दुरुग

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : यवतमाळ

उंची : १२८० फुट

श्रेणी : सोपी

यवतमाळ जिल्ह्याची दुर्गभटकंती करताना रावेरी,कायर,दुर्ग,कळंब यासारखे लहानमोठे गढीकोट पहायला मिळतात पण या गढीकोटांचा उल्लेख मात्र कोठेच दिसुन येत नाही. स्थानिकांना हे गडकिल्ले माहित असले तरी इतरांना मात्र हे किल्ले अपरिचित आहे. हे किल्ले अपरिचित असण्याचे मुख्य कारण म्हणजे हे किल्ले जवळ पास नष्ट झाले आहेत किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काळाच्या ओघात नष्ट होत चाललेला असाच एक किल्ला आपल्याला कळंब या तालुक्याच्या शहराजवळ असलेल्या दुरुग गावात पहायला मिळतो. यवतमाळ-नागपुर महामार्गावर असलेले कळंब शहर यवतमाळ शहरापासुन २३ कि.मी.अंतरावर आहे. या शहरापासुन साधारण ग कि.मी.अंतरावर दुरुग हे ३०-३५ घरांची वस्ती असलेले छोटेसे गाव आहे. या गावामागे साधारण १ कि.मी. अंतरावर लहानसे धरण आहे. खाजगी वाहन असल्यास या धरणापर्यंत जाता येते. या धरणाच्या भिंतीपासून २ कि.मी. आत जंगलात मारुतीचे मंदिर आहे. गावकऱ्यांचा या मंदीरापर्यंत वावर असल्याने तेथे जाण्यासाठी कच्चा रस्ता झाला आहे. पावसाळा वगळता जीप सारखे वाहन या मंदीरापर्यंत जाते. सोबत वाहन नसल्यास हे ३ कि.मी. अंतर पार करण्यास पाउण तास लागतो. ... या मंदिराकडून एक मळलेली पायवाट शेजारच्या डोंगरावर असलेल्या दुरुग किल्ल्यावर जाते. किल्ल्यावर असलेल्या मंदीरात गावकऱ्यांची ये-जा असल्याने हि पायवाट मळलेली आहे. या भागात घनदाट जंगल असल्याने जंगली प्राण्यांचा वावर असतो,त्यामुळे एकट्या-दुकट्याने या किल्ल्यावर जाण्याचा प्रयत्न करू नये. शिवाय जंगल भाग असल्याने गावातुन वाटाड्या घेणे गरजेचे आहे. मंदिराकडील वाटेने १० मिनीटात आपण किल्ल्याच्या उध्वस्त दरवाजात पोहोचतो.किल्ला व त्याच्या परिसरात असलेल्या घनदाट जंगलामुळे हा किल्ला गिरिदुर्ग तसेच वनदुर्ग या दोन्ही प्रकारात मोडतो. किल्ल्यात प्रवेश करण्यापुर्वी वाटेच्या डाव्या बाजुस घळीच्या तोंडावर रचीव दगडांनी बांधलेली तटबंदी दिसुन येते. आपला किल्ल्यावर प्रवेश पश्चिमेकडील या घळीच्या वाटेनेच होतो. दरवाजाच्या जागी आपल्याला केवळ कमानीचे दगड दिसुन येतात. किल्ल्याचा वापर फार पुर्वी थांबल्याने तटबंदीचे ढिगाऱ्यात रुपांतर झाले आहे. तटबंदीचा ढिगारा झाला असला तरी हि तटबंदी शिल्लक असुन किल्ल्याच्या सर्व बाजुस आहे. किल्ल्याचा परीसर साधारण ३० एकरवर आडवा-तिडवा पसरलेला आहे. तटबंदीच्या खालील भागात असलेले दगड तटासाठी वापरल्याने त्या ठिकाणी खंदक निर्माण झाला आहे. तटबंदीत काही ठिकाणी बुरुज असुन ते देखील रचीव दगडांचे आहेत. दरवाजाकडून निघालेली वाट आपल्याला जगधामी मंदिराकडे घेऊन जाते. काही ठिकाणी या मंदीराचा भवानी मंदीर म्हणुन उल्लेख येतो. मंदिराच्या आवारात काही कोरीव शिळा असुन मंदीराचे बांधकाम ते प्राचीन असल्याचे दर्शविते. सद्यस्थितीत किल्ल्यात कोठेही पाण्याची सोय दिसुन येत नाही पण मंदिराच्या मागील बाजुस किल्ल्याबाहेर दूर अंतरावर पाण्याची मोठी विहीर आहे. संपुर्ण किल्ला पाहण्यास एक तास पुरेसा होतो. किल्ल्याचा सुसंगत इतिहास कोठेही उपलब्ध नाही. पुढीलप्रमाणे किल्ल्याची माहिती वाचनात येते. कळंब येथे गोंडराजाचा किल्ला होता. कळंबवर मोगल सुलतानांनी आक्रमण केले. त्यात कत्तली, अत्याचार, लुटालूट करून संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त केला. याशिवाय मोरेश्वलर कुंठे लिखित जुन्या दस्तऐवजात कळंबजवळ दुरुग आहे. येथे भवानीचे हेमांडपंती मंदिर असल्याच्या नोंदी सापडतात.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!