धारावी

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : ठाणे

उंची : 0

श्रेणी : सोपी

वसईच्या किल्ल्याची नाकेबंदी करणारा धारावी किल्ला भाइंदरजवळ आहे. चौक या माथ्यावरच्या ठिकाणापासून पायथ्याच्या पाणबुरुजापर्यंत कोरलई गडाप्रमाणे चिंचोळ्या आकारात या गडाची रचना केली गेली होती. पश्चिम रेल्वेच्या भाईंदर स्थानकावर उतरुन उत्तनला जाणाऱ्या बसने धारावी गडावर जाता येते. बांधल्यापासून सतत झुंजणारा हा किल्ला आज केवळ अवशेष रुपात शिल्लक आहे. ह्या किल्ल्याचे उरलेले अवशेष पहाण्यासाठी भाईंदर - उत्तन बसने धारावी देवी ह्या थांब्यावर उतरावे. इथून जवळच पोर्तुगिजकालीन बेलन माऊली चर्च आहे. ते पाहून पुढे गेल्यावर आपण धारावी देवीच्या मंदिरापाशी पोहचतो. मंदिराच्या पुढे गेल्यावर वाटेला लागुनच एक अलीकडच्या काळात दत्तपादुका म्हणुन दगडात कोरलेले स्थान दिसते. इथून पुढे साधारण १५ मिनीटे चालत आपण एका दर्ग्यावर पोहोचतो. येथे डाव्या हाताला तासलेला अनेक स्तंभासारखा आकार असलेला डोंगर दिसतो. ... पोर्तुगिजांनी १५३६ ते १६०० पर्यंत हा डोंगर तासून दगडाचे अखंड चिरे काढुन त्या चिऱ्यानी वसईचा किल्ला, गोव्याचे चर्च ह्या वास्तु बांधल्या. हा डोंगर पाहून पूढे गेल्यावर रस्ता डोंगराच्या माथ्यावर जातो. वाटेत उजव्या बाजूला खाली समुद्राच्या दिशेला घडीव दगडात बांधलेला एकमेव बुरुज दिसतो. या भागात किल्ल्याचे अवशेष मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहेत. हा केवळ एक बुरुज नसुन या बुरुजाला लागून समुद्राच्या बाजुने लांबवर तटबंदी आहे व एका बाजुची तटबंदी वर डोंगरावर गेली आहे. समुद्राच्या या बुरुजावर पोर्तुगिजांच्या कार्यालयाचे व इतरही बरेच अवशेष आहेत. हे सर्व अवशेष झुडुपात व मातीच्या ढिगाऱ्याखाली लपलेले आहेत. हा बुरुज पाहून गडमाथ्यावर आल्यावर बाग लागते. या बागेत तटबंदीचे काही अवशेष दिसतात. किल्ल्याच्या माथ्यावरुन पश्चिमेला अरबी समुद्र, उत्तरेला वसईचा किल्ला व मध्ये असलेली वसईची खाडी दिसते. या ठिकाणावरुन किल्ल्याचे भौगोलिक स्थान व वसईच्या मोहिमेतील महत्व लक्षात येते. यासाठी एकदा तरी या भागाला भेट दयायला हवी. संपुर्ण किल्ला पाहण्यास १ तास पुरेसा होतो. किल्ले वसई मोहिमेचे प्रतिनिधी डॉ. श्रीदत्त राउत व त्यांचे सहकारी या किल्ल्याची ओळख लोकांना करून देऊन या भागाचा इतिहास जिवंत ठेउन गतवैभवाचे सरंक्षण करण्याची भक्कम कामगिरी करत आहेत. चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत धारावी किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती. इ.स. १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले. धारावी किल्ला वसईच्या किल्ल्यासमोर आहे. एका बाजूला वसईची खाडी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र यामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते. या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्रा व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते. तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते. शंकराजी पंत धारावीचे महत्त्व पेशव्यांना सांगताना लिहितात कि धारावी समुद्र आणि बंदरामुळे हा दुसरा जंजिरा आहे. शिजलेले अन्न निवले नाही तोच वसईला पोचवता येते. १२ एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि ताबडतोब धारावी किल्ला बांधायला घेतला. त्यासाठी २२०० माणसांना रोज ५/- रुपये याप्रमाणे ११०००/- रुपये किल्ला बांधण्यसाठी मागणी करणारे शंकरजी केशव यांनी चिमाजी अप्पांना लिहलेले पत्र उपलब्ध आहे. पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून पोर्तुगिजांनी कडदीन नावाच्या अधिकाऱ्यासोबत ८०० हशम रवाना केले आणि हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला. वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना धारावी किल्ला जिंकून घेणे आवश्यक होते. ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला. पोर्तूगिजांनी २८ फेब्रुवारी १७३८च्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला. चिमाजी आप्पांनी ९ मार्च १७३८ ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगिज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता. शेवटी ६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला. इ.स १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!