दातेगड / सुंदरगड
प्रकार : गिरीदुर्ग
जिल्हा : सातारा
उंची : ३२६० फुट
श्रेणी : सोपी
आंग्ल कवी शेक्सपियरने म्हटले आहे कि नावात काय आहे? नावात काय आहे हे पहाण्यासाठी त्याने एकदा सुंदरगड पहायला हवा होता. नावातील सुंदरता प्रत्यक्षात अनुभवता येणारा गड म्हणजे सुंदरगड उर्फ दातेगड. नावाप्रमाणेच सुंदर असलेल्या या गडाची सुंदरता एकदा तरी अनुभवायला हवी. चला तर मग या सुंदरगडची भटकंती करायला. मुंबई – कोल्हापूर रस्त्यावरील उंब्रजपासून २८ कि.मी.वर पाटण हे तालुक्याचे गाव आहे. टोळेवाडी व कवडेवाडी हि दातेगडाच्या पायथ्याची दोन गावे असुन पाटण-टोळेवाडी हे अंतर ७ कि.मी. तर पाटण-कवडेवाडी हे अंतर १५ कि.मी.आहे. टोळेवाडीतुन गेल्यास उध्वस्त तटबंदीतुन आपला गडावर प्रवेश होतो तर कवडेवाडी येथुन गडावर जाण्याचा राजमार्ग आहे. या दोन्ही वाटांनी गडावर जाण्यास १५ मिनीटे पुरेशी होतात. या वाटेवर एस-टी बस नसल्याने खाजगी वहानाचा वापर सोयीचा ठरतो. पाटणहुन चाफोलीमार्गे कवडेवाडीकडे जाताना डाव्या बाजुस दातेगडाची टेकडी व रस्त्याशेजारी असलेला वाहनतळ नजरेस पडतो.
...
टीम दातेगड या किल्ल्याच्या संवर्धनासाठी कार्यरत असुन त्यांच्या परिश्रमाने या किल्ल्याचा कायापालट झाला आहे. त्यांनी येथे लहानसा वाहनतळ उभारला असुन तेथुन गडावर जाणारा राजमार्ग नव्याने कार्यरत केला आहे. या वाटेने जाताना मुळ मार्गाच्या काही खाणाखुणा दिसुन येतात. एक लहानसा चढ चढुन दरीच्या काठाने तटबंदी खालुन जाणारी हि वाट आपल्याला वरून माराच्या टप्प्यात ठेवत गडाच्या पुर्वाभिमुख दरवाजात आणुन सोडते. या वाटेवर आपल्याला एक नैसर्गिक व एक कोरीव अशा दोन गुहा पहायला मिळतात. मुख्य दरवाजासमोर १०-१२ पायऱ्या बांधलेल्या असुन दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस पहारेकऱ्यांसाठी देवड्या कोरलेल्या आहेत. दरवाजाची कमान आजही कशीबशी तग धरून असुन समोरच कातळात कोरलेली ६ फुट उंचीची मारुतीची आवेशपुर्ण मुर्ती आहे. या मुर्तीच्या डावीकडील भिंतीत त्याच आकाराची गणपतीची मुर्ती असुन या दोन्ही मुर्ती अतिशय कलात्मकरीतीने कोरलेल्या आहेत. येथुन गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळकोरीव मार्ग असुन या वाटेवर डावीकडील भिंतीत एक लहान तोंडाची चौकोनी गुहा आहे. गडाचा हा संपुर्ण भाग खडक कोरून निर्माण केलेला आहे. पायऱ्या चढुन आल्यावर आपला गडावर प्रवेश होतो. गडमाथा समुद्रसपाटीपासुन ३२६० फुट उंचावर असुन दक्षिणोत्तर ४ एकरवर पसरलेला आहे. गडमाथ्यावर आल्यावर डावीकडील बाजुने आपण आपल्या गडफेरीस सुरवात करावी. या वाटेवर आपल्याला सर्वप्रथम नजरेस पडते ती १५० फुट लांब,१० फुट रुंद व साधारण ७० ते ८० फुट खोल आकाराची कातळात कोरलेली प्रचंड मोठी विहीर. या विहिरीच्या काठावर एक दगडी ढोणी असुन विहिरीत