी भिंत उभारली आहे. मुख्य दरवाजाला अधिक संरक्षण मिळावे यासाठी या दोन भिंती उभारलेल्या असुन या भिंतींच्या टोकाशी हे दोन बुरुज बांधण्यात आले आहेत. यातील डावीकडील बुरुजावर पर्शियन शिलालेख असुन हा बुरुज फतेह बुरुज म्हणुन ओळखला जातो. मुख्य दरवाजाकडे जाणारा हा मार्ग वक्राकार असुन हत्तीच्या धडकेने दरवाजा तोडता येऊ नये यासाठी दोन तटामधले अंतर जाणीवपूर्वक कमी ठेवलेले आहे. मुख्य दरवाजाच्या अलीकडे किल्ल्याच्या तटात दगडांनी बंद केलेला लहानसा दिंडी दरवाजा आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा पुर्वाभिमुख असुन आतील दोन्ही बाजुस पहारेकर्याच्या देवड्या आहेत. यातील एका देवडीत लहान तोफ फिरवण्याचे उखळ पहायला मिळते. पुरातत्व खात्याने या दरवाजाला नव्याने लाकडी दार बसवलेले आहे. दरवाजाने आत शिरल्यावर आपला परकोटात प्रवेश होतो व समोरच किल्ल्याच्या आतील तटबंदीत असलेला महाजी बुरुज नजरेस पडतो. या दरवाजाच्या उजव्या व डाव्या बाजुस जाणाऱ्या वाटा असुन उजवीकडील वाट आपल्याला टांकसाळ बुरुज व सोलापुरी बुरुज याच्या मधील भागात नेते तर डावीकडील वाट आपल्याला किल्ल्याचा आतील दरवाजा व किल्ल्याच्या दुहेरी तटबंदीच्या चिलखतामध्ये नेते. आपण प्रथम उजवीकडील भाग पाहुन घ्यावा. टांकसाळ बुरुज व सोलापुरी बुरुज यांच्यामधील भागात काही कमानी असुन कधी काळी गडाची टांकसाळ या ठिकाणी होती. या ठिकाणी एक भुयारी मार्ग असुन त्या मार्गाने किल्ल्याच्या आतील भागात जाता येते. टांकसाळीला पाणी पुरवठा करण्यासाठी असलेली खापरी जलवाहिनी येथे तशीच वरील बुरुजावर पहायला मिळते. येथे बाहेरील तटावर जाण्यासाठी पायरीमार्ग आहे. या पायऱ्यांनी वर चढुन आपली बाहेरील तटाची फेरी पुर्ण करून घ्यावी. परकोटाचा उजवीकडील भाग पाहुन झाल्यावर डावीकडे वळावे. डावीकडे पहिल्या दरवाजाच्या काटकोनात दुसरा दरवाजा असुन त्याच्या अलीकडील वाट आपल्याला परकोटाच्या डाव्या भागात नेते. या परकोटाच्या टोकाशी असलेल्या दुहेरी तटबंदीत अर्धगोलाकार आकाराचा प्रचंड मोठा तलाव असुन हा तलाव गोडी दिंडी म्हणुन ओळखला जातो. हा तलाव कातळात कोरलेला असुन त्याच्या काठावरच बाहेरील तटबंदी उभारली आहे. तलावाची तिसरी बाजु म्हणजे दरीकडील तटबंदी. हि तटबंदी साधारण २० फुट रुंद व ७०-८० फुट उंच आहे. तलावाच्या बाहेरील तटबंदीच्या दिशेला किल्ल्याचा खंदक आहे. या तलावाची प्रस्तर खोदून केलेली रचना बघता या तलावाचा उपयोग संकटकाळी किल्ल्याचे संरक्षण व इतर वेळी वर्षभर पाणीपुरवठा करणारा तलाव असा दुहेरी होत असे. तलाव पाहुन मागे फिरून आपण मुख्य किल्ल्यात प्रवेश करणाऱ्या दरवाजासमोर येतो. दरवाजाच्या डावीकडील बुरुज खंडेराया बुरुज म्हणुन ओळखला जातो. उजवीकडील बुरुजात लहान दरवाजा असुन मुख्य दरवाजा बंद केल्यास या दरवाजाने आत जाता येत असे. या दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस देवड्या असुन आत शिरल्यावर दोन्ही बाजुस