धामणगाव

प्रकार : गढी

जिल्हा : अमरावती

उंची : 0

श्रेणी : सोपी

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातुन गाविलगडला जाताना वाटेत १३ कि.मी. अंतरावर धामणगाव गढी नावाचे मध्यम आकाराचे गाव लागते. धामणगाव नावाबरोबर गढी हा शब्द जोडलेला असल्याने आमची उत्सुकता चाळवली गेली व आम्ही या गावाला भेट देण्याचे ठरवले. या गावाला दिलेली आमची भेट मुळीच वाया गेली नाही. चौकोनी आकाराची हि गढी धामणगाव गावाच्या पश्चिम दिशेला असुन गढीची तटबंदी व या तटबंदीतील चार बुरुज आज केवळ अवशेषरुपात शिल्लक आहेत. गढीची तटबंदी साधारण २०-२५ फुट उंच असुन तटबंदीच्या भिंती मातीच्या असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. गढीचा भुभाग दीड एकर परिसरावर पसरलेला असुन तटबंदीचा बराच भाग कोसळल्याने आत जाण्यासाठी असलेला दरवाजा आज पूर्णपणे नष्ट झाला आहे. गढीच्या चारही बाजुस असलेली ३० फुट उंच तटबंदी व त्यातील बुरुज तसेच गढीभोवती असलेला बुजलेला खंदक पहाता हि गढी एखादा भुईकोट किल्लाच वाटते. ... शिल्लक तटबंदीच्या व बुरुजाच्या वरील भागात काही ठिकाणी बंदुकीच्या माऱ्यासाठी जंग्या दिसून येतात. धामणगाव गढीचे चारही बुरुज शिल्लक असुन यातील दोन बुरुज मोठ्या प्रमाणात ढासळलेले आहेत. तटबंदीची पडझड झालेली असल्याने या बुरुजावर जाण्यास मार्ग नाही. गढीच्या आतील बाजुस कोणत्याही प्रकारचे अवशेष दिसून येत नाही. गढीची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने इतर कोणतेही अंदाज करता येत नाहीत. स्थानिकांना या गढीबद्दल फारशी माहिती नसून सध्या या गढीचा ताबा फाटकर कुटुंबाकडे आहे. काही स्थानिक लोक हि गढी नागपुरच्या भोसले घराण्याची असुन भिसे घराण्याकडे या गढीचा ताबा असल्याचे सांगतात. संपुर्ण गढीची फेरी मारण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गढीचे बांधकाम रघोजी भोसले यांच्या काळात झाल्याचे गावातील जाणकार लोक सांगतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!