दाभोळ

प्रकार : सागरी दुर्ग

जिल्हा : रत्नागिरी

उंची : ४५० फुट

श्रेणी : सोपी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य गाव म्हणजे दाभोळ. रत्नागिरी जिल्ह्याचे वर्णन वाचताना या जिल्ह्यात २६ किल्ले व ४ गढी असल्याचा उल्लेख येतो पण यासोबत दाभोळ किल्ला व चिपळूण गढी व संगमेश्वर गढी पुर्णपणे नष्ट झाल्याचे उल्लेखही येतात. बहुतांशी ठिकाणी दाभोळ किल्ला पुर्णपणे उध्वस्त झाल्याचे वाचनात येते तर पराग पिंपळे यांच्या साद सागराची या पुस्तकात चंडीका मंदिराच्या परीसरात दाभोळ किल्ल्याचे अवशेष असल्याचे वाचनात येते. काही तुरळक ठिकाणी आज दाभोळला किल्ला नसला तरी दाभोळच्या समुद्रासन्मुख टेकडीवर हा किल्ला होता असे उल्लेख येतात. प्र.के.घाणेकर हे आजच्या पिढीतील दुर्गभटक्यांचे श्रद्धास्थान. त्यांच्या कोकणातील पर्यटन या पुस्तकात आलेला दाभोळ किल्ल्याचा ओझरता उल्लेख वाचून मी देखील या किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष धावत्या भेटीत पाहण्याचे ठरवले पण प्रत्यक्ष जागेवर गेल्यावर मला केवळ अवशेषच नाही तर संपुर्ण किल्ला पहायला मिळाला. ... काही मिनिटांसाठी असलेली माझी किल्ल्याची भटकंती अर्ध्या दिवसाची ठरली. या ठिकाणी केवळ किल्ल्याचे अवशेषच नाही तर संपुर्ण किल्ला आहे आणि ज्या चंडीका मंदिराला भेट देतो ते या किल्ल्यातच वसलेले आहे. दाभोळ किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हे चंडीका मंदिरच गाठावे लागते. दाभोळ बंदराच्या तीन कि.मी. अलीकडे दापोली-दाभोळ रस्त्याच्या डावीकडे अर्धा कि.मी. आत चंडिकादेवी मंदिर आहे. दापोली पासुन हे अंतर २५ कि.मी. असुन या वाटेवर एस.टी.बसची चांगली सोय आहे पण फाट्यावर उतरून अर्धा कि.मी.आत चालत जावे लागते. मंदिराकडे येणारा पक्का रस्ता हा गडाची तटबंदी फोडूनच आत आणलेला आहे. येथे आल्यावर सर्वप्रथम देवदर्शन करून नंतरच आपल्या गडदर्शनास सुरवात करायची. चंडीकादेवीचे मंदीर गुहामंदीर असुन एका नैसर्गिक गुहेमध्ये देवीची तीन-साडेतीन फूट उंचीची पाषाणातील शेंदूर लावलेली मूर्ती आहे. या गुहेत खाली उतरण्यासाठी कातळात पायऱ्या कोरलेल्या आहेत. त्यांवरून सुमारे १०-१२ फूट अंतर आत चालत जावे लागते. या गुहेत कृत्रिम प्रकाश वर्ज्य ठरवला असल्याने केवळ समईच्या प्रकाशात खाली उतरून देवीचे दर्शन घ्यावे लागते. गुहेत देवीच्या मुर्तीला प्रदक्षिणा घालुन आल्या मार्गाने परत बाहेर पडावे. पुजाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार इ.स. १६६१ मधील दाभोळ स्वारीत छत्रपती शिवाजी महाराजांनी चंडीकादेवीचे व दाल्भेश्वराचे दर्शन घेतले होते. या मंदीराचे बदामीच्या गुहा मंदिराशी असलेले साम्य पहाता हे मंदीर इ.स.