कमानीयुक्त दालने आहेत. संपुर्ण किल्ल्याला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेत पाण्याची समपातळी राखण्यासाठी बांधलेला उच्छवास येथे पहायला मिळतो. येथे असलेल्या पायऱ्यांनी तटावर जाऊन सर्वप्रथम आपली आतील तटावरील गडफेरी पुर्ण करावी. पायऱ्यांनी वर आल्यावर आपण खंडेराया बुरुजावर येतो. या बुरुजावर जाण्यसाठी पायऱ्या असुन बुरूजाची आतील बाजूने पडझड झाल्याने त्याच्या माथ्यावर जाता येत नाही. याच्या पुढील बुरुज म्हणजे शाही बुरुज. या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या असुन तोफा ठेवण्याची सोय आहे. या बुरुजात एक खोली असुन त्या खोलीच्या एका खिडकीतुन किल्ल्याचा संपुर्ण परीसर तर दुसऱ्या खिडकीतुन गोडी दिंडी व किल्ल्याबाहेरील परिसरावर लक्ष ठेवता येते. या बुरुजावरून संपुर्ण किल्ल्यावर टेहळणी करता येते. निमुळत्या आकाराचा हा किल्ला खंदकाच्या आत दक्षिणोत्तर २० एकरवर पसरलेला आहे. शाही बुरुजावरून उतरून पुढे निघाल्यावर आपण गोडी दिंडी तलावाच्या आतील बाजुस असलेल्या तटावर येतो. या तलावाच्या टोकाशी तटावर एक बुरुज असुन येथुन हा तट बाहेरील तटबंदीशी जोडला गेला आहे. या बुरुजावरून बाहेरील तटावर जायला अटकाव करण्यासाठी कमानीवजा दरवाजा आहे. हा बुरुज कोट तलाव बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजावरुन किल्ल्याखालील दरीवर लक्ष ठेवता येते. शाही बुरुज ते कोट तलाव बुरुज दरम्यान असलेल्या तटाखाली सैनिकांच्या रहाण्यासाठी कमानिवजा दालने आहेत. येथुन पुढील तटबंदी काही प्रमाणात तुटलेली असुन पुरातत्व खात्याकडून तिची पुनर्बांधणी सुरु आहे. येथुन पुढील किल्ल्याचा भाग निमुळता होत गेलेला असुन तटावरील बुरुज पार करत आपण कमान असलेल्या बुरुजावर पोहोचतो. लाल बुरुज म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या या बुरुजावर एक कोठार असुन खाली तटामध्ये दालने आहेत. या बुरुजाजवळ रंगमहालाचे अवशेष असुन त्याच्या जवळच शाही हमामखाना आहे. येथे हौद-कारंजे यांचे अवशेष पहायला मिळतात. लाल बुरुजावरून पुढे निघाल्यावर आपण किल्ल्याच्या दक्षिण टोकाशी असलेल्या बुरुजावर पोहोचतो. या बुरुजात किल्ल्याचा दुसरा उत्तराभिमुख दरवाजा असुन पहारेकऱ्याना रहाण्यासाठी देवड्या आहेत. येथुन आपली पुन्हा किल्ल्याच्या दरवाजाच्या दिशेने फेरी सुरु होते. येथुन थोडे पुढे आल्यावर तटबंदी शेजारी एक मध्यम आकाराचा कोरडा पडलेला तलाव आहे. या तलावात प्रवेश करण्यासाठी दोन कमानी बांधलेल्या आहेत. त्याचे नेमके प्रयोजन लक्षात येत नाही. या तलावात व त्याच्या आसपास मोठ्या प्रमाणात काटेरी झुडुपे वाढलेली आहेत. या तलावाच्या पुढील बुरुज चादरवाणी बुरुज म्हणुन ओळखला जातो. या बुरुजाजवळ आपल्याला तीन स्तरांवर बांधलेला अजुन एक तलाव पहायला मिळतो. हा बहुदा तरणतलाव असावा. या तलावात उतरण्यासाठी पायऱ्या असुन पाणी सोडण्यासाठी एका बाजूला चुन्यात कोरलेली नक्षीदार