उतरण्यासाठी लहान व मोठया अशा दोन्ही आकाराच्या पायऱ्या कोरलेल्या आहेत. विहिरीच्या तळात डावीकडील भिंतीत ८ X ८ फुट आकाराची गुहा कोरलेली असुन या गुहेत शिवलिंग व नंदीची स्थापना केलेली आहे. याच भिंतीच्या वरील बाजुस मध्यावर गजप्रतीमा कोरलेली असुन ती विहिरीच्या काठावरून फेरी मारताना नजरेस पडते. विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. विहिरीच्या दुसऱ्या टोकाला काठावर आयताकृती आकाराचे टाके खडकात कोरलेले आहे. विहीर व तटबंदी यातुन पुढे जाताना दगडी चिरे काढल्याने निर्माण झालेले टाके व दोन वास्तूंचे खडकात कोरलेले चौथरे पहायला मिळतात. गडाचे हे उत्तर टोक पाहुन तटबंदीच्या काठाने आपली गडफेरी सुरु ठेवावी. या वाटेने पुढे जाताना मध्यम आकाराचे अजुन एक आयताकृती टाके नजरेस पडते. हे टाके व पायऱ्यांची विहीर वगळता इतर कोणत्याही टाक्यात पावसाळ्यात देखील पाणी दिसुन येत नाही.हे टाके पाहुन पुढे आल्यावर कातळात कोरलेला एक मोठा हौद पहायला मिळतो.हा बहुदा वास्तुचौथरा असावा. या भागातील तटबंदी आजही सुस्थितीत असली तरी त्याखाली भलीमोठी नैसर्गिक भेग पडल्याने ती केव्हाही ढासळण्याची शक्यता आहे. पुढे उजव्या बाजुस एक लहान उंचवटा असुन तेथुन संपुर्ण गडमाथा नजरेस पडतो.उंचवटा उतरून खाली आल्यावर आपण माथ्यावर प्रवेश केला त्याच्या पुढील बाजुस आपली गडफेरी सुरु होते. या वाटेने जाताना डावीकडील तटबंदीच्या काठावर कातळात कोरलेली दोन चौकोनी टाकी, एक लहान गोलाकार विहीर तसेच काही लहान वास्तुंचे चौथरे दिसतात. या वाटेने आपण गडाच्या दक्षिण टोकावर पोहोचतो. या भागात गडाची मोठया प्रमाणात पडझड झालेली असुन एका बुरुजाचा खडकात कोरलेला पाया दिसतो. येथील एकुण अवशेष, घडीव दगड व खाली उतरत जाणारी वाट पहाता या ठिकाणी गडाचा दुसरा दरवाजा असण्याची शक्यता आहे. येथुन मागे फिरून दुसऱ्या बाजुच्या तटबंदीच्या काठाने पुढे जाताना या तटबंदीत एक शौचकूप पहायला मिळते. येथुन पुढे आल्यावर एक बांधीव वास्तुचौथरा पाहुन आपण गडमाथ्यावर प्रवेश केला त्या ठिकाणी पोहोचतो व आपली गडफेरी पुर्ण होते. संपुर्ण गडफेरी करण्यास एक तास पुरेसा होतो. दातेगडावरुन गुणवंतगड तसेच खुप दूरवरचा परीसर पहायला मिळतो. मध्ययुगात चिपळूण - पाटण - कराड - विजापुर हा एक महत्वाचा व्यापारी मार्ग होता. या मार्गावर देखरेख करण्यासाठी जंगलीजयगड, गुणवंतगड, वसंतगड, सदाशिवगड यासारखे अनेक लहान मोठे किल्ले बांधले गेले. दातेगड किल्ल्यांचा देखील यात समावेश होतो. दातेगडावरील कातळात कोरलेली विहीर पहाता हा किल्ला शिवपूर्व काळात बांधला असल्याचे स्पष्ट होते. शिलाहार घराण्यातील राजा भोज दुसरा याने बाराव्या शतकात हा किल्ला बांधल्याचे मानले जाते. पंधराव्या शतकात शिर्क्यांच्या ताब्यात असणारा हा गड मलिक उत्तुजारने शिर्क्यांचा पराभव करुन बहामनी साम्राज्यास जोडला. बहामनी साम्राज्याच्या अस्तानंतर हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात आला. इ.