दुशाळगड

प्रकार : गढी

जिल्हा : रत्नागिरी

उंची : 0

श्रेणी : सोपी

अलीकडे समाज माध्यमातुन तरुण इतिहास संशोधक शिवप्रसाद शेवाळे यांच्या प्रयत्नातुन संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे दुशालगड नावाचा किल्ला प्रकाशात आल्याचे वाचनात आले होते. काही कामानिमित्त रत्नागिरी येथे जाण्याचा योग आला व या ठिकाणांना भेट देण्याची संधी मिळाली. या भेटीत मला जे दिसले,जाणवले ते मी या लेखात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. साखरपा गावातील गड नदीकाठी एका लहानशा उंचवट्यावर असलेला दुशाळगड आज पुर्णपणे विस्मरणात गेला आहे. साखरपाहुन भडखंबे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर साधारण १ कि.मी.अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजूस हि टेकडी आहे. येथे लक्षात ठेवण्याची खूण म्हणजे या टेकडीसमोर असलेल्या रस्त्यावरून उजवीकडे एक लहान सिमेंटचा रस्ता नदीकाठी असलेल्या स्मशानभुमीकडे जातो. दुशाळगड म्हणुन चौकशी केली असता या ठिकाणावर पोहोचणे कठीण आहे पण गढी म्हणुन चौकशी केल्यावर काही जाणकार लोक या ठिकाणाकडे निर्देश करतात. ... हि वास्तु आज पुर्णपणे भुईसपाट झाली असल्याने यात काही सरंक्षणदृष्ट्या रचना असावी याबाबत ठोसपणे सांगता येत नाही. पण या वास्तुचे शिल्लक असलेले अवशेष व रचना पहाता हा गड अथवा किल्ला नसुन एखादी गढीच असावी कारण स्थानिक लोक देखील या ठिकाणाला गढीचा टेप अथवा गढीचा परा म्हणुन ओळखतात. सध्या हि जागा खाजगी मालमत्ता असुन या जागेची मालकी शिंदे यांच्याकडे आहे. आजमीतीला गढी पुर्णपणे नामशेष झालेली असुन या टेकाडावर मोठ्या प्रमाणात करवंदीची काटेरी झाडी व गवत वाढलेले असल्याने उरलेसुरले अवशेष देखील या झुडुपात लपले आहेत. या ठिकाणी आपल्याला गढी न फिरता अवशेषांची शोधाशोध करावी लागते. आयताकृती आकाराची हि गढी दक्षिणोत्तर साधारण अर्धा एकरवर पसरलेली असुन जांभ्या दगडातील काही चिरे आसपास पसरलेले दिसतात. गढीच्या मध्यभागी एका वास्तुचा चौथरा पहायला मिळतो. गढीत कोणत्याही प्रकारची पाण्याची कोणतीही सोय दिसुन येत नाही. गढीच्या उंचवट्यावरून पूर्वेकडे विशाळगड व मुचकुंद ऋषीची गुहा असलेला माचाळदुर्ग नजरेस पडतो. गढीत इतर कोणतीही वास्तु शिल्लक नसल्याने १० मिनिटात आपली गडफेरी पुर्ण होते. विशाळगड किल्ल्याच्या सान्निध्यामुळे या गढीस दुशाळगड हे नाव मिळाले असावे. विशाळगड किल्ला प्राचीन आहे तर दुशाळगड पेशवे काळात बांधला गेला. दुशाळगडचा उल्लेख इ.स.१७४८ नंतरच्या पेशवे दफ्तरातील कागदपत्रात तसेच पंतप्रतिनिधींच्या बखरीत येतो. पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात वितुष्ट आल्यावर तुळाजीने पन्हाळा प्रांतावर हल्ले केले. त्याला आळा घालण्यासाठी येसाजी आंग्रे व सावंतवाडीकर यांनी संयुक्त मोहीम काढून तुळाजीच्या ताब्यातील घाटावरील मुडागड जिंकून घेतला. घाटाच्या माथ्यावरील ठाणे हातातुन गेल्याने या भागातील महसुल गोळा करण्यासाठी तुळाजी आंग्रे यांनी इ.स.१७५२-५३ दरम्यान साखरपा तर्फ देवळे येथे दुशाळगड बांधला पण लवकरच हा प्रांत पंतप्रतिनिधीच्या ताब्यात आला व इ.स.१७५८ मध्ये त्यांनी हे ठिकाण पाडून टाकले. पंतप्रतिनिधी बखरीत तुळापुराच्या देवीच्या डोंगरात हा किल्ला असल्याचा उल्लेख आहे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!