दौलतगड उर्फ दासगावचा किल्ला

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : रायगड

उंची : ३२५ फुट

श्रेणी : सोपी

महाड शहराला सातव्या शतकापासूनचा वैभवसंपन्न इतिहास आहे. सावित्री, गांधारी आणि काळ नदीच्या तीरावर असलेल्या महाड तालुक्यात गांधारी नदीकाठी सातव्या शतकातील गांधारपाले या बौद्धकालीन लेणी आहेत. महाहट्ट म्हणजेच मोठी पेठ या पाली शब्दाचा अपभ्रंश होत पुढे महाड हे नाव झाले अशी महाडची ओळख आहे. महाड ही या परिसरातील मोठी बाजारपेठ होती. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. सावित्री नदीचा हा मार्ग गाळाने भरून गेल्याने महिकावंती बंदर आणि दासगाव बंदर या बंदरांचे केवळ अवशेष शिल्लक राहिले आहेत. बंदरावरील या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी दौलतगड,सोनगड,महेंद्रगड या किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी म्हणून रायगडची निवड केल्याने रायगडाच्या प्रभावळीत असलेल्या या किल्ल्यांना राजधानीच्या संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व प्राप्त झाले. या किल्ल्यांच्या साखळीमुळे शत्रुला राजधानीवर सहज हल्ला करणे कठीण होते. ... यातील दौलतगड किल्ल्याची निर्मिती नेमकी कोणत्या काळात झाली हे सांगणे जरी कठीण असले तरी रायगडचा उपदुर्ग असलेला हा किल्ला खाडीमार्गावरील टेहळणीचा एक महत्वाचा किल्ला होता. इ.स.१७५६ मध्ये तुळाजी आंग्रे यांच्या विरुध्द नानासाहेब पेशवे यांनी काढलेल्या मोहीमेत इंग्रजांनी केलेल्या मदतीसाठी दासगाव व कोमाल हि गावे तसेच बाणकोट किल्ला त्यांना देण्यात आला. त्यांनंतर इंग्रजांनी या किल्ल्याचे दासगाव फोर्ट असे नामकरण केले व त्यावर दोन बंगले बांधले. पुढे इ.स.१७७५ च्या सुमारास मराठयांनी दासगावचा किल्ला जिंकुन घेतला. आजही स्थानिकांना हा किल्ला दौलतगड म्हणुन परीचीत आहे व वर्षातुन फक्त एकदाच झेंडा लावण्यासाठी शिवजयंतीला आम्ही किल्ल्यावर जातो असे ते अभिमानाने सांगतात. महाड तालुक्यात असलेल्या दौलतगडला भेट देण्यासाठी आपल्याला मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरे पुढे ८ कि.मी.वर असलेले दासगाव हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. महामार्गाला लागुन असलेली दासगावची खिंड व सावित्री नदी यांना लागुन असलेल्या टेकडीवजा डोंगरावर दौलतगडचे अवशेष पहायला मिळतात. किल्ल्याचा डोंगर दक्षिणोत्तर पसरलेला असुन किल्ल्याची समुद्रसपाटीपासुन उंची २५५ फुट आहे. दासगावची खिंड पार केल्यावर लगेचच एक लहान रस्ता उजवीकडे दासगावात जातो. या रस्त्याला लागुनच एक सिमेंटच्या पायऱ्यांची वाट किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे जाते. या शाळेच्या मुख्य दरवाजाने आत पटांगणात शिरून दुसऱ्या बाजुस असलेल्या लहान दरवाजाने बाहेर पडायचे व शाळेच्या इमारतीला वळसा घालुन आपण ज्या दरवाजाने आत शिरलो त्या बाजूस यायचे. येथुन समोरच डोंगरावर गेलेल्या पायवाटेने डोंगर चढायला सुरुवात करायची. ही पायवाट शाळेच्या वरच्या बाजुने डोंगर उजव्या बाजूला आणि शाळा खाली डाव्या बाजूला ठेवत पुढे जाते. या वाटेने वर आल्यावर वरून खाली उतरत जाणारा मोठा चर लागतो. या ठिकाणी तीन वाटा असुन चराच्या अलीकडील वाटेने १० मिनिटे चालत गेल्यावर कातळात खोदलेले एक फुटके टाके लागते. पावसाळा वगळता या टाक्यात पाणी नसते. हे टाके पाहुन परत चराकडे यावे व चर पार करून डावीकडील वाट धरावी. या वाटेने २ मिनिटे चालल्यावर कातळात खोदलेले मध्यम आकाराचे टाके लागते. टाक्यात उतरण्यासाठी २-४ पायऱ्या कोरल्या आहेत. या टाक्याची दुर्गप्रेमींनी अलीकडेच सफाई केली असल्याने पिण्यायोग्य पाणी आहे पण काही स्थानिक सध्या याचा वापर कपडे धुण्यासाठी करत आहेत. हे टाके पाहुन परत चराच्या वाटेवर यावे. येथुन सरळ वर जाणारी वाट गडमाथ्यावर जाते पण या वाटेवर मोठ्या प्रमाणात झाडी वाढलेली असल्याने येथुन वर जाता येत नाही. उजवीकडे जात असलेली उरलेली तिसरी वाट आपल्याला डोंगराला वळसा मारत अर्ध्या तासात दासगावच्या विरुध्द दिशेला असलेल्या किल्ल्याच्या दक्षिण टोकावर घेऊन जाते. या टोकावरून वर चढत ५ मिनिटात आपण गडमाथ्यावरील ध्वजस्तंभाजवळ पोहोचतो. गडमाथा अगदी छोटा असुन माथ्यावर पाण्याचे बुजत चाललेले एक टाके, इंग्रजांनी बांधलेल्या वास्तुंचे उध्वस्त चौथरे, दोन बुरुज व त्यातील तटबंदी. तसेच एक लहान झाडीने भरलेला खोल तलाव पहायला मिळतो. किल्ल्यावर फारसे कोणी जात नसल्याने वाटा मोडलेल्या असुन त्यावर मोठया प्रमाणात झाडी वाढली आहे त्यामुळे या झाडीतुन वाट काढत अवशेष पहाण्यापेक्षा शोधावे लागतात. ध्वजस्तंभ,बुरुज,तटबंदी, तलाव सहज दिसत असले तरी उर्वरीत अवशेष मात्र सावधपणे शोधावे लागतात. गडमाथ्यावरून सवित्री आणि काळ नदीचा संगम तसेच नदीचे दुरवर पसरलेले विस्तीर्ण पात्र दिसते. सावित्री आणि काळ नदीच्या संगमामुळे येथे खाडीपात्रात अनेक बेटे तयार झाली आहेत. या ठिकाणी आपली गडफेरी पुर्ण होते. गावापासुन किल्ला पाहुन परत जाण्यास २ तास लागतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!