५५०-७८ मध्ये चालुक्य काळात बांधल्याचे मानले जाते. देवदर्शन झाल्यावर आपण आपल्या गडदर्शनास सुरवात करायची. मंदिराच्या आवारात येथील पुजाऱ्यांच्या दोन अलीकडील काळातील समाधी आहेत. मंदिराच्या खालील भागात बारमाही वाहणारा झरा असुन येथील टाक्यातील पाणी मंदिराशेजारी असलेल्या घरांना पिण्यासाठी वर्षभर पंपाने पुरवले जाते. टाक्याजवळ पडीक व मातीत गाडल्या गेलेल्या वास्तुची घडीव दगडात बांधलेली ओवरी पहायला मिळते. मंदिरात प्रवेश करण्यापुर्वी आपण एक लहानसा पुल ओलांडतो. हा पुल जांभ्या कातळात कोरलेल्या पाण्याच्या पाटावर बांधलेला असुन हे पाणी तटाखालुन किल्ल्यात आणलेले आहे. मंदिराच्या मागील बाजुस आपल्याला किल्ल्याची ढासळलेली तटबंदी पहायला मिळते. घडीव दगडात बांधलेली हि तटबंदी साधारण ८ फुट उंच आहे. या ठिकाणी असलेली तटबंदी बाहेरील बाजुने पाहील्यास तटबंदीतील घडीव चिरे व त्यातील बुरुज ठळकपणे पहाता येतात. बाहेरील बाजूने तटबंदी पाहुन झाल्यावर तटावर चढावे व तटावरून पुर्व दिशेने आपल्या गडफेरीस सुरवात करावी. साधारण अष्टकोनी आकाराचा हा किल्ला २४ एकरवर पसरलेला असुन संपुर्ण किल्ल्याच्या तटबंदीत आपल्याला २२ बुरुज सहजपणे दिसुन येतात. बुरुजांची संख्या जास्त असावी. या तटबंदीवरून खाली न उतरता साधारण १९१० फुट अंतर चालत जाता येते. या तटबंदीत आपल्याला गोलाकार बुरुजासोबत एक चौकोनी बुरुज पहायला मिळतो. पुर्व टोकावर असलेल्या बुरुजावर एक चौथरा बांधलेला आहे. पुर्व दिशेला असलेल्या तटबंदीमध्ये एक गाडलेले शौचकुप किंवा लहानसा दरवाजा असावा. तटबंदीवरून सरळ पुढे आल्यावर गडाचा पुर्वाभिमुख दरवाजा पहायला मिळतो. दरवाजाची दगडी चौकट आजही तटबंदीत असुन कमान मात्र शेजारी जमिनीवर पडलेली आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजुस दुहेरी तटबंदी असुन त्यात दोन बुरुज बांधलेले आहेत. दरवाजा पाहुन सरळ पुढे आल्यावर आपण गडच्या दक्षिण-पुर्व बुरुजावर येतो. या बुरुजावर भगवा झेंडा फडकवलेला आहे. या बुरुजावरून दाभोळ बंदर व दूरवर पसरलेले खाडीचे पात्र नजरेस पडते. येथुन खाली उतरत जाणाऱ्या तटावर मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असल्याने पुढे जाता येत नाही. येथुन खाली उतरून आंब्याच्या बागेतून मंदीराकडे जाताना घडीव दगडात बांधलेला एक चौथरा पहायला मिळतो. या चौथऱ्यावर आंब्याचे झाड लावलेले आहे. पुढे मंदिराच्या परीसरात आल्यावर आपल्याला वाहन तळाजवळ दोन बुरुज व उध्वस्त तटबंदी पहायला मिळते. रस्ता जिथे तटबंदीच्या आत शिरतो तिथुन सरळ गेल्यावर आपल्याला दोन जवळजवळ असलेले बुरुज पहायला मिळतात पण या बुरुजातील दरवाजा मात्र पुर्णपणे नष्ट झाला आहे. हा भाग पाहुन झाल्यावर किल्ल्यात असलेल्या घराकडील रस्त्यावरून खाली खाडीच्या दिशेने निघावे. या वाटेवर आपल्याला किल्याची