पन्हाळी आहे. किल्ल्या बाहेरील खारी दिंडी तलावातुन खापरी जलवाहिनीतुन आणलेले पाणी या तरण तलावात सोडले जात असे. हि योजना आजही येथे पहायला मिळते. तटबंदीच्या पुढील बुरुजावर हवा महालचे अवशेष असुन आज त्याचा केवळ एक दरवाजा या बुरुजावर उभा आहे. हे राज परीवारातील स्त्रियांचे थंड हवा खाण्याचे ठिकाण होते. या बुरुजाच्या खालील बाजुस खारी दिंडी तलावाची भिंत आहे. बुरुजावरून पाहताना दरीकडे उतरणाऱ्या घळीवर बांध घालून या तलावाचे पाणी अडवल्याचे दिसते. या तटबंदीबाहेर तलावात एक तटबंदीपेक्षा कमी उंचीचा बुरुज असुन त्यात जाण्यासाठी तटाच्या पुढील भागात लहान दरवाजा आहे. या तटाखाली काही कमानिवजा देवड्या आहेत. तटाखाली उतरून त्यातील दरवाजाने आपण किल्ल्याबाहेर तलावावर येतो. तलावात असलेल्या बुरुजात पाण्याच्या पातळीत एक लहान दरवाजा असुन या ठिकाणी राजपरीवारातील लोकांसाठी नौकाविहाराची सोय असावी. शिवाय संकटकाळी येथुन बाहेर देखील पडता येत असावे. येथुन पुन्हा तटावर चढुन पुढे आल्यावर तटाला लागुनच एक मोठा बांधीव हौद आहे. या हौदात उतरण्यासाठी तीन बाजुना पायऱ्या आहेत. तटावरून सरळ पुढे आल्यावर आपण टांकसाळ बुरुजाजवळ पोहोचतो. तटावरून उजवीकडे वळल्यावर आपण महाजी बुरुजावर येतो. या बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन येथील कट्टा पहाता कधीकाळी येथे मोठी तोफ असावी. इतका बुलुंद किल्ला पण यावर एकही तोफ आढळुन येत नाही. या किल्ल्यावरील तोफा कुठे गेल्या हे एक प्रश्नचिन्हच आहे. येथुन पुढे खंडेराया बुरुज असुन आपली तटावरील फेरी येथे पुर्ण होते. येथुन खाली उतरून आता किल्ल्याच्या अंतर्गत फेरीस सुरवात करावी. दरवाजाकडून सरळ वाटेने किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे निघाल्यावर सर्वप्रथम डावीकडे एका चौथऱ्यावर तीन कमानी असलेली इमारत दिसते. हि किल्ल्याच्या अंतर्गत कामकाजाची सदर आहे. सदरेहून थोडे पुढे आल्यावर उजवीकडे एका दुमजली वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. वाटेच्या पुढील भागात उजवीकडे पाण्यासाठी बांधलेला (मनोरा) उच्छवास असुन त्याशेजारी प्राकाराच्या आत बांधलेली मशीद आहे. या प्राकाराच्या दरवाजाच्या कमानीवर ३ ओळीचा पर्शियन शिलालेख कोरलेला आहे. प्राकाराच्या आत मशीद,काही कबरी व एक लहान हौद आहे. मशीद पाहुन पुढे गेल्यावर एका उंच चौथऱ्यावर बांधलेले सैयद सादत नावाच्या पीराचे थडगे आहे. या थडग्याच्या शेजारील भागात खापरी जलवाहिनीचे अवशेष पहायला मिळतात. थडग्याच्या मागील भागात घडीव दगडात बांधलेली तटबंदीतील दरवाजाची कमान पहायला मिळते. या भागात किल्ल्यातील खासा लोकांची वस्ती असल्याने या संपुर्ण वस्तीला तटबंदी होती व हा त्या तटबंदीमधील दरवाजा आहे. दरवाजाच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणात वास्तु अवशेष दिसुन येतात. यात एक सुस्थितीतील धान्याचे कोठार (अंबरखाना) असुन उर्वरीत अवशेष वाड्यांचे