तुंगी

प्रकार : गिरीदुर्ग

जिल्हा : नाशिक

उंची : ३६१२ फुट

श्रेणी : मध्पम

बागलाण प्रांतांची भटकंती करत असताना सेलबारी-डोलबारी डोंगर रांगेवर असलेले दोन सुळके सतत आपले लक्ष वेधुन घेतात व त्या सुळक्याविषयी ओढ आपल्या मनात निर्माण होते. हे सुळके म्हणजे जैन धर्मीयांची प्राचीन लेणी असुन त्यांचे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तीर्थक्षेत्र आहे. बागलाण मधील किल्ल्यांची भटकंती या सुळक्यांना भेट दिल्याशिवाय पूर्ण होत नसल्याने या सुळक्याना भेट देणे क्रमप्राप्त आहे. सटाणा तालुक्यात असलेल्या मांगी तुंगी सुळक्याना भेट देण्यासाठी आपल्याला या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या भिलवड गावात यावे लागते. नाशिक–सटाणा- ताहराबाद मार्गे भिलवड गाव साधारण १५० कि.मी. अंतरावर आहे. भिलवाडी गावामध्ये जैनांची काही मंदीरे असुन हि मंदीरे देखील मांगीतुंगी या नावाने ओळखली जातात. मांगीतुंगी सुळक्यावर जाण्यासाठी गावातुन दोन मार्ग आहेत. भिलवडी गावातील मुख्य रस्त्याने या शिखरांच्या दिशेने पुढे आल्यावर रस्त्याला दोन फ़ाटे फ़ुटतात. उजवीकडील रस्ता मांगीतुंगी डोंगराच्या पायथ्याशी जातो तर डावीकडील रस्ता न्हावी गडाच्या दिशेने जातो. ... उजवीकडील रस्त्याने डोंगराच्या पायथ्याशी गेल्यास या दोन्ही सुळक्यांवर जाण्यासाठी सुमारे २५०० पायऱ्या चढाव्या लागतात. तळातून पायऱ्यांच्या वाटेने सुरवात केल्यास अर्धे अंतर पार केल्यावर डाव्या बाजुस कातळात कोरलेल्या दोन गुहा आहेत. यातील एका गुहेत भगवान नैनीनाथांची मुर्ती असुन दुसऱ्या गुहेत भगवान सुव्रतनाथांची मुर्ती आहे. गुहेत दालने कोरलेली असुन जवळच पाण्याची टाकी देखील आहेत पण यातील पाणी पिण्यायोग्य नाही. या वाटेने सुमारे २००० पायर्यां चा चढ चढून गेल्यावर आपण एका दगडी कमानीपाशी पोहोचतो. पायथ्यापासून या कमानी पर्यंत येण्यास २ तास लागतात. सुळक्यावर जाणारी दुसरी वाट न्हावीगडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याने साधारण अर्धा कि.मी. पुढे आल्यावर सुरु होते. हि वाट कमी श्रमाची व कमी वेळ खाणारी असुन काहीशी खर्चिक आहे. मांगी सुळक्याखाली ४००० फुट उंचीवर जैन धर्मीयांचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांची १०८ फ़ूट उंच मुर्ती कातळात कोरण्यात आली असुन या मूर्तीचा प्राण-प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक सोहळा फेब्रुवारी २०१६ मध्ये करण्यात आला. या मुर्तीपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता बनविलेला आहे. या रस्त्याने वर भाविकांची ये-जा करण्यासाठी येथील संस्थेने खाजगी वाहनांची सोय केली असुन त्यासाठी प्रतिव्यक्ती १०० रुपये देणगी शुल्क आकारले जाते. हा मार्ग खूपच सोयीचा असुन रस्ता कच्चा व उभा चढ असल्याने त्यावर ४ x ४ वाहनाचा वापर केला जातो. आपले खाजगी वाहन या वाटेने वर नेणे धोक्याचे असल्याने त्यासाठी परवानगी दिली जात नाही. या वाटेने १५ मिनीटात आपण भगवान महावीरांच्या मुर्तीपर्यंत पोहोचतो. भगवान महावीरांचे दर्शन घेऊन १० मिनीटात आपण खालुन वर येणाऱ्या पायऱ्यांवर पोहोचतो. पुढे पिण्याचे पाणी नसल्याने पुरेसे पाणी महावीरांच्या मुर्ती कडूनच भरून घ्यावे. दुसऱ्या वाटेने आल्यास आपले