देवगाव खवणे

प्रकार : गढी

जिल्हा : जालना

उंची : 0

श्रेणी : सोपी

मराठवाडयातील किल्ल्यांची भटकंती करताना आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात एखाद दुसरा भुईकोट व अपवादात्मक गिरीदुर्ग वगळता फार कमी प्रमाणात दुर्ग पहायला मिळतात. मराठवाडा प्रांत सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेपासुन दुर असून बहुतांशी सपाट मैदानी प्रदेशाचा व लहानमोठया टेकड्यांचा आहे. सह्यादीच्या भागांपेक्षा हा भाग पुर्णपणे वेगळा असल्याने येथील लहानमोठ्या टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात गढी व एखाद-दुसऱ्या किल्ल्याची रचना केली गेली. स्वतंत्रपुर्व काळात या भुभागावर निजामाची सत्ता असल्याने हे किल्ले व गढी अलीकडील काळापर्यंत नांदते राहील्याने आजही सुस्थितीत आहेत. यामुळेच आपल्याला मराठवाडा भटकंती करताना किल्ल्यायेवजी मोठ्या प्रमाणात गढी पहायला मिळतात. जालना जिल्ह्यात देखील रोहीलगड व मस्तगड हे दोन किल्ले वगळता इतरत्र मोठ्या प्रमाणात गढी दिसुन येतात. हे प्रमाण अगदी ३० कि.मी. वर एक गढी असे धरले तरी वावगे ठरणार नाही. या भागातील वाहन व्यवस्था पहाता येथे प्रवास करण्यासाठी शक्यतो खाजगी वाहनाचा वापर करावा. जालना जिल्ह्यातील मंठा या तालुक्याच्या ठिकाणाहुन लोनारकडे प्रवास करताना २० कि.मी.अंतरावर देवगाव खवणे गाव आहे. ... महामार्गापासुन हे गाव २ कि.मी.आत असुन महामार्गावर या गावाच्या नावाचा फलक लागलेला आहे. या गावात सरदार मोरे यांची चौबुर्जी गढी आहे. गावात प्रवेश करताना दुरूनच उंचावर असलेल्या या गढीची तटबंदी व वरील भागात असलेले आतील प्रवेशद्वार नजरेस पडते. गढीजवळ आल्यावर रचीव दगडात बांधलेला पण सध्या काही प्रमाणात ढासळलेला बुरुज नजरेस पडतो. मोरे यांचे सध्याचे वंशज श्री.अमर मोरे हे गढी लगतच वास्तव्यास असुन त्यांच्या घराच्या आवारातुन गढीवर जाण्याचा मार्ग आहे, २०२०पर्यंत वापरात असलेल्या या गढीचा काही भाग २०२१मध्ये कोसळल्याने मोरे यांच्या वंशजांनी गढीबाहेर स्थलांतर केले आहे. गढीचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असुन तो सध्या बंद केला असल्याने आपला दक्षिणेकडून गढीत प्रवेश होतो. गढीचा दुसरा दरवाजा पुर्वाभिमुख असुन या दरवाजाने आत शिरल्यावर उजव्या बाजुस विहीर आहे. सध्या त्या विहिरीच्या आसपास मोठ्या प्रमाणात काटेरी झाडी असल्याने जवळ जाता येत नाही. येथे समोरच पहारेकऱ्याच्या देवड्या असुन समोरील भाग हा सदरेचा म्हणजे कामकाजाचा आहे तर डावीकडील दरवाजा आपल्याला गढीच्या आतील वास्तव्याच्या भागात नेतो. या ठिकाणी गढीत प्रवेश करणारा मुख्य दरवाजा असुन या दरवाजावर मोठ्या प्रमाणात कलाकुसर केलेली आहे. दरवाजाचा खालील भाग हा घडीव दगडात बांधलेला असुन त्यावरील नगारखाना विटांनी बांधलेला आहे. नगारखान्याच्या दर्शनी भागात मोठ्या प्रमाणात कलाकुसर केलेली आहे. दरवाजावर दगडी शिल्पे कोरलेली असुन तळाला गढी बांधणाऱ्या कारागिराचे नाव कोरलेले आहे पण त्यावर गढी बांधल्याची तारीख मात्र कोरली नाही असे खेदाने नमूद करावे लागते. गढीचे सध्याचे वंशज अमर मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार हि गढी साधारण ३५० वर्ष इतकी जुनी आहे. गढीच्या आतील भागात चौसोपी वाड्याचे अवशेष असुन त्या वाड्याचा खालील मजला घडीव दगडात तर वरील मजल्याचे बांधकाम विटांनी केलेले आहे. गढीची पायथ्यापासून उंची साधारण ७० फुट असुन येथुन संपुर्ण गाव व दूरवरचा प्रदेश नजरेस पडतो. संपुर्ण गढी पहाण्यास अर्धा तास पुरेसा होतो. गढीतील प्रवेश श्री. मोरे यांच्या रहात्या घरातून होत असल्याने त्यांची परवानगी घेणे अगत्याचे ठरते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!