व घरांचे आहेत. वस्तीच्या टोकाला दोन भुमिगत कोठारे असुन स्थानिक लोक त्यांना तेल- तुपाचे टाके म्हणुन ओळखतात. येथुन मुख्य दवाजाकडे आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण किल्ला व्यवस्थित पहाण्यासाठी ३ तास पुरेसे होतात. डोंगराच्या काठावर आणि अखंड वाहणार्यास पाण्याच्या धारेवरील स्थान म्हणजे धारौर, धारूर अशी किल्ले धारूर शहराची ओळख आहे. सातवाहन,राष्ट्रकूट, यादव, चालुक्य, बहामणी, निजामशाही, मोगल यासारख्या अनेक राजसत्ता या या शहरावर नांदलेल्या आहेत. राजा धारसिंहामुळे या गावचे नाव धारूर पडल्याचे स्थानिक सांगतात पण त्याला मौखिक वगळता कोणताही संदर्भ नाही. सातवाहन काळातच धारूर गावाची बाजारपेठ भरभराटीस आली होती. पुढे राष्ट्रकुटांनी या बाजारपेठेच्या रक्षणासाठी धारूर येथे "महादुर्ग" नावाचा किल्ला बांधला. राष्ट्रकुट राजा गोविंद (इ.स.७९३-८१४) याच्या एका दानपत्रात धारऊर अशी नोंद आहे. त्यानंतर , चालुक्य (कल्याणी), देवगिरीचे यादव यांची सत्ता या भागावर होती. यादव काळात धारूर नगराचा उल्लेख असणारा एक शिलालेख अंबाजोगाई येथे आहे. सकलेश्वर देवस्थानच्या निर्मितीसाठी दिलेल्या दानपत्रात धारुरची नोंद सिंघन यादवाचा सेनापती खोलेश्वर (शके ११३२ ते ११६९) याने केली आहे. या दान लेखात प्रासादह्न सकलेश्वरस्य रचितो धारो देश अशी नोंद आहे. यादवांचा शेवट झाल्यावर बहमनी काळात धारूर हे बाजारपेठ म्हणुन व्यापारी केंद्र म्हणून भरभराटीस आले. इ.स.१५२६ मध्ये बहमनी राज्याच्या अस्तानंतर ५ शाह्या उदयास आल्या. त्यातील औसा येथील सुभेदार कासीम बरीद याने बरीदशाहीची स्थापना केली. बरीदशाहीत धारूर, उदगीर, औसा, कंधार हे प्रमुख किल्ले होते. बरीदशाही संपवल्यावर या भागाच्या ताब्यावरून आदिलशाही व निजामशाही यांच्यात अनेक लढाया झाल्या. त्यावेळी धारूरचे महत्व ओळखून इ.स. १५६७-६८ (हिजरी ९७५) दरम्यान अदिलशाही सरदार किश्वरखान लारी याने मूळ राष्ट्रकूट कालीन महादुर्गाच्या जागी त्याचेच दगड वापरून नव्याने अत्यंत मजबूत असा दूर्ग बांधला. किल्ल्याच्या जमिनीकडील बाजुस पाण्याने भरलेला दुहेरी तटबंदी व पाण्याने भरलेला खंदक तर उरलेल्या बाजुस खोल दरी असल्याने शत्रुला हा किल्ला हस्तगत करणे सोपे नव्हते. धारूर किल्ल्याचे वर्णन बुसा तीज-उस-सलातीन या ग्रंथात फकीर अहमद झुबेरी यांनी तसेच अब्दुल हमीद लाहरी याने आपल्या बादशहानाम्यात केले आहे. किश्वरखानने किल्ल्याची उभारणी केल्यानंतर धारूर गावाला दगडी तटबंदी बांधली. आज गावात उभे असलेले मुख्य प्रवेशद्वार आणि मशीद तत्कालिन बांधकामाची साक्ष आहे. किल्ल्यामुळे धारूर शहराचे वैभव वाढले. धारूर किल्ल्यामूळे निजामशाहीच्या हालचालींना शह बसला होता. त्यामूळे मूर्तूजा निजामशहाने इ.