देवगड
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग
उंची : ११० फुट
श्रेणी : सोपी
देवगडच्या हापूस आंब्याची कीर्ती त्याच्या चवीमुळे केवळ भारतातच नव्हे तर सातासमुद्रापार पोहचली आहे. पण ज्या किल्ल्यामुळे या तालुक्याला व पर्यायाने हापूस आंब्याला देवगड हे नाव मिळाले तो किल्ला मात्र प्रसिद्धीपासून फारच दूर आहे. अशा या देवगड किल्ल्याचीच सफर आपण आता करणार आहोत. प्राचिन काळापासून देवगड हे एक सुरक्षित बंदर म्हणून प्रसिध्द असुन देवगड बंदराचा पहिला उल्लेख पेरीपल्सच्या वर्णनात तोगरम या नावाने येतो. समुद्रात शिरलेल्या एका उंच भुशीराच्या निमुळत्या टोकावर असलेला देवगडचा किल्ला केवळ ७०० फुट लांबीच्या पट्ट्याने मुख्य भूभागाशी जोडलेला असुन त्याच्या सर्व बाजुस समुद्राचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या या टेकडीच्या उत्तर बाजुला तटबुरुजांचे पागोटे बांधुन ही तटबंदी तळात खाडीच्या काठापर्यंत बांधत नेली आहे. कोकणातील एखाद दुसरा किल्ला वगळता खाडीकाठी असलेल्या बहुतांशी किल्ल्यांची रचना एकसमान दिसुन येते ती म्हणजे टेकडीवर असलेला मुख्य किल्ला व तेथुन थेट खाडीच्या काठापर्यंत आलेली तटबंदी.
...
देवगड किल्ला हा देखील असाच दोन भागात विभागलेला असुन टेकडीवर बालेकिल्ला व खाडीकाठी परकोट अशी याची रचना आहे. मुंबई-देवगड हे अंतर ४६४ कि.मी.असुन मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव येथुन देवगडला जाणारा फाटा आहे. या फाट्यापासून ४० कि.मी. अंतरावर देवगडचा किल्ला आहे. देवगड हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असल्याने मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर येथुन देवगडला थेट बस सेवा आहे. देवगड बस स्थानकातून देवगड किल्ल्याचा पहिला दरवाजा केवळ १.५ कि.मी. अंतरावर असुन रिक्षाने अथवा चालत तेथे जाता येते. देवगड बस स्थानकासमोरील रस्त्याने समुद्राच्या दिशेने सरळ चालत गेल्यावर २० मिनिटात आपण दत्तमंदीर चौकात पोहोचतो. या चौकातून तीन दिशांना जाणारे मार्ग आपल्याला किल्ल्याच्या वेगवेगळ्या भागात घेऊन जातात. सरळ जाणारी वाट आपल्याला किल्ल्यात असलेल्या वस्तीत घेऊन जाते. या वाटेवर दोन बुरुजांच्या आडोशाने आतील बाजुस असलेला किल्ल्याचा पहिला गोमुखी बांधणीचा दरवाजा लागतो. हा दरवाजा बाहेरील बाजुस चौकोनी असुन आतील बाजुस कमान आहे. पुर्वाभिमुख असलेला हा दरवाजा व कमान कमकुवत झाल्याने त्याला लोखंडी आधार दिलेला आहे. दरवाजावर कोणत्याही प्रकारचे कोरीवकाम दिसुन येत नाही. दरवाजाच्या आतील बाजुस एक जुने जाते पडलेले आहे. गडाच्या या भागात मोठया प्रमाणात वस्ती असुन या वस्तीतुन वाट काढत वर पठारावर जावे लागते. दरवाजा पाहुन झाल्यावर मागे फिरून चौकात