तोरखेडा

प्रकार : गढी

जिल्हा : नंदुरबार

उंची : 0

श्रेणी : सोपी

अदीवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी एक दोन नव्हे तर तब्बल १५ किल्ले गिरीदुर्ग, भुईकोट व गढी या स्वरुपात अस्तित्वात होते. मराठा व पेशवे कालखंडात १८१८ पर्यंत गायकवाड, होळकर, पवार, कदमबांडे, शिंदे या मराठी शासनकर्त्यांनी आपली सत्ता येथे प्रस्थापित केली. आमच्या दुर्गभरारी या समुहाने या सर्व किल्ल्यांचा अभ्यासपुर्ण दौरा केला असता मिळालेली माहिती या संकेतस्थळावर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. यातील हटमोईदा व अष्टे या दोन गढी पुर्ण नष्ट झालेल्या असुन उरलेले १३ गढीकिल्ले त्यांचे उर्वरित अवशेष संभाळत काळाशी झुंज देत आजही उभे आहेत. या १३ किल्ल्यात १ गिरिदुर्ग असुन ३ भुईकोट २ नगरकोट तर उरलेल्या ७ गढी आहेत. संस्थाने खालसा झाल्यावर खाजगी मालमत्ता असलेल्या या गढीकोटाची देखभाल करणे गढी मालकाला अवघड झाल्याने बहुतांशी गढीकोट उध्वस्त होत चालले आहेत. तोरखेडा गढी हि त्यापैकी एक. ... स्थानिकांची या वास्तुप्रती असलेली उदासीनता देखील या गढीकोटांच्या ऱ्हासाला कारणीभूत होत आहे. तोरखेडा गढी दक्षिण नंदुरबार भागात शहादा तालुक्यात शहादा पासुन २७ कि.मी. अंतरावर तर धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा पासुन ३१ कि.मी. अंतरावर आहे. तोरखेडा गढीला भेट देण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नंदुरबार-शहादा अथवा दोंडाईचा गाठावे लागते. नंदुरबार तोरखेडा हे अंतर ६८ कि.मी.असुन प्रकाशा-शहादा-कोथळी मार्गे तेथे जाता येते तर दुसरा मार्ग ६६ कि.मी.असुन नंदुरबार- दोंडाईचा-सारंगखेडा- कोथळी असा आहे. गावाच्या एका टोकाला तापी नदीकाठी हि गढी असुन गढीच्या आत सरदार कदमबांडे यांचा तीन मजली जुना भव्य वाडा आहे. गढीच्या तटबंदी व बुरुजांनी जरी माना टाकायला सुरवात केली असली तरी वाडा आजही सुस्थितीत असुन कदमबांडे यांचे वंशज आजही तेथे राहतात. गढी तिच्या मूळ स्वरुपात नसली तरी कदमबांडे वंशज तीला शक्य तितके जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत. साधारण दोन एकरमध्ये पसरलेल्या या गढीच्या चार टोकाला चार व दरवाजाशेजारी दोन असे सहा मोठे बुरुज असुन उत्तरेला मुख्य दरवाजा व दक्षिणेला लहान दरवाजा आहे. उत्तरेचा महादरवाजा त्याची कमान, लाकडी दारे व दरवाजा वरील वास्तुसकट शिल्लक असुन दक्षिणेकडील दरवाजा मात्र पुर्णपणे ढासळला आहे. या दरवाजातून नदीकडे उतरणाऱ्या पायऱ्या आहेत. तटबंदीची उंची २०-२५ फुट असुन तटबंदी व बुरुजाचे बांधकाम विटांनी केलेले आहे. वेळोवेळी झालेल्या दुरुस्तीमुळे या बांधकामाचे स्वरूप बदलून गेले आहे. गढीचा उत्तर-पुर्व बाजूचा बुरुज मोठया प्रमाणात ढासळलेला आहे. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्याच्या देवड्या असुन आतील बाजुने तटावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्याच्या आतील भागात एक खोल विहीर असुन या विहिरीचे पाणी आजही वापरात आहे. गढीच्या एका कोपऱ्यात उंचावर चुन्यात बांधलेली पाण्याची टाकी असुन या टाकीतील पाणी कधीकाळी वाड्यात फिरविले असावे. वाडयाच्या मागील बाजूस एक भलेमोठे तुळशी वृंदावन आहे. किल्ल्यातील बुरुजावरून तापी नदीचे दूरवर पसरलेले पात्र व खुप लांबवरचा प्रदेश दिसुन येती. वाडयाच्या आत रहात असल्याने बाहेरूनच आपली गडफेरी आटोपती घ्यावी लागते. वाड्यात आमची भेट कदमबांडे यांच्या वंशजांबरोबर झाली असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गढी रावळ यांनी बांधलेली असुन सरदार कदमबांडे यांनी हा भाग जिंकुन घेताना हि गढी देखील जिंकली. अधिक माहितीसाठी इतिहासाची पाने शोधली असता मिळालेली माहिती अशी १३ व्या शतकात सोळंकी सरदार सुजानसिंह रावल यांनी सोनगिरी किल्ल्यावर हल्ला करून तो ताब्यात घेतला. त्यांचे वंशज केसरीसिंह यांचा मुलगा मोहनसिंह याने तोरखेड़ा गढ़ी बांधली व जवळपास २२५ गावावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले त्यात रनाळे गावाचा समावेश होता. या वाड्यात सरदार कदमबांडे यांची जुनी छायाचित्रे व कागदपत्रे आजही पहायला मिळतात. सरदार कृष्णाजी कदमबांडे व व्यंकोजी कदमबांडे हे निजामशाहीतील मातब्बर सरदार होते. निजामशाहीचा अस्त झाल्यावर ते मोगल सत्तेकडून अळकुटी गावी जहागीरदार म्हणून कारभार पाहू लागले. इंग्रजांच्या कागदपत्रात यांचा उल्लेख स्वत:स राजे समजणारे, स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र ध्वज, घोडदळ, पायदळ बाळगणारे असा आला आहे. छत्रपती शाहुमहाराज औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर अमृतराव कदमबांडे त्यांच्या पक्षात सामील झाले. इ.स.१७१० ते १७३५ हा काऴ कदमबांडे घराण्याचा सुवर्णकाऴ होता. सरदार अमृतराव कदमबांडेंची दोन्ही मुले रघोजीराव व कांताजी हे मोठे पराक्रमी निघाले. सरदार कांताजी कदमबांडे यांचेकडील घोडदळात असलेले मल्हारराव होळकर पुढे आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे फार मोठे सरदार झाले. इ.स. १७२० साली अमृतराव व कांताजी यांनी गुजरात भागात चढाई करून या स्वारीतून प्रचंड धन प्राप्त केले. बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत कांताजीरावांनी गुजरात मोहिमेत पराक्रम गाजवला. त्यावेळी रावळाचे वतन असलेला धुळे, रनाळा, कोपर्ली, तोरखेड हा परीसर त्यांना जहागिरी म्हणून मिळाला. त्यांनी तोरखेड येथे आपले मुख्यालय केले तर कोपर्लीला सैनिकांची छावणी केली. छत्रपती शाहुराजांनी कांताजीपुत्र मल्हारराव यांच्यासोबत त्यांची कन्या गजराबाई हिचे लग्न लावून दिले आणि भोसले-कदमबांडे यांची सोयरीक झाली. इ.स. १७५० मध्ये मल्हारराव कदमबांडे तोरखेड येथे स्थायिक झाल्याने अळकुटीच्या गादीचे महत्व कमी होऊन तोरखेडच्या गादीला महत्व प्राप्त झाले.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!