स. १५६९ (हिजरी ९७७) मध्ये पूर्ण निकराने धारूरवर हल्ला चढवला. किल्ला सहजपणे जिंकणे अशक्य असले तरी किल्ला बांधला तो किश्वरखानच फितुरीमुळे या किल्ल्यात मारला गेला. किल्ला बांधत असताना अंकुशखान याने किश्वर खानला अंधारात ठेऊन किल्ल्याचा काही भाग जाणीवपूर्वक पोकळ ठेवला व याच मार्गाने निजामशाही सैन्याने किल्ल्यात प्रवेश करून किश्वर खानचा वध केला. मुर्तजा निजामशहाला धारूर किल्ल्यात अलोट संपत्ती मिळाली. या किल्ल्यात काही काळ निजामशहाचे वास्तव्य होते. या विजयाचे प्रतीक म्हणून त्याने धारूर गावाचे नाव बदलून फतेहबाद ठेवले. हे नाव बदलण्यासाठी स्वातंत्र्यानंतर धारूरच्या जनतेनी खूप प्रयत्न केला व अखेर ५ मे १९७२ रोजी पुन्हा फतेहाबादचे धारूर असे नामकरण झाले. इ.स.१६३०-३१ मध्ये शहाजहानच्या काळात मुघल सरदार आझमखान याने धारूर किल्ला ताब्यात घेतला. तेव्हां आदिलशहानें आपला सेनापति रणदुल्लाखान यास पाठवून मोंगल व विजापूरकर यांच्यातील तहानुसार तो किल्ला आपल्या स्वाधीन करण्यांत यावा अशी आजमखानास विनंती केली. यावर विजापूरकरांनी अहमदनगराचें राज्य घेण्यास मोंगल बादशहास मदत केली नाही या सबबीवर किल्ल्याचा ताबा देण्यास नकार दिला. याच वेळीं निजामशहानें आदिलशहास सोलापूरचा किल्ला परत करुन मोंगलापासून संरक्षण करण्याची विनंती केली पण रणदुल्लाखान व मोंगल सैन्य यांच्यातील लढाईत विजापूरकरांचा पराभव झाला (१६३१). या विजयाचे प्रतिक म्हणून आझमखानाने या किल्ल्याच्या टांकसाळीतुन एक नाणे काढले. शहाजहान नंतर जहांदारशहापर्यंत (हिजरी १०२८ ते ११३१) या किल्ल्याच्या टाकसाळीतून नाणी पाडली जात होती. पन्हाळ्याच्या युध्दानंतर शिवाजी महाराज व नेताजी पालकर यांच्यात मतभेद झाल्याने नेताजी पालकर आदिलशहीस जाऊन मिळाला पण मोगलांनी त्यास पाच हजाराची मनसब, पन्नास हजार रुपये रोख तसेच जहागिरी देऊन आपल्या बाजुस वळवुन घेतले. त्यानंतर नेताजी पालकर धारूरच्या किल्ल्यात रहात होते. शिवाजी महाराज आग्र्याहून निसटताच औरंगजेबाच्या आदेशानुसार जयसिंगाने नेताजी पालकर यांना धारूरच्या किल्ल्यात अटक केली. इ.स.१६८३ मध्ये संभाजी महाराजांचा काळात त्यांचा एक सरदार नारोजी या भागात आला असता येथील किल्लेदाराने त्याच्यावर हल्ला केला त्यात नारोजीसह इतर १०० स्वार मारले गेले याची नोंद औरंगजेबाच्या अखबारात आढळते. इ.स. ३ फेब्रुवारी १७६० रोजी उदगीर येथील मराठे-निजाम लढाईत निजामाला मदत करण्यासाठी सुलतानजी निंबाळकर, मोमीनखान, लक्ष्मणराव खंडागळे हे सरदार १५ हजारांची फौज घेऊन औरंगाबादहून निजामाच्या मदतीस निघाले. पण पेशव्यांचे सरदार राणोजी गायकवाड यांनी त्यांच्यावर हल्ला चढवल्याने त्यांनी धारूरच्या किल्ल्याचा आश्रय घेतला व ते तेथेच अडकून पडले. निजामाने औसामार्गे धारूरला पळ काढला. ११ मार्च १७९५ ला झालेल्या खर्ड्याच्या लढाईनंतर धारूर किल्ला काही काळ मराठ्यांच्या ताब्यात होता पण निजामाने तो पुन्हा जिंकून घेतला. स्वातंत्र्यानंतर हैद्राबाद संस्थान भारतात विलिन होईपर्यंत धारूर किल्ला निजामाच्या ताब्यात असल्याने वहिवाटीत होता.
© Suresh Nimbalkar