स. १५२६च्या सुमारास गुणवंतगड व दंतगिरी परगण्याचे देशमुखी मिळवलेले चालुक्य कुळातील साळुंखे यांचे वंशज तुकोजी आणि रामराव या बंधुची सातारा व कोकणपट्टय़ातील भागाच्या बंदोबस्ताकरता विजापूर दरबाराच्या वतीने नेमणूक झाली. विजापूरच्या कल्याण सुभ्याहून तुकोजी आपले बंधू रामराव यांच्यासमवेत ५ हजारांच्या फौजेसह स्वारीस निघाले. सर्वप्रथम ते साताराप्रांती आले आणि त्यांनी पाटण परगणा सर केला. त्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील धामधूम मोडून त्यांनी आपला मोर्चा रत्नागिरीकडे वळवला. या कामगिरीमुळे आदिलशहाने तुकोजीनी जिंकलेला सर्व प्रदेश त्यांच्या तैनातीला नेमून दिला. अफजलखानच्या वधानंतर १६७३ साली सातारा मोहीमेत शिवाजी महाराजांनी कल्याणगड, सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदन-वंदन यांच्यासोबत हा किल्ला देखील ताब्यात घेतला व गडाची जबाबदारी साळुंखे नावाच्या सरदारावर सोपवली. पाटण परिसरात वास्तव्यास असल्याने पुढे हे घराणे पाटणकर या नावाने ओळखले जाऊ लागले. याच काळात दातेगडास सुंदरगड नामाभिमान प्राप्त झाले. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांकडे गेला पण इ.स.१६८९ मध्ये मराठ्यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला. संताजी घोरपडे आणि चांदजी पाटणकरांनी दक्षिणेत गाजवलेल्या पराक्रमासाठी छ. राजाराम महाराजांनी सरदार पाटणकरांना पाटण महालातील ११ व कराड महालातील १ अशी १२ गावे इनाम दिली होती. १७०७ साली छत्रपती शाहूमहाराजांनी पावसाळ्यात हा प्रदेश जिंकला. इ.स.१७४५ मध्ये पेशवे आणि तुळाजी आंग्रे यांच्या वादात आंग्र्यांनी दातेगडाला वेढा घातला पण हा किल्ला त्यांना जिंकता आला नाही. स्वराज्याच्या तीनही छत्रपतींची सोबत करणारे रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांचे तीन महिने या गड़ावर वास्तव्य होते. अठराव्या शतकांत दातेगडावर पंतप्रतिनिधीचे लोक रहात असत व जेव्हा पेशव्यांच्या पक्षाकडील हुकूम सुटत तेव्हां त्यांच्या अंमलबजावणीस ते अडथळे निर्माण करीत. त्यामुळे पेशव्यांनी या गडाचा ताबा घेतला. १७५२ साली दादोपंतांबरोबर ताराबाईंवर लक्ष ठेवण्यासाठी बाळाजी विश्वनाथ या भागात सैनिकांसोबत होते. मे १८१८ मध्ये मराठा-इंग्रज युद्धात कोणतीही लढाई न करता हा किल्ला कॅप्टन ग्रॅट या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आला. वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्यास खाजगी वहानाने मच्छिंद्रगड, गुणवंतगड, दातेगड आणि वसंतगड हे चार किल्ले एका दिवसात पहाता येतात.
© Suresh Nimbalkar