देवगिरी
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : औरंगाबाद
उंची : २३९० फुट
श्रेणी : मध्यम
देवगिरीचा किल्ला हा मध्ययुगीन इतिहासातील सर्वात महत्त्वाचा किल्ला होता. राष्ट्रकुटांच्या वंशातल्या वल्लभ राजाने आठव्या शतकात हा गड बांधला असे म्हटले जाते. बाराव्या शतकाच्या उत्तरार्धात देवगिरीच्या यादवांचा उदय खानदेश परिसरात झाला. पहिल्या सेऊनचंद्राच्या तेव्हाच्या सेऊनदेशात (आताचा खानदेशात) नाशिक ते देवगिरीचा समावेश होता. कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील भिल्लम-२ या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना करून इथे त्याची राजधानी स्थापली. पुढे सिघंण्ण व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले. या कृष्णाचा भाऊ महादेवने उत्तर कोकणचा प्रदेश आपल्या राज्यास जोडला आणि गादी आपला मुलगा आमण्णाकडे सोपविली. पण कृष्णाचा मुलगा रामचंद्र बंड करून गादीवर आला. रामचंद्र यादव सिहासनावर असताना अल्लाउद्दीन खिलजीने सन १२९४ साली देवगिरीवर आक्रमण केले. त्याच्या मुलाने, म्हणजे शंकरदेवाने खिलजीला रोखून धरण्याचे खूप प्रयत्न केले.
...
पण ते कामी न आल्याने रामचंद्रदेवाला खिलजीशी अत्यंत अपमानास्पद तह करावा लागला. त्यानंतर सन १३०७ व सन १३१२ मधे मलिक कफूरने पुन्हा देवगिरीवर आक्रमण केले. इ.स. १३१६ मधे कुतबुद्दीन मुबारक ह्याने देवगिरीवर हल्ला केला. यावेळी रामचंद्रदेवाचा जावई, हरपालदेव याने या मुसलमानी वावटळीला थांबवायचा अयशस्वी यत्न केला. त्याची कातडी सोलून त्याच्या मृतदेहाला देवगिरीच्या वेशीवर टांगण्यात आले. अल्लाउद्दीनचे अनुकरण मुहम्मद बिन तुघलक (इ.स.१३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत वाढवत नेली. १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलकने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले. दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला व राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली. तुघलकांनंतर अल्लाउद्दीन हसन बहामनी याने दक्षिणेत इ.स.१३४७ साली बहामनी राज्याची स्थापना केली. देवगिरी उर्फ दौलताबाद ही बहामनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहामनी राज्याचे गोवळकोंड्याची कुतुबशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या. औरंगाबादपासून साधारण १५ किमीवर असलेला हा किल्ला देवगड किंवा धारागिरी ह्या नावांनी देखील ओळखला जातो. भारताच्या व विशेषकरुन दख्खनच्या इतिहासात ह्याला अढळ स्थान आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या सपाट प्रदेशांत अनेक उध्वस्त इमारतींचे अवशेष आहेत. हा भाग कटक म्हणून ओळखला जात असे. आजचे दौलताबाद गाव याच परिसरात वसलेले आहे. दौलताबादला एकुण चार तटबंदी असुन सर्वात बाहेरील तटबंदी अंबरकोट नावाने ओळखली जाते. या तटबंदीची उभारणी निजामशाही वजीर मलिक अंबर याने केली. दौलताबाद गावाभोवती या तटबंदीचे अवशेष पहायला मिळतात. या तटबंदीच्या आतील महाकोट नावाने ओळखली जाणारी दुसरी तटबंदी म्हणजे देवगिरीचा मुख्य भुईकोट. या भुईकोटात मोठ्या प्रमाणात किल्ल्याचे अवशेष आहेत. यानंतर येणारी तिसरी तटबंदी किल्ल्याची मुख्य तटबंदी असुन ती कालाकोट म्हणुन ओळखली जाते. कालाकोटा नंतर चौथी तटबंदी म्हणजे पायथ्यापासून ६०० फुट उंच टेकडीवर असलेला देवगिरी किल्ला व त्याची तटबंदी. या संपुर्ण किल्ल्याभोवती खंदक खोदलेला असुन त्याला पार करण्यासाठी आजही पुलाचा वापर करावा लागतो. त्यानंतर माथ्यावर जाण्यासाठी दोन भुयारी मार्ग पार करावे लागतात. दुर्ग बांधणी