तिसगाव

प्रकार : नगरकोट

जिल्हा : अहमदनगर

महाराष्ट्रात तिसगाव नावाने ओळखली जाणारी गावे बहुतांशी जिल्ह्यात आहेत. प्रत्येक गावात या नावाची उत्पत्ती कशी झाली किंवा गावाला तिसगाव नाव कसे पडले याची विविध कारणे सांगितली जातात. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या तिसगाव या गावाच्या नावाच्या उत्पतीबद्दल असेच एक कारण सांगितले जाते. या गावाला कधीकाळी तीस वेशी होत्या अन तीस वेशींचे गाव ते तिसगाव अशी या गावाच्या नावाची उत्पत्ती सांगितली जाते. पण प्रत्यक्ष गावाला भेट दिल्यावर गाव फिरताना मात्र ते तितकेसे खरे वाटत नाही. आज या गावात प्रत्यक्षात पाच वेशी असून या पाचही वेशी पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहेत. या पाचही वेशीना लोखंडी कुंपण घातलेले असुन पुरातत्व खात्याकडून या वेशींची देखभाल केली जाते. चला तर मग या वेशींची भटकंती करायला. अहमदनगर जिल्ह्यात असलेले तिसगाव हे गाव पाथर्डी या तालुक्याच्या ठिकाणाहुन १२ कि.मी.अंतरावर तर अहमदनगर येथुन ४० कि.मी.अंतरावर आहे. मुंबई-पुणे येथुन पाथर्डीमार्गे जाताना तिसगाव मध्ये मुख्य रस्त्यावर असलेली वेस अगदी सहजपणे नजरेस पडते. पण उर्वरीत चार वेशी मात्र गावाच्या विविध भागात विखुरलेल्या आहेत. ... गावात चौकशी करूनच या सर्व वेशी फिरता येतात. अहमदनगर- पाथर्डी रस्त्यावर असलेली वेस अहमदनगर वेस म्हणुन ओळखली जाते. अतिशय भव्य अशी हि वेस साधारण ४० फुट उंच असुन वेशीच्या चारही बाजूस कमानीवजा भव्य दरवाजे आहेत. चौकोनी आकाराची हि वेस साधारण ४० x ४० फुट आकाराची असुन या वेशीत एकंदरीत दोन मजले आहेत. वेशीच्या वरच्या मजल्यावर चारही बाजूस दालने असुन या दालनाच्या बाहेर कधी काळी सज्जे असल्याचे दिसून येते. कारण हे सज्जे नष्ट झाले असले तरी या दालनाबाहेर सज्जाखाली असलेल्या लाकडी तुळई आजही पहायला मिळतात. या वेशीची एकंदरीत रचना पहाता हा नगरकोटाचा दरवाजा मात्र नाही हे नक्की. या वेशीच्या जवळच एक मध्ययुगीन काळातील दगडी बांधकामाचे शिवमंदिर असुन या मंदिरामागे चावीच्या आकाराची बारव पहायला मिळते. हि बारव पूर्णपणे दगडात बांधलेली असुन या बारवमध्ये उतरण्यासाठी एका बाजुस पायऱ्या आहेत. हे मंदीर पाहून झाल्यावर पुढील वेस पाहण्यास निघावे. गावात इतरत्र असलेल्या दोन वेशींची रचना यापेक्षा फारशी वेगळी नाही. यातील एक वेस गावाबाहेर असलेल्या दगडखाणी बागवान मशीद जवळ असुन दुसरी वेस गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या पावन हनुमान मंदिराजवळ आहे. या तीनही वेशींचे बांधकाम एकसमान असुन या स्वतंत्र इमारती आहेत. या तीनही वेशींचा कोटाच्या बांधकामाशी संबंध दिसून येत नाही. याशिवाय उर्वरीत दोन वेशी या कमानीवजा असुन यातील एक कमान वृद्धेश्वर विद्यालयजवळ असुन दुसरी कमान तिसगाव –शिरापुर रस्त्यावर आहे. या कमानी साधारण ३० फुट उंच असुन याची रचना इतर वेशीमधील एका कमानीच्या दरवाजा प्रमाणे आहे. या पाचही वेशीमध्ये बाहेरील बाजूस असलेल्या मोठमोठ्या लाकडी तुळया पहाता या वेशींना लागुन काही प्रमाणात इतर बांधकाम देखील असावे. गाडी सोबत असल्यास या पाच वेशी व्यवस्थित पाहण्यासाठी साधारण दोन तास लागतात. याशिवाय तिसगाव मधील तुळजापूर पेठ मध्ये आपल्याला प्राचीन शिवमंदिर पहायला मिळते. या मंदिराचे सध्याचे नामकरण पुरातन महादेव तुळजाभवानी मंदिर असे झालेले आहे. या मंदिर परिसरात अनेक वीरगळ व काही मंदिराचे अवशेष पडलेले आहेत. मंदिराच्या खांबावरून मंदिर साधारण आठव्या शतकातील म्हणजे चालुक्यकालीन असावे असे वाटते. तिसगाव वेशी पहाताना आपण जवळच असलेल्या पाथर्डी गावातील नगरकोटाचे अवशेष देखील पाहू शकतो. तीसगावाभोवती नगरकोट असावा का ? या बद्दल ठामपणे सांगता येत नाही कारण येथे कोटाचे कोणतेही अवशेष दिसुन येत नाहीत. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव हे छोटेसे पण ऐतिहसिक गाव. निजामशाही काळात तिसगाव हे बाजारपेठेचे ठिकाण होते. पैठणाला जोडणाऱ्या रस्त्यावर हे गाव असल्यामुळे या गावाला पूर्वीपासून महत्त्व होते. निजामशाहीतील सलाबत खान याचे वास्तव्य या गावात होते. सध्या दिसत असलेल्या पाच वेशी निजामशहाच्या काळात या गावात त्यानेच बांधल्याचे स्थानिक सांगतात. या शिवाय त्याचा महाल आणि संपूर्ण गावात भोवती तटबंदी असल्याचे स्थानिक सांगतात पण आज तटबंदीचे कोणतेही अवशेष पहायला मिळत नाहीत.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!