तोंडवली
प्रकार : सागरी दुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग
उंची : 0
श्रेणी : सोपी
कोकणातील काही किल्ले आज काळाच्या उदरात नष्ट झाले असुन काही किल्ल्यांची नोंद केवळ इतिहासाच्या पानात उरली आहे. इतिहासाच्य कागदपत्रात डोकावणारे हे किल्ले तेथे प्रत्यक्षात होते कि नव्हते याबाबत प्रश्नचिन्हच उद्भभवते. आपल्या अस्तीत्वाबद्दल अशीच काही गुपिते बाळगणारा किल्ला म्हणजे तोंडवलीचा कोट. मालवण तालुक्यात असलेल्या तोंडवलीच्या कोटाची स्थाननिश्चिती होत नसल्याने हा कोट आज इतिहास अभ्यासकांसाठी एक प्रश्नचिन्ह आहे. तोंडवली गाव मालवण शहरापासुन १८ कि.मी.अंतरावर तर सर्जेकोट पासून ८ कि.मी. अंतरावर आहे. तोंडवली गावात या किल्ल्याचे अवशेष सापडत नसले तरी गावात असलेल्या वाघेश्वर मंदिराच्या मागील बाजुने एक घडीव दगडात बांधलेली पायऱ्याची वाट पाठीमागील १५० फुट उंचीच्या टेकडीवर जाते. या वाटेच्या शेवटी टेकडीचे पठार असुन तेथे ध्वजस्तंभ उभारलेला आहे. पठाराच्या काठावर असलेला कडयाचा भाग काही ठिकाणी कडयापासुन वेगळा केलेला दिसतो.
...
हे दगड बहुदा कडयावरुन पठारावर येणारा मार्ग अवघड करण्यासाठी तसेच दगडी चिरे काढण्यासाठी पठारापासून वेगळे करण्यात आले असावेत असे वाटते. पण किल्ल्याच्या अस्तित्वाबाबत मात्र ठोस विधान करता येत नाही. वाघेश्वर मंदीराच्या अलीकडे रस्त्याशेजारी खडकात खोदलेली ५x८ फुट आकाराची गुहा पहायला मिळते. या गुहेत शिरण्यासाठी २x३ फुट आकाराचा दरवाजा कोरला आहे. इ.स.१७५६ मध्ये हा तुळाजी आंग्रेकडून विजयदुर्ग घेतल्यावर हा प्रदेश पेशव्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर धुळप यांनी १७६१ दरम्यान कोळंब खाडीच्या आतील बाजुस काठावरच असलेल्या तोंडवली येथे मेढा बांधण्यास सुरवात केली. १९ जानेवारी १७७३ मध्ये करवीरकर व पेशवे यांच्यात झालेल्या तहातील एका कलमात या किल्ल्याचा उल्लेख येतो. यात करवीरकरांनी त्यांच्या ताब्यातील सर्जेकोटाजवळ हा कोट असल्याने तो बांधण्यास मनाई करण्याचे सुचवले असुन पेशव्यांनी त्यावर हा कोट बांधला जाणार नाही असे आश्वासन दिले आहे. पण प्रत्यक्षात हा तह अमलात न आल्याने हा कोट बांधला गेला कि नाही हे कळत नाही.
© Suresh Nimbalkar