त्रिवेणीगड/चौगावचा किल्ला

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : जळगाव

उंची : १४६० फुट

श्रेणी : मध्यम

जळगाव जिल्ह्य़ात गडकोट तसे कमीच. जे आहेत ते हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आणि भुईकोट. पण याच जळगावात अहीर या राजघराण्यांचा वारसा सांगणारा आवर्जून पाहाण्यासारखा नितांत सुंदर डोंगरी किल्ला आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. गडकिल्ल्यांबाबत जास्त प्रसिध्द नसलेल्या जळगाव जिल्ह्य़ात महाराष्ट्र – मध्यप्रदेश सीमारेषेवर आदिवासी बहुल भागात चौगाव किंवा त्रिवेणीगड हा डोंगरी किल्ला उभा आहे. गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या तीन ओढयांच्या संगमामुळे स्थानिक लोक या गडाला त्रिवेणीगड अथवा विजयगड या नावाने ओळखतात. प्राचीन काळापासून दक्षिणेतून मध्यप्रदेशात जाणाऱ्या भिराम घाट या डोंगरी भागावर लक्ष ठेवण्यासाठी त्रिवेणीगड बांधला गेला. उत्तर-मध्य प्रांतातून दक्षिणेतील सुरत, भडोच बंदरातून भारताबाहेर निर्यात होणाऱ्या मालासाठी चौगाव ही बाजारपेठ असल्याने त्रिवेणीगड महत्वाचा होता. ... असा हा प्राचीन काळाशी धागेदोरे जोडणारा चौगावचा किल्ला किंवा त्रिवेणीगड समुद्रसपाटीपासून २००० फुट उंचीवर तर पायथ्यापासुन ४०० फुट उंचीवर उभा आहे. चौगाव गावापासून उत्तरेला असणाऱ्या सातपुडा डोंगररांगेत विराजमान झालेल्या या गडाचे एकुण क्षेत्रफळ ३० एकर असुन गडाची लांबी १७०० फुट तर रुंदी ८०० फुट आहे. त्रिवेणीगडास भेट देण्यासाठी जळगावहून चोपडा मार्गे किल्ल्याजवळच्या चौगावात यावे किंवा अंमळनेर-लासूरमार्गे चौगाव गाठावे. लासूरपासून चौगाव फक्त ३ कि.मी. अंतरावर आहे. त्रिवेणीगडाचा पायथा चौगावापासुन ४ कि.मी.अंतरावर असुन गावातून एक कच्चा रस्ता गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या महादेव मंदिराजवळ येतो. गडावर पहिल्यांदा जात असल्यास या रस्त्याला बरेच फाटे फुटत असल्याने व वाटेत वस्ती नसल्याने गावातुन माहितगार बरोबर घ्यावा. गडावर जाताना गावात एक बांधीव तलाव व त्याच्या काठावर काही अवशेष दिसून येतात. या अवशेषात एक गजलक्ष्मीचे शिल्प दिसून येते. महादेव मंदिराजवळ तीन ओढय़ांच्या प्रवाहांचा संगम झाल्यामुळे यास ‘त्रिवेणी संगम’ म्हणून ओळखले जाते. महादेवाचे मंदिर अलीकडील काळात बांधलेले असुन सुंदर व प्रशस्त आहे. या मंदिराभोवतीच्या जंगलात भरपूर सरपण व ओढय़ाला थंडगार पाणी असल्यामुळे मुक्काम करण्यास हे मंदिर योग्य आहे. पावसाळयात मात्र येथे राहण्याची गैरसोय होईल. त्रिवेणी संगमावरील या मंदिराच्या गाभाऱ्यात शिवलिंग व नंदी असुन सभोवार असणारे खांब व त्यावर तोललेल्या कमानी मंदिर परंपरेला साजेशा आहेत. मंदिराच्या आवारात पंचमुखी हनुमानाची एक मुर्ती असुन दोन गणेशमुर्ती आहेत. मंदिरा भोवती दगड – विटांचे चौथरे असून इतिहासकाळात या