सुस्थितीत असलेली तटबंदी तसेच खाडीच्या दिशेला असलेल्या दरवाजाचे अवशेष पहायला मिळतात. येथुन बाहेरील बाजुने तटाला फेरी मारत आपण एका एकाश्म म्हणजे एकाच दगडात कोरलेल्या गुहेजवळ येतो. या गुहेच्या दरवाजावर चौकट व शेजारी दोन कोनाडे कोरलेले आहेत. हि गुहा आत दोन भागात कोरली असुन गुहेच्या आत बसण्यासाठी ओटा व प्रकाशासाठी खिडकी कोरलेली आहे. तटबंदीच्या काठाने जाताना या तटबंदीत असलेले बुरुज पहायला मिळतात. काही ठिकाणी हे बुरुज मोठ्या प्रमाणात ढासळले आहेत. येथुन वर चढत जाणारी तटबंदी पुर्णपणे घडीव दगडात बांधलेली असुन या तटबंदीत सुस्थितीतील लहान दरवाजा पहायला मिळतो. दरवाजाच्या पुढील भागात घडीव दगडात बांधलेला चौथरा असुन या ठिकाणाला स्थानीक वेताळ चाळा म्हणुन ओळखतात. येथुन खाली उतरल्यास आपण बंदरावर पोहोचतो. या ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. संपुर्ण गडफेरीस दोन तास पुरेसे आहेत. दाभोळच्या बंदराजवळील टेकडीवर बांधलेला हा किल्ला हा सागरी दुर्ग असुन याच्या दोन बाजुस खाडीचे पाणी तर तर दोन बाजुस जमीन आहे. बाहेरील बाजुस असलेला ओढा किल्ल्यात फिरवुन केलेली पाण्याची सोय हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. प्राचीन काळी दालभ्यवती नावाने ओळखले जाणारे नगर म्हणजे आजचे दाभोळ. दालभ्य ऋषींच्या वास्तव्यावरून पडलेल्या या नावाचा कालांतराने दाभोळ असा अपभ्रंश झाळा. इजिप्तचा मॅसिडोनियन वंशातील टॉलेमी राजांच्या नकाशात दाभोळचा उल्लेख येतो. यावरून दाभोळचा पाश्चात्य व मध्य पूर्वेतील जगाशी व्यापार होत असल्याचे दिसुन येते. तेराव्या शतकापर्यंतचा दाभोळचा इतिहास चालुक्य, शिलाहार अशा हिंदू राजवटीचा इतिहास आहे. पश्चिम पट्टीवरील या बंदरावर समुद्रमार्गे पोर्तुगीज, डच, हबशी, तुर्के, इराणी यांची सतत आक्रमणे होत राहिली. रोमन, अरेबियन,इंग्रज अशा अनेक प्रवाशांनी दाभोळला भेट देऊन तेथील तत्कालीन वर्णने लिहून ठेवली आहेत. यादव साम्राज्याच्या अस्तानंतर मलिक काफुरने दाभोळला लष्करी ठाणे निर्माण केले पण इ.स. १३१४ मध्ये तो दिल्लीला परतल्यावर येथे स्वतंत्र मराठी राज्य अस्तित्वात आले. हे राजे विजयनगर सम्राटांचे मांडलिक होते. बहामनी राजवटीत ( इ.स.१३४७ ते १५००) अल्लाउद्दीन हसन बहामनशहाने शेवटच्या काळात दाभोळ जिंकुन त्याचे नाव मुस्तफाबाद ठेवले पण त्याला फार काळ दाभोळ ताब्यात ठेवता आले नाही. त्यानंतर हा भाग संगमेश्वरच्या स्वतंत्र राजाच्या ताब्यात होता. अंजनवेलची वहिवाट या हस्तलीखितानुसार १५ व्या शतकापूर्वी मौजे गुढे तर्फ वलंबे येथें पवार नावाचा मराठा सरदार गढी बांधून या भागावर अंमल करत होता. इ.स.