तोरगळ
प्रकार : भुईकोट
जिल्हा : बेळगाव
उंची : 0
श्रेणी : सोपी
बेळगाव जिल्ह्यातील दुर्गभ्रमंती करताना रामदुर्ग तालुक्यात आपल्याला रामदुर्ग, मुद्कावी, तोरगळ असे एकापेक्षा एक सुंदर दुर्ग पहायला मिळतात. यातील सर्वात सुंदर दुर्ग म्हणजे ११ व्या शतकात मलप्रभा नदीकाठी बांधलेला तोरगळ किल्ला. या किल्ल्यात असलेले भुतनाथ मंदीर संकुल आपल्याला किल्ल्याच्या प्राचीनतेची साक्ष देते. तोरगळ किल्ला बेळगाव पासुन ८४ कि.मी.अंतरावर असुन गोकाक येथुन ५६ कि.मी.तर रामदुर्ग या तालुक्याच्या ठिकाणाहुन १० कि.मी.अंतरावर आहे. संपुर्ण तोरगळ गाव या किल्ल्यात वसलेले आहे. गिरीदुर्ग भूदुर्ग अशी दुहेरी रचना लाभलेला हा किल्ला २३० एकरवर पसरलेला असुन बेळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा दुर्ग आहे. किल्ल्याच्या एका बाजुस मलप्रभा नदीचे पात्र असुन दुसऱ्या बाजुस खंदक खोदून नदीचे पाणी या खंदकात सोडण्यात आले आहे. किल्ल्याची तटबंदी उत्तर दिशेला असलेल्या टेकडीच्या माथ्यापर्यंत बांधत नेली आहे.
...
टेकडीच्या माथ्यावर असलेल्या या किल्ल्याच्या मध्यभागी तटबंदी उभारून टेकडीवरील किल्ला दोन भागात विभागलेला आहे. कोटाचा बालेकिल्ला गडाच्या मध्यवर्ती भागात असुन साधारण २.५ एकरवर पसरलेला आहे. जमिनीवरील किल्ल्याला खंदक असूनही दुहेरी तटबंदीचे सरंक्षण दिले आहे तर काही ठिकाणी तिहेरी तटबंदी बांधलेली आहे. तोरगळ गाव किल्ल्यात असल्याने संपुर्ण किल्ल्यात गाडीरस्ता झाला असुन किल्ल्याचे दरवाजे इतके प्रशस्त आहेत कि चारचाकी वाहन त्यातून सहजपणे ये-जा करतात. गाडीने एका बाजूने किल्ल्यात शिरून दुसऱ्या बाजूने बाहेर पडल्यास या तटबंदीतील एकुण सहा दरवाजे पार करावे लागतात. प्रत्येक दरवाजा अप्रतिम असुन कोरीवकामाने सजवलेला आहे. रामदुर्ग कडून येताना किल्ल्याच्या दक्षिणपुर्व टोकावर असलेल्या पुर्वाभिमुख दरवाजातुन आपला गडात प्रवेश होतो. या दरवाजासमोर खंदक खोदलेला असुन मलप्रभा नदीचे पाणी या खंदकात वळवले आहे. आता मात्र हा खंदक कोरडा पडलेला आहे. नंतरच्या काळात या खंदकावर दगडी पुल बांधलेला आहे. या खंदकात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या असुन या दगडी पुलाखालुन नदीपात्राकडे जाण्यासाठी मार्ग ठेवला आहे. खंदकाचा बुरुजाकडील भाग तटबंदीने बंदीस्त केला असुन त्यात खंदकात उतरण्यासाठी लहान दरवाजा ठेवला आहे. नदीपात्रात चौथऱ्यावर बांधलेले शिवमंदिर असुन काही कोरीव शिल्प पडलेली आहेत. गडाचा हा मुख्य दरवाजा दोन मोठया बुरुजामध्ये बांधलेला असुन बुरुजावर चर्या, नक्षीदार सज्जे तसेच तोफा व बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके