धडगाव
प्रकार : गढी
जिल्हा : नंदुरबार
उंची : 0
श्रेणी : सोपी
एकेकाळी खानदेशात असणारे नंदुरबार खानदेशच्या विभाजनानंतर सहा तालुके असलेल्या नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा थेट मध्यप्रदेश व गुजरात राज्याला भिडल्या आहेत. अदीवासीबहुल असलेल्या या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांचे महाराष्ट्रातील गडकिल्ले या पुस्तकातील ७ किल्ले वगळता इतरत्र कोठेही या किल्ल्यांचा उल्लेख दिसुन येत नाही. आजच्या संगणकाच्या युगात आंतरजालावरही या किल्ल्यांची माहिती दिसुन येत नाही. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातील हटमोईदा व अष्टे या दोन गढी पुर्णपणे नष्ट झालेल्या असुन उरलेले १३ गढीकिल्ले त्यांचे उर्वरित अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आजही उभे आहेत. या १३ किल्ल्यात १ गिरिदुर्ग असुन ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत.
...
नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीमुळे या जिल्ह्याचे उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग झालेले आहेत. धडगाव हा किल्ला उत्तर नंदुरबार भागात अक्राणी तालुक्यात असुन धडगाव हे या तालुक्याचे ठिकाण आहे. धडगाव नंदुरबार हे अंतर ८५ कि.मी.असुन धानोरा किंवा प्रकाशामार्गे तेथे जाता येते. धडगाव गढी गावाच्या पश्चिम भागात असुन वनविभागाचे कार्यालय या गढीत असल्याने या कार्यालयाचा पत्ता विचारत आपण धडगाव गढीच्या दरवाजात पोहोचतो. अक्राणी किल्ला हा धडगावचा किल्ला म्हणुन ओळखला जात असल्याने आपण जर का धडगाव किल्ला म्हणुन विचारणा केली तर आपली रवानगी अक्राणी किल्ल्याच्या दिशेने केली जाते. साधारण चौकोनी आकाराची हि गढी अर्धा एकर परिसरावर पसरलेली असुन चार टोकाला चार बुरुज व पुर्वाभिमुख दरवाजा अशी हिची रचना आहे. गढीचा दरवाजा व तीन बुरुज पुर्णपणे नष्ट झालेले असुन शिल्लक असलेल्या एका बुरुजावर दर्ग्याची स्थापना करण्यात आली आहे. गढीच्या भुईसपाट झालेल्या दरवाजासमोर एक लहानशी तांदळा असलेली घुमटी असुन या घुमटी शेजारी एक चारही बाजुने कोरलेली विरगळ आहे. तटबंदीची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन आज केवळ ५ ते ६ फुट उंचीची दगडी तटबंदी चारही बाजुंनी शिल्लक आहे. धडगाव गढीच्या आतील भागात वनविभागाचे कार्यालय असल्याने ते बांधण्यासाठी आतील मूळ अवशेष पुर्णपणे नष्ट करण्यात आले आहेत. गढीला पाणी पुरवठा करण्यासाठी आत असलेली विहीर पाणी खराब झाल्याने दोन वर्षापुर्वी बुजविण्यात आली आहे. याशिवाय गढीच्या मागील बाजूस तटबंदी बाहेर असलेल्या खोलगट भागात अजुन एक विहीर आहे. गढीत इतर काहीच अवशेष नसल्याने १५ मिनिटात गढी फिरून होते. १४-१५ व्या शतकात हा भाग फारुखी राजसत्तेकडे होता. खानदेशचा पहिला सुलतान फारुकी मलिकराज यांने सुलतानपूर व नंदुरबार हीं शहरे व त्याचा आसपासचा परीसर इ.स. १५३० सालीं ताब्यात घेतला परंतु गुजरात सुलतान मुजफर ह्याच्या आक्रमणाने फारुकी मलिकराज याला थाळनेराकडे परतावें लागलें. इ.स.१५३६ मध्यें महंमुदशहा बेगडा (तिसरा) या गुजरातच्या सुलतानाने राजा झाल्यावर त्यानें अशीरगडावर कैदेंत असतांना कबूल केल्याप्रमाणें सुलतानपूर व नंदुरबार हीं ठाणीं व हा भाग मुबारकखान फारुकी यांस दिला. नंतर मात्र या भागावर मोगल सत्ता आली. मुंबई गझेटमधील ब्रिटीश नोंदीनुसार १८६२ सालीं या गढीची डागडुजी करण्यांत आली असुन येथें पाणी विपुल प्रमाणात असल्याची तसेच भिल्ल पलटणीची एक तुकडी येथे तैनात ठेवली असल्याची नोंद आढळते.
© Suresh Nimbalkar