दुंधा
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : नाशीक
उंची : २२१५ फुट
श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका हा भाग पुर्वी बागलाण म्हणून ओळखला जात असे. आजही अनेकजण याचा उल्लेख बागलाण असाच करतात. याच सटाणा तालुक्यातील दुंधा हा एक अपरिचित किल्ला. समुद्रसपाटीपासून या किल्ल्याची उंची २२८० फुट तर पायथ्यापासुन साधारण ९०० फुट आहे. सटाणा शहराजवळ २१ कि.मी.च्या परिघात कऱ्हागड, दुंधा व अजमेरा हे टेहळणीचे छोटे किल्ले आहेत. दुंधेश्वर डोंगररांगेवर असलेल्या या किल्ल्यांचा वापर टेहळणीचे किल्ले म्हणून केला गेला. सटाणा गाव मध्यवर्ती ठेवून या किल्ल्यांची भटकंती करता येते. खाजगी वहानाने सकाळी लवकर सुरूवात करून दिवसभरात कऱ्हा, अजमेरा, दुंधा हे तीन किल्ले आणि देवळाणे गावातील जोगेश्वर मंदिर सहज पहाता येते. सटाण्यापासून देवळाणे मार्गे २० कि.मी वर दुंधा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव असुन या गावातुन एक रस्ता तळवडे मार्गे लखमापुरला जातो. या वाटेवर २ कि.मी.वर एक कच्चा रस्ता दुंधेश्वर मंदिराकडे जातो.
...
दुंधेश्वर मंदिर हे दुंधा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. दुंधा किल्ल्याला स्थानिक लोक किल्ला म्हणून न ओळखता दुंधेश्वर महाराजांचा डोंगर म्हणून ओळखतात. या दुंधेश्वर मंदिराशेजारी एक आश्रम असुन येथे १० ते १५ जणांची राहण्याची सोय होऊ शकते. मंदिराच्या मागील बाजुस षटकोनी विहीर असुन तिचे पाणी पिण्याकरता वापरतात. मंदिराच्या समोरील भागात चार फुट उंचीचे चारही बाजूने कोरलेले दोन सुंदर विरगळ आहेत. दुंधेश्वर मंदीर अतिशय सुंदर असुन मंदिराला लागुन असलेल्या घनदाट झाडीतुन किल्ल्यावर जाणारी वाट सुरू होते. या वाटेने १५ मिनीटात आपण दगडात खोदलेल्या पायऱ्यापाशी येतो. या पायऱ्या चढून दहा मिनिटात आपण उध्वस्त तटबंदी ओलांडुन माचीसारख्या टप्प्यावर पोहोचतो. येथे समोरच गोरखचिंचेची दोन मोठी झाडे असुन या झाडांच्या सावलीत शंकराचे छोटे घुमटीवजा मंदिर व शेजारी एक दगडी इमारत उभी आहे. मंदिराच्या मागे पाण्याचे छोट कुंड व शेजारी छोटासा बांधीव दगडी हौद आहे. या पाण्याला वास येत असल्याने ते पिण्यासाठी योग्य नाही. हि वाट पुढे डोंगराच्या वरील बाजुस जाताना दिसते. या वाटेने किल्ल्याचा डोंगर चढत जाताना वाटेत दगडात खोदलेले हिरव्यागार पाण्याचे १० × ५ फूट आकाराचे टाके दिसते. हे टाके आंघोळीचे टाकं म्हणुन ओळखले जाते. वर जाणाऱ्या या पायवाटने दहा मिनिटात आपण गडावरील ध्वजस्तंभापाशी पोहोचतो पण वाटेत घसारा असल्याने जपून जावे लागते. ध्वजस्तंभाजवळुन गडाचा आटोपशीर गडमाथा तसेच आसपासचा सर्व प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. झेंड्याच्या उजव्या बाजूला एका वाड्याचे अथवा सदरेचे उध्वस्त अवशेष आहेत. येथून पुढे जाण्यासाठी पायवाट नसल्यामुळे आल्या वाटेने परत मंदिराजवळ यावे. मंदिराकडे उभ राहील्यावर समोरच दोन घरे दिसतात. या घरावरुन जाणारी पायवाट पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांकडे जाते. पायवाटेच्या थोड्या खालच्या अंगाला कातळात खोदलेली दोन पाण्याची टाकी आहेत. हे टाके देवटाके म्हणुन ओळखले जाते. त्यातील एका टाक्याचे पाणी थंडगार व चवदार आहे तर दुसरे टाके मात्र शेवाळलेले आहे. येथुन थोडे पुढे गेल्यावर वाट खाली उतरताना दिसते. या ठिकाणी गडाचे दुसरे प्रवेशदार असण्याच्या खाणाखुणा दिसतात. वापरात नसलेल्या या वाटेने उतरणे धोकादायक आहे. येथुन थोडे पुढे गेल्यावर डाव्या बाजूला अजून एक टाके दिसते पण यातील पाणी शेवाळलेले आहे. गडावर इतर काहीही अवशेष पहायला मिळत नाहीत. येथे आपली गडफेरी पुर्ण होते. दुंधा गडाचा गडमाथा लहान असल्याने गड पाहाण्यासाठी अर्धा तास पुरतो तर पायथ्यापासुन गडावर येण्यास अर्धा तास लागतो. माथ्यावरुन साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड, रतनगड, तांबोळ्या, मांगी-तुंगीचे सुळके, बिष्ठा, डेरमाळ, पिसोळ, कऱ्हा तसेच अजमेरा दिसतात. किल्ल्यांचा आकार व रचना पाहाता यावर फारच थोडी शिबंदी रहात असावी असे वाटते. कुठल्याही गॅझेटियर किंवा पुस्तकांत उल्लेख नसणारा हा किल्ला १९८५ साली इतिहास अभ्यासक गिरीश टकले यांनी वैनतेय गिर्यारोहण – गिरिभ्रमण संस्थेच्या माध्यमातून प्रकाशात आणला. दुन्धा गडापासून आठ कि.मी. अंतरावरील देवळाणे गावात प्राचीन असे शिवमंदिर असुन हे मंदिर व या शिवमंदिरावरील शिल्पे प्रेक्षणीय आहेत.
© Suresh Nimbalkar