आहेत. दरवाजातुन आत आल्यावर डावीकडे तटबंदीला लागुन पहारेकऱ्यासाठी दोन कमानीदार ओवऱ्या असुन उजवीकडे तटबंदीला लागुन मोठा चौथरा व त्यापुढे काही अंतरावर कोरीव मंदीर बांधलेले आहे. मंदिराच्या पुढील भागात गडाचा दुसरा दरवाजा आहे. हा संपुर्ण भाग चारही बाजुने बंदीस्त असुन शत्रु आत शिरल्यास येथे कोंडण्यासाठी हि रणमंडळाची रचना आहे. गडाचा दुसरा दरवाजा आपल्याला पन्हाळा किल्ल्यावरील दरवाजाची आठवण करून देतो. या दरवाजाच्या बाहेरील व आतील बाजुस अनेक कोरीव शिल्पपट आहेत. दरवाजाच्या आतील दोन्ही बाजुस उंच चौथरा बांधलेला असुन दरवाजाचा वरील भाग चौथऱ्याच्या वरील कमानीवर तोललेला आहे. दरवाजाच्या आत दोन्ही बाजुस चौथऱ्यावर तसेच दरवाजाच्या वरील भागात जाण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. पायऱ्यांनी दरवाजाच्या वरील भागात गेले असता या दरवाजाच्या आसपास असलेला गडाचा संपुर्ण परिसर नजरेस पडतो. येथील तटबंदीवरून गडाच्या मुख्य दरवाजाशेजारी असलेल्या दोन्ही बुरुजावर जाता येते. दरवाजाच्या उजवीकडे दुरवर सफेद रंगाने रंगवलेली लहान मशीद आहे. दुहेरी तटबंदीतील हा मार्ग पार करत आपण गडाच्या तिसऱ्या दरवाजात पोहोचतो. या दरवाजाच्या अलीकडे डाव्या बाजुस नदीकडे उतरत जाणार मार्ग आहे. या ठिकाणी असलेली तटबंदी काही प्रमाणात ढासळलेली आहे. गडाचा तिसरा दरवाजा दुमजली असुन या दरवाजाच्या वरील भागात चारही बाजुस कमानी आहेत. हि तिसरी तटबंदी पार करत आपण मुख्य गडात प्रवेश करतो. या दरवाजाने आत प्रवेश केल्यावर २ मिनिटे चालल्यावर रस्त्याच्या उजवीकडे असलेल्या घरांमधून जाणारी एक लहान गल्ली दिसते. या गल्लीतुन सरळ गेल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदीजवळ पोहोचतो. या तटबंदीत गोलाकार आकाराचा मोठा बुरुज पहायला मिळतो. तटबंदीवर चढुन गेल्यावर बुरुजावर जाण्यासाठी पायऱ्या बांधल्या आहेत. या बुरुजाच्या मध्यभागी गोलाकार चौथरा बांधलेला असुन या चौथऱ्याखाली १२ फुट लांबीची तुटलेली भलीमोठी बांगडी तोफ पहायला मिळते. तोफ पाहुन पुन्हा रस्त्यावर येऊन सरळ वाटेने जाताना उजवीकडे आदिलशाही काळातील एक मशीद पहायला मिळते. या मशिदीला लागुन रस्त्याच्या बाजुस दोन उध्वस्त ओवऱ्या आहेत. मशिदीकडून उजवीकडे जाणारा रस्ता आपल्याला किल्ल्याच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बालेकिल्ल्याकडे घेऊन जातो. या वाटेवर उजवीकडे नव्याने बांधलेले दुर्गादेवीचे मंदीर पहायला मिळते. किल्ल्यात मुक्काम करायचा झाल्यास या मंदिरात मुक्काम करता येईल या शिवाय गावात एक मठदेखील आहे. मंदिराच्या पुढील भागात चौकोनी आकाराचा २.