यावे व डावीकडून वर चढत जाणाऱ्या रस्त्याने आपल्या गडफेरीस सुरवात करावी. रस्त्यावरून जाताना उजव्या वाजूस किल्ल्याची ढासळलेली तटबंदी व त्यावर बांधलेली घरे पहायला मिळतात तर डावीकडे देवगडचा समुद्रकिनारा दिसतो. येथुन पुढे रस्ता उजवीकडे वळण घेऊन गावात शिरतो. या वाटेने एका मशीदीच्या अलीकडे डाव्या बाजुस दोन बुरुजात बांधलेला किल्ल्याचा दुसरा पुर्वाभिमुख दरवाजा दिसतो. दरवाजा व त्याशेजारील एका बुरुजाची मोठया प्रमाणात पडझड झालेली आहे. पहिल्या दरवाजापासून सुरु होणारी तटबंदी या दरवाजापर्यंत आलेली आहे. गडात प्रवेश करण्यासाठी हे दोन्ही वेगवेगळे दरवाजे आहेत. या रस्त्याने पुढे जाताना वाटेच्या डाव्या बाजुस एक तर उजव्या बाजुस वस्तीत दोन व वस्ती संपल्यावर दोन असे टेहळणीचे एकुण पाच बुरुज पहायला मिळतात. हे बुरुज तटबंदीत बांधलेले नसुन पुर्णपणे वेगळे आहेत. कदाचीत किल्ला बांधताना अर्धवट राहीला असावा व तटबंदी बांधुन बुरुज जोडण्याचे काम राहुन गेले असावे. येथुन १० मिनिटे चालत पुढे आल्यावर गडाची पुर्व पश्चिम पसरलेली लांबलचक तटबंदी व त्यात असलेले तीन बुरुज पहायला मिळतात. तटबंदी आजही चांगल्या स्थितीत असुन तटबंदीबाहेर खोल खंदक खोदलेला आहे. हा खंदक साधारण १५ फुट रुंद असुन तितकाच खोल आहे. या खंदकामुळे बांधकामासाठी दगड व किल्ल्याला अधीक संरक्षण असे दोन्ही हेतू साध्य झाले आहेत. किल्ल्याच्या उजव्या बाजुच्या टोकावर दोन बुरुजांमध्ये किल्ल्याचा गोमुखी बांधणीचा तिसरा पुर्वाभिमुख दरवाजा आहे. दरवाजाची कमान पुर्णपणे नष्ट झाली असुन आत असलेल्या देवडयाचे केवळ चौथरे शिल्लक आहेत. दरवाजाने आत प्रवेश केल्यावर तटाला लागुन असलेल्या लहानशा घुमटीत हनुमानाची मुर्ती आहे तर काही अंतरावर गणेश मंदीर आहे. आपण गणेशाचे प्रथम दर्शन करून नंतर गडफेरीस सुरवात करावी. इ.स.१९१५ साली बांधलेल्या या मंदिराचा आता जीर्णोद्धार करण्यात आला असुन यातील मुळ मुर्ती आजही कायम आहे. दर्शन आटोपल्यावर दरवाजाशेजारी असलेल्या पायऱ्यांनी तटावर चढुन आपल्या गडफेरीस सुरवात करावी. किल्ल्याचा संपुर्ण परिसर ६० एकरवर पसरलेला असुन बालेकिल्ल्याचा परिसर साधारण १९ एकरवर पसरलेला आहे. बालेकिल्ल्यात फारसे अवशेष दिसुन येत नाही. तटबंदीतील दुसऱ्या बुरुजासोर छप्पर उडालेली एक पडीक वास्तु आहे. तटबंदीच्या पश्चिम टोकावरील बुरुजावर आल्यावर समोर पसरलेल्या अथांग सागराचे दर्शन होते. या बुरुजावर असलेला चौथरा आज मातीचा ढिगारा बनलेला आहे. किल्ल्याचा पश्चिम कड्याचा भाग मोठ्या प्रमाणात ढासळलेला असुन या भागात तटबंदी होती कि नाही हे ठामपणे सांगता येत नाही. बुरुजाच्या पायऱ्यांनी खाली आल्यावर जवळच कातळात कोरलेले एक लहान टाके आहे. मुळात हे टाके नसुन बांधकामासाठी चिरे