शास्त्राची कल्पकता पहाण्यासाठी हा भुयारी मार्ग एकदा तरी अनुभवायला हवा. आज आपण ज्या दरवाजाने आत प्रवेश करतो त्या दरवाजाच्या आसपासची महाकोटाची तटबंदी आजही चांगल्या अवस्थेत असुन या संपुर्ण तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला खंदक फिरवलेला आहे. या दरवाजाने आत शिरल्यावर आपण महाकोट व कालाकोट या दोन तटबंदीच्या मधील भागात येतो. यात असलेल्या किल्ल्याच्या पहिल्या दरवाजाची लाकडी दारे आजही शिल्लक असुन त्यावर अणकुचीदार खिळे ठोकलेले आहेत. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. हा दरवाजा व यापुढील दरवाजा याच्या मधील भागात रणमंडळाची रचना असुन हा संपुर्ण भाग तटावरून माराच्या टप्प्यात आहे. या भागात काही ओवऱ्या असुन त्यात गाड्यांवर तोफा ठेवलेल्या आहेत. दुसऱ्या दरवाजाच्या तळाशी गरुडाचे शिल्प असुन याच्या आत सुध्दा पहारेकऱ्याच्या देवड्या आहेत. या देवड्यांच्या मागून एक रस्ता दुसऱ्या दरवाजाच्या बुरुजावर व शेजारील तटबंदीवर जातो. येथे अलीकडील काळात किल्ल्यात विखुरलेली मंदिराची काही शिल्पे एकत्रित केलेली असुन या तटबंदीच्या बांधकामात काही ठिकाणी मंदीराच्या शिल्पांचा वापर दगड म्हणुन केलेला दिसतो. किल्ला फिरताना असे शिल्प असणारे दगड अनेक ठिकाणी तटां- बुरुजांमध्ये दिसतात. या दुसऱ्या दरवाजा शेजारी १०-१२ फुट उंचीचा चौथरा असुन त्यासमोर जैन मंदिरे व एक दिपमाळ आहे. पुढे उजवीकडे एक देऊळ आहे. दरवाज्यातून आत आल्यावर उजवीकडील वाटेने थोडे पुढे गेले असता एक तोफ पहायला मिळते. या तोफेपुढे काही अंतरावर विटांनी बांधलेली पायऱ्यांची विहिर असुन तिच्या मागील बाजूस काही उध्वस्त इमारती आहेत. हे अवशेष पाहून पुन्हा दरवाजाकडे यावे व सरळ वाटेने किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजाने किल्ल्यात प्रवेश करावा. तिसऱ्या दरवाजाने आत शिरल्यावर उजव्या बाजुस साधारण १०० फुट उंचीचा गुलाबी रंगातील मिनार दिसतो. साधारण साठ फुट त्रिज्या असलेल्या या मिनाराच्या वरील भागात जायला पायऱ्यांची वाट आहे पण सध्या या मनोऱ्यात जाण्यास बंदी आहे. या मनोऱ्याचे बांधकाम कोणत्या काळात झाले हे निश्चितपणे कळत नाही. या मिनाराच्या मागील बाजुस एखादी मोठी वस्ती असल्याचे अवशेष आहेत. यातील एका इमारतीमध्ये किल्ल्यात सापडलेल्या बहुतांशी मुर्ती व काही वस्तु मांडुन ठेवलेल्या आहेत. त्याच्या पुढे काही अंतरावर किल्ल्याच्या या भागातुन बाहेर जाण्यासाठी दरवाजा आहे. हे पाहुन झाल्यावर पुन्हा मिनाराकडे यावे व आपली पुढील वाटचाल सुरु करावी. या वाटेने थोडे चालून गेल्यावर उजवीकडे एका रेषेत बांधलेल्या काही ओवऱ्या दिसतात. या ओवऱ्याच्या समोरील बाजुस म्हणजे वाटेच्या डावीकडे काही पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यावर समोर हत्ती तलाव नावाचा ४० x ४० फुट लांबी रुंदीचा हौद आहे. या हौदाच्या आकारावरुन महाकोट व कालाकोट या भागात पाण्याची व्यवस्था याच हौदातून होत असावी असे वाटते. ह्या हौदाजवळ यादवकालीन मंदिर असुन या मंदिराच्या वाटेवर अनेक शिल्पे पडलेली आहेत. कधीकाळी भव्य आकार असलेल्या या मंदिराच्या आवारात मोठया प्रमाणात कोरीव खांब असुन त्यावरील छप्पर मात्र नष्ट झालेले आहे. मंदिराच्या आत नव्याने स्थापन केलेली भारतमातेची मुर्ती आहे. हे पाहुन झाल्यावर मुळ वाटेवर येऊन किल्ल्याच्या दिशेने निघावे. वाटेत उजवीकडे मुस्लीम शासनकाळात मशिदीमध्ये रुपांतर केलेल्या मंदिराचे भग्नावशेष दिसतात. यामधील कोरीव खांब आजही व्यवस्थित शिल्लक आहेत. येथुन समोरच कालाकोटच्या तटबंदीत असलेला मुख्य दरवाजा व त्याशेजारील