जागेस बडा बाजार नावाने ओळखले जात असे. किल्ला व आसपासचा परिसर वनखात्याच्या ताब्यात असुन हिरवाईने नटला आहे. या ठिकाणी वनखात्याचे रक्षक तैनात असतात. मंदिर परिसर पाहून शेजारील ओढा पार करून मळलेल्या पायवाटेने थोडे पुढे गेल्यावर आपण एका पठारावर येऊन पोहोचतो. येथुन समोरच झाडीने भरलेला त्रिवेणीगड नजरेस पडतो. या किल्ल्याच्या आसपास अनेक टेकड्या असुन त्या स्थानिक नावाने ओळखल्या जातात. पठारावरून गडाच्या डाव्या बाजूने जाणारा मार्ग आपल्याला नाळीच्या वाटेने गडाजवळ घेऊन जातो. चौगावचा किल्ला जरी उंचीने जरी कमी असला तरी याचा वरील कातळटप्पा सभोवताली तासलेला आहे. महादेव मंदिरापासून चालायला सुरुवात केल्यानंतर साधारण तासाभरात आपण गडाच्या पूर्वाभिमुख प्रवेशद्वाराशी येऊन पोहोचतो. घडीव आयताकृती दगडात बांधलेलला हा दरवाजा आजही उत्तम स्थितीत असून त्याच्या माथ्याची कमान फारच सुंदर आहे. दरवाजा शेजारची तटबंदी मात्र ढासळलेली आहे. या दरवाजातून आत गेल्यावर चौगाव किल्ल्याचा झाडीभरला माथा आपणास दिसतो. गडप्रवेश केल्यावर समोरच एक मातीने भरलेला एक कोरडा तलाव दिसतो. तलाव पार करून डाव्या हाताने पुढे गेल्यावर झेंडा बुरूज लागतो. या बुरूजा भोवतीची तटबंदी आजही उत्तम स्थितीत उभी असून येथेच आसपास भिंती शिल्लक असणारी एक वास्तू नजरेस पडते. ही वास्तू पाहून पुढे गेल्यावर एका झाडाखाली कोरीव दगड एकत्र करून रचलेले दुर्गादेवीचे मंदिर पाहायला मिळते. या छोटय़ा मंदिरात देवीचा मूळ तांदळा व अलीकडे बसविलेली दुर्गेची मूर्ती असून मंदिर परिसरात इतस्तत: पडलेले कोरीव दगड आपणास दिसतात. या दगडात दोन शिल्पे पडलेली असुन एक पशुवधाचे शिल्प आहे. या दगडावरून येथील पुरातन मंदिर काही वेगळेच असणार याची कल्पना येते. मंदिराच्या पुढे थोडे खालच्या बाजूस झाडीभरल्या भागात कातळातील कोरीव टाक्यांचा समूह असून या टाक्याच्या आतील बाजुस पाच कमानीयुक्त गुहा कोरलेल्या दिसतात. या टाक्याच्या मधोमध असलेल्या भिंतीवरून आपण या गुहाकडे जाऊ शकतो. या गुहा टाक्यातील पाण्याने भरल्या असल्याने ही लेणी बाहेरूनच पाहावी लागतात. गडावरील हा टाकीसमूह पाहून समोरील चढ चढून आपण उत्तरेकडील उंचवटय़ावर बांधलेल्या राजप्रसादाच्या इमारतीजवळ पोहोचतो. या वाडय़ास स्थानिक लोक गवळी राजांचा राजवाडा म्हणून ओळखतात. या वाडय़ाच्या सभोवती असलेल्या २०-२५ फूट उंचीच्या दगड व चुन्याच्या मदतीने बांधलेल्या भिंती आजही उत्तम स्थितीत उभ्या आहेत. या भिंतीच्या माथ्यावर दोन टप्प्यात केलेले विटांचे नक्षीकाम फारच सुंदर असून असे काम इतरत्र कोणत्याही किल्ल्यावर पाहायला मिळत नाही. त्यामुळे त्रिवेणीगडावरील राजवाड्याचे विटांचे नक्षीकाम आपल्या कायम लक्षात राहते. पूर्व बाजूने प्रवेशद्वार असलेल्या या वाडय़ाच्या आत गेल्यावर समोरच एक भिंत असून तिला वळसा मारून आत प्रवेश केल्यावर या वाडय़ाची