साधारण १८०० पायऱ्या चढण्याचे श्रम कमी होतात. येथुन साधारण २०० पायऱ्या चढुन गेल्यावर आपण सुरवातीला उल्लेख केलेल्या दगडी कमानीजवळ पोहोचतो. या वाटेने वर चढताना अनेक ठिकाणी कातळात कोरलेला जुना पायरीमार्ग दिसुन येतो. या कमानीतून आत आल्यावर उजवीकडील वाट तुंगी सुळक्याकडे जाते तर डावीकडील वाट मांगी सुळक्याकडे जाते. तुंगी सुळक्याचे अंतर व उंची मांगी सुळक्यापेक्षा जास्त असल्याने सर्वप्रथम तो भाग पाहुन घ्यावा. दरवाजातुन उजवीकडे वळल्यावर आपण आपण मांगी-तुंगी सुळक्यामध्ये असलेल्या डोंगरसोंडेवर येतो. या सोंडेवरून १५ मिनिटे चालल्यावर आपण तुंगी सुळक्याच्या पायथ्याशी येतो. या वाटेवर आपल्याला एका संगमरवरी मंदीरात श्रीराम व बलभद्र यांच्या पादुका तसेच कृष्णकुंड नावाचे कातळात कोरलेले पाण्याचे टाके पहायला मिळते. कृष्णकुंड कृष्णाच्या शेवटच्या दिवसाचे प्रतीक समजले जाते. या डोंगर सोंडेवर बलरामाने श्रीकृष्णावर अग्निसंस्कार केले व त्यानंतर त्याने जैन धर्माची दिक्षा घेतली अशी आख्यायिका आहे. येथुन साधारण ३०० पायर्या चढून अर्ध्या तासात आपण तुंगी सुळक्याच्या पोटात असलेल्या जैन लेण्यांकडे येतो. या ठिकाणी तुंगी सुळक्याची समुद्रसपाटीपासुन उंची ३६१२ फुट आहे. तुंगी सुळक्याला प्रदक्षिणा मार्ग असुन या मार्गाने संपुर्ण सुळक्याला प्रदक्षिणा मारता येते. या प्रदक्षिणा मार्गावर पाण्याचे एक टाके व तीन गुहा असुन या तीनही गुहेत जैन तिर्थंकरांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. या मुर्तीना लेप देऊन त्यांचा टिकाऊपणा वाढवलेला आहे. पहिली गुहा रामचंद्र भगवान यांची असुन या गुहेत तीन ध्यानस्थ जैन मुनी कोरलेले आहेत. दुसरी गुहा चंद्रप्रभू भगवान यांची असुन त्यांच्या मुर्तीच्या दोन्ही बाजुस तीन-तीन जैन मुनी कोरलेले आहेत.यापुढील गुहा म्हणजे पंचबालायती गुहा. या गुहेत महावीरांच्या विविध रूपातील पाच मुर्ती कोरलेल्या आहेत. सुळक्याच्या पोटात पाण्याचे एकमेव टाके असुन त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही. गुहेत कोरलेल्या या मुर्ती व्यतिरिक्त बाहेर कातळावर देखील काही देवतांच्या मुर्ती कोरलेल्या आहेत. तुंगी शिखराला वळसा मारून झाल्यावर मांगी सुळक्याच्या दिशेने आपला प्रवास सुरु करावा. तुंगी शिखर पाहुन कमानीपर्यंत यायला एक तास पुरेसा होतो. भिलवाड गावात जैन धर्मीयांची धर्मशाळा असुन येथे नाममात्र शुल्क भरून राहण्याची तसेच जेवणाची सोय होते.मांगी-तुंगी हे एक जैन सिद्ध-क्षेत्र असुन येथे हनुमान, सुग्रीव, नल, नील, महानील, गव, गवाक्ष आणि रामायणातील इतर ९९ वानररूपी योद्ध्यांना जीवनातून मुक्त होऊन मोक्ष मिळाला अशी जैन धर्मीयांची श्रद्धा आहे. बागलाणच्या बागुलवंशीय राठोड घराण्याचा ११ वा राजा विरमशहा राठोड याने मांगी तुंगीची लेणी खोदवून घेतली. टीप- मांगीतुंगी सुळक्यांवर चालत जाण्यासाठी सकाळी लवकर सुरवात केल्यास उन्हाचा त्रास कमी जाणवतो. पायथ्यापासून दोन्ही सुळके पाहुन परत येण्यासाठी ६ तास लागतात. मांगीतुंगी सुळक्यांच्या वाटेवर व सुळक्यांवर कोठेही पिण्यायोग्य पाणी नाही त्यामुळे पाणी तळातून अथवा वाटेवर भगवान महावीर यांच्या मुर्तीकडून भरून घ्यावे.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!