तासगाव गणपती

प्रकार : मध्ययुगीन गणेश मंदीर

जिल्हा : सांगली

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव शहरातील गणपती मंदिर महाराष्ट्रात बऱ्यापैकी प्रसिद्ध आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे बहुतेक गणपती मूर्तीची सोंड डाव्या बाजूला झुकलेली असते पण या मंदीरातील मुर्तीची सोंड उजवीकडे झुकलेली आहे. ही मूर्ती १२५ किलोग्रॅम वजनाची असुन पंच धातुंनी बनविल्याचे सांगीतले जाते. तासगाव गणपती मंदिराचे बांधकाम हे कर्नाटकातील कारागीरांनी केले असल्याने मंदिराची वास्तुकला दक्षिण भारतीय शैलीतील आहे. मंदीराची रचना अतिशय भव्य दिव्य आहे. या मंदिरात तीन मुख्य भाग आहेत: गोपूरम (प्रवेशद्वार), मंडप (सभामंडप) आणि गर्भगृह (मुख्य देवस्थान). मंदिराच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असुन आतील बाजुस प्रशस्त पटांगण आहे. त्यासमोर प्रवेशद्वार आणि देवस्थानची कचेरी आहे. शेजारी रथगृह आहे. प्रवेशद्वारावर ७ मजले असलेले साधारण ९६ फूट उंचीचे गोपूर आहे. या गोपुरावर विविध देवता आणि पुराणकथांशी संबंधित शिल्पे कोरलेली आहेत. तेथून पुढे गेल्यावर मुख्य मंदिरासमोर दगडी कारंजे आहे. मंदीराच्या पश्‍चिम बाजूला नक्षीदार खांबांनी केलेला सभामंडप, गणेशाचे गर्भगृह व त्याला लागुन इतर चार देवतांची मंदीरे आहेत. ... मंदिराचा सभामंडप दोन रांगेतील नक्षीदार खांबावर तोललेला आहे. यामध्ये तीन मार्गिका आहेत. सभामंडपाचे छप्पर कोरीव दगडांच्या पट्ट्यांनी झाकलेले आहे. प्रवेशद्वाराजवळ नंदी आणि गरुड यांच्या दोन भव्य मूर्ती उभ्या आहेत. मंदिराच्या संपुर्ण परिसराला प्राकार म्हणजे दगडाची भिंत घालुन बंदिस्त करण्यात आले आहे. त्यातुन बाहेर पडण्यासाठी प्रत्येक दिशेला एक दरवाजा बांधण्यात आला आहे. तासगावचे संस्थानिक श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन हे पटवर्धन घराण्यातील पराक्रमी सरदार होते. या घराण्याचे मूळ पुरूष हरभट (बाबा) पटवर्धन हे होते. कोकणातील गणपतीपुळ्याजवळील कोतवडे हे त्यांचे मूळ गाव. हरभट बाबांचे एक चिरंजीव म्हणजे रामचंद्रपंत आणि त्यांचे चिरंजीव म्हणजे परशुराभाऊ. इ.स.१७५५ ते १७९९ या काळात परशुराभाऊंनी अनेक लढायांमध्ये पराक्रम गजवला. माधवराव पेशवे यांनी पानिपतच्या युद्धानंतर भाऊंना कसबे तासगावची नेमणूक दिली. इ.स.१७७० ते १७९९ या कालंखंडात भाऊंनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. टिपू सुलतान बरोबरही भाऊंची अनेक युद्धही झाली. या मोहिमांच्या दरम्यान त्यांना कर्नाटक आणि श्रीरंगपट्टण येथील मंदिरांची भव्यता आणि स्थापत्यशास्त्र पाहण्याची संधी मिळाली. या मंदिरांच्या सौंदर्याने प्रभावित होऊन त्यांनी तासगाव येथे अशाच प्रकारचे भव्य मंदिर उभारण्याचे ठरवले. १७७९ मध्ये भाऊ तासगाव येथे स्थायिक झाले. त्यावेळी भाऊंनी कर्नाटक इथून गवंडी, सुतार, शिल्पकार आणि राजस्थानातून चित्रकार आणून इ.स.१७७१ ते १७७९ या काळात तासगाव येथे सिद्धीविनायकाचे भव्य मंदीर उभारले. सन १७७९ मधे फाल्गून शुद्ध चतूर्थी या शुभदिनी उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाची प्रतिष्ठापना केली. त्या वेळेपासून तासगाव येथील श्री गणपती पंचायतन संस्थानचा गणपती केवळ दीड दिवसांचा असतो. भाऊंनी श्रीरंगपट्टण येथे पाहिलेली रथोत्सवाची कल्पना तासगावात प्रत्यक्षात आणली. रथोत्सवासाठी प्रथम भाऊंनी तीन मजली लाकडी रथ तयार केला. तासगाव गणपती मंदिराच्या रथोत्सवाची परंपरा इ.स.१७८५ साली सुरू झाली. हा रथ पाच मजली आणि तीस फूट उंचीचा आहे. दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान या रथोत्सवास सुरवात होते. राजवाड्यात प्राणप्रतिष्ठापना केलेली मातीची मूर्ती आणि संस्थानची १२५ किलोची पंचधातूंची मूर्ती पालखीतून वाजत गाजत मंदिरात आणली जाते. त्यानंतर तेथे दोन्ही मूर्तींची आरती केली जाते. त्यानंतर जमलेला लाखो भाविकांचा जनसमुदाय गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया च्या जयघोषात रथ ओढण्यास सुरवात करतो. हा रथ कापूर ओढय़ाकाठी सुमारे अर्धा कि.मी. अंतरावर असलेल्या कार्तिककस्वामींना भेटण्यास काशीविश्‍वेश्‍वराच्या मंदीरापर्यंत ओढत नेला जातो. तेथे आरती करून मातीच्या मुर्तीचे कापूर नाल्यात विसर्जन केलं जातं. विसर्जनानंतर पंचधातूंच्या मुर्तीसह मिरवणूक पुन्हा गणपती मंदीराकडे येते.
© Suresh Nimbalkar

पुढे वाचा...

छायाचित्रे

error: Content is protected !!