काढल्याने पडलेला खड्डा आहे कारण जांभ्या दगडाच्या इतक्या वरील थरात पाणी टिकत नाही. टाक्याच्या पुढील भागात मातीत गाडलेले घरांचे चौथरे आहेत. या अवशेषांच्या शेजारी एक चौकोनी आकाराची खोल विहीर असुन तिला नव्याने चिऱ्याचे कुंपण घातले आहे. या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे. विहिरीच्या पुढील भागात दगडी कुंपणाच्या आत दिपस्तंभ, बंदर विभाग कार्यालय व कर्मचारी यांची घरे आहेत. या भागात नाममात्र शुल्क भरून संध्याकाळी ४ ते ५ या वेळेत प्रवेश दिला जातो पण विनंती केल्यास इतर वेळेस मर्यादीत प्रवेश दिला जातो पण त्यासाठी सरकारी ओळखपत्र सोबत असणे गरजेचे आहे. या भागात छायाचित्र घेण्यास पुर्णपणे बंदी आहे. दीपस्तंभाच्या आवारात एक पश्चिमोत्तर बुरुज व उत्तरेकडील तटबंदी वगळता इतर कोणतेही अवशेष नाहीत. किल्ल्याचा हा भाग पाहुन झाल्यावर या सरकारी आवाराच्या कुंपणाच्या भिंतीशेजारून उत्तरेकडील तटबंदीकडे जावे. या भागात मोठया प्रमाणात आंब्याची झाडे असुन हा भाग खाजगी मालकीचा आहे. आंब्याच्या मोसमात गेल्यास बागेतील माणसे येथुन जाण्यास बंदी करतात व प्रतिबंधीत क्षेत्र असल्याचे कारण सांगतात. उत्तरेकडील तटबंदीच भाग पुर्णपणे उताराचा असुन यावर टप्प्याटप्प्याने पायऱ्या बांधलेल्या आहे. किल्ल्याच्या या तटबंदीत दीपस्तंभाच्या आवारातील बुरुजासकट एकुण ४ बुरुज आहेत. या संपुर्ण तटबंदीत बंदुकीचा व तोफांचा मारा करण्यासाठी जंग्या व झरोके बांधलेले आहेत. साधारण १००-१२५ पायऱ्या उतरून आपण खाडीच्या काठावर असलेल्या चौथ्या बुरुजावर येतो. या बुरुजावर बंदर विभागाचे ओंस पडलेले कार्यालय आहे. या बुरुजावरून खाडीच्या काठावर असलेले अजुन तीन बुरुज पहायला मिळतात. हा बुरुज पाहुन पुढच्या बुरुजाकडे जाताना उजवीकडे एक लहान गोल विहीर पहायला मिळते. या विहिरीचे पाणी आजही बंदरावरील बोटींसाठी वापरले जाते. तिसऱ्या बुरुजावर सिमेंटचा कट्टा बांधून त्यावर समुद्राकडे रोख करून ठेवलेल्या १० फुट लांबीच्या दोन तोफा पहायला मिळतात. इ.स.१८६२ साली इंग्रजांनी केलेल्या पहाणीत या किल्ल्यावर ४१ तोफा असल्याचे उल्लेख येतात. त्यानंतर अलीकडील काळात म्हणजे देवगड बंदर वापरात असताना किल्ल्यावर तीन तोफा असल्याचे उल्लेख येतात पण आज मात्र किल्ल्यावर केवळ या दोन तोफा शिल्लक आहेत. या बुरुजावरून समोरच असलेला देवगड बंदराचा बोटींसाठी बांधलेला धक्का नजरेस पडतो. बुरुज पाहुन झाल्यावर या धक्क्यावर यावे. बंदर वाहतुक चालु असताना सतत गजबजलेला हा धक्का आज मात्र ओस पडला आहे. या धक्क्यावरून खाडीच्या आतील बाजुस तटबंदीला लागुन किल्ल्याचा बोटीसाठी असलेला धक्का पहायला मिळतो. या धक्क्याजवळच किल्ल्याचा झाडीत लपलेला लहान दर्या दरवाजा आहे. धक्क्यावरून