बुरुज नजरेस पडतात. यातुन आत शिरल्यावर आपला मुख्य किल्ल्यात प्रवेश होतो. आत शिरल्यावर वाट उजवीकडे वळते. या वाटेवर सैनिकांना राहण्यासाठी दालन असुन त्यापुढे लाकडी दारे आजही शिल्लक असलेला दिंडी दरवाजा आहे. पुढे पुन्हा पहारेकऱ्याच्या देवड्या व पायऱ्या लागतात. या सर्व पायऱ्या चढून गेल्यावर चिनीमहाल नावाचा पडीक अवस्थेतील दुमजली वाडा लागतो. येथुन मागे येऊन डावीकडे गेल्यावर निजाममहाल नावाचा अजुन एक वाडा आहे. याचा आकार व यात असलेली अनेक दालने व अप्रतिम कोरीव काम पहाता येथे खरोखरच राजेशाही थाट असावा असे वाटते. सध्या पुरातत्व खात्याने या दोन्ही वाडयाच्या दुरुस्तीचे काम सुरु केलेले आहे. वाडयाच्या मागील बाजुने एक वाट वाड्याच्या मागील बाजुस असणाऱ्या लेण्यांकडे जाते. वाड्याच्या पुढील भागात एक गोलाकार बुरुज बांधलेला असुन या बुरुजावर साधारण २० फुट लांबीची पंचधातूची एक तोफ ठेवलेली आहे. किल्ला शिकन नाव कोरलेल्या या तोफेला तिच्या मागील बाजूस असलेल्या मेंढ्याच्या तोंडामुळे मेंढा तोफ म्हटले जाते. हा बुरुज या तोफेसाठी बांधलेला असुन त्यावरून किल्ल्याचा दूरवरचा प्रदेश तसाच किल्ल्याभोवती असणारा खंदक नजरेस पडतो. डोंगरात कोरुन काढलेला हा खंदक साधारण ६० फुट रुंद असुन खंदक पार करण्यासाठी नव्याने लोखंडी पुल बांधलेला आहे. खंदकात दगडांनी बांधलेला जुना पुल असुन खंदकाची पाण्याची पातळी राखण्यासाठी दोन भिंती बांधलेल्या आहेत. संकटकाळी या बंधाऱ्यातून पाणी सोडल्यावर हा पुल पाण्याखाली जात असे. किल्ल्याचा डोंगर खंदकापासुन वरपर्यंत तासून गुळगुळीत केलेला आहे. पुलावरुन पलिकडे गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे अतिशय अरुंद जागी किल्ल्याचा तिसरा दरवाजा बांधलेला आहे. येथून कातळात कोरून काढलेली वाट एका चौकात येऊन संपते. येथुन बोगद्याप्रमाणे कातळात कोरलेला देवगिरी किल्ल्याचा प्रसिद्ध असलेला भुलभुलैय्या/ अंधारी मार्ग सुरु होतो. एखाद्या लेण्याप्रमाणे दिसणाऱ्या या दरवाजाच्या दर्शनी भागात किर्तीमुखे कोरलेली आहेत. हा मार्ग दोन भागात विभागलेला असुन पहिला भाग साधारण ६० फुट लांब तर दुसरा भाग ५५ फुट लांब आहे. पहिला भाग पार करण्यासाठी नव्याने पायऱ्यांची वाट केली आहे तर दुसऱ्या भागात विजेचे दिवे लावण्यात आले आहेत. अंधारीच्या ह्या भागात प्रकाशाविना जाणे अशक्यच आहे. मार्गाच्या आतील बाजुस वळणे दिलेली असुन काही ठिकाणी पायऱ्या बांधुन अडथळे निर्माण केले आहेत तर काही ठिकाणी फसवे मार्ग खोदले आहेत. अंधारी ओलांडून माथ्यावर आल्यावर डाव्या बाजुस गणपतीचे मंदिर आहे. येथुन साधारण १५० पायऱ्या चढून गेल्यावर अष्टकोनी आकाराची बारादरी नावाची प्रशस्त दुमजली इमारत लागते. यातील डावीकडील जिन्याने इमारतीच्या पहिल्या माळ्यावर जाता येते. बारादरीच्या उजवीकडील दरवाजा आपल्याला बिजली दरवाजापाशी घेऊन जातो. याच्या पुढील बुरुजाच्या पोटात एक गुहा असुन त्यात जनार्दनस्वामींच्या पादुका व पाण्याचे टाके आहे. या बुरुजावर असलेली तोफ काळापहाड म्हणुन ओळखली जाते. गुहेपासून साधारण १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण किल्ल्याच्या सर्वोच्च भागात असलेल्या बुरुजावर पोहचतो. या बुरुजावर २० फुट लांबीची दुर्गा नावाची तोफ ठेवलेली असुन तिच्या माऱ्याच्या टप्प्यात संपुर्ण किल्ल्याचा परीसर येतो. किल्ल्यावरील हे सर्वात उंच ठिकाण असुन येथुन संपुर्ण किल्ला व त्याच्या आसपासचा परीसर व्यवस्थितपणे पहाता येतो. किल्ल्याच्या अंबरकोटाची तटबंदी खूप लांबवर पसरलेली दिसते. किल्ला व्यवस्थित फिरण्यास एक पुर्ण दिवस लागतो.
© Suresh Nimbalkar