दिंडोरी

प्रकार : गढी/ नगरकोट

जिल्हा : नाशीक

उंची : 0

श्रेणी : सोपी

महाराष्ट्राची डोळस भटकंती केल्यास तुम्हाला केव्हा कुठे काय पहायला मिळेल याचा नेम नाही. रामशेज किल्ला पाहुन कण्हेरगडला जाताना आमच्या बाबतीत नेमके हेच घडले. नाशिकहून १८ कि.मी.अंतरावर तळेगाव दिंडोरी गाव आहे. या गावात प्रवेश करण्यापुर्वी उजवीकडे एक बुरुज व त्यावर फडकत असलेला भगवा झेंडा दिसतो. हा बुरुज व झेंडा पाहुन आमची गाडी अचानक थांबली व पाऊले या बुरुजाच्या दिशेने वळली. तळेगाव दिंडोरी गावात असलेल्या या वास्तुबाबत काहीही माझ्या वाचनात आले नव्हते. दिंडोरी या तालुक्याच्या ठिकाणापासून साधारण ८ कि.मी.असलेली हि वास्तु म्हणजे एक चौबुर्जी गढी असून स्थानिक लोक या गढीस गोसाव्याची गढी म्हणून ओळखतात. साधारण १ एकरमध्ये पसरलेल्या या गढीची आज मोठ्या प्रमाणात पडझड झाली असुन या गढीची पश्चिमेला असलेली तटबंदी व त्याच्या टोकाला असलेले दोन बुरुज आजही सुस्थितीत आहेत. ... या तटाची लांबी १९० फुट असुन उंची २० ते २२ फुट आहे. उर्वरित दोन बुरुज अर्ध्यापेक्षा जास्त ढासळलेले आहे. शिल्लक असलेल्या तटाची कमी अधीक प्रमाणात हीच अवस्था आहे. तटाचे बांधकाम चुन्यामध्ये ओबडधोबड दगडांनी केलेले असुन फांजीवरील बांधकाम विटांनी केलेले आहे. गढीच्या उत्तर दिशेला असलेल्या दरवाजाची कमान व आतील बांधकाम आजही शिल्लक असुन त्यावर काटेरी झुडपे टाकून ते बंद करण्यात आले आहे. गढीच्या आतील भागात फिरताना नव्याने बांधलेले एक शिवमंदिर व काही नाथपंथीय समाध्या पहायला मिळतात. गढीत मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असुन इतर काही नसल्याने १० मिनिटात आपली भटकंती पुर्ण होते. गढीसमोरील मुख्य रस्ता ओलांडुन पलीकडील नव्याने बांधलेल्या मंदिरामागे गेले असता नगरदुर्गाची काही प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी व या तटबंदीतील उध्वस्त दरवाजा पहायला मिळतो. स्थानिक लोकांकडुन या गढीबाबत फारशी माहिती मिळत नाही.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!