देहेरगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशिक
उंची : ३२९७ फुट
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेला रामशेज किल्ला त्याने मुगलांशी दिलेल्या साडेपाच वर्षाच्या झुंजीमुळे इतिहासात व पर्यटकांत चांगलाच प्रसिद्ध आहे पण त्याच्या या झुंजीचे कवतिक जवळुन न्याहाळणारा त्याचा सवंगडी देहेरगड मात्र तितकाच दुर्लक्षीत व इतिहासाबाबत अबोल आहे. रामशेज किल्ल्यासमोरच देहेरगड व भोरगड हि दुर्गजोडी उभी असुन यातील भोरगडावर वायुदलाने रडार बसविले असल्याने तेथे जाण्यास बंदी आहे तर देहेरगडवर जाता येते कि नाही याबाबत मतांतरे आहे. देहेरगड आणि भोरगड हे दोन्ही किल्ले एकाच डोंगरधारेवर असुन मधील दोन लहान सुळक्यांनी एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. भोरगडावर जाणारा रस्ता हा देहेरगडाला वळसा घालुनच जातॊ. देहेरगडवर जाताना आपल्याला कोठेही अडविले जात नाही मात्र हा अतिदक्षतेचा परिसर असल्यामुळे देहेरवाडीतील गावकरी गडावर जास्त वेळ थांबु नका असा प्रेमळ सल्ला मात्र देतात. काही का असेना पण आपल्याला देहेरगडची दुर्गवारी सहजपणे करता येते.
...
देहेरवाडी हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले गाव नाशिकहून २१ कि.मी. अंतरावर तर आशेवाडी या रामशेज किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापासुन ८ कि.मी.अंतरावर आहे. आशेवाडी पुढे ७ कि.मी.अंतरावर रासेवाडी गाव आहे पण या गावाआधी १ कि.मी. अलीकडे देहेरवाडी गावात जाणारा रस्ता आहे. या गावामागे असलेल्या डोंगरावर देहेरगड वसला असुन या डोंगराची एक सोंड उतरली आहे. खाजगी वाहन सोबत असल्यास आपण देहेरगड गावातुन या सोंडेखाली असलेल्या घरापर्यंत जाऊ शकतो अन्यथा मुख्य रस्त्यापासुन या सोंडेपर्यंत अर्ध्यातासाची पायपीट करावी लागते. या सोंडेपासुन गडावर जाण्यास दीड तास पुरेसा होतो. सोंडेखालच्या घरासमोर एक मोठे बाभळीचे झाड असुन येथुन वर तिरकी चढत जाणारी वाट आपल्याला सोंडेवरील पठारावर पोहोचवते. या पठारावर कधीकाळी वस्ती असल्याच्या खुणा दिसू येतात. येथुन समोरच टेकडावर उभा असलेला गडाचा कातळमाथा दिसून येतो. गावकरी या पठारावर गुरे चरावयास आणत असल्याने अनेक ढोरवाटा पसरल्या आहेत पण आपण कोठेही न वळता सरळ या टेकाडावरील झाडीच्या दिशेने चढण्यास सुरवात करावी. मातीने भरलेल्या हि निसरडी मुरमाड वाट वळणावळणाची चढाई करून गडाच्या कातळाखाली असलेल्या झाडीत शिरते. या झाडीतुन ५ मिनिटे वाटचाल केल्यावर उजवीकडे गडाच्या कातळाखाली कड्याला चिटकून खोदलेले एक कोरडे पडलेले लहान चौकोनी आकाराचे टाके दिसते. टाक्याकडून थोडे पुढे आल्यावर घळीतून उतरत आलेल्या गडाच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली असुन एका ठिकाणी १०-१२ फुट सोपे प्रस्तरारोहण करावे लागते. या पायऱ्यांच्या वाटेने १० मिनिटात आपण गडाच्या उत्तराभिमुख उध्वस्त दरवाजात पोहोचतो. दरवाजा व शेजारील बुरुज पुर्णपणे ढासळलेले असुन त्यांच्या