भव्यता आपल्या नजरेत भरते. या वाडय़ाच्या आत सध्या सागवान झाडांची गर्दी झाल्याने पालापाचोळा तुडवत थोडेसे जपुनच आत फिरावे लागते. या वाडय़ाच्या आतील बाजूस अनेक दालने, देवळ्या व कोनाडे आजही शिल्लक असून हे सर्व पाहिल्यानंतर गड नांदता असतानाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. याच्या एकंदरीत बांधणीवरून ही बहुदा सदर वा दरबाराची वास्तू असावी. या वाडय़ासमोरील मोकळ्या जागेत सहा फूट लांबीच्या चार ऐतिहासिक तोफा १९७७ साली सापडल्या त्या सध्या चोपडा तहसीलदार कचेरीच्या आवारात ठेवण्यात आल्या आहेत. या प्रासादाच्या पलीकडेच आणखी एका छोटय़ा वाडय़ाचे अवशेष आहेत. वाडयाच्या पुढून खाली उतरल्यावर गडाच्या उत्तर बाजुस थोडं खालच्या बाजूस गडाचे दुसरे प्रवेशद्वार आहे. उतारावर दरीच्या बेचक्यात बांधलेला हा दरवाजा सुस्थितीत असुन या भागातील गडाची तटबंदी ठळकपणे दिसून येते. हा सर्व परिसर झाडीने व्यापलेला असुन आतील वास्तू दिसत नाहीत. त्रिवेणी गडाच्या पूर्व भागात पावसाळी पाण्याचा एक तलाव,एक चोरदरवाजा व दोन ठिकाणी तटामधील जंग्या दिसुन येतात. उरलेला भाग बांधकाम विरहित असून या भागात बेलाची झाडे मोठया प्रमाणात आहेत. आपण थोडया वेळात या भागाची चक्कर मारून आल्यावाटेने दक्षिण दरवाज्यातून गड उतरू शकतो. या दरवाजाने खाली उतरताना एक वाट आपल्याला गडाच्या डोंगराला बिलगुन पुढे जाताना दिसते. या वाटेने थोडे पुढे गेल्यावर आपल्याला खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसून येतात. ही खांबटाकी असुन या टाक्यातील पाणी बर्फासारखे थंडगार असुन चवदार आहे. गडावर पिण्यायोग्य पाणी फक्त या टाक्यात आहे.येथुन मागे फिरून परत मूळ वाटेला लागावे. संपुर्ण गडदर्शन तीन तास तरी हाताशी हवेत. त्रिवेणीगडाच्या इतिहासावर नजर टाकल्यास या किल्ल्यावर असणारी कातळकोरीव टाकी व त्यांच्या शेजारील लेणीसमान गुहा पाहता या किल्ल्याची उभारणी प्राचीन काळात झाली असणार यात शंका नाही. स्थानिक लोक अहीर राजांना गवळीराजे म्हणुन संबोधन करतात. किल्ल्यावरील वाडयाला गवळीराजांचा राजवाडा म्हणून ओळखले जाते. जळगाव परिसरातील किल्ल्यांवर साधारणपणे अहीर घराणे. राष्ट्रकूट, यादव व त्यांचे मांडलिक निकुंभ यांची सत्ता होती. यावरून हा गडदेखील याच राजसत्तेच्या ताब्यात असावा. जळगाव जिल्हा म्हणजे कोरडा , दुष्काळसदृश, कमी झाडी असणारा भूभाग म्हणून ओळखला जात असला तरी त्रिवेणीगड मात्र या सर्व वास्तवाला फाटा देत बऱ्यापैकी हिरवीगार झाडी – झुडूपे व बारा महिने थंडगार पाण्याने भरलेली टाकी आपल्या अंगाखांद्यावर बाळगून आहे. त्रिवेणीगड जळगाव जिल्ह्य़ातील आवर्जून पाहावा अशा किल्ल्यांपैकी एक असून थोडा लांबचा प्रवास करायला लागला तरी हरकत नाही पण दुर्गप्रेमीनी एकदा तरी या किल्ल्याला भेट द्यायला हवी.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!