किल्ल्यातील आतील भाग दिसू नये यासाठी दरवाजासमोर आडवी भिंत घातली आहे. किल्ल्याचा बाहेरील दरवाजा चौकोनी असुन आतील बाजुस गोलाकार कमान आहे. दरवाजाच्या आतील बाजुस पहारेकऱ्याची देवडी असुन वर आल्यावर समोरच एका चौथऱ्यावर वेताळाची घुमटी आहे. बंदरावरील कर्मचाऱ्याच्या निवास स्थानामागे चिऱ्यात बांधलेल्या एका मोठया वास्तुचे अवशेष पहायला मिळतात. गडफेरीस सुरवात केली त्या दत्तमंदीर चौकातुन उजवीकडे येणारा रस्ता या निवास स्थानापर्यंत येतो. या रस्त्याने दत्तमंदीर चौकाकडे जाताना उजव्या बाजुस खाडीच्या काठावर पडझड झालेली तटबंदी व त्यात असलेले तीन बुरुज पहायला मिळतात. किल्ल्याच्या पहिल्या दरवाजास जोडलेली ही तटबंदी रस्ता बांधताना तसेच येथील घरामुळे पुर्णपणे नष्ट झाली आहे. दत्तमंदीर चौकात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते. वर दिलेल्या मार्गाने संपुर्ण गडफेरी करण्यास ३ तास पुरेसे होतात व संपुर्ण किल्ला पाहुन होतो. देवगड किल्ला नेमका कोणी व कधी बांधला याची पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने इतिहासकारात याच्या बांधणी काळाविषयी एकवाक्यता नाही. देवगड किल्ल्याच्या बांधणीचे श्रेय कान्होजी आंग्रे यांना दिले जाते. इ.स.१७१३ मध्ये कान्होजी आंग्रे व छत्रपती शाहु महाराज यांच्यामधील तहात देवगड किल्ल्याचा कागदोपत्री पहिला उल्लेख येतो. या तहानुसार देवगड किल्ला कान्होजी आंग्रे यांच्याच ताब्यात राहिला होता. किल्ल्यावर असलेली अपुरी पाणी व्यवस्था व किल्ल्याचे अपुर्ण बांधकाम पहाता हा किल्ला धामधुमीच्या काळात बांधला गेला असावा असे वाटते. किल्ला भागात केवळ ३ विहिरी असुन आजही पुरेसे पाणी नाही. पण अनेक इतिहासकारांच्या मते किल्ल्याची बांधणी,त्यावेळची राजकीय स्थिती पहाता इतके सुरक्षीत बंदर शिवकाळात दुर्लक्षीत रहाणे शक्य नाही शिवाय शिवरायांनी गडाजवळच्या खाडीमध्ये तारवे बांधल्याचा उल्लेख शिवचरित्र पत्रसारसंग्रहात येतो. या आधारावर हा किल्ला शिवकाळात अस्तित्वात असावा असे मानले जाते. दिनांक १८ ऑक्टोबर १७२० रोजी इंग्रज अधिकारी वॉल्टर ब्राऊन याने वाडीकर सावंतांच्या मदतीने देवगड किल्ल्यावर हल्ला चढविला पण त्याला पराभव पत्करून परत जावे लागले. इ.स.१८५६ सालीं पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त मोहीमेत किल्ल्यावरून फारसा प्रतिकार न होता किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला यावेळी बापुजी हरी यास किल्लेदार नेमले गेले. इ.स. १७९८-९९ दरम्यान गंगाधर बचाजी यांची किल्लेदार म्हणुन नेमणुक होती. ८ एप्रिल १८१८ रोजी कर्नल इम्लाक याने हा किल्ला जिंकून घेतला. इ.स.१८७५ सालीं खारेपाटण हे तालुक्याचे ठिकाण देवगड येथे आणले गेले.
© Suresh Nimbalkar