केवळ खुणा शिल्लक आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस समोरच कातळात कोरलेले मोठे टाके आहे. वरून पडणारी दगडमाती या टाक्यात साठत असल्याने टाके बुजत आले आहे. दरवाजाच्या या भागात एक बुरुज व काही प्रमाणात तटबंदी नजरेस पडते. टाक्याजवळ गावकऱ्यानी एका अनगड देवतेची स्थापना केलेली आहे. या टाक्याकडून वर जाणाऱ्या पायऱ्यांनी आपण गडाच्या दुसऱ्या उध्वस्त दरवाजात पोहोचतो. दरवाजाचा हा भाग कातळात कोरून काढलेला असुन वरील भागातील कमान नष्ट झाली आहे. या दरवाजातुन आत आल्यावर उजवीकडील वाटेने आपण बालेकिल्ल्याच्या उंचवट्याखाली येतो. येथुन एक वाट सरळ वर जाताना दिसते तर दुसरी निमुळती वाट कड्याला लागुन उजवीकडे जाताना दिसते. उजवीकडील या वाटेने सांभाळून १५-२० पाऊले गेल्यावर कातळात एका रेषेत कोरलेली पाण्याची तीन टाकी दिसतात. हि तीनही टाकी कोरडी पडलेली आहेत. टाकी पाहुन मागे फिरल्यावर सरळ वर जाणाऱ्या वाटेने आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. त्रिकोणी आकाराचा गडमाथा समुद्रसपाटीपासून ३५८० फुट उंचावर असुन साधारण अडीच एकरवर पसरलेला आहे. बालेकिल्ल्याचा माथा लहान असुन येथे वाढलेल्या उंच गवतात वास्तुंचे बहुतांशी अवशेष गवतात लपलेले आहेत. येथुन सरळ जाणारी वाट बालेकिल्ल्याचा उंचवटा उतरून गडाच्या पूर्व भागात येते. या भागात असलेली गडाची तटबंदी आजही काही प्रमाणात शिल्लक असुन कातळात कोरलेली पाण्याची ४ टाकी आहेत. या चारही टाक्यांची पडझड झालेली असुन दोन टाक्यात पिण्यायोग्य पाणी आहे. टाक्या शेजारी कातळात कोरलेल्या चौथऱ्यावर सिमेंटचा चौथरा बांधुन त्यावर सिमेंटचे शिवलिंग स्थापन केलेले आहे. या चौथऱ्याशेजारी पडझड झालेल्या भिंती असलेली एक वास्तु आहे. टाक्याकडून सरळ पुढे आल्यावर आपण भोरगडाच्या दिशेने असलेल्या किल्ल्याच्या टोकावर येतो. या टोकावर उजव्या बाजूस तीन तर डाव्या तीन अशी एकुण सहा पाण्याची टाकी आहेत पण या सर्वच टाक्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. येथुन कातळात कोरलेली एक पायवाट गडाच्या खालच्या टप्प्यावर उतरताना दिसते पण या वाटेचा पुढील भाग कोसळल्याने खाली उतरता येत नाही. येथुन आल्या वाटेने मागे फिरून दरवाजात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. देहेरवाडीतून गड फिरून परत गावात येण्यासाठी साडेतीन तास लागतात. देहेरगडजवळ मुक्काम करायचा झाल्यास गावातील हनुमान मंदिरात मुक्काम करता येईल. देहेरगडाचा आकार व त्यावरील अवशेष पाहता हा टेहळणीचा किल्ला असावा. गडाचा कातळात कोरलेला पायरीमार्ग गडाची प्राचीनता दाखवतो. पेठ- सावळघाट -दिंडोरी या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची उभारणी करण्यात आली असावी. इ.स.१६७०-७१ दरम्यान हा प्रदेश मराठ्याच्या ताब्यात आला त्यावेळी देहेरगड मराठ्यांनी जिंकून घेतला. इ.स.१७५३-५४ मधील पेशवे-निजाम तहातील किल्ल्यांच्या यादीत देहेरगडचा उल्लेख येतो.
© Suresh Nimbalkar