१५०२ च्या (शके १७२४) सुमारास मुस्तफाखान या सरदारानें या पवाराच्या गढ्या उध्वस्त करून दाभेम (दाभोळ) येथें सुभा स्थापन केला. बर्जेस यांच्या फिरस्तामध्ये आझमखान नावाचा सरदार हिजरी ९०० मध्ये म्हणजे इ.स.१४९४ मध्ये कोकणात आल्याची नोंद येते. यावेळी कोकणात नागोजीराव यांचे राज्य होते. दाभोळला झालेल्या रणसंग्रामात आझमखान मरण पावला पण नागोजीचा पराभव झाला. आझमखान याच्या मुलाने मुस्तफाबाद नाव बदलून हामजाबाद असे ठेवले. कोकणातील हा भाग आदिलशाहीच्या ताब्यात आल्यावर दाभोळ हे या प्रांताचे मुख्य ठिकाण होते. आदिलशाहीत दाभोळ बंदराचे महत्त्व अधिक वाढले. अरबस्तानातून अरबी घोडयांची आयात दाभोळ बंदरात होत असे. विजापूर-गुहागर हा राजमार्ग बनला होता. दाभोळ बंदरातील व्यापारी जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी विजापूरकरांनी खाडीच्या मुखावर एका बाजुस अंजनवेल तर दुसऱ्या बाजुस दाभोळ किल्ला बांधला असावा. दाभोळ बंदर आदिलशाहीच्या ताब्यात असले तरी समुद्रावर पोर्तुगीजांचीच सत्ता होती. इ.स.१५०८ मध्ये दाभोळ किल्ल्यात ६००० सैन्य असुन त्यात ५०० तुर्की असल्याचा उल्लेख येतो. इ.स.१५१० ते १५२२ दरम्यान पोर्तुगीजांनी दाभोळ बंदर तीन वेळा लुटले. इ.स.१५२० मध्ये पोर्तुगीजांनी दाभोळ मधील घोड्यांच्या आयातीचे रक्षण केल्यास त्यांच्याशी मैत्री करण्याचा प्रस्ताव इस्माईल आदिलशहाने ठेवला पण पोर्तुगीजांनी तो मान्य केला नाही. इ.स.१५४७ मध्ये दाभोळ येथे दोन किल्ले व ४००० रहिवाशी असल्याचा उल्लेख येतो. इ.स.१५८२ मध्ये पोर्तुगीज व आदिलशाहीत संघर्ष निर्माण झाला. आधीच्या करारानुसार आदिलशहाने दाभोळचा किल्ला पाडून त्यातील तोफा पोर्तुगीजाना देण्याचे मान्य केले होते तसेच डेट व जकात या पोर्तुगीजांच्या जप्त केलेल्या नौका परत करायच्या होत्या. पण आदिलशहाने हा करार न पाळल्याने पोर्तुगीजांणी आपले आरमार दाभोळ बंदरात आणले. यावर घाबरून अली आदिलशहाने २९ जानेवारी १५८२ रोजी पोर्तुगीजांशी नवा करार केला. तेराव्या शतकाच्या मध्यापासून तर सोळाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत जवळपास ३०० वर्षांहून अधिक काळ मुसलमानी सत्तांचा अंमल दाभोळवर राहिला. इ.स १६५१ (शके १५७४) च्या सुमारास शिवाजी महाराजांनी दाभोळ प्रांत ताब्यात घेतला व ते आपल्या आरमाराचे ठाणे केले शिवाय मुलकी खात्यात दाभोळ हा एक सुभा केला. या काळात दाभोळ येथे किल्ला असावा कारण १६७३ ते १७२४ दरम्यान दाभोळ बंदराच्या काढलेल्या काही पोर्तुगीज चित्रात गावामागे असलेल्या टेकडीवर किल्ल्याची तटबंदी स्पष्टपणे दिसुन येते. शिवकाळात व नंतर या किल्ल्याचा दाभोळ किल्ला असा स्वतंत्र उल्लेख कोठेही येत नाही. पुढील काळात दाभोळ बंदराचा वापर कमी झाल्याने या किल्ल्याचे महत्व संपले व किल्ला विस्मृतीत गेला.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!