५ एकरात सामावलेला चौबुर्जी बालेकिल्ला आहे. याच्या २० फुट उंच तटाबुरूजावर चर्या बांधलेल्या असुन बंदुकीचा मारा करण्यासाठी जंग्या तर बुरुजावर तोफेसाठी झरोके बांधलेले आहेत. बालेकिल्ल्याचा दरवाजा व त्यातील लाकडी दारे आजही सुस्थितीत असुन दरवाजाच्या वरील बाजुस नगारखाना आहे. गावातील काही हुल्लडबाज लोकांमुळे या दरवाजाला सध्या टाळे लावलेले आहे. हा परीसर शिंदे सरकार यांची खाजगी मालमत्ता असुन सध्या त्यांचा मुक्काम कोल्हापुरला असतो. गढीच्या दरवाजातुन आत डोकावून पहिले असता उध्वस्त वाड्याचे अवशेष पहायला मिळतात. या गढीचे बांधकाम १८ व्या शतकात झाल्याची नोंद मिळते. गढीच्या बाहेर उत्तर बाजुस तटबंदीजवळ शिंदे यांचा नव्याने बांधलेला बंगला आहे. बालेकिल्ल्याच्या दरवाजाकडून सरळ जाणारा रस्ता भुतनाथ मंदीर संकुलाकडे जातो तर डावीकडील रस्ता नदीच्या दिशेने जातो. नदीच्या दिशेने गेल्यावर आपण किल्ल्याच्या पुर्व बाजुस असलेल्या तटबंदीजवळ येतो. या तटबंदीत दोन चौकोनी बुरुजांमध्ये बांधलेला लहान दरवाजा असुन या दरवाजाची कमान नक्षीदार खांबावर तोललेली आहे. दरवाजाच्या वरील बाजुस फुलांची व देवतांची शिल्प कोरलेली आहेत. या तटबंदीबाहेर काही अंतरावर किल्ल्याची नदीकाठी दुसरी तटबंदी आहे. या दोन्ही तटबंदीमधील भागात नदीच्या पाण्यावर शेती केली जाते. हा दरवाजा पाहुन पुन्हा बालेकिल्ल्याकडे यावे व सरळ रस्त्याने भुतनाथ मंदीर संकुलाकडे जावे. प्राकाराची भिंत असलेल्या या मंदिर संकुलात ५ मोठी व १ लहान अशी प्राचीन सहा शिवमंदीरे आहेत. हि सर्व मंदीरे ११ व्या शतकातील असुन चालुक्यांच्या राजवटीत राजा भुतंकुशानें बांधल्याचे सांगीतले जाते. हा किल्ला देखील त्याच्याच काळात बांधला गेला. मंदीरे पाहुन पुन्हा मुख्य रस्त्यावरील मशिदीजवळ यावे. येथुन सरळ रस्त्याने पश्चिमेला गेल्यावर आपण किल्ल्याच्या आतील तटबंदीत असलेल्या दरवाजाजवळ येतो. हा दरवाजा दोन चौकोनी बुरूजामध्ये बांधलेला असुन याच्यावर कोरीवकाम केलेले आहे. दरवाजाच्या बाहेरील बाजुस माशाचे शिल्प कोरलेले आहे. या दरवाजातुन देखील चारचाकी वाहन सहजपणे पार होते. हा दरवाजा पाहुन सरळ पुढे निघाल्यावर आपण किल्ल्याच्या शेवटच्या तटबंदीत असलेल्या दरवाजात येतो. या दरवाजावर खूप मोठया प्रमाणात कोरीवकाम केलेले आहे. दरवाजाच्या डाव्या बाजुस तटबंदीजवळ दगडी पुष्करणी आहे. किल्ल्याचा हा दरवाजा दगडी खांबावर तोललेला असुन या खांबावर भारवाहक कोरलेले आहेत. दरवाजाच्या संपुर्ण कमानीवर अतिशय सुंदर नक्षी कोरलेली आहे. दरवाजाबाहेर तटात एक लहान दालन असुन त्यातील शिल्पात शिवलिंग नंदी कोरलेले असुन दोन व्यक्ती वंदन करताना दाखवल्या आहेत. या दरवाजात रणमंडळाची रचना केलेली असुन दरवाजाचा पुढील भाग तटबंदीने बंदीस्त केला आहे. दरवाजाच्या या भागात चौकोनी आकाराचे सहा लहान बुरुज आहेत पण तटबंदीचा सुरवातीचा भाग व त्यातील दरवाजा कोसळल्याने हे सहजपणे लक्षात येत नाही. या दरवाजाने बाहेर आल्यावर आपण किल्ल्याबाहेरून जाणाऱ्या महामार्गावर येतो. येथे आपली तोरगळ नगरदुर्गाची भटकंती पूर्ण होते. किल्ल्याला अजुनही काही दरवाजे असुन ते आता वापरात नसल्याची माहिती गावकऱ्याकडून मिळते. तोरगळ किल्ल्यातील बहुतांशी वस्ती मराठी माणसांची आहे. नगरदुर्गाचा एकुण परिसर १०० एकरवर पसरलेला असुन याच्या तटबंदीत गोलाकार व चौकोनी आकाराचे लहानमोठे ७८ बुरुज आहेत. किल्ल्याच्या टेकडीवरील भागात चौकोनी आकाराचे ३२ बुरुज असुन माथ्यावरील तटबंदीलगत एक लहानसा चौकोनी बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या चार टोकावर चार गोलाकार बुरुज आहेत. माथ्यावरील तटबंदीत किल्ल्याबाहेर जाण्यासाठी एक दरवाजा आहे. किल्याच्या टेकडीवरील भागात एका वाड्याचे अवशेष वगळता इतर कोणतेही अवशेष दिसुन येत नाही. संपुर्ण किल्ला पुर्णपणे व्यवस्थित पहायचा ठरवल्यास दोन दिवस देखील कमी पडतील त्यामुळे आपण किल्ल्यावरील महत्वाचे अवशेष पहात तीन तासात किल्ल्याची धावती भेट उरकुन घ्यायची. तोरगळ किल्ला ११ व्या शतकात भूतंकुश नांवाच्या राजाने बांधल्याचे सांगितले जाते. इ.स. १६६२ च्या दरम्यान येथील स्थानिक पाळेगारांचे बंड मोडुन काढण्यासाठी खुद्द आदिलशहा या भागात आला. त्याने रायचूर व तोरगळ यांवर हल्ला करून हा भाग ताब्यात घेतला पण तोरगळचा किल्ला त्याच्या ताब्यात आला नाही. इ.स १६७५ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहिमेच्या काळात आपाजी सुरी हुबळीकर, जिवाजी शिंदे व मालोजी भोसले यांच्यासोबत या भागात सैन्य रवाना केले. यातील आपाजी सुरी यांनी नरगुंद रामदुर्ग या भागात छावणी केली तर जिवाजी शिंदे यांनी तोरगळ येथे छावणी केली. हा भाग ताब्यात घेतल्यावर येथील देसाई मराठयांना सामील झाले. पुढील काळात तोरगळ या भागाचे सत्ताकेंद्र बनले. महाराजांच्या मृत्युनंतर मुघलांच्या ताब्यात गेलेला हा किल्ला इ.स.१६९० सालीं नरसोजीराव शिंदे यांनी जिंकून घेतला व राजाराम छत्रपतीनें हा प्रांत नरसोजी रावाना सरंजामांत जहागीर म्हणून दिला. यानंतर तोरगळ किल्ल्यावर शिंदे घराण्यातील ९ पिढयानी राज्य केले. तोरगळ, मनोली आणि नेसरी येथील शिंदे घराणे एकच असुन करवीरच्या राणी जिजाबाई या तोरगळकर शिंदे यांच्या घराण्यातील होत्या. कोल्हापुर राज्यातील तोरगळ संस्थानावर नरसोजीराव शिंदे हे शेवटचे राजे असुन त्यांची कारकीर्द १९३२ – १९४९ पर्यंत होती.
© Suresh Nimbalkar